अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन!

‘हर घर तिरंगा’ या उपक्रमास देशाच्या विविध भागांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्ये भारताने विविध चढ-उतार पाहिले.
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन!

ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज, १५ ऑगस्ट २०२२ या दिवशी देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा होतो आहे. खरे म्हणजे स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवास याआधीच प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमास देशाच्या विविध भागांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्ये भारताने विविध चढ-उतार पाहिले. देशातील गरिबांना चार घास सुखाचे खाण्यास मिळावेत, यासाठी ‘गरिबी हटाव’ सारखे उपक्रम देशपातळीवर घेण्यात आले; पण शासन यंत्रणेतील कमालीचा भ्रष्टाचार, स्वार्थीवृत्ती यामुळे या योजनेचे लाभ देशातील गरीब जनतेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. योजना चांगली होती; पण झारीतील शुक्राचार्यांमुळे या योजनेचे तीन-तेरा वाजले! १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाची फाळणी झाली. संपूर्ण स्वराज्याचा आग्रह धरणाऱ्यांनाही ही फाळणी मान्य करावी लागली! फाळणीमुळे विविध भागांमध्ये दंगली उसळल्या. पश्चिम आणि पूर्व पाकिस्तानमध्ये लोकांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. पाकिस्तानमधून भारतात येत असलेल्या जनतेची लुटमार करण्यात आली. शेकडो महिलांवर अत्याचार करण्यात आले. यादरम्यान, काश्मीरमध्ये टोळीवाल्यांना घुसवून पाकिस्तानने काश्मीरचा बराच भूभाग हडप केला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने या सर्व घटनांचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. स्वातंत्र्यानंतर परकीय आक्रमणे, नैसर्गिक संकटे यावर मात करीत आपण देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. हा स्वातंत्र्यदिन साजरा करताना ब्रिटिशांच्या जोखडातून देश मुक्त करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्या सर्वांचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव यांच्यासह स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे आदी क्रांतिकारकांनी ब्रिटिशांशी सशस्त्र संघर्ष केला. त्यातील अनेक जण ‘वंदे मातरम’चा जयघोष करीत हसत हसत फासावर गेले. १८५७च्या स्वातंत्र्य समरातील राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, बहादूरशहा जाफर आदींचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. स्वातंत्र्यासाठी देशाच्या विविध भागात उठाव होत होते; पण महात्मा गांधी यांनी ‘चलेजाव चळवळी’च्या निमित्ताने जे आंदोलन उभारले, त्यास जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यादरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारले. या आणि अशा अनेक लहान-मोठ्या संघर्षातून देश सोडून जाण्याचा निर्णय इंग्रजांना घ्यावा लागला. स्वातंत्र्यसंग्रामातील लाल-बाल-पाल यांचे योगदान कोण विसरणार! अशा असंख्य देशभक्तांनी केलेल्या त्यागामुळे आपण हा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. तसेच सत्तेवर आलेले पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी आदींचे योगदान विसरता येणार नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तर बांगलादेशची निर्मिती करून जगाचा भूगोल बदलून टाकला! काँग्रेसच्या नंतर देशात अनेक सरकारे आली. त्या सरकारांनी देशाला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, देशाला आणीबाणी, ऑपरेशन ब्लू स्टार, मुंबई महानगरावर झालेला २६/११चा भीषण हल्ला अशा अनेक संकटांना सामोरे जावे लागले; पण त्यामुळे न डगमगता देशाची प्रगतिपथावर वाटचाल सुरू आहे. भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर अनेक जनताभिमुख उपक्रम राबविण्यात आले. ‘न खाऊंगा और न खाने दूंगा’ यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना वेसण बसली. अनेक भ्रष्टाचारी नेते सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. काहींवर खटले गुदरण्यात आले आहेत. या सर्वांचा विचार करता इस्रो, चांद्रयान मोहीम, मंगळयान मोहीम, पोखरणची अणुचाचणी यांचा विसर पडणे केवळ अशक्य! कोरोना महामारीच्या काळात भारताने जागतिक पातळीवर जे योगदान दिले, त्याचे प्रगत राष्ट्रांनाही आश्चर्य वाटले! कोरोनाकाळात जगाचा तारणहार अशी जी भारताची प्रतिमा निर्माण झाली, त्यामध्ये भारतीय संशोधकांचे योगदानही मोठे आहे, हे लक्षात घ्यायला हवे! आज भारत जगातील एक बलाढ्य शक्ती म्हणून उभा राहत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा चांगलाच वाढला आहे. भारतास बरोबर घेतल्याशिवाय आंतरराष्ट्रीय समुदायाचे पान हालत नाही. आज जगामध्ये भारतास जी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे, त्यामध्ये विद्यमान शासनकर्त्यांबरोबरच पूर्वसुरींचे योगदानही मोठे आहे, हे लक्षात घ्यायला हवे!

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in