Ambedkar Jayanti Special : वर्गात महापुरुष शिकवातना

संस्कारक्षम वयातील मुलांपर्यंत महापुरुषांची व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार पोहोचवायचे तर त्यासाठी काही वेगळे उपक्रम राबवण्याची गरज असते. वाचन, संकलन, सादरीकरण यातून मुलं महापुरुषांच्या जीवनचरित्राशी थेट जोडली जातात.
Ambedkar Jayanti Special : वर्गात महापुरुष शिकवातना
नवशक्ति अक्षररंग
Published on

- आनंदाचे झाड

- युवराज माने

संस्कारक्षम वयातील मुलांपर्यंत महापुरुषांची व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार पोहोचवायचे तर त्यासाठी काही वेगळे उपक्रम राबवण्याची गरज असते. वाचन, संकलन, सादरीकरण यातून मुलं महापुरुषांच्या जीवनचरित्राशी थेट जोडली जातात.

महापुरुषाचे वय कसे मोजावे? या प्रश्नाचे उत्तर देताना श्री. म. माटे यांनी असे म्हटले होते की, “त्या महापुरुषाच्या मृत्यूनंतर समाज जितकी वर्षे कृतज्ञेने आठवण काढतो ते त्यांचे वय होय.” हे अगदी खरंय. सामान्य माणसं एकदा जन्माला येतात, मृत्यूनंतर कायमची पडद्याआड जातात. असामान्य माणसं मृत्यूपर्यंत अनंत मरणयातना भोगतात, मृत्यूनंतर आपल्या कर्तृत्वाने चिरंजीव होतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असंच चिरंजीव व्यक्तिमत्त्व.

गेली वीस वर्षे शिक्षक म्हणून काम करतोय. वर्गात महापुरुष शिकवताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे लेकरांची ‘महापुरुषांचे बालपण’ जाणून घेण्याची तीव्र इच्छा. लेकरं आपलं स्वतःचं बालपण आणि महापुरुषांचं बालपण यात तुलना करतात. ही अगदी सहज गोष्ट आहे, पण मला त्यांच्यातला कुतूहलाचा तिसरा डोळा उघडायचा असतो. म्हणून मी वर्गात महापुरुष शिकवताना प्रत्यक्ष या महापुरुषांचे जीवनपट उलगडणारे प्रसंग उभे करतो. केवळ मी स्वतः भाषण देऊन लेकरांना महापुरुष समजणार नाहीत, हे माझ्या लक्षात आले. म्हणून काही वेगळ्या वाटा शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बरंच काही हाती लागलं.

वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच आम्ही प्रत्येक महिन्यातल्या जयंत्या व पुण्यतिथी असलेल्या महापुरुषांची नावे बाजूला काढून वर्गवार वाटप करतो. त्यानुसार लेकरं वर्षभर या महापुरुषांचे विचार संकलित करतात. जेव्हा त्यांची पाळी येते तेव्हा त्या वर्गातील लेकरं स्वतः ठरवतात की, आजची जयंती, पुण्यतिथी कशी साजरी करायची. लेकरांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या कल्पकतेला धुमारे फुटतात. अगदी गेल्याच वर्षी आमच्या लेकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जरा वेगळ्याच पद्धतीने साजरी केली. सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या लेकरांच्या वाट्याला एप्रिल महिना आला होता. त्यानुसार त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाची जयंती साजरी करण्याची संधी मिळाली.

वर्गातल्या प्रत्येकाने यात आपला सहभाग नोंदवला. वर्गप्रमुख म्हणून कल्याणीने सर्वांना काम वाटून दिलं होतं. स्वाती आणि शीतलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वेगवेगळी छायाचित्रं जमा करण्याचं काम दिलं होतं. त्यानुसार त्यांनी वर्षभर बाबासाहेबांची लहानमोठी शेकडो छायाचित्रं जमा केली आणि कार्यक्रमात त्यांची प्रसंगानुरूप मांडणी केली. त्यांचं हे प्रदर्शन सर्वांनी पाहिलं. स्वाती आणि शीतलचं कौशल्य यातून दिसून आलं. शाळेतल्या सर्व लेकरांना या प्रदर्शनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि त्यांच्या पाऊलखुणा पाहायला मिळाल्या. खुशी आणि ईश्वरी यांना त्यांनी बाबासाहेबांचं बालपण सगळ्यांना सांगायचं असं सुचवलं होतं. या दोघींनी वर्षभरात आंबेडकरांच्या बालपणातल्या आठवणी वेगवेगळ्या पुस्तकांतून, वर्तमानपत्रांतून, मासिकांमधून, चित्रपटांमधून जमा केल्या. त्यानुसार इतर मित्र-मैत्रिणींची मदत घेऊन त्यांनी नाटिका सादर केली. नाटिकेमधून त्यांनी बाबासाहेबांचे बालपण उभे केले. किती सहजता अन् कल्पकता भरलेली असते लेकरांमध्ये हे यातून लक्षात आलं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणविषयक भूमिका मांडण्याबद्दलची जबाबदारी प्रतीक, प्रयास आणि सचिन यांच्याकडे दिलेली होती. मग काय, या तिघांनी बाबासाहेबांचं शिक्षण कसं झालं? किती झालं? कुठं झालं? आदी प्रश्नावली करून त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. हे सर्व जमा करताना त्यांनी अनेक पुस्तकं चाळली. अनेकांच्या मुलाखती घेतल्या. आपल्या परिचित व्यक्तींना याविषयी प्रश्न विचारून भंडावून सोडले. यातून त्यांना जे मिळालं ते अमूल्य होतं! त्यांनी या सगळ्याचं शाळेच्या मंचावर अप्रतिम सादरीकरण केलं. या एकाच कृतीतून आमच्या सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं शिकणं आणि फुलत जाणं कळलं.

कल्याणी व ममता या दोघींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सावली होऊन साथ देणाऱ्या रमाईंविषयी समग्र माहिती गोळा करून त्यावर एकांकिका सादर केली. एका महापुरुषाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून जगणं किती वेगळं असतं याची जाणीव लेकरांना झाली. कोणताही महापुरुष एका रात्रीत तयार होत नाही, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली स्त्री किती महत्त्वाची असते, हे यातून लेकरांना कळलं.

‘एक पोळी कमी खा, पण एक पुस्तक विकत घ्या.’

‘पुस्तके उरी घ्यावीत बाबासाहेबांसारखी..!’

‘पुस्तकं माझा श्वास आहेत. पुस्तकांना मी दूर करूच शकत नाही.’

बाबासाहेबांचे हे सुविचार लिहिलेले रंगीबेरंगी फलक पाहून, वाचून नवलंच वाटलं. अनेक लेकरांनी आपल्या ‘अमृतकण’च्या वहीत ही विचारपुष्पं लिहून घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम आणि वाचन हा भाग दीक्षा, रूपाली, करण आणि कोमल यांच्याकडे होता. त्यांनी त्यांच्या कल्पकतेने माहिती मिळवून फलक सजवले. हे फलक वाचून सर्वांना वाचन आनंद मिळाला. पूनम, अश्विनी, यश व आयुष यांनी शाळेच्या ग्रंथालयातील सर्व ग्रंथशाळेच्या पटांगणात आपल्या कल्पकतेने मांडले. दिवसभर लेकरं या ग्रंथाच्या सहवासात राहून वेगवेगळे विचार संकलित करू लागली. अनेकजण पुस्तकं हाती घेऊन ती चाळू लागली. लेकरांच्या हातांना पुस्तकांचा सुगंध लागला.

प्राथमिक शाळा असल्याने लेकरांच्या वयास झेपेल असाच उपक्रम आम्ही त्यांना देतो. पण यातही लेकरं सरस ठरतात. कोणतंही साह्य न करता लेकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सादर केलेल्या नाटिका, एकांकिका, त्यांचे शिक्षणविषयक-ग्रंथविषयक विचार या सगळ्याची मांडणी चकित करणारी होती. प्रत्येक महापुरुषाचं वेगळेपण या अशा उपक्रमाच्या माध्यमातून लेकरांच्या लक्षात येतं. यातून त्यांचा तौलनिक अभ्यास होतो.

एखाद्या महापुरुषाच्या जयंतीनिमित्त केवळ एखाद तासाचा भाषणाचा कार्यक्रम म्हणजे औपचारिकता होय. आमच्या शाळेत कार्यक्रमाचं नियोजनही लेकरंच करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं उत्तम नियोजन कोमल व पूनमने केलं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी अहवाल लेखन, इतिवृत्त लेखनही लेकरंच करतात. पुढील कार्यक्रमात आधीच्या कार्यक्रमाच्या इतिवृत्ताचे वाचन केलं जातं, हे विशेष.

बघा, किती कल्पकता असते लेकरांमध्ये! या कुतूहलाच्या तिसऱ्या डोळ्यांना सतत जे चांगलं आहे, स्वच्छ आहे ते दाखवण्याचा प्रयत्न शिक्षकांनी केला पाहिजे. लेकरांना असं स्वच्छ व चिकित्सक दाखवलं, तरंच आमचे महापुरुष सर्वांचे होतील. अन्यथा महापुरुषांच्या वाटण्या होतच राहतील.

प्रयोगशील शिक्षक आणि शैक्षणिक बाबींवरील लेखक.

logo
marathi.freepressjournal.in