भाजपच्या नेत्यांची बेताल वक्तव्ये

२०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी आपल्या बेताल वक्तव्यांनी कहर करून दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मटण, मांस, मच्छी खाणाऱ्यापासून ते अगदी...
भाजपच्या नेत्यांची बेताल वक्तव्ये

-ॲड. हर्षल प्रधान

-मत आमचेही

२०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी आपल्या बेताल वक्तव्यांनी कहर करून दाखवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मटण, मांस, मच्छी खाणाऱ्यापासून ते अगदी नकली संतान म्हणेपर्यंत विरोधकांवर आगपाखड केली. निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्याने त्यांची जीभ सतत घसरत होती.

मटण-मछली, मुघल, ज्यांना जास्त मुले होतात ते मुस्लिम, घुसखोरी करतात ते मुस्लिम, काँग्रेसचे नेते महिलांचे मंगळसूत्र काढून घेणार, उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली सेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी ही नकली राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे हे नकली संतान, काँग्रेसवाले मतांसाठी मुजरा करतील, अशी एकापेक्षा एक विशेषणे त्यांनी विरोधकांबद्दल वापरली. या सगळ्या वक्तव्यांचा सामान्य मतदारांवर परिणाम झालाच. विरोधकांनी तर त्यांचा चांगलाच समाचार घेतला. या घसरलेल्या जिभेमुळे आणि बेताल वक्तव्यांमुळे मोदींची प्रतिमाही मलीन झाली आणि भाजपचीही. मात्र भाजपचा हा जीभ घसरण्याचा आजार नवीन नाही. गेल्या दहा वर्षांतील भाजपच्या नेत्यांची वक्तव्ये आठवली तरी त्यांचा हा विकार जुना असल्याचे सहज लक्षात येईल.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार काळात बिहारच्या लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव आणि विकास-शील इन्सान पार्टी (व्हीआयपी) प्रमुख मुकेश साहनी यांनी हेलिकॉप्टरमध्ये एकत्र मासे, रोटी आणि मिरची खातानाची व्हिडीओ क्लिप शेअर केली. त्या दिवसात नवरात्रीचा महिना आणि उपवास होते. नवरात्रीच्या कालावधीत मांसाहार केल्याबद्दल तेजस्वीची निंदा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडीओ उचलला आणि समाजमाध्यमावर सर्वदूर पसरवला. मोदी इतक्यावरच थांबले नाहीत. उधमपूर (जम्मू आणि काश्मीर) आणि बिहारमधील गया आणि औरंगाबाद येथे आपल्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार करताना, मोदींनी नवी दिल्लीतील पंडारा पार्क येथे मीसा भारती यांच्या घरी मटण शिजवून ते खाल्ल्याबद्दल लालू यादव आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सावन काळात मटण खाल्ल्याबद्दल मोदींनी राहुल गांधी आणि लालूप्रसाद यादव यांचे नाव न घेता त्यांची तुलना मुघलांशी केली. कायदा कोणाला काही खाण्यापासून रोखत नाही पण या लोकांचा हेतू काही औरच आहे. जेव्हा मुघलांनी येथे हल्ला केला तेव्हा मंदिरे पाडल्याशिवाय त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे मुघलांप्रमाणेच त्यांना देशातील जनतेला चिडवायचे आहे, असेही मोदी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्याने चांगलाच गदारोळ उडाला. पण मोदी आपल्या पूर्ण प्रचारात अशीच वक्तव्ये करत राहिले. खरेतर देशासमोर या निवडणुकीच्या काळात बेरोजगारी आणि वाढती महागाई हे लोकांपुढील गंभीर प्रश्न होते आणि आहेत, हे विषय त्यांच्यावर असह्य भार बनले आहेत. मात्र याचे उपाय मोदी आणि भाजपकडे नव्हते आणि नाहीत म्हणूनच ते असे असंबंध विषय काढून बेताल वक्तव्य करत राहिले.

मंगळसूत्र ते मुजरा मोदींच्या वक्तव्यांचा कचरा

सत्तेवर निवडून आल्यास काँग्रेस “माता-भगिनींचे सोने चोरून घेईल”, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अलीगढ येथील निवडणूक रॅलीत केलेल्या या वक्तव्याचा प्रतिध्वनी देशभर ऐकू आला. काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत केलेले हे वक्तव्य मोदींच्या अंगलट आले. प्रियांका गांधी यांनी मोदींना सडेतोड उत्तर दिलेही. “ माझ्या आईचे मंगळसूत्र या देशासाठी कुर्बान झाले आहे,” असे चोख उत्तर मोदींना मिळाले. मात्र त्यावरही ते थांबले नाहीत. मला देशवासीयांना सावध करायचे आहे. काँग्रेस आणि भारतीय आघाडीची नजर तुमच्या कमाईवर आणि संपत्तीवर आहे. काँग्रेसचे 'शहेजादा' म्हणतात की, त्यांचे सरकार सत्तेवर आले तर कोण किती कमावते, कोणाकडे किती मालमत्ता आहेत याची चौकशी करतील. आमच्या माता-भगिनींकडे सोने आहे. ते 'स्त्रीधन' आहे, ते पवित्र मानले जाते, कायदाही त्याचे संरक्षण करतो. आता या लोकांची नजर महिलांच्या 'मंगळसूत्र'वर आहे. माता-भगिनींचे सोने चोरण्याचा त्यांचा हेतू आहे, असे मोदी म्हणाले. सगळ्यात कहर म्हणजे मोदींनी थेट उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हटले. उद्धव ठाकरेंवर बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेनेनंतर नकली संतान अशी टीका केली. मोदींच्या टीकेवर उद्धव ठाकरेंनी पलटवार करत जोरदार हल्लाबोल केला. मोदीजी माझ्याशी लढा. माझ्या आई-वडिलांचा अपमान सहन करणार नाही. तुम्ही कुठे पण राहा. कोणीपण असा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर शिवसेनेचे प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वत: शिवसेनेची जबाबदारी माझ्यावर सोपवली. तरी देखील काही पावटे, आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणतात. आपल्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणणारे पावटे, या पावट्यांना कुठे मोड फुटले आहेत, माहीत नाही. यांची इथपर्यंत मजल गेली की, हिंदुहृदयसम्राटांचा मी पुत्र आणि तेलंगणाच्या भाषणामध्ये ते मला नकली संतान म्हणाले. मोदीजी मी माझं बर्थसर्टिफेक तुमच्याकडं मागितलं नाही, तेवढी तुमची लायकीही नाही. तुम्ही कुणी ब्रह्मदेवाचा अवतारही नाहीत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. मी माझी सात पिढ्यांची वंशावळ तुम्हाला देतो, तुम्ही तुमची दाखवा, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी मोदींना विचारला.

पंतप्रधान मोदी यांच्या मनावर एवढा ताण पडलाय. मध्ये कोणीतरी सांगितलं की, ते झोपतच नाहीत. झोपले नाही किंवा झोप पूर्ण झाली नाही तर डॉक्टर सांगतात की, मेंदूवर परिणाम होतो आणि लोक काही वेळेला भ्रमिष्टासारखं बोलायला लागतात. असे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी मोदींना सुनावले. लोकसभेच्या या निवडणुकीत भाजपच्या या सर्वोच्च नेत्यांची जीभ इतकी घसरली की हे महान नेते आपल्या देशाचे पंतप्रधान होते याची लाज वाटू लागली. पण भाजपच्या नेत्यांची जीभ घसरण्याचा हा प्रकार नवीन नाही हेच गेल्या दहा वर्षांतल्या वक्तव्यांची उजळणी केल्यावर लक्षात येईल.

भाजप आमदार प्रशांत परिचारक :- पंजाबमधील सीमेवर लढत असलेला जवान वर्षभर तिकडे असतो. त्याला इकडे मुलगा झाल्याचे तार करून कळविले जाते. मग तो तिकडे पेढे वाटून आनंद साजरा करतो. असे कसे काय होते.

भाजप नेता भीम सिंह :- सेना, पुलिस में लोग मरने ही जाते हैं, जवान मरने के लिये होते है.

भाजप खासदार संजय धोत्रे :- शेतकरी मरतायत तर मरू द्या, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा.

भाजप खासदार गोपाळ शेट्टी :- शेतकरी मरण्याची फॅशन झाली आहे.

भाजप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी :- सरकारच्या भरवशावर शेतकऱ्यांनी राहू नये.

भाजप कृषी मंत्री राधाकृष्ण सिंग :- नामर्दी और ड्रग कि वजह से किसान आत्महत्या करते है.

भाजप आमदार व माजी कृषी मंत्री एकनाथ खडसे :- शेतकऱ्यांना मोबाईलची बिले भरण्यासाठी काही वाटत नाही, मात्र ते विजेचं बिल भरत नाहीत.

माजी सहकार मंत्री (भाजप) चंद्रकांत पाटील :- शेतकऱ्यांना उद्देशून... आवाज वाढवून बोलू नका, सरकारकडे पैसे छापायची मशीन नाही.

हरयाणाचे भाजपचे कृषी मंत्री ओमप्रकाश धनकर :- "किसान कायर और अपराधी है".

भाजप माजी प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे - शेतकऱ्यांना उद्देशून ‘एवढी तूर घेतली तरी रडतात साले’.

भाजप माजी मुख्य प्रवक्ते माधव भांडारी :- शेतकरी संपावर गेले तरी काही फरक पडणार नाही, आम्ही परदेशातून शेतीमाल आयात करू?

भाजप उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे :- लोक नोटबंदी दरम्यान बँकांसमोर लाइनमध्ये मृत्यू पावली तेव्हा त्यांना विचारले असता, लोक रेशनच्या लाइनमध्ये उभी राहून पण मरू शकतात?

भाजप माजी ज्येष्ठ केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू (दिल्ली) - शेतकऱ्यांना उद्देशून "कर्जमाफी फॅशन हो गया हैं!"

भाजप माजी मंत्री विनोद तावडे (महाराष्ट्र) :- लोकांना फुकट घेण्याची सवय.

मध्य प्रदेश गृहमंत्री :- "मंदसौर में मारे गये लोग किसान नहीं अपराधी हैं". केंद्रीय माजी गृहमंत्री राजनाथ सिंग (दिल्ली) (मे-२०१५ ) - "किसान कर्जमाफी की उम्मीद न करें.

कृषी राज्यमंत्री संजीव बालियान (राज्यस्थान) :- "किसानों तुम्हारी औकात क्या है" ...दो मिनट में ठीक कर दूंगा.

भाजप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :- शेतकऱ्यांची सुकाणू समिती नसून ही तर जिवाणू समिती आहे, असे शेतकऱ्यांच्या संपादरम्यान शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या समितीला उद्देशून बुलून शेतकऱ्यांचा जिवाणू म्हणून अपमान केला.

माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख - जैन समाज कांदा खात नाही म्हणून त्यांची प्रगती. कांदा खाऊन रडणाऱ्यांची आर्थिक प्रगती खुंटते. इंदापुरातल्या सभेत माजी सहकार मंत्री सुभाष देशमुखांचा जावईशोध.

कोरोना थोतांड आहे ; कुलुपे तोडून आत जाऊया. - संभाजी भिडे

ही सगळी वक्तव्य गेल्या दहा वर्षांतली आहेत. मोदींनी आपल्या बोलघेवड्या भाजपच्या कार्यकर्त्यांना जरी प्रशिक्षण दिले असते तरी भाजपचे नेते-कार्यकर्ते असे बेबाक काही बोलले नसते. मात्र मोदीजी स्वतःच्या बेताल वक्तव्यांची उजळणी करत होते. आज देशात रोजगार नाही, तरुण दरवर्षी अंड्यातून पिल्ले बाहेर पडावीत तशी ग्रॅज्युएट होत आहेत. मात्र पुढे काय करायचे हे त्यांनाच माहीत नाही. देशातील एकूण लोकसंख्येच्या ६५% लोक हे तरुण आहेत. मात्र ते बेरोजगार म्हणून उभे आहेत. सरकारी धोरणे सामान्य माणसांच्या नजरेत येत नाहीत. टॅक्स देणाऱ्या माणसांचा पैसा सरकारी योजनांद्वारे जनतेपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. मात्र तसे गेल्या दहा वर्षांत तरी झाले नाही. लोकांपर्यंत पोहचली ती भाजपच्या नेत्यांची बेताल वक्तव्ये. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे लोक मोबाईलवर आणि समाजमाध्यमांवर तीच तीच वक्तव्ये फॉरवर्ड करतात, त्याचे मिम्स बनवतात आणि आपले मनोरंजन करून घेतात. सध्या लोकांच्या हातात एवढंच राहिले आहे. मोदींच्या लोकसभा निवडणुकीतील या घसरलेल्या जिभेची आणि बेताल वक्तव्यांची उजळणी सतत भविष्यात होत राहील. देशातील जनता हुशार आहे. ती मोदींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.

(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in