कार्ड क्रमांक नसलेले अभिनव क्रेडिट कार्ड

नंबर नसलेल्या कार्डचा वापर, हा सध्या जगभरात नव्याने आलेला ट्रेंड आहे. यातील फिजिकल कार्ड हरवले तरी तुमची माहिती ॲपमध्ये सुरक्षित असल्याने त्यापासून कोणताही धोका संभवत नाही.
कार्ड क्रमांक नसलेले अभिनव क्रेडिट कार्ड
Published on

उदय पिंगळे

ग्राहक मंच

नंबर नसलेल्या कार्डचा वापर, हा सध्या जगभरात नव्याने आलेला ट्रेंड आहे. यातील फिजिकल कार्ड हरवले तरी तुमची माहिती ॲपमध्ये सुरक्षित असल्याने त्यापासून कोणताही धोका संभवत नाही. हे कार्ड वापरणारा ग्राहक टेक्नोसॅव्ही असावा त्याला ॲप वापरून कार्ड व्यवहारांवर नियंत्रण ठेवता यायला हवं. डिजिटल व्यवहार करणारी तरुणाई या क्रेडिट कार्डचे संभाव्य ग्राहक आहेत.

माझ्या पत्नीच्या नावाचे, मी सहधारक असलेले सेव्हिंग खाते ॲक्सिस बँकेत आहे. त्याचे क्रेडिट कार्ड मार्केटिंग करणारे लोक लईच भारी आहेत. ग्राहकांनी त्याचेच कार्ड काही करून घ्यावेच म्हणून ते इतकी गळ घालतात. त्या प्रकारास एखाद्याच्या मागे हात धुवून लागणे हे कुत्र्यासारखे मागे लागतात असे वाटते. माझ्या पत्नीचे नावे खाते असले तरी मोबाईल नंबर माझा असल्याने सर्व मॅसेज, कॉल मलाच येतात. मध्यंतरी अनेक दिवस या कार्ड मार्केटिंग करणाऱ्या मंडळींनी आपल्या गोड आवाजात पण दररोज चारचार वेळा, वेळी अवेळी कधीही फोन करून भंडावून सोडलं होतं. शेवटी कस्टमर केअरकडे तक्रार करून, मला क्रेडिट कार्ड नकोय, यापुढे क्रेडिट कार्ड संबंधित फोन आल्यास मी बँकेतील खातेच बंद करेन असा निर्वाणीचा इशारा दिल्यावर त्यानंतर काही दिवसांनी हे फोन यायचे बंद झाले. माझे अजूनही मन:परिवर्तन होऊन मी त्यांचे क्रेडिट कार्ड घेईन अशी भाबडी आशा त्यांना अजूनही वाटत असावी, त्यामुळेच काही दिवसांनी माझी आठवण झाल्यावर त्यांचा एखादा फोन येतो.

भारतातील खाजगी क्षेत्रातील मोठी बँक, ॲक्सिस बँक आणि बेल्जियममध्ये स्थापित 'फेडरेशन ऑफ युरोपियन आणि इंटरनॅशनल असोसिएशन'-FAIB यांनी एकमेकांच्या सहकार्याने भारतातील पहिलच नंबर विरहित को ब्रॅण्डेड क्रेडिट कार्ड ग्राहकांना उपलब्ध करून दिलं आहे. आजपर्यंत गेली अनेक वर्षे आपण कार्ड धारकाचे नाव, १६ अंकी कार्ड क्रमांक, त्या कार्डची वैधता ही सर्व माहिती सर्वसाधारणपणे एका बाजूवर तर दुसऱ्या बाजूस या कार्डची खात्री सिद्ध करणारा CVV क्रमांक असलेलं क्रेडिट कार्ड पहात आलो आहोत. हे नंबर बहुदा खाचलेले किंवा फुगीर असतात, अलीकडे अगदी साधे डिजाईन असलेली कार्डही अनेकांनी आणली असली तरी त्यावरही नंबर असतो. १० ऑक्टोबर २०२३ रोजी हे नंबर विरहित क्रेडिट कार्ड प्रथमच वितरित करण्यात आलं. यावर फक्त धारकाचे नाव आहे.

ॲक्सिस बँक आणि FAIB यांच्या सहकार्याने ही अभिनव निर्मिती आपल्यापुढे आली आहे. FAIB म्हणजेच फेडरेशन ऑफ युरोपियन अँड इंटरनॅशनल एस्टाब्लिशड् इन बेल्जियम, सन १९४९ कोणतेही आर्थिक लाभ न मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेली नामवंत संस्था आहे. आपल्या सभासदांना अनेक बाबतीत योग्य ते मार्गदर्शन आणि मदत या संस्थेमार्फत केली जाते. ते कोणत्याही बाबतीतील व्यावसायिक सल्ला, आवश्यक असल्यास त्या क्षेत्रातील दिग्गजांचा संपर्क, विविध प्रश्नावरील सर्व्हे, अत्यावश्यक प्रशिक्षण, सभासदांच्या अडचणी, विचारांची देवाण घेवाण, वादविवाद, नवीन माहितीची देवाणघेवाण अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. ॲक्सिस बँकेच्या मदतीने त्यांनी हे अधिक सुरक्षित तंत्रज्ञान देऊ केले असून FAIB चे मोबाईल अँप्लिकेशन वापरणाऱ्या ग्राहकांना लाभ होईल. याच FAIB ची भारतातील कंपनी सोशल वर्थ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड येथे आपल्या व्यावसायिक भागीदारांच्या सहाय्याने पूर्णपणे पेपरलेस पद्धतीने तात्काळ कर्ज, पगारदारांना पगाराची उचल देणारा सावकारी व्यवसाय करते. कंपनीचे कर्ज देणारे ॲप असून, बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून रिझर्व बँकेकडे कंपनीची नोंदणी झालेली आहे. क्रेडिट कार्ड वरील व्यवहार हे एक कर्जच आहे, त्यावर ग्राहकांची वैयक्तिक माहिती नसल्याने कार्ड वरील माहितीच्या चोरीमुळे होणारे गैरव्यवहार टळतील. ग्राहक या कार्डावर विश्वास ठेवून निश्चिंत राहू शकतात असा ॲक्सिस बँकेच्या कार्ड विभागाचे प्रमुख संजीव मोघे यांचा दावा आहे.

या कार्डावरून उपहारगृह, मनोरंजन, पर्यटन यासंबंधी ऑनलाइन व्यवहार केल्यास दरमहा ₹ १५००/- च्या अधिकतम मर्यादेत ३ % कॅशबॅक मिळेल. या नवीन कार्डाची ऑपरेटिंग एजन्सी व्हिसा, मास्टरकार्ड नसून एनपीसीआयने विकसित केलेली ‘रूपे’ ही स्वदेशी आहे. याशिवाय हे कार्ड कोणत्याही यूपीआय प्रणालीशी जोडले जाऊ शकते. त्यामुळे हेच क्रेडिट कार्ड वापरून ग्राहक गुगल पे, पेटीएम, फोनपे यासारख्या अँप्लिकेशन बरोबर त्यास लिंक करून पेमेंट करू शकतात. याचा वापर करून वर्षातून चारदा देशांतर्गत एअरपोर्टवरील लॉन्ज सेवेचा उपभोग घेता येईल. कार्डचा वापर करून ₹ ४००/- ते ₹ ५०००/-पर्यंत इंधन खरेदी केल्यास त्यावर सरचार्ज घेतला जाणार नाही. वेळोवेळी ॲक्सिस बँकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध ऑफर्सचा कार्डधारकांना लाभ घेता येईल. फइबच्या ग्राहकांना हे कार्ड फिजिकल स्वरूपात त्याचप्रमाणे ॲपवरदेखील मिळेल. त्याचा आयुष्यभर मोफ़त वापर करता येईल तसेच ते घेण्यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही.

नंबर नसलेल्या कार्डचा वापर, हा सध्या जगभरात नव्याने आलेला ट्रेंड आहे. यातील फिजिकल कार्ड हरवले तरी तुमची माहिती ॲपमध्ये सुरक्षित असल्याने त्यापासून कोणताही धोका संभवत नाही. हे कार्ड वापरणारा ग्राहक टेक्नोसॅव्ही असावा त्याला ॲप वापरून कार्ड व्यवहारांवर नियंत्रण ठेवता यायला हवं. डिजिटल व्यवहार करणारी तरुणाई या क्रेडिट कार्डचे संभाव्य ग्राहक आहेत. भारतीय रिझर्व बँकेने अलीकडेच निवडक बँकांना त्याच्या ग्राहकांना क्रेडिट लाईन ही कर्ज सुविधा देण्याची परवानगी दिली आहे. त्यास अनुसरून या क्रेडिट कार्डचा वापर करून अनेक ग्राहकांना घेतलेल्या कर्जाचे विविध माध्यमातून सुरक्षितरीत्या पेमेंट करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. (यात उल्लेख केलेले क्रेडिट कार्ड आणि तात्काळ कर्ज देणारे ॲप यांची कोणतीही शिफारस हा लेख करत नाही)

मुंबई ग्राहक पंचायत/ mgpshikshan@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in