कठपुतळ्यांचा खेळ

संघर्षाशी संबंधित सर्व देश आपापल्या बाहुल्या संघटनांच्या (प्रॉग्झीज) माध्यमातून खेळ खेळत आहेत. निदान आतापर्यंत तरी तसेच चित्र आहे. पण हा कठपुतळ्यांचा खेळ करताना एखादी चुकार कृती संपूर्ण मध्य-पूर्वेत युद्धाचा भडका उडवू शकते.
कठपुतळ्यांचा खेळ

ऑर्बिट

गतवर्षी ऑक्टोबरमध्ये हमास-इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून आसपासच्या क्षेत्रात ज्या घडामोडी घडत आहेत त्यातून हेच दिसते की, इस्रायल सोडल्यास कोणताही देश थेटपणे संघर्षात उतरलेला नाही. संघर्षाशी संबंधित सर्व देश आपापल्या बाहुल्या संघटनांच्या (प्रॉग्झीज) माध्यमातून खेळ खेळत आहेत. निदान आतापर्यंत तरी तसेच चित्र आहे. पण हा कठपुतळ्यांचा खेळ करताना एखादी चुकार कृती संपूर्ण मध्य-पूर्वेत युद्धाचा भडका उडवू शकते.

मासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला करून सध्याच्या संघर्षाची सुरुवात केली. इस्रायलने ताबडतोब गाझा पट्टीवर प्रतिहल्ले सुरू केले. आजवर या संघर्षात इस्रायलचे सुमारे १२०० नागरिक आणि गाझा पट्टीतील साधारण २५ हजार लोक मारले गेले आहेत. मध्यंतरीच्या काळात आठवडाभर तात्पुरती युद्धबंदी होऊन दोन्ही बाजूंनी काही ओलीस आणि कैद्यांची सुटका झाली. पण त्यानंतर पुन्हा लष्करी कारवाया सुरू झाल्या. आता हळूहळू त्यात शेजारी देश आणि त्यांच्या बाहुल्या संघटना सामील होऊन संघर्षाची व्याप्ती वाढू लागली आहे.

इराण हा या क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागीदार देश आहे. इराणचा इस्रायलला थेट विरोध तर आहेच, शिवाय अनेक दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून इराण आपला प्रभाव टाकू पाहत आहे. गाझा पट्टीतील हमास, इस्रायलच्या उत्तर सीमेवरील लेबॅननमधील हिजबुल्ला, येमेनमधील हुथी बंडखोर असा संघटनांना इराणचा पाठिंबा आहे. या सर्वांनी मिळून इस्रायलविरुद्ध संयुक्त आघाडी उघडली आहे. ती ॲक्सिस ऑफ द रेझिस्टन्स म्हणून ओळखली जाते. इस्रायलनेही अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशांच्या मदतीने सर्वांविरुद्ध एकाच वेळी प्रतिकार चालवला आहे.

हमासला लेबॅननमधील हिजबुल्लाने साथ दिली आणि इस्रायलच्या उत्तरेकडील भागात ड्रोन, रॉकेट्सचा मारा केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने लेबॅननमध्ये हिजबुल्लाच्या तळांवर रणगाडे, तोफखाना, ड्रोन्स आणि हवाईदलातर्फे हल्ले केले. या संदर्भात इराण आणि इस्रायलने एकमेकांना हल्ल्याच्या धमक्याही दिल्या. हिजबुल्लाच्या आघाडीवर परिस्थिती फारशी चिघळली नाही. दरम्यान, येमेनमधील हुथी बंडखोरांनी इराणच्या पाठिंब्याने तांबड्या समुद्रात इस्रायल आणि त्यांच्या मित्रदेशांच्या मालवाहू जहाजांवर ड्रोन आणि रॉकेट्सद्वारे हल्ले सुरू केले. तांबडा समुद्र (रेड सी) आणि अरबी समुद्राला जोडणारी केवळ ३२ किमी रुंदीची चिंचोळी सामुद्रधुनी बाब-अल-मांडेब किंवा गेट ऑफ टियर्स म्हणून ओळखली जाते. नौकानयनासाठी हा मार्ग पूर्वीपासूनच धोकादायक आहे. तेथे अनेक जहाजे बुडत असल्याने त्याला जुन्या खलाशांनी अश्रूंचे द्वार असे नाव दिले होते. बाब-अल-मांडेबच्या उत्तरेला येमेनचा तर दक्षिणेला जिबुती आणि इरिट्रियाचा किनारा आहे. सध्या येमेनमधील हुथी बंडखोर या सागरी मार्गावरील जहाजांवर हल्ले करत आहेत. त्याचा फटका भारतालाही बसला. गेल्या महिनाभरात हुथी बंडखोरांनी अशा अनेक जहाजांना लक्ष्य बनवले आहे. त्यामुळे जगातील अनेक प्रमुख शिपिंग कंपन्यांनी सुएझ कालवा आणि तांबड्या समुद्रातून जाणारा मार्ग वापरणे बंद केले आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या जहाजांना संरक्षण देण्यासाठी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, नॉर्वे, स्पेन आणि बहरीन यां देशांच्या नौदलांनी एकत्र येऊन एक गट स्थापन केला आहे. या देशांच्या युद्धनौका संघर्षग्रस्त भागातून जाताना व्यापारी जहाजांची सोबत करणार आहेत. भारतानेही अरबी समुद्र आणि तांबड्या समुद्राच्या परिसरात किमान दहा युद्धनौका तैनात केल्या आहेत.

आता युरोप आणि मध्य-पूर्वेतील अनेक देशांना भारत, चीन आणि अन्य आशियाई देशांशी व्यापार करण्यासाठी अधिक लांबचा मार्ग वापरावा लागणार आहे. युरोपमधून आशियाच्या किनाऱ्यावर येण्यासाठी त्यांच्या जहाजांना आता भूमध्य समुद्र, सुएझ कालवा आणि तांबड्या समुद्राऐवजी संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून अटलांटिक महासागरातून हिंदी महासागरात प्रवेश करावा लागणार आहे. आफ्रिकेच्या दक्षिणेकडील केप ऑफ गुड होपला वळसा घालून येताना या जहाजांना किमान ३५०० सागरी मैलांचा जादा प्रवास करावा लागणार आहे. युरोपमधून भूमध्य समुद्र-सुएझ कालवा-तांबडा समुद्र आणि हिंदी महासागर असा प्रवास साधारण १० हजार सागरी मैलांचा आहे. त्यात आता आणखी ३५०० सागरी मैलांची वाढ होऊन तो प्रवास सुमारे १३,५०० सागरी मैलांचा होणार आहे. युरोपमधून तांबड्या समुद्रामार्गे प्रवास करून आशियात येण्यास जहाजांना साधारण २५ दिवस लागतात. आता आफ्रिकेला वळसा घालून येताना त्यात दहा दिवसांच्या प्रवासाची भर पडणार आहे. त्यासाठी अधिक इंधन खर्ची पडणार आहे. शिवाय, जहाजांना युद्धातील संभाव्य नुकसानापासून भरपाई देणाऱ्या विम्याचा दरही वाढला आहे. ही परिस्थिती आणखी काही दिवस सुरू राहिली तर जागतिक बाजारपेठेतील इंधनाच्या आणि अन्य जिन्नसांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

इराणने मंगळवारी इराक आणि सीरियावर क्षेपणास्त्र हल्ले केले. इस्रायलच्या मोसाद या हेरगिरी संस्थेचे इराकच्या स्वायत्त कुर्द प्रांताची राजधानी अर्बिल शहरातील मुख्यालय आणि इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचे सीरियातील तळ इराणने लक्ष्य बनवले. सीरियातील इडलिब शहरातील इसिसच्या तळांवर इराणने चार खैबर क्षेपणास्त्रे डागली. इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्स दलांचे जनरल कासीम सुलेमानी यांना अमेरिकेने २०२० साली इराकमध्ये ड्रोन हल्ला करून ठार मारले होते. सुलेमानी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ३ जानेवारी रोजी इराणच्या केरमान शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात इसिसने दोन स्फोट घडवले होते. त्यात साधारण १०० नागरिकांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी इस्रायलने लेबॅननच्या बैरुत शहरात केलेल्या हल्ल्यात इराणसमर्थित हिजबुल्ला संघटनेचा वरिष्ठ नेता मारला गेला होता.

त्या बदल्यात इस्रायलच्या हवाई दलाने शनिवारी पहाटे सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणच्या इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोअरचे (आयआरजीसी) चार वरिष्ठ नेते मारले गेले. गेल्या काही दिवसांत इस्रायलने अनेक नेत्यांना ठार मारले आहे. इस्रायलने २५ डिसेंबर २०२३ रोजी सीरियातील सय्यदा झैनाब येथे केलेल्या हल्ल्यात इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड्सच्या कुद्स फोर्सचे जनरल राझी मुसावी यांना ठार मारले होते. अमेरिकेने ३ जानेवारी २०२० रोजी बगदादमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात इराणच्या रेव्होल्युशनरी गार्डचे जनरल कासीम सुलेमानी मारले गेले होते.

यापाठोपाठ इराण आणि पाकिस्ताननेही एकमेकांवर हल्ले केले आहेत. इराणने बुधवारी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. काही दिवसांपूर्वी इराणमध्ये झालेल्या हल्ल्यांना जबाबदार असलेल्या जैश-अल-अद्ल या दहशतवादी गटाच्या तळांना या हल्ल्यात लक्ष्य केल्याचे इराणचे म्हणणे आहे. इराणच्या सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील रस्क या गावातील पोलीस ठाण्यावर १५ डिसेंबर २०२३ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात इराणच्या सुरक्षादलांचे ११ कर्मचारी मारले गेले होते. याचा बदला घेण्यासाठी पाकिस्ताननेही लगेच इराणच्या प्रदेशात क्षेपणास्त्र हल्ले केले. ही परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही तर केव्हाही युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in