धोक्याची घंटा

एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्याचं राजकीय चित्रच पालटलं आहे
धोक्याची घंटा
Published on

एकसंघ असल्याचा दावा करणारी महाविकास आघाडी अंतर्विरोधानं कशी त्रस्त आहे, हे अखेर स्पष्ट झालं. विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचवी जागा जिंकण्यासाठी एकही आमदार नसताना भाजपचा उमेदवार विजयी होतो आणि १६९ आमदारांचा पाठिंबा असताना महाविकास आघाडीचा उमेदवार पराभूत होतो, यावरून महाराष्ट्राला राजकीय भूकंपाचे संकेत मिळाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्याचं राजकीय चित्रच पालटलं आहे. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषद निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला पराभवाची धूळ चारली आहे. या दोन्ही निवडणुकांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची कुशल रणनीती यशाचं गमक ठरली. विधान परिषद निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचे तब्बल २१ आमदार फोडत पाचव्या जागेवरील आपला उमेदवार जिंकून आणला. ही महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. राज्यसभेनंतर आता विधान परिषद निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडी सरकारला धोबीपछाड दिली आहे. या निवडणुकीत भाजपला १३४ मतं मिळाली. सत्तास्थापनेसाठीचा आकडा १४५ आहे. या जादूच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला आता फक्त १२ आमदारांची गरज आहे. सध्या भाजपकडे १०६ आमदार आहेत आणि अपक्षांच्या पाठिंब्याने हा आकडा ११३ पर्यंत जातो; पण या निवडणुकीत भाजपने १३४ मतांपर्यंत मजल मारली आहे. म्हणजेच त्यांच्या पारड्यात २१ अतिरिक्त मतं आली आहेत. आता ही मतं कुठून आली आणि कोणत्या पक्षाचे कोणते आमदार फुटले, हे प्रश्‍न उपस्थित होतातच पण त्याहून सर्वात मोठा प्रश्‍न पडतो तो म्हणजे उद्धव ठाकरे सरकार आता अल्पमतात येत चाललं आहे का? त्यांचं स्थान डळमळीत झालं आहे का? भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या आमदारांपेक्षा जास्त मतं मिळवत असताना जास्त मतं तर बाजूलाच; परंतु शिवसेनेला पुन्हा एकदा मोठ्या फुटीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पाठिशी असलेला १३ आमदारांचा गट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गेला होता. खरं तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासूनच शिंदे नाराज आहेत. उध्दव ठाकरे त्यांना मुख्यमंत्री करतील असं वाटलं होतं; परंतु तसं झालं नाही. त्यानंतर उघडपणे नाही, तरी अंतर्गत धुसफूस सुरू होती. आता तर ती जाहीरपणे व्यक्त झाली. शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदार संपर्कक्षेत्राच्या बाहेर जातात, यावरून ते लक्षात येतं. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचं एक-एक मत बाद झालं असतानाही त्यांचे उमेदवार अगदी सहज विजयी होतात आणि या दोन पक्षांना जास्त आमदार पाठिंबा देत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जादा मतं मिळणं तर दूरच; स्वतःचे आमदारही टिकवता येत नाहीत, हे प्रकर्षानं पुढं आलं. राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्षांची मतं भाजपकडे गेली होती आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीतल्या दोन पक्षांना आपलीच मतं टिकवता आली नाहीत. यावरून भाजपने महाविकास आघाडीचं घर किती पोकळ केलं आहे, हे लक्षात येतं. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार काठावर पास झाले. तसंच तीन आमदार आणि समर्थक नऊ अपक्ष आमदारही फुटले. मध्यरात्रीपासूनच शिवसेनेच्या वर्तुळात या निकालाचे तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली. सोमवारी रात्रभर वर्षा बंगल्यावर बैठकांचं सत्र सुरू होतं. महाविकास आघाडीतल्या शिवसेना आणि काँग्रेसला आपली मतं राखता आली नसताना राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अतिरिक्त सात मतं मिळवल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने अगोदर ‘एकला चलो रे’ चा इशारा दिला होता. तो राष्ट्रवादी काँग्रेसने जेवढा गांभीर्याने घेतला, तेवढा काँग्रेसने घेतला नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले होते; मात्र पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागल्यानं त्यांचं संख्याबळ ५३ इतकं झालं. त्यानंतर पक्षाचे नेते आणि मंत्री नवाब मलिक तसंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात जावं लागल्याने मतदानाचा हक्क बजावता आला नाही. त्यांच्या मतदानाची याचिका सर्वोच्च न्यायालयानेही निकाली काढली. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वत:ची केवळ ५१ मतं होती; मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे या दोघांना मिळून ५७ मतं मिळाली. तसंच निंबाळकर यांच्या वाट्याचं एक मत भाजपच्या आक्षेपामुळे बाद झालं. याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकची सात मतं मिळवल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतं. विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कग्रेसची सर्व सूत्रं पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती होती. पक्षाची ५१ मतं असताना त्यांच्या दोन उमेदवारांना ५७ मतं मिळाली. यामागे प्रामुख्याने पवार यांच्या जवळ असलेले अपक्ष, समाजवादी पक्ष आणि ‘एमआयएम’च्या मतदारांची त्यांना साथ मिळाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पवार यांचा आमदारांवर किती मोठा प्रभाव आहे, हे या निवडणुकीतून स्पष्ट झालं. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडं पुरेसं संख्याबळ नव्हतं. असं असूनही भाजपनं विजय खेचून आणला, हे आता सत्ताधाऱ्यांंनाही बोचत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. महाविकास आघाडीच्या आजच्या पराभवाचे तीव्र पडसाद येत्या काही दिवसात महाराष्ट्रात उमटण्याची व आरोप-प्रत्यारोपांच्या वादळात सरकारच्या स्थैर्यापुढे प्रश्‍नचिन्ह उभं राहण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला आईचं दूध विकणारा नराधम पक्षात नको, असा इशारा शिवसेना आमदारांच्या बैठकीत दिला होता. प्रत्यक्षात  मात्र शिवसेनेचीही मतं फुटल्याचं निकालावरून दिसतं. शिवसेना पक्षप्रमुखांची पक्षावरची पकड आणि आमदारांवरचा दरारा कमी झाल्याचं हे लक्षण आहे. काँग्रेसला पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे दोन्ही जागा जिंकण्यास ५२ मतांची गरज होती. ४४ मतं जवळ असताना त्यांना बाहेरून आठ मतं आणणं आवश्यक होतं. शिवसेनेने आपल्याकडील चार जादा मतं काँग्रेसला देऊ, असा शब्द दिला होता. प्रत्यक्षात ही मतं काँग्रेसला मिळाली नाहीत, असं निकालावरून दिसतं. बाहेरील मतांपेक्षा काँग्रेसला स्वत:ची ४४ मतंदेखील शाबूत ठेवता आली नाहीत. त्यांच्या दोन उमेदवारांना पहिल्या पसंतीची मिळालेली मतं ४१ इतकीच आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचीही तीन मतं फुटल्याचा संशय आहे. त्यामुळे दगाबाज आमदार कोण, याविषयी बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं. एकंदरीत, फडणवीस यांचा प्लान यशस्वी झाल्याचं दिसतं.

logo
marathi.freepressjournal.in