भावनांचे मेकओव्हर

ग्रुपमधील सावकार उर्फ रावशा उर्फ रावसाहेब याने सोबत भोवरा आणला होता आणि तो जमिनीवर असा मस्त टाकला होता.
भावनांचे मेकओव्हर

एका शाळेतील मित्रांचं २०-२२ वर्षानंंंंतर गेटटुगेदर ठरलं होतं. सगळे बऱ्याच वर्षांनी भेटणार होते. उत्सुकता तर होतीच. कोण कसं दिसत असेलपासून सध्या तो किंवा काय करत असेल, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याची अधीरता होती. काही जणांना मी कसा आणि किती मोठा आहे हे सांगण्याची घाई होती. अशातच गेटटुगेदरचा दिवस आला. सगळे एकत्र आले. भेटीगाठी गप्पा सुरू झाल्या. मस्त आनंदी, उत्साही वातावरण होते. कुठेतरी कुणाच्या तरी मनाच्या कोपऱ्‍यात अस्वस्थतेचे वारेही घुमत होते. संमिश्र भावभावनांचा गदारोळ सुरू होता आणि अचानक मध्येच एक गलका उडाला. अचानक सगळे तिकडे धावले. हसण्याचा, ओरण्याचा, मला, तुला, मीपण असे आवाज घुमू लागले. तो दंगा ही सगळी मंडळी त्यांच्या बालपणात गेल्याचा होता.

त्यांच्या ग्रुपमधील सावकार उर्फ रावशा उर्फ रावसाहेब याने सोबत भोवरा आणला होता आणि तो जमिनीवर असा मस्त टाकला होता. भोवऱ्‍याच्या गतीप्रमाणेच मुलांचा घोळका वाढू लागला. आजही भोवरा नीट पकडता येणे, तो नीट टाकणे, कुणाला अजूनही या गोष्टी चांगल्या जमतात. कुणाला आजही साधा भोवरा फेकता येत नाही, यावर चर्चा उफाळून येत होत्या. सगळे जण त्या भोवऱ्‍याभोवतीच होते.

मनातील विचारांची जत्रा अशीच असते. आपली दैनंदिनी अगदी व्यवस्थित विना अडथळा सुरू असते, तोपर्यंत सगळं नीट सुरू असतं; परंतु कुठली तरी एक समस्या मेंदूतील सगळ्या विचारांना त्या भोवऱ्याप्रमाणे स्वत:भोवती फिरवत ठेवते. अशी समस्या इतर सगळ्या चांगल्या-वाईट विचारांना एकत्र करते. त्यांचा गुंता करते. त्या विचारातच आपल्याला अडकवून ठेवते.

दीपा घरातील रोजची कामं आटोपून आॅफिसला जायला निघाली. घरातून निघताना ती अतिशय आनंदी मन:स्थितीत होती. घरातून वेळेत निघाली होती. मुलांचं सगळं आवरलं होतं. नवऱ्‍याचा डबा करून दिला होता. नवऱ्‍याची पाठवणी करून बाकीची कामं उरकून नंतर ही निघाली होती. तसं म्हणायला गेलं, तर ती या क्षणी चांगल्या मूडमध्ये होती; मात्र ती आॅफिसमध्ये पोहोचली, तेव्हा प्रचंड चिडली होती. तिला काही सुचत नव्हतं. मधल्या वेळेत असं काय झालं असेल. घरापासून आॅफिसकडे जाताना रस्त्यात तिला तिचा नवरा मित्रांबरोबर निवांत गप्पा मारताना दिसला. खरंतर तो घरातून निघाला, तेव्हा त्याचं मित्रांना भेटणं वगैरे असं काही ठरलं नव्हतं. अचानक भेटले होते ते; परंतु तिच्या मनात विचारांचा भोवरा घुमू लागला. त्याला सांगायला काय झालं होतं. घरातील माझी गडबड दिसली नाही का? याला मित्रांबरोबर टाइमपास करायला बरा वेळ मिळतो. घरातून निघाला तेव्हा तर याला खूप गडबड होती. नेहमी असाच करतो तो, कुटुंबाला, मला, मुलांना वेळ देत नाही. त्याला नेहमी मित्रच हवे असतात, वगैरे, वगैरे.

अगं दीपा थांब, किती बोलतेस. किती चिडतेस. नवरा आहे तो तुझा. जरा शांत हो. तुला त्रास द्यायचा म्हणून तो मित्रांना भेटला का? तेही सकाळी त्याच्या आॅफिसच्या वेळेत. अचानक भेटीगाठी होऊ शकत नाहीत का? तिच्या सहकारी मैत्रिणीने तिची समजूत काढली खरी; पण दीपाचा मूड दिवसभर खराबच होता.

दैनंदिन जीवनात समस्या तर येणारच. त्या समस्यांमुळे निर्माण होणाऱ्‍या भावनांवर नियंत्रण ठेवता येणं हे मोठं आव्हान असतं. कितीही राग आला तरी रागावर नियंत्रण असेल तर योग्य प्रतिक्रिया दिली जाते. रागामुळे अस्वस्थता, नकारात्मकता, आरडाओरडा करावा वाटणे, आदळआपट करण्याची वृत्ती, एकटे राहावे वाटणे, स्वत:ला किंवा इतरांना दुखापत करावी वाटणे इ. टोकाच्या भावना निर्माण होतात. त्यांना समजून घेणं, जाणीवपूर्वक योग्य प्रतिक्रिया देणं, ही सहज जमणारी गोष्ट नक्कीच नाही. भावना चुकीची किंवा बरोबर असा शिक्का मारता येत नाही. त्या भावनांमुळे दिली जाणारी प्रतिक्रिया चुकीची किंवा बरोबर असू शकते.

दु:ख, आनंद, राग, भीती, आश्चर्य, उदासी, निराशा, एकटेपणा अशा सर्व प्रकारच्या भावनांकडे लक्ष देऊन बघता येते. त्या भावनांना नेमकेपणाने जाणून घेता येते. त्या भावनांना नाव देता येते. इतकंच नाही तर प्रत्येक भावनेवर नियंत्रणही ठेवता येते. हे कौशल्य प्राप्त केल्यास कोणत्याही गंभीर समस्येतून, त्यामुळे उत्पन्न होणाऱ्‍या भावनेतून लवकर बाहेर पडता येते. प्रतिसाद देण्याच्या पद्धतीत बदल होतो. सकारात्मक ऊर्जा आपल्याभोवती निर्माण होते, म्हणूनच भावनिक साक्षरता, भावनिक सजगता, भावनिक बुद्धिमत्ता अशा शब्दांचंही महत्त्व अलीकडे वाढलेलं आहे. भावनांक जाणीवपूर्वक वाढवता येतो. भावनिक परिपक्वतेची उंची प्रयत्नाने आपल्याला गाठता येऊ शकते.

दुसऱ्याला त्रास देणं, स्वार्थी असणं, अहंकारी असणं, मीपणाला चिकटून बसणं, इतरांचा अजिबातच विचार न करणं, दुसऱ्‍यांच्या मनाला लागेल असं बोलणं, अपमानास्पद वागणूक देणं ही निश्चितच चांगल्या मनाची लक्षणं नाहीत. अशा लोकांचा भावनांक कमी असतो. त्यांना स्वत:च्या भावनांबरोबर तडजोडी करता येत नाहीत. भावना जशी आहे, तशी स्वीकारता येत नाही. उलट अशा काही व्यक्ती मी कसं कधीच रडत नाही. मी एकटी कधीच बसत नाही, आम्हाला बुवा माणसं लागतात, आमच्या अवतीभोवती. त्यांना एक काही काम नाही. रिकाम्याच असतात सदा न कदा म्हणून मिरवतात लोकांमध्ये. आम्हाला नाही जमत असं मिरवायला. अशा पद्धतीने शब्द फेकत राहतात. काही लोकांना आपल्यातील कमतरता लपवण्यासाठी शब्दांचा मेकओव्हर जबरदस्त जमतो. त्यापेक्षा आपल्या भावनांचा प्रामाणिकपणे मेकओव्हर करण्याचा प्रयत्न केला तर सुखी माणसाचा सदरा सापडल्याचा आनंद होईल.

अति विचारांचा गुंता सोडवण्यासाठी दीर्घश्वसन उपयोगी पडते. श्वासाबरोबर भावनांची हालचाल जाणवली तर परिणाम लक्षात येतात. दीर्घश्वसन करताना शरीरातील कंप, धडधड, कुठेतरी मुंगी चावल्यासारखी जाणीव, पोटातील गुडगुड आवाज, कानाभोवती बारीक अस्वस्थ करणारा आवाज, श्वास घेताना सोडताना मधूनच भलतीच होणारी क्रिया, एखादा अवयव आखडणे इ. गोष्टी वाचता-ऐकता येणे, ते ऐकत असताना कोणतीही प्रतिक्रिया न देणे महत्त्वाचे आहे. अशा पद्धतीने आपल्याच मनातील शरीरातील हालचालींचा साक्षीदार होता येणं, ही भावनाच किती जबरदस्त आहे.

परिणामी, दैनंदिन जीवनातील आनंदाचा क्षण शोधावा लागणार नाही, कारण प्रत्येक क्षण आनंदी होईल. अर्थात, ही प्रक्रिया समजून घेणे, त्यातील बारकाव्यांचा अभ्यास करणे. सतत जागृतावस्थेत राहण्यासाठी स्वत:ला प्रश्न विचारणे, दिवसभरातील भावनिक अवस्थांचं मोजमाप करणे, नकारात्मक भावनांना सकारात्मकतेकडे वळवणे, अशा सवयी स्वत:ला लावाव्या लागतील. विचारांचं जुनाट कोष्ट्याचं जाळं काढून टाकावं लागेल. मेंदूमधील एक पेशी जवळजवळ इतर १५००० पेशींना जोडत असते. ही पेशी जोडण्याची प्रक्रिया एखाद्या झाडाच्या फांद्यांच्या वाढीप्रमाणे होत असते. हे पेशी जोडण्याचं काम कोणत्याही वयात नव्याने विचार कसा देतो, यावर अवलंबून असतं. याच पद्धतीने सकारात्मक विचारांच्या फांद्या मनात वाढवणं, मेंदूपर्यंत नेऊन रुजवणं ही कामं आपला श्वास आणि त्याबरोबरच आपले विचार करतं असतात. माणसाच्या चांगुलपणाची जडणघडण एका दिवसात होत नाही, त्यासाठी सातत्याने सकारात्मक विचार मनात रुजवावे लागतात. त्याचा जास्तीत जास्त सराव करावा लागतो.

कारणं कोणतीही असोत, भोवऱ्‍यासारखी चक्र डोक्यात फिरू लागली, तर चक्कर येऊ शकते; परंतु भावनांशी समजूतदारपणे वागता आलं तर परिस्थिती जशी आहे, तशी स्वीकारण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in