मुंबईवरील वर्चस्वासाठी निकराची लढाई

मुंबईतला मराठी मतदार निवडणुकीत जागृत राहून मुंबईसाठी म्हणून मतदान करणार की, प्रचाराच्या लाटेबरोबर वाहत जाणार
मुंबईवरील वर्चस्वासाठी निकराची लढाई

मातीत गाडण्याची आणि अस्मान दाखवण्याची भाषा सुरू झाली आहे, यावरून मुंबई महापालिकेची निवडणूक किती रंगतदार होईल, याची कल्पना येऊ शकते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गणेश दर्शनाच्या निमित्ताने केलेला मुंबई दौरा म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची पूर्वतयारी होती. या दौऱ्यामध्ये शहा यांनी जी भाषा वापरली, त्या भाषेचीही खूप चर्चा झाली. कानफटात मारण्यापासून मातीत गाडण्यापर्यंतच्या त्यांच्या भाषेबाबतच्या प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. आपल्याकडे मुंबई राखता आली नाही, याचे शल्य गुजरातच्या राज्यकर्त्यांच्या मनात सहा दशकांहून अधिक काळापासून आहे. हे शल्य दूर करण्यासाठी गुजरातच्याच विद्यमान नेतृत्वाने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईवरील शिवसेनेचे पर्यायाने मराठी माणसांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे. गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार हा त्यांचा त्यासाठीचा प्रमुख आधार आहे. शिवसेनेतून फुटून निघालेला एकनाथ शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राज ठाकरे यांच्या मदतीने मराठी मतदारांना आपल्याकडे ओढून त्यांना ही मोहीम फत्ते करावयाची आहे. मुंबई अमराठी माणसांच्या हातात गेली तरी चालेल; परंतु उद्धव ठाकरे यांचे राजकारण संपले पाहिजे, अशा वेडाने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांना सध्या पछाडलेले दिसते. भारतीय जनता पक्षासाठी हे फायद्याचेच आहे. अर्थात, मुंबईतला मराठी मतदार निवडणुकीत जागृत राहून मुंबईसाठी म्हणून मतदान करणार की, प्रचाराच्या लाटेबरोबर वाहत जाणार, हाही प्रश्न आहेच.

शिवसेनेसाठी यंदाची निवडणूक खूपच कठीण आणि आव्हानात्मक आहे. कारण २०१७च्या निवडणुकीत सत्ता राखता राखता शिवसेनेच्या तोंडाला फेस आला होता. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या मुंबईच्या भारतीय जनता पक्षाने जवळपास शिवसेनेइतक्या जागा मिळवल्या होत्या. मुंबईतील एकूण २२७ वॉर्डांपैकी शिवसेनेला ८४, भाजप ८२, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी ९, मनसे ७ आणि इतर उमेदवारांना १४ जागांवर विजय मिळाला होता. शिवसेना सर्वात मोठा पक्ष बनला असला तरी भारतीय जनता पक्षाला फक्त दोन जागा कमी मिळाल्या होत्या. आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपची सूत्रे आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहेत. शिवाय शिवसेनेत मोठी फूट पडल्यामुळे खासदार, आमदारांसह अनेक नगरसेवकांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. अशी शिवसेना राज्यातील सत्ता, केंद्रातील सत्ता पाठीशी असलेल्या भाजपशी कसा सामना करणार हा खरा प्रश्न आहे. आजवर शिवसेना मराठी माणसाचे राजकारण करीत आली, त्याला हिंदुत्वाची जोड होती. महाविकास आघाडीसोबत गेल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता आणि महापालिका निवडणुकीतही तो सुरू ठेवला जाईल. शिवसेनेच्या मराठी मतपेटीवर डल्ला मारण्यासाठी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा वापर केला जाईल.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकलेले दिसताहेत. सध्याचे राजकीय चित्र पाहता महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊ शकते. काँग्रेस या आघाडीत असण्याची शक्यता कमी आहे. कारण कमी-जास्त प्रमाणात का असेना; पण काँग्रेसची मुंबईत सर्वत्र ताकद आहे. काँग्रेसला मानणारा मतदारही सगळीकडे आहे. आघाडी केली तर अनेक ठिकाणी काँग्रेसचा पारंपरिक मतदार शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठवून दिल्यासारखे होईल. त्यामुळे मुंबईतील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि असलेला पाया मजबूत करण्यासाठी काँग्रेस स्वबळावर लढण्याचा पर्याय स्वीकारेल, त्याचाही काही प्रमाणात फायदा भाजपला होऊ शकतो.

२०१७च्या महापालिका निवडणुकी वेळी भाजप आणि शिवसेना महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये एकत्र होते, तरीही त्यांनी महापालिकेची निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढवली होती. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. २०१९ची विधानसभा निवडणूक एकत्र लढवल्यानंतर भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीचा प्रयोग केला. त्यामुळे सुमारे तीन दशके युतीमध्ये एकत्र राहिलेल्या दोन पक्षांमध्ये कमालीचे वितुष्ट निर्माण झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते टोकाला पोहोचले आहे. अन्य कुठल्याही सत्तेपेक्षा मुंबई महापालिकेची सत्ता शिवसेनेसाठी सर्वाधिक महत्त्वाची ठरत आली आहे. शिवसेनेचे प्राण मुंबई महापालिकेमध्ये आहेत, असेही म्हटले जाते. २०१७च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मारलेल्या मुसंडीमुळे शिवसेनेचे प्राण कंठाशी आले होते; परंतु थोडक्या फरकाने सत्ता राखण्यात शिवसेनेला यश आले होते. सध्या शिवसेनेची ताकद खच्ची झाली असताना दुसरीकडे भाजपची ताकद सत्तेच्या अंगाने आणि जनाधाराच्या अंगानेही वाढली आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी गणेशोत्सवातील दर्शनाच्या निमित्ताने मुंबईचा दौरा करून भाजपच्या नेते-कार्यकर्त्यांना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी कानमंत्र दिला. त्यामुळे भाजपच्या गोटामध्ये चैतन्याच्या लाटा उसळू लागल्या आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भाजपने आधीच मुंबईभर पोस्टरबाजी करून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या व्होट बँकेला धक्का देण्याबरोबरच आशिष शेलार यांच्यासारख्या नेतृत्वाच्या माध्यमातून मराठी माणसांनाही आपलेसे करण्याची रणनीती भाजपने आखलेली दिसते. शिवसेनेला जेवढे म्हणून खच्ची करता येईल, तेवढे करण्याचा निर्धारही करण्यात येत आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यातून तोच संदेश देण्यात आला आहे.

भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने महाविकास आघाडीचा प्रयोग केला, त्यानंतरच्या अनेक प्रश्नांबाबत लोकांच्या मनात संभ्रम होता. महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने बनलेले सरकार असल्याची टीका भाजपच्या वतीने करण्यात येत होती. तर अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन भाजपने न पाळल्यामुळे युती तोडावी लागल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत होते. युतीच्या चर्चेत असलेल्या अमित शहा यांनी मात्र त्यासंदर्भात तपशीलवार बोलणे आतापर्यंत टाळले होते. ताज्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने त्यासंदर्भातही त्यांनी मौन सोडले. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिला असून त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. एकवेळ अन्याय सहन करा; परंतु कोणी धोका दिला तर सहन करू नका, असे सांगून अमित शहा यांनी आपली आगामी दिशा स्पष्ट केली. मी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाबाबत कुठलेच वचन दिले नव्हते.

आम्ही राजकीय चर्चा उघडपणे करतो, बंद खोलीत नाही, असे सांगून शहा यांनी मुंबई महापालिकेसाठी ‘मिशन १५०’ची घोषणा केली आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीसंदर्भात भाष्य करताना, उद्धव ठाकरे यांच्या लोभामुळेच शिवसेना फुटली आणि त्यांचे मुख्यमंत्रिपद गेल्याचे शहा म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी फक्त भाजपलाच धोका दिलेला नाही, त्यांनी महाराष्ट्राच्या विचारधारेला आणि महाराष्ट्राच्या जनमतालाही धोका दिल्याचा घणाघातही त्यांनी केला. शहा यांच्या वक्तव्यांचा एकूण सूर पाहता शिवसेनेचा पराभव करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी त्यांनी ठेवलेली दिसते. केंद्रात सत्ता असताना आणि अनेक राज्यांमध्ये सत्ता मिळवली असताना महाराष्ट्राच्या सत्तेतून भाजपला अपमानास्पदरीत्या बाहेर ठेवल्याचा सल त्यांनी पहिल्यांदाच व्यक्त केला आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता हिसकावून घेतली, तर शिवसेनेचा राज्य पातळीवरही वेगाने ऱ्हास होऊ शकेल, अशी भाजपची धारणा दिसते आणि त्यात तथ्यही आहे. अशा आव्हानाला शिवसेना कशी सामोरी जाते, हेही पाहणे नजिकच्या काळात कुतूहलाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in