
- दखल
- डॉ. स्वर्णमाला म्हस्के
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त विशिष्ट जातीयांचे असा समज आजही समाजात सोयीस्करपणे दृढ असताना या समजाला छेद देत एक भटक्या जमातीतील मुलगी शिक्षण घेऊ लागते. शिक्षणाच्या या वाटेवर तिला जोतिबा भेटतात, बाबासाहेब भेटतात आणि तिच्यात अंतर्बाह्य परिवर्तन होते. ‘त्यांचे’ वाटणारे बाबासाहेब आता तिला ‘आपले’ वाटतात.
माझा जन्म मराठवाड्यातील २०० घरांची वस्ती असलेल्या छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात झाला आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्याचे सामाजिक स्थान हे जात-सरंजामी (caste-feudal) आणि लिंगभाव असमानता (gender inequalities) नी घडलेले आहे. या प्रदेशात सगळ्याच प्रकारचे भेदभाव गडद आहेत. अशा वातावरणात मोठं होत असताना खेड्यातील व्यवहाराने माझा बालपणाचा अवकाश पूर्णपणे व्यापलेला होता. ग्रामीण भागातील वास्तव आणि त्यातील एका भटक्या जातीचे सामाजिक स्थान यानुसार माझी जडणघडण होत होती. वडिलांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले. आई रात्रशाळेत प्रौढ शिक्षण केंद्राच्या माध्यमातून शिकली. आई-वडील दोघेही शेती करतात. घरात पदवीपर्यंतचे शिक्षण यापूर्वी कोणीही घेतलेलं नव्हतं. त्यामुळे काय शिकलं पाहिजे हे घरातून कळण्याचा प्रश्नच नव्हता. पण आई-वडिलांनी सतत शिक्षणासाठी पाठिंबा दिला.
ज्या वयात गावात आजूबाजूला बालविवाह होत होते त्यावेळी आई-वडिलांनी मला शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं, ही खरंच मोठी जमेची बाब होती. माझ्या उच्च शिक्षणालाही त्यांनी पाठिंबा दिला. असे असले तरीही कुटुंबात दैनंदिन व्यवहारात स्त्री-पुरुष विषम व्यवहार ठळक होते. जातीचे, कुटुंबाचे पावित्र्य जपण्याकरिता मुलींवर जास्त बंधन होती. मुलींना जास्त शिकू न देता बालविवाह करण्याला समाजमान्यता होती. घरात आणि आजूबाजूला लग्न होईपर्यंत शिक्षण घ्यावे एवढाच मुलींच्या शिक्षणासंबंधीचा विचार तत्कालीन परिस्थितीत होत होता. भारतात मध्यम जातींमध्ये स्त्रियांची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख ही स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडताना दिसत नाही, तर त्यांची स्व-ओळख ही जात-धर्म आणि लिंगभावाच्या एकत्रित सत्ताकारणामधून घडते. हे सत्ताकारण ज्या पद्धतीने स्त्रियांची ओळख उभी करते, त्यातूनच त्यांची सामाजिक ओळख घडत जाते. पर्यायाने याच सत्ताकारणाचे दबावतंत्र मी स्वत:ही मुलगी म्हणून मोठं होत असताना अनुभवत होते.
गावात जातीनुसार वस्त्या होत्या. प्रत्येक वस्तीचे जातनियमनानुसार दैनंदिन व्यवहार सुरू होते. बालवयात मी सामाजिकरित्या रूढ असलेल्या जाती-धर्माच्या आचार-विचार मान्यतेचा कधी खोलवर विचार केला नव्हता. सार्वजनिक ठिकाणी निम्न जातींना दिली जाणारी वागणूक, त्यांच्याशी केले जाणारे तुटक व्यवहार आणि त्यांचं जगणे हे सर्व नैसर्गिक आहे, अशीच स्व-जाणीव जातीसंस्थेने बालवयात विकसित केलेली होती. जात-धर्माच्या या सांस्कृतिक नियमानुसार दैनंदिन जीवन आकार घेत होते. मात्र माझ्या घरामध्ये इतर कुटुंबापेक्षा जात आणि धर्माबद्दल उदार वातावरण होते. आई-वडिलांनी घरात कधीच जातीबद्दलचा हा भेदभाव विकसित करायला हातभार लावला नव्हता. त्यामुळे माझ्या कुटुंबामधून मला उदारपणे वावरण्याचे मूल्यशिक्षण मिळालेले होते. पर्यायाने बालपणापासूनच सार्वजनिक जागी वावरताना, शिक्षण घेताना विषम व्यवहार कधीही जाणीवपूर्वक जगण्याचा भाग बनलेला नव्हता.
बाबासाहेबांची भेट आणि माझ्यातील स्थित्यंतर
पदव्युत्तर शिक्षणाकरिता मी संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास विभागामध्ये प्रवेश घेतला. औरंगाबादला शिक्षण घेणं हे माझं स्वप्न होतं. या स्वप्नासाठी मी सर्व पातळ्यांवरील संघर्ष करत राहिले. औरंगाबादला आल्यानंतर प्रथम काही काळ माझे वर्तन गावात अनुभवलेल्या विषम व्यवहारानुसार घडत होते. विद्यापीठातील पहिल्या भीमजयंतीची उत्सुकता मला होती, पण लहानपणापासून कधीच ‘बाबासाहेब आपले सर्वांचे आहेत’ हे ऐकले नव्हते किंवा ‘भीमजयंती’ आपल्यासाठी नसते, ती विशिष्ट जातीतील लोकांसाठी असते, हा विचार घडलेला होता. त्यामुळे मी पूर्णवेळ जयंतीच्या मिरवणुकीच्या कडेकडेने उभी राहिले. आपण जयंतीला येऊन भयंकर चूक केली, असा अपराधभावही येत होता. भीम जयंतीत मोकळेपणाने डान्स करणारी मुलं-मुली पाहून मला असं कसं असू शकतं? हा मोठा प्रश्न पडला होता. कारण माझ्या २२ वर्षांच्या प्रवासात कधीच माझ्या जवळपास असलेल्या स्त्रीला आनंदाने, मोकळेपणाने नाच करताना बघितलं नव्हतं. ‘बाईने नाचणं’ हे बेइज्जत असलेले लोक करतात ही जात आणि पितृसत्तेची दृष्टी त्या काळात घडलेली होती. परंतु या विद्यापीठातील व्यवहाराने माझी ही दृष्टी लवकरच बदलली. दुसऱ्या वर्षीच्या जयंतीपर्यंत मला ‘आपले बाबासाहेब’ इतकी समज आली आणि येथून पुढे ‘जयंतीत नाचणं’ हा माझ्यासाठी ‘स्वातंत्र्याची’ स्फूर्ती देणारा क्षण होता व आज तो अधिक प्रवाही ठरला आहे.
या विद्यापीठात आल्यावर प्रथमत: मला माझ्या सामाजिक स्थानाविषयी जाणीव झाली. ही जाणीव मला वर्गामध्ये माझ्या शिक्षकांनी शिकवलेल्या फुले-बाबासाहेबांमुळे झाली. आपल्यासोबत खासगी आणि सामाजिक अवकाशात जो व्यवहार होत होता त्याबद्दलचे प्रश्न मनात उपस्थित होऊ लागले. मुलींचेही एक स्वतंत्र म्हणणे असते, मुलींनाही हक्क-अधिकार असतात, ते हिरावले जात असतील तर ते लढून मिळवावे लागतात, हा आत्मविश्वास मला या परिसराने दिला. दुसरीकडे वर्गातून, वाचनातून बाबासाहेब कळत होतेच, पण मला या विद्यापीठामध्ये शिकताना येथील चळवळींमधून जैविक व वैचारिक बाबासाहेब भेटले. विद्यापीठामध्ये शिक्षण घेणारी माझी पहिली पिढी होती. येथे राहण्याचा संघर्ष होताच. या संघर्षात हॉस्टेलमध्ये दर्जेदार जेवण न भेटणे, आर्थिक परिस्थिती बिकट असणे, अशा अनेक समस्या होत्या. मात्र या प्रश्नांमुळे हतबल न होता संघर्ष करून प्रश्न सोडवले पाहिजेत, ही जाणीव मला इथल्या फुले-आंबेडकरी चळवळीमुळे झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ही फुले-आंबेडकरी चळवळीची महत्त्वाची प्रेरणा आहे. मलाही ती मिळाली. या प्रेरणेनेच माझ्यातील विषम धारणांचे उच्चाटन करण्यास मदत केली. विद्यार्थी चळवळीने माझ्यातील समतादायी ‘स्व’ घडवण्याचा प्रयत्न केला. सम्यक दृष्टी मला याच भूमीने दिली.
मध्यम जातीच्या आणि हिंदू धर्माच्या आचार-विचारातून माझी धार्मिक ओळख उभी राहिलेली होती. पण या ओळखीमुळे समाजात आपल्याला सतत दुय्यम वागणूक मिळाली आहे, याची जाणीव होऊ लागली होती. संस्कृती, रूढी-परंपरा यांच्या नावाखाली स्त्रियांना दुय्यम, तर कधी दर्जाहीन वागणूक मिळते हे लक्षात येऊ लागले. त्यावेळी मी माझ्या धार्मिक ओळखीला (religious identity) प्रश्न विचारू लागले. या प्रश्न विचारण्याने मला माझी खरी ओळख कोणती आहे याचं उत्तर मिळवून देण्यास मदत केली. सम्यक दृष्टी घडवण्यासाठी व ‘स्व’ची ओळख करून देण्यासाठी मला ‘बुद्धिझम’ महत्त्वाचा वाटतो.
बाबासाहेबांनी दिली ज्ञान निर्मितीची प्रेरणा
पदवीपर्यंत माझं वाचन फक्त परीक्षाकेंद्री होतं. पदवीनंतर मी अभ्यासक्रमाच्या बाहेरचं अतिरिक्त वाचन करायला सुरुवात केली. एम.ए.चं शिक्षण घेत असताना वर्गात जो इतिहास शिकवला जात होता तो आतापर्यंत शिकलेल्या इतिहासपेक्षा वेगळी दृष्टी देणारा होता, हे लक्षात यायला लागलं. राजेरजवाड्यांच्या कथा आणि लढाई म्हणजेच इतिहास या टॅब्यूमधून बाहेर काढून सर्वसामान्य लोक, स्त्रिया आणि वर्षानुवर्ष परिघावर राहिलेल्या लोकांचा आवाज इतिहासात समाविष्ट का नाही? त्यांच्या हस्तक्षेपाच्या आणि कर्तव्याच्या नोंदी व्हायला हव्यात, या आशयाची मांडणी शिक्षकांकडून होत होती, ती कळू लागली. इतिहासलेखनातील वस्तुनिष्ठता काय असते, याची समज येऊ लागली. या समजेमुळे ज्ञान व्यवहारविषयी जिज्ञासा निर्माण झाली. फुले-बाबासाहेब-मुक्ता साळवे-ताराबाई शिंदे यांच्या इतिहास दृष्टीने ‘वैश्विक मानवतावादाची’ भूमी दृष्टी (stand point) समजली.
बाबासाहेबांना भारतातील ज्ञान निर्मितीचं गौडबंगाल समजलं होतं. अस्पृश्य जातीत जन्म झाल्यामुळे जातीव्यवस्था आणि धर्मव्यवस्थेकडून मिळालेली अमानवीय वागणूक बाबासाहेबांनी अनुभवली होती. बाबासाहेबांनी आपल्याला आलेल्या स्व-अनुभवांना प्रश्न विचारले. मला किंवा माझ्या समुदायाला आणि स्त्रियांनाच ही वागणूक का? असे प्रश्न त्यांना पडले. याची पाळंमुळं त्यांना जात-धर्माच्या सत्ताकारणामध्ये दिसली. त्यांनी त्यांच्या इतिहासलेखनामध्ये ‘अज्ञान’ आणि ‘गुलामी’ची कारणमीमांसा केली आहे. त्यांची ज्ञान निर्मिती माझ्यासारख्या जात-धर्म आणि पुरुषत्वाचे दबाव तंत्र अनुभवणाऱ्या मुलीच्या लेखनाची प्रेरणा बनली. लिखाण कोण करत आहे? कुठल्या स्थानावरून (location) करत आहे? कोणाच्या बाजूने करत आहे? अर्थात ज्ञान कोण उभे करत आहे? आपल्यापर्यंत येणारे ज्ञान हे तथ्य (fact) आहे का? या सगळ्या गोष्टी समजून घेणे किती आवश्यक आहे, हे कळले. ज्ञानाकडे, ज्ञान निर्मितीकडे भाबडेपणानं बघणं सोडून दिलं पाहिजे, याची जाणीव होऊ लागली. पर्यायाने आपल्यावर ज्ञान म्हणून थोपवलेल्या गोष्टींची पडताळणी करायची दृष्टी बाबासाहेबांच्या ज्ञान व्यवहारामुळे मिळाली.
शिक्षणाचं अंतिम उद्दिष्ट
भारतीय समाजव्यवस्थेत वर्षानुवर्ष शिक्षण हा विशिष्ट जात-वर्गाचा अधिकार मानला जात होता. शिक्षणामुळे एका वर्गाकडे ‘विशेषाधिकार असलेली (privileged) प्रतिष्ठा’ आहे, तर दुसरीकडे शिक्षण नसल्यामुळे एका मोठ्या समूहाला अपमानास्पद, अवमानित आयुष्य जगावे लागत आहे, हे डॉ. बाबासाहेबांना समजलं होतं. समाजशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागतिक पातळीवर शोषणाची काय स्थिती आहे याचा आढावा घेतला. त्याकाळी जगभरात विविध समाजघटकांचे शोषण होत होतेच, पण त्याविरोधातले आवाजही उभे राहिले होते. भारतीय इतिहासात त्यांना अशा प्रकारची क्रांती आढळली नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष शोषण चालूच राहिले. कारण शोषित वर्ग शिक्षणापासून वंचित होता, उच्चभ्रू समाजाने जनसामान्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षणाचा साधन म्हणून वापर केला आहे, हे बाबासाहेबांच्या लक्षात आले. या प्रक्रियेचे वर्णन करताना ते म्हणतात, “समाजाची नैसर्गिक उत्क्रांती ही शिक्षणावर अवलंबून असते. जर लोकांना शिक्षण नाकारले गेले तर ते त्यांच्या भौतिक लाभांपासून वंचित राहू शकतात आणि दबले जाऊ शकतात.” त्यामुळे आपल्याला स्वत:ची आणि समाजाची परिस्थिती बदलायची असेल तर ‘शिक्षणा’शिवाय बदल होणार नाही, हे बाबासाहेबांनी ओळखले होते. म्हणूनच ज्ञान हे केवळ फक्त भौतिक प्रगतीसाठी नाही, तर ज्ञानाने आपल्यात नैतिक जबाबदारी आली पाहिजे, असे सांगत शिक्षणाद्वारे, ज्ञानाद्वारे बुद्धाने दिलेली प्रज्ञा-शील-करुणा आणि मैत्री ही तत्त्व आत्मसात करावीत, असा संदेश बाबासाहेब आपल्याला देतात.
महाड सत्याग्रहाच्या वेळीही बाबासाहेब महिलांना उद्देशून शिक्षणाचं जे महत्त्व सांगतात ते अशिक्षित कुटुंबातून येणाऱ्या पहिल्या पिढीतील शिक्षण घेणाऱ्या मुलींना भावणारे आहे. बाबासाहेबांच्या शिक्षणाबद्दलच्या या तर्कशुद्ध मांडणीने माझ्यासारख्या जिने कुटुंबात प्रथमच विद्यापीठ पाहिलं, अशा पहिल्या पिढीतील मुलीला शिक्षण हा आपल्या मुक्तीचा आणि पंख पसरवण्याचा मार्ग वाटू लागला. त्या मार्गावर चालून मी शिक्षण क्षेत्रातील डॉक्टरेट ही डिग्री घेतली आणि आज सन्मानाने जीवन जगतेय.
पंख पसरवण्याचे जे बळ मला बाबासाहेबांमुळे मिळाले ते माझ्यासारख्या असंख्य मुलींना मिळो...
इतिहासाच्या अध्यापक आणि लिंगभावाच्या अभ्यासक.