पृथ्वीचा आस अधिक कलला ; वर्षानुवर्षे अनिर्बंध भूजल उपसा केल्याचा परिणाम

त्याचा लगेच मोठा परिणाम दिसला नाही तरी दीर्घकाळात पृथ्वीच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात
पृथ्वीचा आस अधिक कलला ; वर्षानुवर्षे अनिर्बंध भूजल उपसा केल्याचा परिणाम

वॉशिंग्टन : सरकारी नळाला पुरेसे पाणी येत नसले की जमिनीला छिद्रे पाडून शेकडो फूट खोल कूपनलिका खोदणे ही आता आपल्या इतक्या सवयीची बाब झाली आहे की, त्याचे पर्यावरणावर काय परिणाम होतात, याचा विचारच होताना दिसत नाही. गेल्या काही वर्षांत मानवाने इतक्या अफाट प्रमाणात भूजलाचा उपसा केला आहे की, त्यामुळे पृथ्वीचा आस अधिक प्रमाणात कलला आहे. त्याचा लगेच मोठा परिणाम दिसला नाही तरी दीर्घकाळात पृथ्वीच्या पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या शास्त्रज्ञांनी या विषयावर संशोधन करून त्याचा अहवाल जिओफिजिकल रिसर्च लेटर्स या नियतकालिकाच्या १५ जून २०२३ च्या अंकात प्रसिद्ध केला आहे. अहवालात नमूद केल्यानुसार गेल्या ५० वर्षांत मानवाने जगभरात १८ ट्रिलियन टन एवढ्या मोठ्या प्रमाणात भूजलाचा उपसा केला आहे. त्याच्या तुलनेत पाणी पुनर्भरणाचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. मानवाने १९९३ ते २०१० या काळात २१५० गिगाटन इतके भूजल उपसले. हे प्रमाण इतके मोठे आहे की, त्याने पृथ्वीवरील सर्व समुद्रांच्या पाण्याची पातळी ६ मिलिमीटरने (०.२४ इंच) वाढली असती.

गेल्या काही वर्षांत पृथ्वीच्या पोटातून आपण इतके पाणी उपसले आहे की, त्याने १९९३ ते २०१० या काळात पृथ्वीचा आस आणखी ८० सेंटिमीटरने जास्त कलला, अशी माहिती सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटीचे संशोधक की-वेऑन सेओ यांनी दिली. त्यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले होते.

पृथ्वीचा आस २३.५ अंशाने कललेला असतो. त्यात समुद्रातील पाण्याचे प्रवाह, सागरतळातील ज्वालामुखी, खडकांची निर्मिती अशा विविध कारणांनी थोडा-फार फरक पडतो. पृथ्वीचा आस कलण्यात पाण्याची काय भूमिका असते त्याचा शोध २०१६ साली लागला होता. त्यानंतर भूजलाच्या भूमिकेचा शोध घेण्यात आला. भूजलाचा सर्वाधिक उपसा उत्तर अमेरिका खंडाच्या पश्चिमेकडील भाग आणि भारताचा वायव्येकडील भाग येथे असल्याचे अभ्यासात दिसून आले. भूजलाचा अनियंत्रित उपसा केल्याने पृथ्वीचे वस्तुमान ज्या प्रकारे तिच्या सर्व भागांत पसरलेले असते त्यात फरक पडतो. त्यामुळे पृथ्वीचा आसही काही प्रमाणात कलतो. गेल्या काही वर्षांतील संशोधनानुसार तो आता थोडा पूर्वेकडे कलत असल्याचे दिसून आले आहे.

भूजल उपशाने पृथ्वीचा आस १९८१ ते १९९५ या काळात जितका कलला होता, त्यापेक्षा १७ पट अधिक वेगाने तो १९९५ ते २०२० या काळात कलला आहे. हा वेग कमी करायचा असेल तर पुढील अनेक दशके युद्धपातळीवर जमिनीत पाण्याचे पुनर्भरण करावे लागेल. अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम गंभीर असतील, असा इशारा सेओ यांनी दिला आहे.

पृथ्वीचे फिरणे मंदावणारे धरण

चीनच्या हुबेई प्रांतात यांगत्से नदीवर थ्री गॉर्जेस नावाचे अजस्त्र धरण बांधले आहे. हे धरण १८१ मीटर उंच आणि २३३५ मीटर लांबीचे आहे. त्यात इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साठवले आहे की, त्यामुळे पृथ्वीच्या परिवलन काळात (स्वत:भोवती फिरण्याचा कालावधी) ०.०६ मायक्रोसेकंदांचा फरक पडला आहे. म्हणजेच तेवढ्या काळाने पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी झाला आहे. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने २००५ साली केलेल्या पाहणीत ही बाब स्पष्ट झाली.

logo
marathi.freepressjournal.in