वेगळा माणूस घडवणारी AI

कृत्रिम बुद्धिमत्तेचे माणसाला जितके आकर्षण वाटत आहे, तितकेच भयही वाटत आहे. माणूस जेव्हापासून भाषा शिकला, लेखन कला शिकला तेव्हापासूनच हे भय उदयाला आले आहे. मात्र या भयावर मात करत मानवाने प्रत्येक आव्हान पेलले आहे.
वेगळा माणूस घडवणारी AI
Published on

विशेष

श्याम तारे

कृत्रिम बुद्धिमत्तेचे माणसाला जितके आकर्षण वाटत आहे, तितकेच भयही वाटत आहे. माणूस जेव्हापासून भाषा शिकला, लेखन कला शिकला तेव्हापासूनच हे भय उदयाला आले आहे. मात्र या भयावर मात करत मानवाने प्रत्येक आव्हान पेलले आहे.

प्रत्येक नव्या पिढीला असे वाटते की त्यांच्यासमोर आलेले कोणतेही नवे तंत्रज्ञान त्यांचे मेंदू बिघडवण्यासाठीच आले आहे. गेली दोन हजार चारशे वर्षे हेच चालले आहे. तत्वचिंतक सॉक्रेटिस म्हणाले होते की, लिहून ठेवल्याने आपला मेंदू सडणार आहे. त्यांच्या मते आपण सगळे काही विसरणार आहोत आणि केवळ शहाणपणा शिल्लक राहील. पण प्लेटो हुशार निघाला. त्याने हे सगळे लिहून ठेवले आणि आज २,४०० वर्षांच्या नंतर आपल्याला अनेक गोष्टी लिखित स्वरूपात दिसत आहेत.

इसवीसन १८८० च्या सुमाराला टेलिग्राफ नावाचे यंत्र अवतरले आणि ठिपके आणि रेषा यांचा काळ सुरु झाला. आता वाक्ये छोटी झाली. समीक्षकांना वाटले की आता कवितेचा अंत होणार आणि आपण सर्व आता तोतरे बोलू लागणार. असे काही झाले नाही. टेलिग्राफ यंत्रणेत प्रत्येक वाक्यानंतर ‘स्टॉप’ हा शब्द येत असे.

अलिकडेच लेखक आणि पत्रकार असलेल्या निकोलस कार यांच्या एका मासिकातील लेखाने खळबळ उडवून दिली. ‘गूगल आपल्या सर्वांना मूर्ख बनवणार आहे आणि इंटरनेट देखील माणसाची एकाग्रता आणि चिंतन करण्याची क्षमता घालवणार आहे’, असे त्यांनी सांगितले. यावेळी जमाई कास्कियो यांनी त्याचा कडाडून विरोध केला. ते म्हणाले की, मानवी आकलन शक्ती आजवर समोर उभ्या ठाकलेल्या सगळ्या आव्हानांना सामोरी गेली आहे. इतकेच नव्हे, तर सुयोग्य विचारांच्या मार्गाने त्यातून उत्क्रांतीचा मार्गही मानवाने शोधला आहे.

आज आपल्या जीवनात आणखी एक लक्षणीय वळण दाखल झाले आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अथवा ‘एआय’ या नावाने ते ओळखले जाते. मूळ स्वरूपात एआय हा एक विस्तृत भाषा प्रारूपांचा संग्रह आहे. या तंत्रज्ञानाच्या बाबतीत अजूनही काही ठामपणे सांगता येत नसले तरीही आणि ते साधारण बुद्धिमत्तेच्या मार्गाने चालले आहे का? हे सांगण्याची अद्याप वेळ आलेली नसल्यामुळे असे म्हणता येईल की, हे प्रारूप आपल्या संस्कृतीला मान्य झाले की त्याचे विविध उपयोग कळतील आणि मानवाला ते उपयोगीही पडू शकेल. माणसाने तंत्रज्ञानाच्या बाबतीत आजवर अनेकदा हे करून दाखवलेले असल्याने तो पुन्हा एकदा हे नवे तंत्रज्ञानही पूर्णपणे आत्मसात करील, यात शंका नाही.

मानवाचे सर्वात पहिले आकलन असलेले तंत्रज्ञान म्हणजे भाषा हे होते. या भाषेमधूनच आपण जिथे आहोत तिथपर्यंत पोहोचलो आहोत. जगाच्या विविध संस्कृती आणि विविध भाषांशी संवाद सुरु झाल्यानंतर दोन्ही भाषांमधील काही शब्द दोन्ही भाषांमध्ये सामान्य झाले. आधी भाषा आणि नंतर लेखन यांच्यामधून आपल्या मेंदूमधील विचार कागदावर मांडता आले आणि आपण ते वाचूही शकलो. हे वितरण केले गेलेले आकलन होते, ज्ञान होते, हे लक्षात घ्या. इथपर्यंत आल्यानंतर संस्कृतीनेच या साधनांचा उपयोग आपल्याला जगण्यासाठी फायदेशीर ठरेल, अशी खात्री दिली. तरीही आपली नव्या आकलन तंत्रज्ञानाची भीती मात्र कमी झालेली नाही.

सुप्रसिद्ध माध्यम तत्वचिंतक मार्शल मॅक-लुहान यांनी असे मांडले की, माध्यमे म्हणजे माणसाचा विस्तार असतात; मात्र हा विस्तार करताना पूर्वीच्या काही कामांना ‘कात्री’ लावावी लागते. माणूस लिहिता झाल्यामुळे त्याची स्मरणशक्ती काहिशी कमी झाली असली तरी त्यामुळेच माणूस विज्ञान, इतिहास आणि साहित्य यात सक्षम होऊ शकला. माणूस लिहिता झाल्यामुळे त्याची सांस्कृतिक ओळख काहीशी धूसर होत गेली आणि छपाईच्या तंत्रज्ञानाने तर अनेकांच्या सत्यवचनी अधिकारशाहीला वचक बसवला. आता कृत्रिम बुद्धिमत्तेने आणलेल्या विस्तृत भाषा प्रारूपांमुळे तर्कशुद्धता, निर्मितीक्षमता आणि गंभीर विचार या माणसाच्या निसर्गदत्त प्रतिष्ठा-त्रयीवर आघात होण्याची भीती घोंघावते आहे.

विस्तृत भाषा प्रारूपे ही आजवरच्या कोणत्याही आकलन साधनापेक्षा अधिक घातक आहेत. त्यामुळे ही आजचीच भीती आहे असे नाही, तर त्यांनी येण्याची जी वेळ साधली आहे ती भीती वाढवणारी का आहे, त्यामागची कारणेही समजून घेतली पाहिजेत.

पहिला मुद्दा म्हणजे आपण माणूस आणि तंत्रज्ञान यांच्यात फरक दाखवू शकत नाही. दुसरे असे की, हे तंत्रज्ञान माणसाला बदलण्याची भाषा करीत आहे, त्याची क्षमता वाढवण्याची नाही. तिसरे कारण म्हणजे हे प्रारूप कोणत्याही संस्कृतीपेक्षा अधिक वेगाने वाढते आहे. चौथे कारण असे की, माणूस आतापर्यंत या तंत्रज्ञानाला पूर्णपणे समजून घेऊ शकलेला दिसत नाही. पाचवे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे हे तंत्रज्ञान सरळ सरळ माणसाच्या नैसर्गिक श्रद्धांवर आणि त्याच्या ‘विशिष्ट’ असण्यावर आघात करीत आहे.

एआयच्या संदर्भातील सुरुवातीच्या काही अभ्यासांमध्ये असे दिसले अथवा दाखवले गेले आहे की, या तंत्रज्ञानामुळे मानवी मेंदू सडण्याचे प्रकार होत असून माणूस या तंत्रज्ञानाचा केवळ उपभोग घेणारा मूर्ख ठरणार आहे. एका अमेरिकन विद्यापीठाच्या अभ्यासात एआय माणसाला मूर्ख बनवते आहे, असे म्हटले असले तरी तेथील अभ्यासाची व्याप्ती केवळ मोजक्या माणसांची होती. दुसऱ्या एका विद्यापीठाच्या अभ्यासात असे दिसले की ‘चॅट जीपीटी’चा उपयोग करणाऱ्यांचे ज्ञान ‘उथळ’ असते. याचा अर्थ सुरुवातीची संशोधने फारशी ग्राह्य ठरवता येणार नाहीत. कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात हे सामान्यपणे होतच असते आणि ‘चॅट जीपीटी’ची तर जगभरातील संस्कृतीशी ओळख होऊन केवळ काही वर्षेच झाली आहेत. नेमका अंदाज येण्यासाठी किमान दहा वर्षे तरी लागतील.

माध्यमे आणि काही एआय निर्माते यांनीही सार्वजनिक जाणीवेत एआयबद्दल एक सुप्त भीती घालून ठेवली होती. एआयची सुरक्षा ही अतिशय प्रचंड अशा आर्थिक गुंतवणुकीमुळे महत्त्वाची बनली होती.

सर्वसामान्य जनतेसाठी एआय ही एक गूढ काळी पेटी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्दच मुळात १९६० मध्ये उपयोगात आणला गेला. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे एआय हे इतर साधनांच्याप्रमाणे एकल संसाधन नसून त्यात अनेक कामे करणारी विविध साधने आहेत. विस्तृत भाषा प्रारूपे हे फार तर यातील पहिले साधन म्हणता येईल.

आज एआयही एका परिवर्तनाच्या वळणावर आहे. माणसाच्या जगण्यासाठी स्मरणशक्तीचा विस्तार आणि माहिती वाटून घेणे या दोन गोष्टींना प्राथमिकता आहे. पण एआय चे विस्तृत भाषा प्रारुप अजून विचार करायला शिकलेले नाही. उलट ते स्वार्थी होत चालले आहे आणि ‘या प्रश्नाचे उत्तर मला येत नाही’ हे शब्दच त्यांच्या कोशात नसल्यामुळे ते चक्क खोटे बोलतात आणि अखेरीला एक वाक्य असते, ‘आम्ही सांगतो ते खरे असेलच असे नाही’...आणि हे असे नवे तंत्रज्ञान माणूस घडवायला निघाले आहे.

विज्ञान विषयांचे अभ्यासक व लेखक

logo
marathi.freepressjournal.in