छद्म विज्ञानाचा विळखा

एखाद्याच्या जन्मापूर्वी पासून बोकांडी बसलेलं कर्मकांड त्याच्या मृत्यूनंतर कर्मकांड करूनच संपतं.
छद्म विज्ञानाचा विळखा

अज्ञान आणि अंधश्रद्धा ही भारतीय समाजाला लागलेली कीड आहे. त्यातूनच कर्मकांडाचा जन्म झाला. हजारो वर्षे हे कर्मकांडाचं भूत जनमानसांच्या मुंडक्यावर स्वार झालेलं आहे. हे कर्मकांड हद्दपार करण्यासाठी अनेक समाजसेवकांनी खस्ता खाल्ल्या. डॉ नरेंद्र दाभोलकर तर यासाठी शहीद झाले. कांही अंशी अंधश्रद्धा कमी झाल्या. हे जरी खरं असलं तरी बुद्धीचा नेहमी चालखीने गैरवापर करून समाजात स्वतःचं खोटं वर्चस्व टिकविण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या एका घटकाने छद्मीपणाने विज्ञानाचा वापर करून नवीन अंधश्रद्धा निर्माण केल्या. त्या अंधश्रद्धा शिकलेल्या व अति शिकलेल्या; पण व्यवहारात ठार अडाणी असलेल्या घटकात प्रामुख्याने आढळतात.

वरवर ते विज्ञान वाटतं; पण खरं तर ती फसवणूक असते. ती खोटी, आभासी व फसवी; पण वैज्ञानिक वाटणारी अंधश्रद्धा असते. तिचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे. एखाद्याच्या जन्मापूर्वी पासून बोकांडी बसलेलं कर्मकांड त्याच्या मृत्यूनंतर कर्मकांड करूनच संपतं. त्याच कर्मकांडाची आभासी वैज्ञानिक आवृत्ती सध्या बाजारात तेजीत आहे. ढोबळमानाने अंधश्रद्धा तीन प्रकारच्या असतात. पैकी पहिल्या क्रमांकाच्या अंधश्रद्धा या अघोरी असतात. त्यात जादूटोणा, भूत-पिशाच्च यांचा वापर केला जातो. त्या माध्यमातून समाजाचं शोषण केलं जातं. त्या पिळवणुकीचे साधन असतात. क्रमांक दोनच्या अंधश्रद्धा धार्मिक वा आध्यत्मिक असतात. त्यात भोंदू बुवा, बाबा, महाराज असतात. ते समाजाची फसवणूक करून शोषण करतात. या दोन्हीही अंधश्रद्धांना विवेक व विज्ञान यांचा बिलकुल आधार नसतो. अशा अंधश्रद्धांना समाजातील जाणकार माणसं विरोध करतात. काही जण त्यांचा फोलपणा चव्हाट्यावर आणतात. याला छेद देण्यासाठी अलीकडे काहींनी थेट विज्ञानाचा आधार घेतल्याचे भासवत अंधश्रद्धा पसरविण्याचं काम हाती घेतले आहे. त्यालाच छद्म वैज्ञानिक अंधश्रद्धा असं म्हटलं जातं. ते विज्ञान आहे, असं भासवत फसवणूक केली जाते. याची सुरुवातही माणसाच्या जन्मापूर्वीच केली जाते. मुलगा अगर मुलगी चांगली व कर्तृत्ववान जन्माला यावी, यासाठी ‘गर्भसंस्कार’ नावाचा एक नवीन फंडा त्यांनी बाजारात आणलेला आहे. त्याचे काहींनी थेट वर्ग सुरू केले आहेत. गरोदर महिलांना आपलं अपत्य चांगलं निपजावं, असं वाटणं साहजिक असतं. त्या त्यांच्या मानसिकतेचा गैरफायदा उठवत गर्भसंस्काराचा सध्या धंदा मांडला आहे.

आश्चर्य म्हणजे या अंधश्रद्धा थेट काही दवाखान्यातच चालविल्या जात आहेत. गर्भसंस्कार हे थोतांड आहे. दुसरं असं की, स्मरणशक्ती हा माणसाच्या उपजत शक्तीचा एक भाग आहे. त्याला खतपाणी घालायची गरज नसते. हे त्रिकालाबादित सत्य आहे. हे विज्ञान माहीत असणाऱ्या माणसांनीच लहान मुलांची स्मरणशक्ती वाढविण्याची चक्क जाहिरात करून फसवणूक सुरू केली आहे. त्यास शास्त्रीय आधार असल्याचे भासविले जात आहे. Midbrain activation असं त्याचं नाव आहे. ते अवैज्ञानिक तर आहेच; पण त्याही पुढं जाऊन ती अंधश्रद्धा आहे. त्या जाहिरातीला भुलून काही जण आपल्या मुलामुलींना त्यांच्याकडं पाठवून फसत आहेत. त्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. आयुर्वेदिक उपचार, देशी औषधे या नावाखाली काही जण हा धंदा करत आहेत. आपल्या शरीरातील रक्तदाब कमी व्हावा यासाठी चुंबक खिशात बाळगण्याचा काही जण सल्ला देत आहेत. शिकली-सवरलेली माणसं त्यांचं ऐकून लोहचुंबक घेऊन फिरायला लागलेली आहेत. असं सर्रास घडत आहे. मोबाइल टॉवरमधून ज्या लहरी हवेत येतात, त्यापासून कॅन्सरसारखा रोग होतो, असंही पसरविण्यात आलेलं आहे. मोबाईल, लॅपटॉप, टॅब, कॉम्प्युटर जवळ बाळगणे कसं वैज्ञानिक दृष्टीने घातक आहे. हे सांगणारे अगदी अधिकार वाणीने व बेधडक अंधश्रद्धा पसरवत सुसाट सुटले आहेत. रात्री झोपताना मोबाइल उशाला ठेवून झोपणे घातक असल्याची विधाने करणारे ढीगभर आहेत. सर्वात कहर म्हणजे चुंबकीय गादी हा महागडा फंडा आहे. त्याला काही जण जपानी गादी असंही म्हणतात. त्या गादीची किंमत लाखाच्या घरात आहे. त्या गादीवर झोपल्यास सर्व रोग नष्ट होतात, असं रेटून सांगितलं जातं. अगतिक माणसं त्यावर विश्वास ठेवून फसतात. या व अशा अनेक अंधश्रद्धा आहेत. त्या जास्त करून शिकलेल्या माणसात आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ सुरू होऊन बरेच दिवस झाले; पण अंधश्रद्धा कमी होण्याऐवजी त्या नवनवीन स्वरूपात वाढीस लागल्या आहेत. हे चिंताजनक आहे. छद्म वैज्ञानिक अंधश्रद्धाचा विळखा पडला आहे. तो दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. परत एकदा डॉ. दाभोलकर जन्म घेतील आणि आपली या विळख्यातून सुटका करतील. या भ्रमात राहून चालणार नाही. याचा मुकाबला अपणालाच करावा लागेल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in