
भ्रम-विभ्रम
सावनी गोडबोले
महाराष्ट्रातल्या संतांनी सर्वात मोठा कोणता चमत्कार केला असेल, तर माणसांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढले. वारीतून जातीभेद नष्ट करण्याची शिकवण दिली. लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धा काढून टाकण्याचा प्रयत्न संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासारख्या आपल्या संतांपासून ते साहित्यिकांपर्यंत अनेकांनी त्यांच्या अभंगगाथेतून, साहित्यातून वारंवार केला आहे.
सावता माळी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, चोखा मेळा या साऱ्यांनी आपल्या अभंगातून जे सत्य मांडले तोच मोठा चमत्कार आहे, पण आपल्याला हा चमत्कार पुरेसा वाटत नाही. ज्ञानेश्वरीसारखा थोर ग्रंथ वयाच्या सोळाव्या वर्षी लिहिला याचे अप्रूप वाटण्याऐवजी रेड्याच्या तोंडून वेद वदवले किंवा भिंत चालवली अशा दंतकथांचेच जास्त कौतुक वाटते. तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केले, त्यांची गाथा इंद्रायणीत तरली यावर आपला झटकन विश्वास बसतो... पण त्यांनी लिहिलेल्या अभंगांवर आपण विचार करत नाही, त्यातली शिकवण नीट लक्षात घेत नाही.
अनेक अभंगांतून काळाच्या पुढे असलेले तुकोबा आपल्याला भेटत राहतात. चारशे वर्षांपूर्वी इतके क्रांतिकारक विचार ते करू वा मांडू धजावले याचे नवल वाटत राहते. तीर्थक्षेत्रे, मांत्रिक, या साऱ्यांबद्दल अत्यंत कडवट असे सत्य ते सांगतात.
सिंहस्थ काळात कुंभ मेळे होत, त्याबद्दल तुकोबांनी म्हटले आहे...
आली सिंहस्थ पर्वणी।
न्हाव्या भटा जाली धनी ।।१।।
अंतरी पापाच्या कोडी।
वरीवरी बोडी डोई दाढी।।२।।
बोडिले ते निघाले।
काय पालटले सांग वहिले।।३।।
पाप गेल्याची काय खुण।
नाही पालटले अवगुण।।४।।
भक्ती भावे विन। तुका म्हणे अवघा सीण।। ५।।
म्हणजे सिंहस्थात केवळ न्हावी आणि भट यांना बरकत येते, कारण लोक तीर्थक्षेत्री पापे धुवायला, धार्मिक कर्मकांडे करायला येत. दाढी केल्याने वरवर सफाई होईल, पण पाप गेल्याची कोणती खूण आहे का, असे ते विचारतात. भक्तिभाव नसताना केलेली ही कर्मकांडे ही निव्वळ उपचार आहे हे ते पुनः सांगतात.
याच विषयावर कुसुमाग्रजांनी सिंहस्थ या नावाने अत्यंत तिखट-तेज कविता लिहिली होती...
व्यर्थ गेला तुका। व्यर्थ ज्ञानेश्वर। संतांचे पुकार। वांझ झाले।। रस्तोरस्ती साठे। बैराग्यांचा ढीग। दंभ शिगोशिग। तुडुंबला। अशी झाली सारी। कौतुकाची मात। गांजाची आयात। टनावारी।। तुका म्हणे ऐसे। मायेचे माईंद त्यापाशी गोविंद नाही।।
तुकारामांना जे कळले होते तेच कुसुमाग्रजांनीही विसाव्या शतकात कळकळीने सांगायचा प्रयत्न केला, पण लक्षात कोण घेतो?
अभंग क्र. १३७ मध्येही ‘देव दगडाच्या मूर्तीत, तीर्थस्थानी राहतो’ यावर आक्षेप घेतला आहे.
तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी।
काय काशी करिती गंगा।
भीतरी चांगा नाही तो।।
तीर्थक्षेत्री देव नसतो, तीर्थ हे देखील पाणीच असते. (आणि खरेतर आताच्या काळात नद्या प्रदूषित झाल्याने तीर्थ अजिबातच स्वच्छ राहिलेले नाही! )
देव चांगल्या माणसांतच, सज्जनांतच नांदतो, तीर्थात किंवा देवस्थानी नाही, हा तुकोबांनी चारशे वर्षांपूर्वी मांडलेला विचार त्यानंतरच्या कितीतरी कवींनी त्यांच्या लेखणीतून पुन्हा पुनः सांगितले आहेच की.
‘देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी’ या गीतात गदिमांनी देव चरचरात भरून राहिला आहे हे सांगितले आहे. ‘कुठे शोधीसी रामेश्वर अन् कुठे शोधीसी काशी’ या गीतात पाडगावकरांनीही देवाचा शोध तीर्थस्थानी नव्हे, माणसाच्या हृदयात घेतला आहे आणि ‘शोधीसी मानवा राऊळी मांदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी’ असे वंदना विटणकरांनीही म्हटले आहे.
तुकोबांनी दगडातल्या देवावरच नव्हे तर मांत्रिकांवरही विश्वास ठेवला नाही. ते म्हणतात,
‘सांगो जाणती शकून। भूत भविष्यवर्तमान।।
त्यांचा आम्हाशी कंटाळा। पाहो नावडती डोळा।।’ (अभंग क्र. १५०१)
आणखीन एका अभंगात तुकोबांनी, इतरांना फसवून पाप करणाऱ्या आणि वैराग्याचा आव आणून वासनेत गुरफटलेल्या खोट्या साधू संतांवर तोफ डागली आहे.
ऐसे कैसे झाले भोंदू?।
कर्म करुनि म्हणती साधू॥
अंगा लावूनिया राख।
डोळे झाकूनी करिती पाप॥
दावुनि वैराग्याची कळा।
भोगी विषयाचा सोहळा॥
तुका म्हणे सांगो किती।
जळो तयांची संगती॥
अभंग क्र. ४२७६ मध्ये ते म्हणतात,
‘देव्हारा बैसोनी हालविती सुपे।
ऐसी पापी पापे लिंपवाती।।
तयांचे स्वाधीन दैवते असती।
तरी का मरती त्यांची पोरे?।।’
ज्याच्या अंगात येते, जो आपल्या दैवी शक्तीने सुपे हलवीत असे, त्याची देवावर सत्ता चालत असली पाहिजे.. मग तरीही अशांची मुले बाळे अशी अकाली कशी मरत?
नवसाच्या प्रथेला तर त्यांचा अत्यंत प्रखर विरोध होता; कारण नवस ही अडाणी लोकांची फसवणूक होती.
‘नवसे कन्या पुत्र होती।
तरी का करणे लागे पती?।।’
म्हणजे जर स्त्रियांना निव्वळ नवसांनी अपत्य प्राप्ती होत असली तर त्यांना पतीची गरज तरी का पडावी?
गंमत म्हणजे निव्वळ निरीक्षणाच्या आणि तर्काच्या आधारावर त्या काळातील संतांना जे कळले ते आपल्याला आधुनिक उपकरणे आणि तपासण्या असूनही पटत नाही.
अजूनही अनेक ठिकाणी मासिक पाळीच्या काळात वेगळे बसायची प्रथा आहे. निदान धार्मिक समारंभात किंवा देवळात विटाळ असताना जाऊ नये अशा मताच्या अनेक बायका एकविसाव्या शतकात आहेत आणि बाराव्या शतकात संत सोयराबाई मासिक देहधर्म किंवा पाळीबद्दल लिहून जातात..
देहासी विटाळ म्हणती सकळ।
आत्मा तो निर्मळ नित्यशुद्ध।।
देहीचा विटाळ देहीच जन्मला।
सोवळा तो झाला कवण धर्म।।
विटाळावाचून उत्पत्तीचे स्थान।
कोण देह निर्माण करी जगी।।
म्हणोनि पांडुरंगा वानित असे थोरी।
विटाळ देहांतरी वसतसे।।
देहाचा विटाळ देहीच निर्धारी।
म्हणतसे महारी चोखयाची।।
सर्व माणसांचा जन्म ज्या विटाळातून झाला आहे त्याच्या स्पर्शाने सोवळा धर्म ओवळा कसा होतो? पुढे समर्थ रामदासांनी देखील सोवळ्या- ओवळ्याबद्दल त्यांना पडलेले कोडे दोन ओळीत मांडले आहे.
‘ऐसे कैसे रे सोवळे, शिवता होतसे ओवळे’.
वारीत जातीभेद विसरणारी मंडळी गावी परत आली की, जातपात परत पाळू लागतात. कायद्याने अस्पृश्यतेवर बंदी आणली. पण अजूनही आपापल्या जातीचा जाज्वल्य अभिमान आणि इतर जातींबद्दल तुच्छता हे काही आपल्या मनातून जात नाही.
अजूनही जातीबाहेर लग्न केले, तर त्या दाम्पत्याला घरात न घेणे, त्या कुटुंबाला वाळीत टाकणे आणि काही वेळा त्या मुलाला किंवा मुलीला मारून टाकणे हे ऐकू येते. यावरून जातीची पाळेमुळे किती खोल रुजली आहेत ते जाणवते. जात नाही ती जात हेच खरे! आणि शेकडो वर्षे संत वचनात, अभंग गायनी न्हाऊनही आपण कोरडे पाषाण राहिलो!
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या