जात वर्चस्वाची नशा

खून व बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना त्यांच्या जातीवरून संस्कारी ठरवणं हे गैर व निषेधार्ह आहे.
जात वर्चस्वाची नशा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव झाला. हर घर तिरंगाही फडकला. देशभक्तीचा एक इव्हेंट पार पडला. परत जो तो आपापल्या कामाला लागला. या दरम्यान दोन अतिशय भयानक घटना घडल्या. त्यांनी आपल्या समाजात खोलवर रुजलेले जात वास्तव जगासमोर आले. ते जात वास्तव समाजाला घातक आहे. त्यातली पहिली घटना आहे गुजराथ सरकारने बिल्किस बानो प्रकरणातील गुन्हेगारांची शिक्षा माफ करून त्यांची सुटका केली. त्या निर्णयाचे समर्थन करणारा एक लोकप्रतिनिधी म्हणाला की, हे आरोपी ब्राम्हण समाजात जन्मलेले असल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. या खून व बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना त्यांच्या जातीवरून संस्कारी ठरवणं हे गैर व निषेधार्ह आहे.

दुसरी घटना आहे राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सुराना गावातील सरस्वती विद्या मंदिर या शाळेत शिकणाऱ्या नऊ वर्षीय दलित समाजातील इंद्रकुमार मेघवाल नावाच्या विद्यार्थ्याने माठातील पाणी पिले, त्यामुळे ते पाणी दूषित झाले, असे समजून चैल सिंग नावाच्या धर्मांध व जातीयवादी शिक्षकाने त्या विद्यार्थ्यास इतकी बेदम मारहाण केली की, त्यात त्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटनादेखील समाजात असलेले जात वास्तव अधोरेखित करणारी आहे. सन २००२ मध्ये गुजरात राज्यात झालेल्या भीषण दंगलीमध्ये बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिच्या डोळ्यादेखत तिच्या तीन वर्षांच्या लहान बाळाचा व कुटुंबातील १३ सदस्यांचा अत्याचार करून खून/हत्या करण्यात आली, त्यातील फक्त सात मृतदेहच सापडले. सदर घटनेतील सर्व आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती.

एकीकडे संपूर्ण देशातील जनता स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना त्याच दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी गुजरात सरकारने सदर घटनेतील सर्व आरोपी कैद्यांची शिक्षा माफ करून त्यांना सोडून दिले आहे. त्यामुळे असे गंभीर गुन्हे करण्यासाठी आरोपी गुन्हेगारांना एक प्रकारचे उत्तेजनच गुजरात सरकारने दिले आहे. त्याचा निषेध करण्याऐवजी त्या आरोपींना त्यांची आरती करून ओवाळण्यात आले. त्यांचे औक्षण केले. काही जण त्यांच्या पाया पडले. हे सर्व कमी होते की काय म्हणून एका जबाबदार लोकप्रतिनिधीने त्यांच्या जातीचा उदोउदो केला. ही बाब भयानक आहे. इंदरकुमार मेघवाल हा हिंदू धर्मात जन्मलेला मुलगा. जातीय उतरंडीतील शेवटच्या थरात असणाऱ्या दलित समाजात तो जन्मला. त्याचे शिक्षक चैन सिंग हेही हिंदूच; मात्र ते उच्च जातीत जन्मलेले. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा स्वतंत्र माठ होता. इंदरकुमार मेघवाल या नऊ वर्षीय मुलाला तहान लागली असल्याने त्याने त्या मठातील पाणी पिले. ज्या देशात कायद्याने अस्पृश्यता नष्ट केली आहे, त्या देशात सवर्णांच्या मठातील पाणी पिणे हा गुन्हा नाही; परंतु ज्या देशात कायद्यापेक्षा जात वास्तव श्रेष्ठ समजले जाते, तिथं कायद्यापेक्षा जातच महत्त्वाची असते. एकाच धर्मातील जातीच्या उतरंडीतील असमान थरामुळे त्या उच्च जातीय शिक्षकाने त्या मुलाला केवळ तो दलित आहे म्हणून मरेपर्यंत मारले.

उच्च जातीत जन्मलेल्या खुन्यांना अन‌् बलात्काऱ्यांना शिक्षा माफ करणे. त्या गोष्टीचे समर्थन करताना त्यांच्या उच्च जन्मलेल्या बाबीस महत्त्व देणे. हे कोणत्याच अंगाने स्वीकारण्यासारखे नाही. ‘कितीही झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ’ असं ब्राम्हणांचं वर्णन मनुस्मृती मध्येच फिट आहे. तिथंच ते शोभून दिसते. स्वतंत्र भारतात त्याला कवडीचीही किंमत नाही. हे सगळ्या जगाला माहीत आहे. तरीही उच्च जातीची भलावण करणे हे नजरचुकीने घडत नाही. आपला वर्णवर्चस्ववाद शाबूत ठेवून जात वास्तव जीवापाड जपण्यासाठी ही त्यांची धडपड आहे. हे विधान त्यांनी जाणूनबुजून केले आहे. आम्ही स्वातंत्र्य, समता, बंधुता नाकारतो आहे. हा उद्दामपणा त्यांना करावयाचा असतो. आपण पेरलेले जातीय विष समाजात किती खोलवर मुरलेलं आहे. याची त्यांना चाचणी घ्यावयाची आहे. त्यांच्यात जातिश्रेष्ठत्व खचाखच भरलेलं आहे. त्याची झलक त्यांनी दाखविली आहे.

आपल्या माठातील पाणी पिणाऱ्या दलित मुलाला ठार मारण्याइतका राग ज्या शिक्षकाला येतो. तो शिक्षक समस्त शिक्षण क्षेत्राला लागलेला काळिमा आहे. त्याच्या डोक्यात जात किती फिट्ट बसली आहे. हे त्याच्या वर्तनावरून स्पष्ट होते. या दोन्हीही घटनेतील जात वास्तव समजून घ्यायला हवे. हा जातीय उन्माद आहे. त्यात कायदा माहीत असूनही तो न पाळण्याची मस्ती आहे. त्यांना त्यांच्या उच्च जातीचा माज चढला आहे. ते दोघेही जात वर्चस्वाच्या नशेत आहेत. त्याना कायद्याचा धाक नाही. ते संविधान मानत नाहीत. त्यांना संविधानातील समता खटकते आहे. त्यांच्या अंगात मुजोरपणा ठासून भरलेला आहे. ते त्यांच्या जातीसाठी काहीही करू शकतात. इतरांनाही ते जातीसाठी माती खायचे धडे देतात; पण एक मात्र आहे की, त्यांची संख्या अगदी कमी आहे. या देशात संविधान व त्यातील तरतुदी मानणारा वर्ग मोठा आहे. जातीय व धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या या मूठभर माणसांचा चोख बंदोबस्त करण्याची जबाबदारी केवळ कायद्याची नसून ती समस्त जनतेचीसुद्धा आहे. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. तरच यांचा माज, मस्ती, उद्दामपणा, नशा उतरविण्यास मदत होईल, असे वाटते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in