
भ्रम विभ्रम
श्रीपाल ललवाणी
नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात केले जाते, जल्लोषाचाच एक भाग म्हणून मद्यसेवन केले जाते. याचे रूपांतर काहीजणांत पुढे व्यसनात होते. दारूप्रमाणेच गर्द, गांजा, भांग या अमली पदार्थांचे व्यसन माणसाला घातक व बरबाद करणारेच आहे. विनाशकारी वादळाला आत्ताच जर थांबवले नाही, तर कितीतरी कोवळे युवक आणि युवती नव्या शतकाचा पहिला उगवता सूर्य बघण्यासाठी शिल्लकच राहणार नाहीत.
आता लवकरच हे वर्ष संपून नवीन वर्ष सुरू होईल. संपणाऱ्या वर्षाला निरोप देणे आणि नवीन वर्षाचे स्वागत करणे हे ३१ डिसेंबरच्या रात्री जगभरात मोठ्या उत्साहाने व जल्लोषात केले जाते. या जल्लोषाचाच एक भाग म्हणून मद्यसेवन केले जाते. एवढेच नाही, तर अनेक युवक मद्याचा पहिला प्याला ३१ डिसेंबरला मित्रांच्या आग्रहाखातर घेतात. याचेच रूपांतर काहीजणांत पुढे व्यसनात होते. व्यसन हे हळूवारपणे चोर पावलाने येते. सुरुवातीला उत्सुकतेपोटी किंवा मित्रांच्या आग्रहामुळे थोडी दारू प्यायली जाते, दारू पिण्याचा कालावधीही बऱ्यापैकी मोठा असू शकतो. पण हळूहळू हा कालावधी कमी होत जातो, दारूचे प्रमाणही वाढत जाते. सुरुवातीला महिन्यातून कधीतरी पिणारे हळूहळू रोज घेऊ लागतात. समाजामध्ये मद्यसेवनाला असलेली प्रतिष्ठा यामुळे पिणाऱ्याला आपण काही चुकीचे करतोय, असे वाटतच नाही. हळूहळू वरचे वर दारू पिण्यासाठी कारणे शोधली जातात. दुःख, मानसिक ताण, औदासिन्य, कौटुंबिक समस्या विसरण्यासाठी मी पितो असे मद्यसेवनाचे समर्थनही केले जाते. पण आता हळूहळू दारूचे दुष्परिणाम दिसायला लागतात. एक मानसिक आजाराकडे त्याची वाटचाल सुरू होते. शरीराच्या सर्व अवयवांवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. व्यवसाय, नोकरीकडे दुर्लक्ष होऊ लागते. आर्थिक समस्या उद्भवू लागतात. काहीजण बायको, मुलांना मारहाण करू लागतात. आर्थिक उत्पन्न कमी झाल्याने सर्वच कुटुंब संकटात सापडते. पुरुषांमधील दारूच्या व्यसनाचे दुष्परिणाम सर्वात जास्त स्त्रियांना भोगावे लागतात. चांगला चाललेला संसार उद्ध्वस्त होऊ शकतो.
दारूप्रमाणेच गर्द, गांजा, भांग या अमली पदार्थांचे व्यसन माणसाला घातक व बरबाद करणारेच आहे. पण आपल्या देशात सर्वात जास्त व्यसन कशाचे असेल, तर ते तंबाखूचे. तळागाळातल्या व्यक्तीपासून उच्चशिक्षित सभ्य लोकसुद्धा तंबाखूच्या व्यसनाला बळी पडलेले दिसतात. मिश्री, तपकीर, जर्दा, मावा, गुटखा, बिडी, सिगारेट असे तंबाखूचे विविध प्रकार आढळून येतात. तंबाखू मादक जरी नसली, तरी त्यात असलेला निकोटीन हा घटक शरीरावर दुष्परिणाम करतो. तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात होतो. तंबाखू सेवन करणाऱ्या लोकात हृदयविकार, अर्धांगवायू, नपुंसकत्व यांची शक्यता अधिक असते.
व्यसन म्हणजे एखादी अशी सवय की, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक त्रास होत असल्याची जाणीव होत असूनही त्यात बदल करणे शक्य होत नाही. व्यसन हे एक विनाशकारी वादळ आहे. या वादळात आज आपल्या देशातील युवा पिढी अडकलेली आहे. मेंदूला बधिर करणाऱ्या कोणत्याही मादक पदार्थाचे म्हणजेच तंबाखू, सिगारेट, दारू, गांजा, चरस, झोपेच्या गोळ्या इ. अशा प्रकारच्या कोणत्याही पदार्थाचे अतिरेकी सेवन करणाऱ्या व्यक्तीला व्यसनी ही पदवी प्राप्त होते. मुख्य म्हणजे याची जाणीव त्याला असली तरी त्याचा नाईलाज असतो. इतका तो व्यसनाच्या आहारी जाऊन हतबल झालेला असतो. आता असा प्रश्न पडू शकतो की, व्यसनांचे एवढे दुष्परिणाम माहीत असतानाही लोक व्यसन का करतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अशा पदार्थांच्या सेवनाने मेंदूला तात्पुरती मिळणारी उत्तेजना हवीहवीशी वाटू लागते. दुःख, ताण तात्पुरते का होईना विसरले जाते. अनेक मादक पण घातक पदार्थ सहजासहजी उपलब्ध होतात हेही एक महत्त्वाचे कारण आहे. आनुवंशिकता हेही एक कारण आहे. पण एकंदरीत व्यसन हा बराच काळ टिकणारा, भरपूर तोटा करणारा, अल्पकाळ आनंद देणारा असा आजार आहे. अंधश्रद्धेप्रमाणेच व्यसन हे माणसाचा विवेक नष्ट करते. त्याच्या विकासात, सुखात बाधा आणते. व्यसन हा एक सामाजिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक असा प्रश्न आहे.
सध्या अनेक शहरांतून अनेक व्यसनमुक्ती संघटना काम करत आहेत. व्यसनांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून योग्य ते उपचार या संस्थांमार्फत केले जातात. त्याला यशही बऱ्यापैकी मिळत आहे. एकदा व्यसन सुटलेली व्यक्ती पुन्हा केव्हाही व्यसनाकडे वळू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. काही बाबा, बुवा आपण मंत्रतंत्राने व्यसन दूर करण्याचा दावा करतात. पण ती केवळ अंधश्रद्धा आहे. काही बोगस डाॅक्टर्स काही गोळ्या देऊन व्यसन बरे करण्याचा दावा करतात. पण केवळ गोळ्या घेण्याने व्यसन बरे होत नाही हे समजून घेतले पाहिजे. योग्य उपचारांनीच व्यसनावर विजय मिळवता येईल.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्षे ‘व्यसनाला बदनाम करा’ हा उपक्रम राबवित आहे. या अंतर्गत ३१ डिसेंबरला ‘द दारूचा नाही, द दुधाचा’ अशा घोषणा देत कार्यकर्ते दूधवाटप करतात. व्यसनापासून दूर राहण्याचे लोकांना आवाहन केले जाते. लोकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या रॅलीज काढून त्यांच्यात व्यसनविरोधी विशेष जागृती केली जाते. हल्ली इतर अनेक संघटनाही हे कार्य करतात, ही समाधानाची बाब आहे. व्यसन ही एक सामाजिक समस्या असल्याने समाजातील सर्वच घटकांनी व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्व समाज व्यसनमुक्त होईल तो सुदिन!
लेखक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहेत.