निराशेचा उंचावलेला आलेख...

या परीक्षेत देशातील प्रविष्ठ झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी नव्यान्नव टक्क्यापेक्षा अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाली आहेत.
निराशेचा उंचावलेला आलेख...

नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाव्दारे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. महाराष्ट्रातील सुमारे ८५ विद्यार्थी भारतीय प्रशासन सेवेच्या विविध पदांसाठी पात्र ठरले. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षावर होत आहे. मात्र या परीक्षेत देशातील प्रविष्ठ झालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी नव्यान्नव टक्क्यापेक्षा अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाली आहेत.

अनेक विद्यार्थी जीवाचे रान करत परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आटापिटा करत असतात. भारतीय प्रशासन सेवेची परीक्षा म्हटली तर साधीसुधी नाहीच मुळी. इथे प्रत्येकाचा कस लागतो.देशातील लाखो विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेला प्रविष्ठ होतात. अनेक जण स्वतःला सिध्द करण्याचा प्रयत्न करतात. काही जण आईबाबांची इच्छा म्हणून या मार्गाचा प्रवास करू पाहतात, काही आपण प्रयत्न करून पाहण्यास काय हरकत आहे ? म्हणून रस्ता चालू लागतात. काही जण या पदाचे असलेले ग्लॅमर म्हणून प्रयत्न करतात. प्रयत्न करणे मुळात वाईट

नाहीच मात्र आपल्यातील क्षमताची ओळख न करता हा प्रवास सुरू ठेवल्याने अपय़श वाटयाला येते. आपल्या बौध्दिक,शारीरिक,मानसिक,कौशल्य क्षमतांचा विचार न करता प्रवास सुरू ठेवला,तर वेगळ्या वाटा चालण्याच्या प्रयत्नात रस्ता चुकण्याची शक्यता अधिक आहे. अलीकडील बुध्दी संशोधनांचा विचार करता प्रत्येक विद्यार्थ्यांचा कल,अभिरूची आणि क्षमता जाणून घेता येणे शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या वाटा निवडणे शक्य आहे. स्वतःला स्वतःची ओळख झाली तर कोणत्याही क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवता येईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाव्दारे विविध प्रशासकीय पदांसाठी सातत्याने परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी प्रविष्ठ होतात. यावर्षी ११ लाख ३५ हजार ६९७ उमेदवारांनी नोंदणी केली. त्यातील ५ लाख ७३ हजार ७३५ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार ९० उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले. लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांपैकी २ हजार ५३९ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरली. त्यातील अवघे ९३३ उमेदवार विविध पदांसाठी निवडले गेले. यात ६१३ मुले व ३२० मुलींचा समावेश आहे. राष्ट्रीय पात्र सूचीमध्ये महाराष्ट्रातील सुमारे ८५ उमेदवाराचा समावेश आहे. पहिल्या शंभरमध्ये महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. यावर्षी राज्यातील पात्र उमेदवारांचा टक्का

घटला आहे. २०१९ मध्ये देशातील ११ लाख ३५ हजार २६१ उमेदवारांनी अर्ज सादर केला होता. तर २०२० मध्ये १० लाख ५७ हजार ९४८ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. साधारणपणे आपण वरील आकडेवारीवर नजर टाकली दरवर्षी दहा लाखापेक्षा अधिक उमेदवार परीक्षा देता आहेत. दरवर्षी ही संख्या सातत्याने वाढत आहे. लाखोंने विद्यार्थी प्रविष्ठ होत असली तरी त्यापैकी प्रत्येकवेळी सुमारे एक हजार उमेदवार पात्र ठरत आहेत. हे उत्तीर्णतेचे प्रमाण दरहजारी एक असे आहे. परीक्षेच्या निकालाची टक्केवारीवर नजर टाकली तरी परीक्षेच्या काठिण्य पातळीचा अंदाज बांधता येईल. परीक्षा कठीण असली तर सातत्याने प्रविष्ठ होणारे विद्यार्थ्यांची संख्येचा आलेख उंचावत आहे हे विशेष. देशात १९५० साली ३ हजार ६४७ उमेदवार परीक्षेसाठी बसले होते, तर त्यापैकी २ हजार ४९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा

दिली होती आणि २४० उमेदवार पात्र ठरली होती. आता प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांचा आलेख किती उंचावला आहे हे सहजतेने लक्षात येईल. इतके मोठया प्रमाणावर विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. पहिल्या प्रयत्नानंतर पुन्हा माघारी फिरणारे विद्यार्थ्यांचे प्रमाण फारच कमी आहेत. मोठया अपेक्षा ठेवत पुन्हा पुन्हा प्रयत्न केले जाता आहेत. असे पुन्हा पुन्हा प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहेत. भारतात या परीक्षेच्याव्दारे एकूण २४ सेवांसाठी उमेदवार निवडले जात असले तरी आय.ए.एस साठीच आपण पात्र ठरावे म्हणून प्रयत्न करणा-या उमेदवारही आहेत. याचे कारण या पदांचा प्रभाव आणि त्या पदाला समाज मनात मोठी प्रतिष्ठा आहे आणि अधिकारही अधिक आहेत. भारतात ९९ टक्केपेक्षा अधिक विद्यार्थी येथील परीक्षेत अनुत्तीर्ण होतात ही बाब लक्षात

घ्यायला हवी. हे अपयश अनेकदा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठले आहेत. अनेक मुले निराशेच्या छायेत डोकावताना दिसतात. आपल्याला येथे यश नाही म्हणून इतर मार्ग अनुसरतात. गेले काही वर्षात स्पर्धा परीक्षेत अपय़शाने आत्महत्या केल्या असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. ही निराशेची किनार जीवनभर सोबत ठेवत जगणे सुरू असते. पुरेसे यश मिळाले नाही तर दुसरा मार्ग म्हणून राज्य लोकसेवा आयोगाच्या व्दारे राज्य सेवेत दाखल होण्याचा प्रयत्न होतो.. कधी बॅंकींग क्षेत्रात प्रवेश करतात. मात्र जेव्हा कोठेही संधी मिळत नाही तेव्हा अनेकांच्या समोर तारे चमकत असतात. वय वाढलेले असते आणि लाखो रूपये खर्च झालेली असतात या विद्यार्थ्यांच्या निराशेने ती तरूणाई उध्दवस्त झालेली असते. खरेतर या दिशेचा प्रवास करताना तेथील अभ्यासक्रमाची व्यापकता, त्यासाठी लागणा-या क्षमता यांची ओळख नसताना केवळ आकर्षण म्हणून आपण त्या दिशेचा प्रवास करू लागलो, तर यश मिळण्याची शक्यता नाही. अनेकदा स्वतःची स्वप्ने मुलांवर लादत स्पर्धा परीक्षांच्या मार्गाने पाल्यांनी जावे म्हणून पालक प्रयत्न करतात. येथे मुले पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हवे ते प्रयत्न करतात पण तरी अपय़शच येते. यासाठी लागणारे वातावरण,अभ्यासाची बैठक,आकलन, सराव, अभिरूची, कल, बौध्दिक क्षमता यांचा विचार करण्याची गरज असते. अलीकडे बुध्दीसंशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी दहा प्रकारच्या बुध्दिमत्ता असतात. यात भाषिक, तार्किक, सांगतिक, शारीरिक, निसर्ग, व्यक्ती अंतर्गत, आतंरव्यक्ती, अवकाशीय, अध्यात्मिक, आस्तित्वात्मक बुध्दिमत्तांचा समावेश आहे. या बुध्दिमत्तांचे विविध प्रकार लक्षात घेतले तर या सर्व बुध्दिमत्ता प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात असतात. एका बुध्दिमत्तेत विद्यार्थी उच्च स्थानी असतो आणि इतर बुध्दिमत्ता त्यापेक्षा कमी असतात इतकेच. यातील जी बुध्दिमत्ता अधिक आहे त्या क्षेत्रातील मार्ग विद्यार्थ्यांने निवडला तर त्यात यश मिळण्याची शक्यता अधिक असते. पालकांनी आपल्या पाल्याची अभिरूची, कल यांचा विचार न करता केवळ आपले स्वप्न लादत मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला तर मुलांच्या जीवनात आनंद निर्माण कसा होणार ? कदाचित मुले परीक्षा उत्तीर्ण होतील मात्र त्यांना त्या परीक्षेतील यशाचा आनंद संपूर्ण जीवनभरही उपभोगता येणार नाही. जीवनात सत्ती, संपत्ती, अधिकार, प्रतिष्ठा म्हणजे सर्व काही नसते. त्यापलीकडे मनाची भूक असते. ती भूक मुबलक पैशाने भागवली जात नाही. त्यामुळे पालकांनी देखील विचार करत मुलांनाच आपले मार्ग निवडू देण्याची गरज आहे. आपल्या इच्छा ,आकांक्षा पूर्ण करणारी व्यवस्था म्हणजे आपली मुलं नाहीत हे लक्षात घ्यायला हवे.प्रत्येक मुल हे स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे. सचिन तेंडुलकरांसारख्या क्रीडा बुध्दिमत्ता लाभलेल्या तरूणाने त्या बुध्दिमत्तेच्या जोरावर सर्वोच्च यश आणि स्थान प्राप्त केले. लता मंगशेकरांसारख्या गानकोकीळा असलेल्या गायकिने आपल्या संगीत साधनेवर जगात नाव अजरामर केले. यांच्या औपचारिक शिक्षणाचा विचार करता ते एका अर्थाने ही माणसं साधी मॅट्रीकही झालेली नाहीत. मात्र आज त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जगाच्या इतिहासावर नाव कोरले आहे. त्यांच्या पालकांनी मुलांच्या बुध्दिमत्ता, कल, अभिरूचीचा विचार न करता स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडण्यास सांगितले असते तर ते कितपत यशस्वी झाले असते ? समजा परीक्षेत यशस्वी झाले असते तर त्यांनी वर्तमानात ज्या क्षेत्रात यश प्राप्त केले आहे आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे ते स्थान अबाधित राहिले असते काय ? असा प्रश्न आपण स्वतःच स्वतःला विचारला असता तर त्याचे उत्तर नकारात्मकच येतेच. स्वतःच्या क्षमता, कल, अभिरूचीच्या दिशेने प्रवास करता आला म्हणून यशाचे शिखर गाठता आले आहे. स्पर्धा परीक्षेतील अपयश हे विद्यार्थ्यांच्यापेक्षा पालकांचे अधिक आहे. या स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थी स्वतःहून किती प्रयत्न करतात ? हा क्षमता जाणून न घेता प्रवास केल्यानेच अपयश खुणावताना दिसते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in