रोहित पवारांचा ‘फियास्को’

राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी राज्यात आमदार रोहित पवार यांनी गेले सव्वा महिने वादळ उभे करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांना राज्यातच नव्हे, तर लोकसभा, राज्यसभेतसुद्धा कोणीही दाद दिली नाही.
रोहित पवारांचा ‘फियास्को’
रोहित पवारांचा ‘फियास्को’
Published on

सह्याद्रीचे वारे

अरविंद भानुशाली

राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी राज्यात आमदार रोहित पवार यांनी गेले सव्वा महिने वादळ उभे करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांना राज्यातच नव्हे, तर लोकसभा, राज्यसभेतसुद्धा कोणीही दाद दिली नाही.

राष्ट्रवादीवर कब्जा मिळवण्यासाठी रोहित पवार यांनी कट-कारस्थान केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. आता सर्व डाव उघडकीस आल्याने विलीनीकरणासह आता हासुद्धा विषय संपुष्टात आला आहे असेच म्हणावे लागेल.

महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी कर्नाटकातून झिरो एफआयआर नोंदविण्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. एवढेच नव्हे, तर असा एफआयआर नोंदवण्याचा अधिकारच कर्नाटक सरकारला नाही, असा दावाही त्यांनी केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले की, कोणी कारस्थान करीत असेल तर आम्ही आकाश पाताळ एक करू. तुमच्यापेक्षा माझे व अजितदादांचे संबंध गेली १०-१२ वर्षे होते हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. अजितदादांचे विमान चालविणाऱ्या पायलटने कोणतीही नशा केली नव्हती. अपघात प्रकरणात अगोदर एडीआर नोंदवण्यात येतो अशावेळी घातपात आहे असे जर वाटले तर एडीआर एफआरएमध्ये कन्व्हर्ट होतो. त्याचा समावेश दोषारोप पत्रात होतो.

अजितदादा यांच्या अपघाती निधनानंतर त्याला वेगळे वळण देणारे पवार कुटुंबीय आमदार रोहित पवार यांनी गेली सव्वा महिने हा अपघात नसून घातपात आहे असे म्हणत मीडियाला हाताशी धरून एकच मोहोळ उठविले होते. हा प्रश्न लोकसभा, राज्यसभा, विधानसभा परिषदेत आमदार, खासदारांनी उठवावा यासाठी सतत भेटीगाठी घेत होते. विशेष म्हणजे नवी दिल्लीत जाऊन पत्रकार परिषद घेणे, काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, आपचे नेते अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्षाचे अखिलसिंह यादव, बिहारचे प्रसाद आदी नेत्यांना भेटून हा प्रश्न लोकसभा, राज्यसभेत उठवावा, अशी विनंती केली. विशेष त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी पक्षाच्या खा. सुप्रिया सुळेही होत्या, परंतु सव्वा महिन्यानंतर कुणीही अजितदादांच्या मृत्यूचा प्रश्न उपस्थित केला नाही. आता या प्रश्नाला जवळ जवळ पूर्णविराम मिळाला आहे. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावर रोहित पवार यांनी तासनतास पत्रकार परिषद घेऊन कुणीही त्याची साधी दखलदेखील घेतली नाही.

खरं पाहू गेल्यास दस्तरखुद्द शरद पवार यांनी पहिल्याच दिवशी ममता बॅनर्जी यांच्या प्रतिक्रियेवर स्पष्ट केले होते की, अजितदादांच्या विमानाला झालेला अपघात आहे त्यावर कुणी संशय व्यक्त करून राजकारण करू नये. असे असताना अचानकपणे रोहित पवार यांनी हा अपघात नाही, घातपात आहे. यावर राहुल गांधींप्रमाणे पत्रकार परिषदा मुंबईत लागोपाठ घेतल्या. इलेक्ट्रॉनिक मीडियाने त्याला जोरदार प्रसिद्धी दिली. त्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळात हा प्रश्न कुणीही उपस्थित केला नाही. उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली सभेत सीआयडी चौकशी जाहीर केली. दरम्यान, विमान कंपनीचे प्राथमिक रिपोर्टही सादर झाले. ते रिपोर्ट बिनबुडाचे आहेत असे सांगून रोहित पवार यांनी विमान कंपनीवर टीकेची झोड उठवली. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली. त्याप्रमाणे राज्य सरकारने केंद्र सरकारला कळविले. परंतु त्यानंतर रोहित पवार गप्प बसतील का? यावर समाधान न मानता त्यांनी दिल्ली गाठली. गेली सव्वा महिने आदळआपट केल्यानंतर आता त्यावर कुणीही भाष्य करण्यासही तयार नाही. हे पाहता रोहित पवारांचे ताबूत थंडावले आहेत.

सोशल मीडियावर जे-जे होत होते त्यामुळे अजित पवार समर्थकांत संभ्रम निर्माण झाला होता. म्हणे या कटाचा ‘मास्टर माइंड’ मिळाला आहे. हा मास्टर माइंड अजित पवारांच्या बरोबर सावलीप्रमाणे राहत होता. त्यांनीच हे कटकारस्थान केले, तर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी जादूटोण्याचा शोध लावला. म्हणे, जेथे विमान कोसळले होते ती जागा बदलली गेली- किती हास्यास्पद प्रकार आहे. अपघातग्रस्त विमानाचे धूड उचलता तरी येईल का? परंतु सर्वत्र संभ्रमावस्था निर्माण करणे एवढेच काम रोहित पवारांचे होते. मीडियाने त्याला जास्तच प्रसिद्धी दिल्याने रोहित पवार यांनी संजय राऊत यांची जागाच घेतली होती.

अजितदादांच्या निधनानंतर निर्माण केलेली ही संभ्रमावस्था मात्र बुधवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांची हवाच काढून घेतली. मुळात कर्नाटक सरकारला झिरो अवर्समध्ये गुन्हा नोंदविण्याचा अधिकारच नाही. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी राहुल गांधी यांची भेट घेऊन हे उद्योग केले; परंतु अपघातप्रकरणी १७५ (अ) खाली झिरो अवर्समध्ये गुन्हा नोंद व एफआयआर दाखल करता येत नाही. रोहित पवार यांना अजितदादांबद्दल जेवढे प्रेम आहे त्यापेक्षा आम्हाला अजितदादा गेल्याचे दुःख जास्त आहे. आम्ही दोघे १० ते १२ वर्षे एकमेकांच्या जवळचे होताे. हा अपघात नसेल घातपात असेल तर सरकार ते जमिनीतून उखडून पाहील. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक दाखले देऊन रोहित पवारांचे मुद्दे खोदून काढले.

राज्य सरकारने सीआयडी चौकशी सुरू केली. ती आता अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आमदारांनी मला भेटून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. राज्य सरकारने केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र देऊन सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मी स्वतः लवकरच केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन ती मागणी लावून धरणार आहे. तांत्रिकदृष्ट्या एफआयआर दाखल करता येत नाही. असे सांगून रोहित पवार यांना स्पष्ट शब्दांत ठणकावले. एकूण राष्ट्रवादी शरद पवार गटात जे राजकारण अजितदादा गेल्यानंतर सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणजे रोहित पवारांनी संभ्रमावस्था निर्माण केली आहे. त्याचा पर्दाफाश बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी केला. प्रारंभी राष्ट्रवादी विलीनीकरणावर राष्ट्रवादीच्या (शरद पवार) नेत्यांनी हलकल्लोळ केला. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होऊन राष्ट्रवादीची धुरा त्यांच्याकडे गेली. यावेळी शरद पवार गटातील नेत्यांना अजित पवारांची राष्ट्रवादी बळकवायची होती, म्हणून तर विलीनीकरणाचे घोडे पुढे दामटले जात होते. राष्ट्रवादीच्या नेत्यामुळे हा कट उधळला गेला आणि मग रोहित पवार यांनी अजितदादांचा मृत्यू घातपात आहे असे म्हणून राजकारण सुरू केले त्यास मुख्यमंत्र्यांनी पूर्णविराम दिला आहे.

राष्ट्रवादी (शरद पवार) दोन्ही आघाड्यांवर पूर्णपणे फेल जात असताना आता रोहित पवार यांनी ज्यांचा सुतराम संबंध नाही असे असताना अजितदादांची राष्ट्रवादी ताब्यात घेण्याचा डाव प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांचा होता, असा आरोप केला. मुळात प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष व सुनील तटकरे हे प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. उलट रोहित पवार यांचा सुतराम संबंध नाही. यावर तटकरे यांनी म्हटलं आहे ते विशेष महत्त्वाचे आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर ज्या ज्या घडामोडी, तसेच सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या विरोधात कोणती कटकारस्थाने केली याची पूर्ण माहिती आमच्याकडे आहे. अजितदादा जिवंत असतानाही कटकारस्थाने करण्यात आली आताही तोच प्रकार सुरू आहे, असे तटकरे यांनी स्पष्ट केले. याचा अर्थ पवार कुटुंबीयांच्या नावावर राष्ट्रवादी हडप करण्याचा डाव खेळला गेला. एकूण रोहित पवार यांचा फुगलेला फुगा फुटला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी रोहित पवार यांच्या आरोपांचा समाचार घेताना म्हटलं, अजितदादा गेले. यामुळे महाराष्ट्र हादरून गेला होता. रोहित पवार यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. त्याबद्दल आम्हाला आनंद आहे. अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाला कोणी वेगळं वळण लावत असेल तर महाराष्ट्र सरकार गप्प बसणार नाही. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी रोहित पवारांच्या एक-एक मुद्द्याची चिरफाड केली. तुम्ही दिल्लीत गेलात, राहुल गांधी व इतरांना भेटलात आणि त्यातूनच कर्नाटक सरकारने झिरो अवर्समध्ये गुन्हा नोंदून पाठवला आहे. त्यांना तो अधिकार नाही. या प्रकरणात रोहित पवार न्यायालयात जाऊ शकतात, न्यायालय आदेश देऊ शकते. परंतु १७५ (अ) मध्ये गुन्हा नोंदल्यानंतर जोपर्यंत आरोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत एफआयआर दाखल करताच येत नाही. यामध्ये महत्त्वाचे आरोपपत्र आहे. मुख्यमंत्र्यांनी यावेळी सुमारे ४५ मिनिटे अजितदादांच्या अपघातासंदर्भात माहिती दिली. तपास यंत्रणा जे करत आहे त्यात अडथळा आणून संभ्रम निर्माण करू नका. जादूटोणा, भोंदूबाबा असे करून जर विमान पाडणार असेल तर मग निवडणूक तरी कशाला घ्यायची?

logo
marathi.freepressjournal.in