विशेष
श्याम तारे
तुमच्या मुलांसाठी नवा मित्र येत आहे, जो एआयच्या मदतीने शिकण्यात, विचार करण्यात आणि संवाद साधण्यात बदल घडवून आणेल. पण हा गप्पिष्ट संवादक तुमच्या मुलांच्या सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्तेवर कसा परिणाम करेल?
काळ फार पुढे गेलेला नाही, पण एआयची सोबत मुलांना मिळू लागल्यामुळे त्यांच्या शिकण्यात, विचार करण्यात आणि इतरांशी जोडले जाण्यात प्रचंड बदल होणार आहेत, हे लक्षात घ्यावेच लागेल. असाच एक काळ आज तुमच्यासमोर मांडत आहे.
तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल, त्याचे नाव आपण ‘अन्नू’ ठेवूया. हे नाव मुलगा किंवा मुलगी दोघांसाठीही चालेल. अन्नू शाळा संपवून घरी आली आहे आणि आता गृहपाठाच्या अभ्यासाला बसायची तयारी सुरू झाली आहे. अन्नू साहजिकच काही दिवसांपूर्वीच घरात आलेल्या आणि आता परममित्र झालेल्या ‘पेकू’ नावाच्या एआय प्रतिनिधी गप्पिष्टाला गणिताच्या अभ्यासाबद्दल विचारायला सुरुवात करते आणि ज्याचे नावच गप्पिष्ट आहे, तो तिला गप्पांमध्ये गुंतवतो. ‘शाळेत आज तुझी मैत्रीण तुला लागेल असे बोलली का?’ इथून संवाद सुरू होतो आणि हा प्रश्न विचारून शांत झालेला गप्पिष्ट आता केवळ ऐकण्याचे काम करतो आहे, कारण अन्नू जे काही बोलते आहे. त्यामुळे त्याच्या ज्ञानात म्हणजे ‘मोठ्या भाषेच्या प्रारूपामध्ये’ (लार्ज लँग्वेज मॉडेल) भर पडत आहे. पेकू तिला गप्पांमध्ये गुंतवतो आहे आणि तिचा अभ्यास मात्र बाजूला राहिला आहे. पेकू थकलेलाही नाही आणि त्याच्यासाठी मुळातच कोणताही दिवस वाईट नसतो.
ही आहे आपल्या मुलांची नवी आणि पहिली पिढी. मुलांना पूर्वी कधीही असा सोबती नसायचा, हे यांना माहीतच नाहीये. त्यांच्या कल्पनेतही ही गोष्ट नसल्याने, हा पेकू मुळातच मानवापेक्षा वेगळा मानव आहे, हेही त्यांच्या लक्षात येणार नाही. यात काही चांगले आहे की वाईट हा इथे प्रश्नच नाहीये. पण आज माणूस जे काही निर्माण करतो आहे, ते काय आहे, ते तरी समजून घ्यावे लागेल.
काय चालले आहे तरी काय?...
एक डिजिटल मानववंश अभ्यासक म्हणून या घटना बघताना हा विषय अतिशय गुंतागुंतीचा आहे, हे मलाही कळते आहे. कारण अनेक स्वरूपांमधील मोठ्या भाषेचे प्रारूप हे एक नवे आणि जबरदस्त ताकदीचे साधन आहे, जे समाजात शिरते आहे. त्यांची परिणती कोणत्या प्रकारे होईल, याविषयी आज तरी काहीही सांगणे कठीण आहे. परंतु एक मात्र खरे की, आजवर जे नवीन तंत्रज्ञान आणले गेले, त्यातून काही अनपेक्षित परिणाम मिळाले आहेत. त्यामुळे इथेही तसे परिणाम मिळणे शक्य आहे.
या गप्पिष्टांमध्ये सुसंस्कृतपणाचा आभास होत असला, तरी ही ‘मोठ्या भाषेची प्रारूपे’ मुळातच कमी संदर्भाची संवादक आहेत. याचा अर्थ असा की, जर त्यांना स्पष्ट माहिती मिळाली, तर त्यावर ते उत्तम प्रक्रिया करू शकतात, परंतु भाषेतील अथवा विशेषत: सांस्कृतिक संवादातील गर्भित अर्थाच्या बाबतीत मात्र त्यांची तारांबळ उडते. (तारांबळ काय, खरे तर गप्पिष्टांना संस्कृतीचा अर्थ मुळीच कळत नाही.) त्याचप्रमाणे, गप्पिष्टांना संदर्भ असलेल्या माहितीचा गंधही नसतो. आता बोला...
जी मुले गप्पिष्टांच्या सोबतीने मोठी होतील, ती अगोदरच्या कोणत्याही पिढीपेक्षा वेगळ्या प्रकारे शिकवली आणि प्रशिक्षित केली जातील. आपल्या अन्नूला केवळ इंग्रजी भाषा येते आणि तिला फ्रेंच शिकायची आहे. आता तिला जर सांगितले की हे काम तुला केवळ संवादातून करायचे आहे, तर ती फ्रेंच भाषा बोलू लागेल, पण या गप्पिष्टांना फ्रेंच भाषेचा सांस्कृतिक कल समजतच नसेल, तर भाषा शिकून काय होणार?
ज्या संस्कृती आणि समाजात आपण वाढतो, ते दोन्हीही आपल्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. गप्पिष्ट आणि त्यांची ‘मोठी भाषेची प्रारूपे’ या सगळ्याला बाधा आणतील. कारण गप्पिष्टांची उत्तर देण्याची पद्धत अधिकारवाणीची वाटते आणि त्यात कोणतेही सांस्कृतिक संदर्भ, भावनिक एकात्मता अथवा कुटुंब आणि समाजाशी जोडणी आढळत नाही. आता याचा परिणाम कसा होऊ शकेल ते बघा.
अन्नू अखेरीस माहितीच्या जगात तर उत्तम संचार करू शकेल, पण तिला सामाजिक आणि कौटुंबिक संकेत आणि त्यामध्ये दडलेली भावनिक बुद्धिमत्ता यांच्याशी काही देणेघेणे नसेल. कारण इतर लोकांशी तिचा संवादच असणार नाही. संवाद असेल तो माहितीशी. तुम्ही माहिती पाठवलीत, तर उत्तर ताबडतोब येईल, पण त्यात काही संकेत असतील, तर उत्तरच मिळणार नाही, कारण ही मुले आणि आमची अन्नूसुद्धा एखाद्या गप्पिष्टासारखी वागू लागली असेल. समाज आणि कुटुंब भावनेपासून दूर...
थोडक्यात सांगायचे तर, आपल्या मुलांना किंवा नातवंडांना आपण ‘सायबोर्ग’ झालेले बघणार आहोत. त्यांच्या आकलन शक्तीचा विकास विविध स्वरूपातल्या मोठ्या भाषेच्या प्रारूपानुसार किंवा गप्पिष्टाच्या सान्निध्यात होणार आहे. हे असे सगळे खूपच वाईट होणार आहे, असेही वाटू देऊ नका, कारण असेच होईल, हे कुणीही सांगितलेले नाही. परंतु, मानवी बुद्धिमत्ता आणि विकास यांचा नव्याने विचार करण्याची गरज नक्कीच असणार आहे. ‘सायबोर्ग’मध्ये जीवशास्त्रीय आणि जीवतंत्र-इलेक्ट्रॉनिक अथवा यंत्रमानव भाग असतील. हा शब्द मानवाच्या अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात १९६० साली आणला गेला.
मानवी इतिहासात पालक आणि सामाजिक महत्त्वाची अशी इतर प्रतिष्ठित मंडळी, शिक्षक आणि मार्गदर्शक अशी भूमिका बजावत आली आहेत. ‘एका मुलाला तयार करायला अख्खे गाव लागते,’ असे मानले जायचे, असा काळ होता. त्यामुळे आता आणि यापुढे जर आमच्या अन्नूसहित मुलांना गप्पिष्टांचा लळा लागला, तर त्यामध्ये जीवनाच्या रसाऐवजी भावनांची केवळ नक्कल असेल. याचे कारणही स्पष्ट आहे. ही मुले अशा भावनांना सामोरीच गेलेली नसतील.
एआय गप्पिष्ट कुणाला जोखत नाहीत, कधी रजेवर जात नाहीत आणि त्यांनी कधी जगात प्रवासही केलेला नसू शकतो. अशा वेळी त्यांच्यावर आपण आजच्या गुंतागुंतीच्या समाजात आणि नातेसंबंधात आपल्या मुलांची जबाबदारी सोपवू शकतो का, यापेक्षा सोपवावी का, यावर विचार करावा लागणार आहे.