
- पाऊलखुणा
- राकेश मोरे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा दरवळ आजही जगभर पसरलेला आहे. या लेखात त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या स्थळांची; कोल्हापुरातील पहिला पुतळा, लंडनमधील निवासस्थान, दिल्लीतील अलिपूर रोड, महू येथील जन्मस्थळ आणि टोकियोमधील बुद्ध विहारांतील स्मृती यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. हा दिवस केवळ एक उत्सव नसून, प्रेरणास्रोत आहे. बाबासाहेबांचा विविध विषयांवरील सखोल अभ्यास अद्वितीय होता. राजकारण, समाजकारण, अर्थशास्त्र, कामगार हक्क, शेती आणि ग्रामीण विकास या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिले. त्यांच्या विचारांचे द्रष्टेपण आजही तितकेच समर्पक वाटते. त्यांचे विचार केवळ भारतातच नव्हे, तर जगभर पोहोचले. त्यामुळेच जगभरात त्यांच्या स्मृती जागवणारी स्मारके उभारण्यात आली आहेत. ही स्मारके म्हणजे सामाजिक न्याय, समता आणि मानवी हक्कांचे जागतिक प्रतीक आहेत.
जगातील पहिला पुतळा - कोल्हापूर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत उभारलेला पहिला पुतळा कोल्हापुरातील बिंदू चौकात ९ डिसेंबर १९५० रोजी उभारण्यात आला. जगभरात महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वाधिक पुतळे असल्याची नोंद आहे; मात्र, कोल्हापूर येथील मराठा नेते भाई माधवराव बागल यांच्या पुढाकाराने कोल्हापुरातील बिंदू चौकात महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे ९ डिसेंबर १९५० रोजी उभारण्यात आले होते. महात्मा फुले यांचा पुतळा बाबुराव पेंटर यांनी साकारला होता, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बाळ चव्हाण यांनी निर्माण केला. खास बाब म्हणजे, बाबासाहेबांनी स्वतः कोल्हापूर भेटीदरम्यान हा पुतळा पाहिला होता.
महू : जन्मभूमीचे स्मारक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या वडिलांची लष्करी नोकरी होती आणि तेथेच त्यांचे वास्तव्य होते. आज महू हे ‘आंबेडकर नगर’ म्हणून ओळखले जाते. बाबासाहेबांच्या जन्मस्थळी सरकारने उभारलेले स्मारक हे लाखो लोकांना प्रेरणा देणारे ठिकाण बनले आहे. दरवर्षी येथे लाखो लोक भेट देतात.
लंडनमधील वास्तव्य :
प्रेरणास्थान झालेले घर
डॉ. आंबेडकर ५ जुलै १९२० रोजी लंडनला उच्च शिक्षणासाठी रवाना झाले. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एम.एस्सी. आणि ग्रेज इनमध्ये बॅरिस्टरीचा अभ्यास केला. १९२१ मध्ये एम.एस्सी. आणि पुढे ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधासाठी पीएच.डी. ही पदवी मिळवली. लंडनमधील किंग हेन्री रोडवरील एका छोट्याशा घरात ते दोन वर्षे राहिले. त्यावेळी त्यांनी उपासमारीचे दिवसही पाहिले, परंतु अभ्यासात खंड पडू दिला नाही. हे घर आता ऐतिहासिक स्मारक म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र शासनाने हे स्मारक २०१५ साली जनतेसाठी खुले केले. येथे बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आधारित माहिती आणि छायाचित्रांचे प्रदर्शन पाहायला मिळते.
दिल्लीतील घर : २६, अलिपूर रोड
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेवटचे निवासस्थान दिल्लीतील २६ अलिपूर रोड हेच होते. त्यांनी येथेच ‘द बुद्ध अँड हिज धम्म’, ‘बुद्ध आणि कार्ल मार्क्स’, ‘रिव्होल्युशन अँड काऊंटर रिव्होल्युशन’ यांसारखी ग्रंथसंपदा लिहिली. ६ डिसेंबर १९५६ रोजी येथेच त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या निधनानंतर हजारोंचा जनसमुदाय अलिपूर रोडला जमला होता. हे घर आता ऐतिहासिक स्थळ आणि प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाते.
मुंबईतील पहिले स्मारक : कुपरेज चौक
मुंबईतील डॉ. आंबेडकरांचा पहिला पुतळा कुपरेज येथे, विद्यापीठ व मंत्रालयाच्या मधोमध, १९६२ साली प्रजासत्ताक दिनी उभारण्यात आला. शिल्पकार राम सुतार यांनी बनवलेला हा पुतळा बाबासाहेबांच्या मूळ प्रतिमेस खूपच जवळचा मानला जातो. विशेष म्हणजे, भय्यासाहेब आंबेडकर यांच्या देखरेखीखाली या पुतळ्याला मान्यता मिळाली होती.
टोकियो, जपान :
बौद्ध विहारांतील आदरांजली
जपानमधील, विशेषतः टोकियो येथील बौद्ध विहारांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष सन्मानाने स्थान दिले गेले आहे. त्यांच्या मूर्ती, छायाचित्रे आणि कार्याचे वर्णन करणारे फलक या विहारांमध्ये लावले गेले आहेत. काही ठिकाणी त्यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाचेही औचित्याने आयोजन केले जाते. जपानी बौद्ध भिक्षू बाबासाहेबांना नवबौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान मानतात. डॉ. आंबेडकरांनी स्वीकारलेल्या नवयान बौद्ध धर्माची समतावादी मांडणी जपानी समाजालाही प्रभावित करणारी ठरली आहे. आज टोकियोतील हे बौद्ध विहार केवळ धार्मिक स्थळे नाहीत, तर बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय प्रभावाची जिवंत प्रतीकं बनली आहेत.
अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन आणि कार्य देशभरातच नव्हे, तर जगभरातही स्मरणात ठेवले जाते. त्यांच्या स्मृतिगंधांनी जगातल्या अनेक पिढ्यांना न्याय, समता आणि बंधुतेचा सुगंध दिला आहे. बाबासाहेबांचे कार्य आणि स्मृतिस्थळे ही नव्या पिढीसाठी प्रेरणास्थाने ठरली आहेत. त्यांच्या आठवणी आणि विचारांचे हे ‘स्मृतिगंध’ भावी पिढीच्या मनात कायमचे कोरले जातील, याची खात्री बाळगायला हरकत नाही.
rakeshvijaymore@gmail.com