ओदिशातील चेटकीण बळींचे अनोखे स्मारक

जगभरात अनेक प्रतिष्ठित नेत्यांची, संत-समाजसुधारकांची स्मारके उभारली जातात. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचे स्मरण होते. परंतु चेटकीण प्रथेमुळे बळी पडलेल्या पीडित महिलांचे अनोखे स्मारक ओदिशा पोलिसांनी केऊंझर जिल्ह्यात उभे केले आहे.
ओदिशातील चेटकीण बळींचे अनोखे स्मारक
www.odishapolice.gov.in
Published on

- राहुल थोरात

भ्रम-विभ्रम

जगभरात अनेक प्रतिष्ठित नेत्यांची, संत-समाजसुधारकांची स्मारके उभारली जातात. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचे स्मरण होते. परंतु चेटकीण प्रथेमुळे बळी पडलेल्या पीडित महिलांचे अनोखे स्मारक ओदिशा पोलिसांनी केऊंझर जिल्ह्यात उभे केले आहे. समाजाने महिलांवर केलेल्या अत्याचारांची साक्ष देत हे स्मारक आजही उभे आहे. जगातले हे असे एकमेव स्मारक आहे.

ओदिशा पोलीस दलातील जय नारायण पंकज (आय.पी.एस.) या कल्पक आणि संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याने चेटकीण प्रथेमध्ये बळी पडलेल्या महिलांचे स्मारक उभारुन त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसले आहेत. जगभर स्त्रिया वेगवेगळ्या कुप्रथांना बळी पडत असतात. पण त्यांचे स्मारक उभारुन त्यांच्या स्मृती जतन करण्याचे काम कुठेच होत नाही. म्हणूनच अनिसच्या ओदिशा दौऱ्यामध्ये जय नारायण पंकज या पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली. तेव्हा त्यांनी ओदिशा राज्यातील चेटकीण प्रथेची माहिती दिली. ओदिशा राज्यातील ग्रामीण आदिवासी भागात आजही लाोकांचा ‘चेटकीण’ या भ्रामक कल्पनेवर विश्वास आहे. यात एखाद्या महिलेवर ती चेटकीण असल्याचा आरोप ठेऊन तिला मारले जाते. राज्यभरात दरमहा अशा तीन ते चार घटना घडत असतात. चेटकीण बळीच्या हत्येमध्ये देशात ओदिशा राज्याचा दुसरा क्रमांक लागतो.

कोणत्या कारणाने स्त्रियांच्या चेटकीण म्हणून हत्या होतात? या प्रश्नाचे उत्तर देताना जय नारायण पंकज यांनी सांगितले की, ‘आजही आदिवासी भागात शिक्षण आणि आरोग्य सेवांची कमतरता आहे. मलेरिया आणि डायरिया हे रोग येथे मोठ्या प्रमाणात होतात. घरातील मूल आजारी पडले, गाय आजारी पडली तर आदिवासी लोक त्या मुलाला ‘गुनिया’ (देवऋषी) कडे घेऊन जातात. हे गुनिया लोक आदिवासींना सांकेतिक माहिती देऊन एखाद्या महिलेचे वर्णन सांगतात आणि हीच चेटकीण (आदिवासी भाषेत ‘दहिनी’) आहे, असे समजून त्या निरपराध महिलेची हत्या करतात. एखादा मुलगा कुपोषणाने आजारी पडून मेला, तरी तो चेटकीण असणाऱ्या महिलेने टोणाटोटका (जादूटोणा) करून मारला, असे मानले जाते. केवळ संशयावरून आणि अंधश्रद्धेतून अशा हत्या घडत आहेत.’

ही आदिवासी मंडळी चेटकीण हत्येचा गुन्हा केल्यावर पळून जात नाहीत. ते सरळ गुन्हा कबूल करतात. माझ्या मुलाला ती खाणार होती, माझ्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी मी तिला मारले, असा सरळ कबुलीजबाब ते पोलिसांना देतात. कारण चेटकीण असते, यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. खरेतर हे आरोपीही या अघोरी प्रथेचे एक प्रकारे बळीच आहेत. हे आरोपीही अशा प्रकारच्या भ्रमाने, अंधश्रध्देने ग्रासलेले असतात.

जय नारायण पंकज केऊंझर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख असताना चेटकिणीच्या दरमहा चार-पाच केसेस दाखल होत असत. केऊंझर हा जिल्हा आदिवासीबहुल आहे. या जिल्ह्यात पहाडी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. तिथे आजही आदिवासी लोक पहाडी भागामध्ये राहतात.

२०१५ मध्ये केऊंझर जिल्ह्यातील लहांडा या आदिवासी पाड्यावर चेटकिणीच्या संशयाने एकाच कुटुंबातील सहा जणांना ठार केले गेले. तेव्हा या प्रथेचे क्रूर स्वरूप जगासमोर आले. हे हत्याकांड त्या वेळी खूप गाजले. लहांडा हत्याकांडानंतर ओदिशा सरकारने चेटकीण प्रतिबंधक कायदा सर्वत्र राबवण्याचा निश्चय केला.

या कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात जय नारायण पंकज सांगतात की, राज्यात सतत घडणाऱ्या चेटकीण बळींच्या प्रकारामुळे ओदिशा सरकारने चेटकीण प्रतिबंधक कायदा २०१३ मध्येच संमत केला होता. या कायद्याचा मला माझ्या कामात मोठा आधार मिळाला. मी माझ्या जिल्ह्यातील चेटकीण कुप्रथेला बळी पडलेल्या केसेसचा डाटा एकत्र केला. तेव्हा मला त्यातील भयानक दाहकता दिसली. गेल्या वीस वर्षांत जिल्ह्यात १०० पेक्षा जास्त निरपराध लोक या कुप्रथेला बळी पडले आहेत, हे दिसून आले. हा चेटकीण प्रतिबंधक कायदा आदिवासी भागात पोहोचलाच नव्हता. शहरी भागातच याची थोडीफार माहिती होती.

चेटकीण प्रथेच्या पीडितांचे हे अभिनव स्मारक उभे करण्याची कल्पना कशी सुचली? या प्रश्नाचे उत्तर देताना जय नारायण पंकज म्हणाले की, ‘वेगवेगळ्या केसेसचा अभ्यास केल्यावर माझ्या हे लक्षात आले की, एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा चेटकिणीच्या संशयावरून खून होतो, तेव्हा त्या संपूर्ण कुटुंबाकडेच संशयाने बघितले जाते. चेटकिणीचे कुटुंब म्हणून त्यांची समाजात हेटाळणी केली जाते. आधीच घरातल्या स्त्रीची खोट्या आरोपातून हत्या झालेली असते आणि वरून समाजाकडून होणारी ही निंदा-नालस्ती. यामुळे हे कुटुंब सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत होते. त्यामुळेच या कुटुंबियांना आपण आधार देण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, असे मला नेहमी वाटायचे. अशा कुटुंबांना समाजाकडून मान-सन्मान मिळाला पाहिजे, समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी निकोप झाली पाहिजे, असे मला मनोमन वाटते. त्यातूनच मला एके दिवशी या पीडितांचेच स्मारक उभारण्याची कल्पना सुचली. जगामध्ये अनेक नेत्यांची स्मारके असतात; पण गरीब, पीडित, अंधश्रद्धेचे बळी पडलेल्या निरपराध लोकांचे कोणीच स्मारक उभे करत नाहीत. आपण हे काम ओरिसा पोलिसांच्या वतीने करायचे, असे ठरवून आम्ही कामाला लागलो.’

या अनोख्या स्मारकाचे स्वरूपही तसेच विशेष आहे. केऊंझर पोलीस मुख्यालयाच्या परिसरामध्येच हे स्मारक उभे करण्यात आले आहे. त्यासाठी स्थानिक कलाकाराकडून आदिवासी महिलेचे एक सात फुटी दगडी शिल्प बनवून घेण्यात आले. या शिल्पातील महिलेच्या चेहऱ्यावरचे भाव हे ‘माझ्याकडे चेटकीण म्हणून पाहू नका, तर एक सर्वसाधारण स्त्री म्हणून पाहा’ असे आहेत. हे दगडी शिल्प चेटकीण कुप्रथेत बळी पडलेल्या समस्त स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते. या स्मारकाच्या भोवती मार्बल दगडावर केऊंझर जिल्ह्यातील चेटकीण प्रथेच्या बळी पडलेल्या सर्व स्त्री-पुरुषांची नावे कोरून त्यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले आहे.

या स्मारकाच्या उद्घाटनानंतर सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबियांसोबत सहभोजन केले. या सहभोजनाने ही पीडित कुटुंबे भारावून गेली. या स्मारकाची चर्चा संपूर्ण देशभर झाली. इंग्रजी वर्तमानपत्राने याच्या बातम्या केल्या. ओदिशा पोलिसांच्या या कामाचे सर्वांनी कौतुक केले.

(लेखक महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in