एक सांत्वन पत्र

स्वप्नांत कुठल्यातरी अभयारण्यातल्या एका वाघाला सर्कसवाले पकडून घेऊन गेलेत
एक सांत्वन पत्र

रमप्रिय मित्रवर्य, प. मा. मु. (पर्मनंट माजी मुख्यमंत्री) उधोजीराजे यांस सप्रेम नमस्कार.

मध्यरात्री गाढ झोपेत असताना (काय करणार, अख्ख्या राज्याचा कारभार एकट्यालाच पाहवा लागतो. रात्रीपर्यंत जीव थकून जातो, मग गाढ झोप लागते.) एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नांत कुठल्यातरी अभयारण्यातल्या एका वाघाला सर्कसवाले पकडून घेऊन गेलेत. अभयारण्यात मुक्तपणे हिंडणारा वाघ आता सर्कशीतल्या स्टुलावर बसल्यावर कसा दिसेल, या विचाराने जीव कासावीस झाला आणि झोप उघडली. सकाळच्या वर्तमानपत्रात, ‘सूचक स्वप्न पडेल’ असं राशिभविष्य वाचल्याचं आठवलं आणि जीव जास्तच घाबराघुबरा झाला. आपल्याला फोन करून आपली ख्यालीखुशाली विचारणार होतो; पण म्हटलं आधी कोणाशी तरी बोलावं, म्हणून आमच्या किरीटभाईंना फोन लावला. तुम्हालाही काही सूचक स्वप्नबिप्न पडलं की काय, म्हणून त्यांना विचारलं, तर त्यांना एका भटक्या, पिसाळलेल्या कुत्र्याला म्युनिसिपालटीवाले गाडीत टाकून घेऊन गेले, असं स्वप्नं दिसल्याचं त्यांनी सांगितलं. हे बोलताना ते किंचित हसल्याचा मला भास झाला. परत डोळा लागेना म्हणून टीव्ही लावला, तर तुमच्या प्रवक्त्यांना ‘ईडी’ने उचलल्याची बातमी जोरात सुरू होती. (माझ्याशी बोलण्याआधीच किरीटभाईंनी टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या असतील, असा मला दाट संशय आहे. जाऊ द्या. माणूस थोडा विचित्रच आहे; पण आपल्याशी प्रामाणिक आहे. पळून तरी जात नाही आपल्याला सोडून.)

खरं म्हणजे आपल्यावर एकामागोमाग एक असे दुःखाचे डोंगर कोसळत असताना मी सांत्वनासाठी समक्ष यायला हवं होतं; पण अंगावर इतक्या काही जबाबदाऱ्या आहेत की, वेळच मिळत नाही. आधी आपली काही माणसं सुरतला पळून गेलीत, तेव्हा सांत्वनासाठी येणार होतो; पण नक्की केव्हा यावं, तेच कळेना. ते तर रोजचंच होऊन बसलं होतं. तरीही मी येणारच होतो; पण (आताच्या) आमच्या (आणि पूर्वाश्रमीच्या तुमच्या) एकनाथभाईंनी, ‘पिक्चर तो अभी बाकी हैं मेरे दोस्त,’ असं म्हणत थांबवलं. मला काही कळेना. मला वाटलं १९८०त हरियाणात भजनलालांनी केलं होतं, तसं आपण करणार आहात की काय! माझी काही हरकत नव्हती. पाठोपाठ दिल्लीतसुद्धा आपले ‘१२ वाजलेत.’ एकंदरीत आपलं महाभारतातल्या दुर्योधनासारखं झालंय, रोजच कोणी ना कोणी ‘धारातीर्थी’ पडतंय. रडणार तरी कोणाकोणाच्या नावाने? कोण कोण गेलं त्यांची फक्त नावं ऐकायची आणि गप्प बसायचं. आपल्याला खरं सांगतो, माझा तर आता पुनर्जन्मावरचा विश्वासच उडून गेला आहे. काही पुढचा जन्म नसतो. या जन्मीचं याच जन्मी फेडावं लागतं माणसाला. तुमचं काय मत आहे?

आजची घटना तशी आपल्यासाठी वाईटच. आपला तर ‘गड पण गेला आणि वाघ पण गेला!’ आता आपली बाजू मांडणार कोण? बोलणार कोण, लिहिणार कोण? (अर्थात, आता बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी उरलंय तरी काय?) रोज सकाळी ९ वाजता, ‘नॉन स्टॉप नॉन सेन्स’ कॉमेडी शो सादर करणार कोण? तसं सापडेल कोणीतरी; पण तुमच्या लाडक्या प्रवक्त्यांइतका घाणेरडा शब्दसाठा दुसऱ्या कोणाकडे असणार? आता दुसऱ्या कोणाला प्रवक्ता करणं म्हणजे, ‘हातभट्टीची तहान व्हिस्कीवर भागवल्या’सारखं होईल. त्यातल्या त्यात एक बरं झालं की, आपली ‘म्यारेथॉन मुलाखत’ आधीच पार पडली. नाहीतर महाराष्ट्राची जनता किती मोठ्या मनोरंजनाला मुकली असती? इतकी पोरकट प्रश्नोत्तरे दुसऱ्या कोणी लिहून दिली असती? असू देत शेवटी वाईटाच्या आधी काहीतरी चांगलं घडलं ना? आता फक्त आदित्यला सांभाळा. मागे मी रात्री २ वाजता हुडी घालून बाहेर पडलो होतो, तेव्हा मला आदित्यची गाडी रस्त्यात क्रॉस झाली होती. तरुण मुलांनी असं अपरात्री फिरू नये. उगीच ‘दिशा’ चुकायची. लक्ष असू द्या... एकदा रश्मी वहिनींच्या हातचे बटाटावडे (अनेकवचन लक्षात घ्यावे.) खायला यावं म्हणतो. कधी येऊ? येताना प्रतिज्ञापत्र आणावे लागेल का? कळवावे.

आपला मित्र

देवानाना नागपूरकर (उ.मु.म.रा.)

ता. क. - मंत्रिमंडळाचा विस्तार मुद्दामच लांबवला आहे. आपलीच वाट पाहतोय. कधी येताय? हे पत्र घेऊन येणाऱ्याला ‘मातोश्री’त आत सोडतील की नाही, अशी भीती वाटत होती. ‘साहेबांना प्रतिज्ञापत्र घ्यायला आलो आहे.’ असं सांग म्हणजे कोणी अडवणार नाही, असं त्याला सांगितलं आहे.

- दे.ना. (उ.मु.म.रा.)

logo
marathi.freepressjournal.in