अढळ श्रद्धेच्या गर्दीत चार धामची ठिसूळ वाट

चार धाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असताना हिमालयातील पर्वतरांगा ठिसूळ दगडाच्या असल्याचे विसरुन चालणार नाही. सहाजिकच तिथल्या रस्त्यांची वाहन क्षमता मर्यादित आहे.
अढळ श्रद्धेच्या गर्दीत चार धामची ठिसूळ वाट
Published on

अजय तिवारी

दखल

चार धाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असताना हिमालयातील पर्वतरांगा ठिसूळ दगडाच्या असल्याचे विसरुन चालणार नाही. सहाजिकच तिथल्या रस्त्यांची वाहन क्षमता मर्यादित आहे. वाहतूक कोंडीमुळे यात्रेकरूंना भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. अन्य अनेक अडचणीही आहेत. त्यामुळेच देशातल्या सर्वात लोकप्रिय चार धाम यात्रेमध्ये नियोजनाच्या बाबतीत काय चुकत आहे, हे पहावे लागेल.

उत्तराखंडमध्ये १० मेला चार धाम यात्रा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सुमारे दीड लाख यात्रेकरूंनी यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पावन तीर्थक्षेत्रांना भेट दिली असल्याचे आकडेवारी सांगते. यावरुन गेल्या वर्षीच्या तुलनेत भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसते. तौलनिक विचार केला तर ही वाढ सुमारे ६१ टक्के असल्याचे समोर येते. गेल्या वर्षी पहिल्या तीन दिवसांमध्ये ९५ हजार यात्रेकरू या धार्मिक नगरीमध्ये पोहोचले होते. अलिकडे विशेषत: केदारनाथ मंदिरात जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. दहा मे रोजी केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्यापासून पहिल्या तीन दिवसांमध्ये भाविकांच्या संख्येत ६७ टक्क्यांनी वाढ दिसून आली. गेल्या वर्षी पहिल्या तीन दिवसांमध्ये ४४ हजार ८९२ यात्रेकरूंनी या हिमालयातील मंदिराला भेट दिली असल्याची नोंद आहे. या वेळी ही संख्या वाढून ७५ हजार १३९ झाली. त्याचप्रमाणे गंगोत्रीमध्ये यात्रेकरूंच्या संख्येत ६१ टक्के तर यमुनोत्रीमध्ये ५९ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसत आहे. यात्रेच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये १५ हजार ४३२ भाविक बद्रीनाथ धामला पोहोचले होते. या वर्षी १२ मे रोजी म्हणजेच हे मंदिर उघडण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल २२ हजार ६९० यात्रेकरूंनी बद्रीनाथाचे दर्शन घेतले. याचा अर्थ भाविकांची श्रद्धा आणि या पवित्र स्थळांची लोकप्रियता वाढत आहे, असा असला तरी यासंदर्भातील काही धोके दुर्लक्षित करुन चालणार नाही.

पहिली बाब म्हणजे हिमालयीन पर्वतरांगा ठिसूळ दगडाच्या बनल्या असल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच तिथल्या रस्त्यांची वाहन क्षमता मर्यादित आहे. त्यातूनच तिथे आधीच लोकांचा मोठा ओघ बघायला मिळतो. परिणामस्वरुप यात्रेकरूंना वाहतूक कोंडीसह मंदिरात प्रवेश करण्यासाठीही तासनतास लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. उदाहरणादाखल बघायचे तर यंदा बद्रीनाथ मंदिरात दर्शनाला सुरूवात झाल्याच्या दिवशी भाविकांची रांग सुमारे चार किलोमीटर अंतरावरील माना गावापर्यंत पोहोचली होती. हाच कल आणि असाच ओघ कायम राहिल्यास या वर्षी चारधाम यात्रेसाठी ८० लाखांपेक्षा अधिक भाविक येऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. याबाबत बोलताना डेहराडूनस्थित सामाजिक कार्यकर्ते आणि ‘सोशल डेव्हलपमेंट फॉर कम्युनिटीज (एसडीसी) फाऊंडेशन’चे संस्थापक अनुप नौटियाल सांगतात की, एवढ्या मोठ्या संख्येने येणार्‍या यात्रेकरूंना हाताळण्या इतक्या येथील टेकड्या सक्षम नाहीत. सहाजिकच यात्रेकरूंचा एवढा मोठा ओघ हाताळण्यासाठी इथली पायाभूत सुविधा तयार आहे का, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळेच चार धाम यात्रेची पुढील व्यवस्था करताना धोरणकर्त्यांनी संख्येत होणारी प्रचंड वाढ लक्षात ठेवावी, अन्यथा संभाव्य आपत्तीला तोंड देण्याची तयारी ठेवावी. काही दिवसांपूर्वीच यमुनोत्री मंदिराकडे जाणार्‍या धोकादायक डोंगरी रस्त्यावर भाविकांची मोठी गर्दी दिसून आली होती. त्याचा व्हिडिओ ‘सोशल मीडिया’वर व्हायरल झाला होता. यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यापैकी बहुतेक प्रतिसादांमध्ये परिस्थिती प्रतिकूल असल्याचे वर्णन केले गेले. त्यानंतर यात्रेकरूंनी किमान एक दिवस मंदिरात जाणे टाळावे असे आवाहन करणे, राज्य पोलिसांना भाग पडले होते. ही बाब निश्चितच काळजीची आहे. खेरीज यात्रेकरू आपल्या सोबत घेऊन जाणार्‍या नकारात्मक आठवणींचा परिणाम उत्तराखंडच्या पर्यटनावर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. म्हणूनच धोरणकर्त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की यात्रेकरूंना पर्यटनाचा चांगला अनुभव आला तरच धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन वाढेल. त्यासाठी आधी ठोस आणि नेमक्या नियोजनाची गरज आहे.

या वर्षी चार धाम यात्रेच्या प्रारंभीच गंगोत्री आणि यमुनोत्री धाममध्ये भाविकांच्या आगमनाचे यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले गेले आहेत. गर्दीमुळे गंगोत्री-यमुनोत्री येथे दर्शनासाठी आलेले भाविक चिंतेत दिसत होते. काही दिवसांपूर्वी यमुनोत्रीच्या स्थितीवरील व्हायरल व्हिडिओवर, उत्तराखंड सरकारने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला होता. परंतु समस्या ‘जैसे थे’ आहे. चार धाम यात्रेतील श्रद्धेचा ओघ कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच यंदाच्या विक्रमी गर्दीमुळे मंदिर समितीने यात्रेकरूंना रात्री उशिरापर्यंत धामांमध्ये दर्शन घेण्याची मुभा दिली आहे. विक्रमी गर्दी असल्यामुळे पोलीस आणि प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त ठेवावा लागतो. त्याचाही ताण बराच मोठा आहे. भाविकांची संख्या वाढल्याने वाहने रस्तोरस्ती अडकून पडत आहेत. त्यामुळे प्रसंगी एकाच जागी दहा-बारा तास थांबावे लागत आहे. दुसरीकडे, भाविक वेळेत पोहोचू न शकल्याने हॉटेलचालकांचे नियोजनही बिघडत आहे. अलिकडेच उत्तराखंडच्या सरकारविरोधात हॉटेलचालकांनी आंदोलन केले. हा संघर्षही दुर्लक्ष करण्याजोगा नाही.

चार धाम यात्रेत २०२२ मध्ये ८० तर २०२३ मध्ये शंभर जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी पहिल्या तीन दिवसांमध्येच ११ जण दगावले. मात्र त्याला तिथले सरकार कमी आणि भाविकच जास्त जबाबदार आहेत. समुद्रसपाटीपासून जास्त उंच गेल्यावर ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार असणार्‍यांनी शक्यतो चारी धाम यात्रा करू नये, असे सांगितले जाते. परंतु आपल्याकडे वृद्धापकाळात सारे आजार जडल्यावर ‘हरी हरी’ करायला मोकळे झाल्याची मानसिकता असते. खरे तर, साडेतीन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या ठिकाणी जाणे म्हणजे अशा रुग्णांसाठी एक प्रकारे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखेच असते. त्यातच गर्दीच्या वेळी तर ऑक्सिजन आणखी कमी पडतो. खाण्या-पिण्याचे हाल होतात. रस्त्यात अडकून पडल्याने शौचालयांची व्यवस्था नसते. वयोवृद्धांना औषधे घ्यायची असतात. मात्र अडचणीच्या काळात वेळा चुकतात. त्याचे दुष्परिणामही समोर येतात. एकीकडे ही स्थिती असताना उत्तराखंड सरकारचेही अपयश लक्षात घ्यायला हवे. दररोज पाच हजार भाविकांना सामावून घेण्याची चार धामची व्यवस्था असेल आणि प्रत्यक्षात २०-२५ हजार भाविक येणार असतील तर व्यवस्था कोलमडून पडणारच. मात्र सरकार याकडे गांभीर्याने बघताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार धाम महामार्गाचा प्रकल्प हाती घेतल्यामुळे रस्ते चारपदरी होतील. परंतु गर्दी वाढली तर व्यवस्थेवर ताण येणार आहे. त्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे.

सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बातम्यांद्वारे माहितीचा प्रसार करणे सोपे आहे. खेरीज गुगलद्वारे नकाशावर कोठे किती ट्रॅफिक आहे हे लगेच समजते. तरीही या भागामध्ये होणारी एवढी मोठी गर्दी आणि गोंधळ समजण्यापलीकडचा आहे. अनेक ठिकाणी तर भाविकांना कडाक्याच्या थंडीत रस्त्यावरच रात्र काढावी लागते. मध्यंतरी गंगनानी ते गंगोत्री या सुमारे ६० किलोमीटरच्या परिसरात दिवसभर ९०० प्रवासी वाहने अडकून पडली होती. भरीस भर म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन बुकिंग व्यवस्थाही भरवशाच्या नाहीत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे समजल्यानंतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे दर्शन बंद करण्यात आले. मात्र हे सारे उशिरा सुचलेले शहाणपण होते असेच म्हणावे लागेल. कारण गाड्या काही वेळ थांबवून ठेवल्यानंतर सोडल्यामुळे लोकांच्या अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला तरी अनेकांकडचे अन्न आणि पाणी संपले होते. स्वाभाविकच त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला.

या वर्षी यमुनोत्रीमध्ये यात्रेकरूंच्या संख्येने नवा विक्रम केला असून गर्दी अजूनही वाढत आहे. त्यासाठी प्रशासनाने गतिरोधक आणि गेट यंत्रणा कार्यान्वित केली आहे. परिणामस्वरुप आता दर्शन सुरळीत सुरू आहे; मात्र अरुंद रस्त्यावर मोठमोठ्या बसेस अडकल्याने गंगोत्री धाम अधिक अडचणीत येत आहे. गरज पडेल तेव्हा प्रशासन, पोलीस आणि मंदिर समिती यात्रेकरूंना अल्पोपहार देण्याची व्यवस्था करते. भाविकांच्या सोयीसाठी गंगोत्री येथील बाजारही पहाटे दोन वाजेपर्यंत खुला ठेवण्यात आला होता. मात्र त्यामुळे अडचणी पूर्णपणे संपताना दिसत नाहीत. पूर्वी केवळ धार्मिक यात्रांच्या नावाखाली तीर्थयात्रा होत असत. आता अनेक ब्लॉगर्सही टीमसह येताना दिसतात. रील्स बनवणारेही सर्वत्र दिसतात. धार्मिक आणि प्रार्थनास्थळांवर रील किंवा ब्लॉग बनवण्यास बंदी घातली पाहिजे, असे काहींचे मत आहे. कारण यामुळे लोकांचे लक्ष विचलित होते. याबाबतचे दडपण वाढल्याने आता रील्स बनवण्यावर बंदी घातली गेली आहे. मात्र तरीही वाढत्या गर्दीमुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहणे आवश्यक असून राजकीय नेत्यांनीही गर्दी रोखण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवणे आवश्यक आहे.

(लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in