विशेष
उमेश काशीकर
शिक्षक, शेतकरी आणि नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे आचार्य देवव्रत महाराष्ट्रात येताच शाश्वत शेतीची नवी चळवळ उभारण्याची आशा पुन्हा प्रबळ झाली आहे.
दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देशाच्या उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवली. आचार्य देवव्रत महाराष्ट्राकरिता नवीन असले तरीही राज्यपाल पदावर गेल्या ११ वर्षांपासून विराजमान आहेत. आचार्य देवव्रत हे राजकारणातून आलेले व्यक्तिमत्व नाही; तर ते आहेत हाडाचे शिक्षक व शेतकरी. देवव्रत हे कुरुक्षेत्र हरियाणा येथे गेल्या ३५ वर्षांपासून मुला-मुलींसाठी निवासी गुरुकुल चालवीत आहेत. त्याठिकाणी त्यांनी प्रधानाचार्य म्हणून काम केले आहे. सन २०१५ ते २०१९ ते हिमाचल प्रदेश येथे राज्यपाल होते व २०१९ पासून आजतागायत ते गुजरातचे राज्यपाल आहेत. आता महाराष्ट्राचीही जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. आपल्या देशात देवव्रत यांची ओळख एक प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी व नैसर्गिक शेतीचा ध्यास घेतलेला भगीरथ अशी आहे. कुरुक्षेत्र येथे गेल्या दोन दशकांमध्ये त्यांनी आपल्या २०० एकर पारंपारिक शेतीला नैसर्गिक शेतीमध्ये परिवर्तित करून संपूर्ण देशापुढे नैसर्गिक शेतीचे एक मॉडेल निर्माण केले आहे. गेल्या अकरा वर्षांपासून आचार्य देवव्रत यांनी रासायनिक शेतीला हद्दपार करुन देशाला पूर्वीप्रमाणे नैसर्गिक शेतीचा देश करण्याचा ध्यास घेतला आहे. सुरुवातीला हिमाचल प्रदेश येथील व नंतर गुजरात येथील लाखो शेतकऱ्यांना त्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी प्रेरित केले आहे. गेल्या दोन अडीच महिन्यात त्यांनी महाराष्ट्रात देखील नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी चर्चासत्रे, बैठकी व कार्यशाळा घेतल्या आहेत.
नैसर्गिक शेती का?
या प्रश्नाचा उलगडा राज्यपालांनीच आपल्या भाषणातून केला आहे. "पूर्वी आपण स्वतः इतर शेतकऱ्यांप्रमाणेच युरिया, रासायनिक खते, कीटकनाशके वापरून शेती करायचो. एक दिवस आपल्या शेतातील एक शेतमजूर तोंडाला पंचा बांधून कीटकनाशकांची फवारणी करता करता बेशुद्ध पडला. त्याला लगेचच इस्पितळात भरती केले. शेतात फवारणी करताना असे मृत्यू झाल्याचे यापूर्वी ऐकले होते. त्यामुळे त्या शेतमजुरावर तातडीने उपचार करून आपण त्याला कसेबसे वाचवले. परंतु त्याच दिवशी एक निर्धार केला: तो म्हणजे जमिनीत विषद्रव्ये टाकणारी रासायनिक शेती पुन्हा करायची नाही. मग करायचे काय? तर आपण हिस्सार येथील चौधरी चरणसिंह हरियाणा कृषी विद्यापीठातील वैज्ञानिक डॉ. हरिओम शर्मा यांना भेटलो. त्यांनी सांगितले की रासायनिक शेतीला पर्याय जैविक शेती होऊ शकते"
राज्यपाल सांगतात : "शास्त्रज्ञांच्या सूचनेनुसार आपण तीन वर्षे जैविक शेती केली. उत्पादन घटत होते. तरीही निष्ठेने जैविक शेती केली. जैविक शेतीमध्ये बाहेरून लागणाऱ्या निविष्ठांचा खर्च जास्त होतो. शेतीला लागणारे शेणखत तयार करण्यासाठी शेतकऱ्याकडे पशुधन मोठ्या प्रमाणावर पाहिजे. इतके पशुधन सामान्य शेतकरी आणणार कुठून ? अल्प भूधारक शेतकऱ्यांना जैविक शेती परवडणारी नाही, असे लक्षात आले. जैविक शेतीमुळे उत्पादन घटते ते वेगळेच. त्यामुळे रासायनिक शेतीला जैविक शेती पर्याय होऊ शकत नाही, या निष्कर्षाप्रत आपण आलो."
नैसर्गिक शेती म्हणजे काय?
राज्यपाल आचार्य देवव्रत सांगतात : "नैसर्गिक शेती व जैविक शेती अगदी भिन्न आहेत. नैसर्गिक शेती किंवा प्राकृतिक कृषी - म्हणजे सूक्ष्म जिवाणूंची शेती. गांडुळांची शेती. नैसर्गिक शेती म्हणजे जैविक शेती नव्हे !"
सूक्ष्म जिवाणू- गांडूळ नेमके काय करतात हे पटवून देताना राज्यपाल म्हणतात "आपल्या स्वयंपाकघरात ज्या प्रमाणे माउली किंवा स्वयंपाकी स्वयंपाक तयार करतो त्याप्रमाणे पृथ्वीच्या पोटातील सूक्ष्म जीव, गांडूळ आपले अन्न तयार करण्याचे काम करतात. रसायने वापरून आपण सूक्ष्म जीव नष्ट केले आहेत, म्हणजे अन्न निर्मात्यांनाच मारले आहे. रसायने वापरून आपण अन्न विषयुक्त केले, अन्नधान्यातील पोषणमूल्य कमी केले आहे, जमिनीतील पाणी विषारी बनवले. युरिया शेतात टाकताना त्यातील नायट्रोजनची वातावरणातील ऑक्सिजनशी युती होऊन हवा प्रदूषित केली. आज तर आपण भारतातील शेतजमिनीचे अक्षरशः वाळवंट करून ठेवले आहे. आमच्या पंजाब हरियाणा येथील काही गावांमध्ये रसायनांमुळे जमिनीचा पोत इतका बिघडला आहे की तेथील जमिनीतून निर्माण झालेले अन्न खाल्ल्यावर कॅन्सर झाला नाही तरच नवल !"
राज्यपाल या विषयावर पोटतिडकीने बोलतात तेंव्हा ऐकणारा स्तब्ध होऊन अंतर्मुख होतो.
मातेच्या दुधात कीटक नाशके, युरिया
"आपण युरिया, डीएपी, रासायनिक खते व कीटकनाशके यांवर अडीच लाख कोटी रुपये खर्च करीत आहोत आणि त्या मोबदल्यात आपण आपले अन्न विषारी करीत आहोत. आज तर मातेच्या दुधात देखील कीटकनाशके, युरिया, डिटर्जंट आणि फॉर्मॅलिनचे अंश सापडले असून या संदर्भात नुकताच दैनिक भास्कर मध्ये वृत्त नुकतेच प्रकाशित झाला आहे", असे ते सांगतात.
उत्पादन घटत नाही !
"नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन घटते हा मोठाच गैरसमज आहे. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन वाढते व सोबतच पर्यावरण रक्षण देखील होते. नैसर्गिक शेतीमध्ये समस्त प्राणिमात्रांचे कल्याण अंतर्भूत आहे. त्यामुळे ‘नैसर्गिक शेती’ हे पवित्र कार्य असून ते धर्मातीत आहे," असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.
"रासायनिक शेतीचा इतिहास काही दशके वर्षे जुनी आहे. पूर्वी भाजी फळांना चव होती. रासायनिक खतांमुळे फळे भाजा बेचव झाल्या आहेत. अन्नधान्याचे पोषणमूल्य कमी झाले, लठ्ठपणा वाढत आहे,", याकडे त्यांनी लक्ष वेधले.
एक मुद्दा महत्वाचा राज्यपाल अधोरेखित करतात. “अतिवृष्टी झाली तर नैसर्गिक शेतीचे नुकसान कमी होते, कारण गांडूळ व सूक्ष्म जिवाणूंमुळे पाणी जमिनीच्या पोटात मुरते. रासायनिक शेतीमध्ये जमिनीचा वरचा थर कडक होतो व पाणी शेत जमिनीत मुरत नाही. पाणी जमून राहते व पिकांचे नुकसान होते. अवर्षण व अतिवृष्टी दोन्हीवर उपाय नैसर्गिक शेती आहे," असे ते सांगतात. राज्यपाल देवव्रत यांच्या सूचनेनुसार गुजरात प्रमाणे महाराष्ट्राला नैसर्गिक शेतीचे हब करण्याचे कार्य राज्यात केले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चासत्रात सांगितले. "भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेला ईश्वराचा दर्जा दिला आहे. नैसर्गिक शेतीमध्ये गोमातेचा उपयोग सर्वाधिक आहे. राज्य घटनाकारांनी या शास्त्रीय विचाराला समोर ठेवून घटनेतील ‘मार्गदर्शक तत्वे’ लिहिताना त्यात गोहत्याबंदी सांगितली होती", असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दिनांक १८ नोव्हेंबर रोजी राज्यपाल देवव्रत यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालय येथे नैसर्गिक शेती याच विषयावर दुसरे चर्चासत्र आयोजित केले. यावेळी त्यांनी राज्यातील कृषी वैज्ञानिक, कृषी व पशुविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु आदींना नैसर्गिक शेतीचे महत्व पटवून दिले. या चर्चासत्रामध्ये राज्यापालांशिवाय राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आणंद गुजरात येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, दंतिवाडा येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, गुजरात राज्याच्या 'आत्मा' संस्थेचे संचालक यांची देखील व्याख्याने आयोजित केली गेली आणि नैसर्गिक शेतीच्या विषयाला प्रत्यक्ष आणण्याच्या दृष्टीने विचार विनिमय झाला.
एखाद्या गावी जायचे, तेथे हाती झाडू घेऊन साफसफाई करायची, शासकीय शाळेत मुक्काम करायचा, आदिवासी शेतकऱ्याच्या घरी भोजन करायचे आणि संध्याकाळी खाटेवर बसून ग्रामस्थांना युरिया, डीएपी, कीटकनाशके न वापरता नैसर्गिक शेतीसाठी जीवामृत, घनजीवामृत कसे करायचे हे सांगतात. आतापर्यंत त्यांनी ११ गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. 'हरित क्रांतीचे जनक' असे संबोधले जाते असे भारतरत्न सी सुब्रमण्यम हे महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून लाभले होते. आता त्यांच्याच कार्याचा वसा पुढे नेणारे राज्यपाल आचार्य देवव्रत राज्याला राज्यपाल म्हणून लाभले आहेत. नैसर्गिक शेती हा केवळ कृषी पद्धतीतील बदल नसून तो शेतकऱ्यांचे उत्पन्न, भावी पिढ्यांचे आरोग्य, पर्यावरणाचे संतुलन आणि विकसित भारत संकल्पनेशी थेट निगडित असा विषय आहे. शासन, शास्त्रज्ञ, समाज आणि शेतकरी या सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास राज्य निश्चितपणे “नैसर्गिक शेतीचे हब” होऊ शकेल.
जनसंपर्क अधिकारी, राजभवन