डॉ. आंबेडकरांचे शिक्षणतत्त्व

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला गुलामगिरीतून मुक्त होण्याचे प्रभावी साधन मानले. त्यांनी शिक्षणबंदीची चिकित्सा करून सार्वत्रिकीकरण, राष्ट्रीयकरण व मुक्तीदायी शिक्षणाचा पुरस्कार केला. शिक्षणाशिवाय राजकीय परिवर्तन शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Published on

शिक्षणनामा

रमेश बिजेकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला गुलामगिरीतून मुक्त होण्याचे प्रभावी साधन मानले. त्यांनी शिक्षणबंदीची चिकित्सा करून सार्वत्रिकीकरण, राष्ट्रीयकरण व मुक्तीदायी शिक्षणाचा पुरस्कार केला. शिक्षणाशिवाय राजकीय परिवर्तन शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. आंबेडकरांची चळवळ भारतातील ऐतिहासिक चळवळ होती. गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी ज्ञानात्मक लढाई त्यांनी केंद्रवर्ती केली. अज्ञान हे गुलामगिरीचे कारण आहे, हे महत्त्वाचे निदान त्यांनी केले. यातून सुटका करून घेण्यासाठी मुक्तीदायी ज्ञानाचा त्यांनी पुरस्कार केला. ब्राह्मणी गुलामगिरी अधोरेखित करून जातीअंताचा मुक्तीदायी दृष्टिकोन त्यांनी स्वीकारला. त्यांच्या लिखाणात व आंदोलनात ही बाब केंद्रवर्ती राहिली आहे. हा ज्ञानात्मक संघर्ष त्यांनी सर्वव्यापी केला. शिक्षणातही त्यांची ही दृष्टी प्रतिबिंबित होते. डॉ. आंबेडकरांनी शिक्षणावर प्रासंगिक लिखाण व भाषणे केली आहेत. त्यातून त्यांचा शिक्षणदृष्टिकोन स्पष्ट होतो. त्यांच्या शिक्षणतत्त्वात पुढील बाबी अंतर्भूत आहेत. परिवर्तनाचे साधन, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, राष्ट्रीयकरण, भौतिक लाभाचे साधन आणि मुक्तीदायी शिक्षण आशय या प्रमुख बाबींचा समावेश त्यांच्या शिक्षणविचारात दिसून येतो.

परिवर्तन ही सापेक्ष परिभाषा आहे. सुधारवादी, क्रांतिकारी आणि प्रतिगामी या तिन्ही विचारप्रवाहांमध्ये या परिभाषेचा वापर केला जातो. डॉ. आंबेडकरांनी ती सापेक्ष न ठेवता व्याख्यांकित केली. त्यांच्या व्याख्येत दोन महत्त्वाचे बिंदू आहेत, गुलामगिरी अधोरेखित करणे व पर्याय देणे. त्यांच्या शिक्षणविचारात याची प्रचिती वारंवार येते. शिक्षणबंदीची चिकित्सा वर्णजाती व्यवस्थेशी जोडून त्यांनी केली. शिक्षणबंदीची ज्ञानपरंपरा वेदांतिक ब्राह्मणी ज्ञानपरंपरा राहिली आहे. ही ज्ञानपरंपरा आपण स्वीकारल्यामुळे आपण शिक्षणबंदी स्वीकारली. शिक्षणबंदी नाकारणारा विचार प्राचीन काळापासून अस्तित्वात आला आहे, परंतु त्या विचाराचे आपण पाईक झालो नाही. या अज्ञानापोटी हजारो वर्ष ज्ञानव्यवहारात आपला हस्तक्षेप राहिला नाही. ही शिक्षणबंदी आपण झुगारली पाहिजे.

राजकारणात उच्चवर्णीयांचे वर्चस्व आहे. अज्ञानामुळे आपले राजकीय अस्तित्व निर्माण झाले नाही याकडे त्यांनी पुढील शब्दात लक्ष वेधले -

“शिक्षण व विद्या या गोष्टीशिवाय आपला उद्धार होणार नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक कार्ये अंगीकारली. राजकारणात माझा विशेष महत्त्वाचा काळ गेला. सध्या राजकारणाच्या दोऱ्या उच्चवर्णीयांच्या हातात आहेत. त्या दोऱ्या तशाच त्यांच्या हाती ठेवण्यासाठी उच्चवर्णीयांची धडपड चाललेली आहे. माऱ्याच्या जागा पटकावण्यासाठी जी विद्या पाहिजे ती अजून उच्चवर्णीयांखेरीज इतरांना प्राप्त झालेली नाही. ……त्याप्रमाणे राजकारणाच्या दोऱ्या विद्येशिवाय आपल्या हाती येणार नाहीत. राजकीय सत्ता हाती यावी म्हणून अनेकांनी प्रयत्न चालविले आहेत. पण त्यांना यश येत नाही...”

राजकीय परिवर्तन व निर्णयप्रक्रियेतील स्थान शिक्षणाशिवाय निश्चित होत नाही. म्हणून शिक्षणबंदीच्या मानसिकतेतून बाहेर पडून शिक्षण घेण्याचे आव्हान त्यांनी केले.

‘डॉ. आंबेडकर म्हणतात, आम्ही कोणत्याही लाभाचा त्याग करायला तयार आहोत, परंतु उच्चशिक्षणातील भौतिक लाभाचा त्याग करायला तयार नाही.’ शिक्षण हे भौतिक लाभाचे साधन आहे, याचे संकेत आंबेडकरांनी दिले. मात्र भौतिक लाभाचा अर्थ नोकरी मिळवण्यापुरता घेतला गेला. शाळा, महाविद्यालये ही सार्वजनिक भौतिक केंद्रे आहेत. ती सार्वजनिक न राहता खासगी झाल्यास भौतिक लाभ हिरावला जातो. ज्ञानाची केंद्रे सार्वजनिक, सरकारी, लोकाभिमुख असल्यास त्याचा भौतिक लाभ जनतेला मिळतो. खासगी तत्त्वाने सार्वत्रिकता संपुष्टात येते. ज्ञानव्यवहारातील हस्तक्षेपातून अनेक शक्यता खुल्या होतात. ज्ञान स्वयंभू एक भौतिक शक्ती असते. व्यवस्थेचे परिवर्तन ज्ञानातून घडते. व्यवस्थेचा भौतिक ढांचा बदलल्यास त्याचा लाभार्थी होण्याचा अवकाश निर्माण होतो. उत्पादन आणि वितरण प्रक्रियेत बदल ज्ञानातून घडतात. औद्योगिक उत्पादनाची सुरुवात औद्योगिक ज्ञानातून (विज्ञान) झाली. म्हणून भौतिक लाभाकडे व्यापक दृष्टिकोनातून बघणे डॉ. आंबेडकरांना अपेक्षित होते.

१८८२ चा हंटर आयोगाचा अहवाल १८८५ ला प्रसिद्ध झाला. कायदा अस्तित्वात आल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी यावर आक्षेप घेतला. या कायद्याने शिक्षणाची जबाबदारी लोकल बॉडीवर (स्थानिक स्वराज्य संस्था) सोपवली व सरकारने आपली जबाबदारी झटकली. लोकल बॉडीला शिक्षणाची समज नव्हती. शिक्षण का गरजेचे आहे याची जाणीव त्यांना नव्हती. हा पहिला आक्षेप डॉ. आंबेडकरांनी घेतला. या आक्षेपात सामाजिक तथ्ये होती. सरंजामी प्रवृत्तीचे वर्चस्व समाजात होते. त्यामुळे लोकल बॉडीत सरंजामी प्रवृत्तीचे वर्चस्व असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. सरंजामशाही पुराणमतवादी विचारसरणी व संस्कृतीची पुरस्कर्ती होती. आधुनिक ज्ञान आणि नवी विचारसरणी स्वीकारण्याची क्षमता सरंजामशाहीची नव्हती. त्यामुळे लोकल बॉडी शिक्षणाची न्याय्य जबाबदारी पेलू शकत नव्हती. दुसरे कारण म्हणजे लोकल बोर्डाचे अल्प उत्पन्न आणि कमकुवत यंत्रणा. शिक्षण ही महत्तम बाब आहे. तिला किमान न्याय देण्यासाठी आर्थिक पाठबळ आवश्यक असते, अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली.

सरंजामी प्रवृत्ती शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या बाजूची नव्हती. जातीव्यवस्थेने घडवलेल्या बंदिस्त शिक्षणव्यवस्थेचे सामाजिकीकरण झाले होते. ही रचना शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण घडू देत नव्हती. दुसरे कारण म्हणजे सर्वांना शिक्षण देण्याची ब्रिटिश सरकारची राजकीय इच्छाशक्ती नव्हती. त्यामुळे ते आपली जबाबदारी इतरांवर ढकलत होते. लोकल बोर्डच काय, प्रांतीय सरकारही शिक्षणाचा खर्च भागवू शकत नव्हते. म्हणून शिक्षण लोकल बोर्डावर न सोपवता केंद्र सरकारने शिक्षणाची जबाबदारी स्वीकारावी व खर्च वाढवावा, अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली.

भारतातील ज्ञानात्मक संघर्ष ब्राह्मणी-अब्राह्मणी छावणीत सातत्याने राहिला आहे. २० व्या शतकात ब्राह्मणी नीती-मूल्यांसह भांडवली नीती-मूल्यांची पेरणी होत होती. सत्ताधारी वर्ग ब्राह्मणी-भांडवली नीती-मूल्यांचा पुरस्कार करत होता. शिक्षणात ब्राह्मोभांडवली विचारसरणी रुजलेली होती. त्यातही ब्राह्मणी विचारसरणीचे प्रभुत्व होते. या विचारसरणीचे प्रभुत्व कायम रहावे असा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा होता. सत्ताधाऱ्यांसाठी शिक्षण ही राजकीय कृती असते. देश कसा घडवायचा याचा आराखडा म्हणजे शिक्षणधोरण असते. शिक्षणआशयात उत्पादन-वितरण धोरण आणि जीवनदृष्टी घडवण्याचा ज्ञानव्यवहार उभा केला जातो. गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, भूगोल, पर्यावरण इत्यादी विषय उत्पादनासाठी व भाषा, सामाजिक शास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, प्रतीके इत्यादी विषय जीवनदृष्टी घडवण्यासाठी अंतर्भूत केलेले असतात.

उभरत्या भांडवलशाहीची गरज म्हणून विज्ञान, तंत्रज्ञानाचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला होता. अभ्यासक्रमातील आधुनिक ज्ञानप्रणाली कोणत्याही समाजाची गरज असते. चिकित्सा केंद्रवर्ती करून नवे शोध लावणे ही ज्ञानप्रणालीचे महत्त्वाचे अंग असते. त्यातून ती स्वतःही विकसित होत असते व कालबाह्य ज्ञानाला प्रतिवाद उभा करत असते. भारतात मात्र या ज्ञानप्रणालीचा व्यापक विचार न करता यांत्रिक विचार केला गेला. म्हणून विज्ञानाची पदवी घेतलेला विद्यार्थी वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊ शकला नाही. ज्ञान-विज्ञान आणि देव-धर्म हे विषय कप्पेबंद राहिले. त्यामुळे ज्ञान-विज्ञानाचा विचार करताना परलोकवादाचे सहसंबंध जोडले जात नव्हते. आजही जोडले जात नाहीत. धार्मिक नीती-मूल्यांच्या पुरस्कारातून पितृसत्ताक जातीव्यवस्थेच्या दृढीकरणाची भूमिका शिक्षण आशयात घेतली होती. डॉ. आंबेडकरांनी हे नाकारून जातीबंदिस्त उत्पादनसंबंध तोडण्यासाठी आधुनिक ज्ञानप्रणाली आणि आंतरजातीय विवाह व जैविक नातेसंबंध उभारण्यासाठी अब्राह्मणी नीती-मूल्यांचा पुरस्कार शिक्षण आशयात करण्याचा आग्रह धरला.

rameshbijekar2@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in