व्यक्तिविशेष
सुरेखा खरे
लोकशाहीर, कलावंत, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट २०२५ रोजी १०५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने, त्यांचा स्वयंशिक्षित वाचक म्हणून झालेला प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो.
जीवनात अनेकदा पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि विचारांना चालना देण्यासाठी वाचन गरजेचे आहे. आपले वर्तन, विचार, मत, दृष्टिकोन आणि व्यवहार यावर वाचनाचा प्रभाव पडतो. वाचन ही एक व्यक्तिमत्त्व घडवणारी प्रक्रिया आहे. वाचनाबद्दल पाउलो फ्रेअरी म्हणतात, “जगाचे वाचन हे नेहमीच शब्द वाचण्यापूर्वी असते आणि शब्द वाचणे म्हणजे सतत जगाचे वाचन करणे होय.” शब्द वाचण्यापूर्वी माणूस जग वाचायला शिकतो. अण्णाभाऊंचा जीवनसंघर्ष पाहिला, तर असे दिसते की पुस्तके वाचण्याआधी त्यांनी समाजाचे वाचन केले होते. अण्णाभाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले. समाजाच्या विकासासाठी औपचारिक शिक्षणाला महत्त्व असले तरी त्यांच्या बाबतीत समाजजीवनातून मिळालेले शिक्षण अधिक मोलाचे ठरले.
मुंबईमध्ये राहत असताना त्यांना घरगडी, हॉटेल बॉय, हमाल, डोअर किपर, खाणकामगार, सिनेमाची पोस्टर लावणे, मुलांना खेळवणे अशा अनेक प्रकारची कामे करावी लागली. ही कामे करत असतानाच एका मित्राच्या मदतीने ते साक्षर झाले आणि त्यानंतर त्यांचा वाचनप्रवास सुरू झाला. मुंबईतील चित्रपटांच्या आणि दुकानांच्या पाट्यांवरील अक्षरे जुळवून ते साक्षर झाले. पाट्या वाचणे, सिनेमे बघणे, ऐकण्याच्या माध्यमातून शिकणे अशा पद्धतीने त्यांनी स्वतः वाचन आणि लेखन आत्मसात केले.
महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मार्क्सवादी लेखक, फ्योदोर दोस्तोव्हस्की, मॅक्सिम गॉर्की, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, महर्षी शिंदे, हरिवंशराय बच्चन, सूर्यकांत त्रिपाठी, खलील जिब्रान, लिओ टॉलस्टॉय, लेनिन चरित्र, म. माटे, हरिभाऊ आपटे, रशियन क्रांतीचा इतिहास, कामगार वाङ्मय मंडळाने मराठीत प्रकाशित केलेला मार्क्स-एंगल्सचा ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’, ‘मुंबई कामगार’ साप्ताहिक, वी. स. खांडेकर, ना. सी. फडके अशा अनेक लेखकांचे साहित्य त्यांनी वाचले. आपल्या वाचनाची आवड जपण्यासाठी त्यांनी आपल्या राहत असलेल्या लहान खोलीत एक छोटे ग्रंथालय उभारले होते. महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथांमधून आणि वृत्तपत्रांमधून त्यांचे सामाजिक प्रबोधन घडले. या ग्रंथांनी सामाजिक न्यायासाठी आणि समतेसाठी लढणाऱ्या अण्णाभाऊंना सामाजिक परिवर्तनाची व अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. बाबासाहेबांचे स्त्री-पुरुष समानतेचे तत्त्व अण्णाभाऊंच्या साहित्यातही जाणवते. त्यांच्या कादंबऱ्यांतील नायिका खंबीर आणि स्वाभिमानी दिसतात.
मॅक्सिम गॉर्की यांचे साहित्य त्यांना प्रेरणा देणारे ठरले, असे अण्णाभाऊ स्वतः म्हणतात. एका मित्राकडून मिळालेल्या गॉर्की यांच्या अनुवादित ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. अण्णाभाऊ म्हणतात की, “मॅक्सिम गॉर्की यांचे ग्रंथ वाचून माझी लेखनदृष्टीच बदलून गेली.” म्हणूनच आपल्या कथा लेखनाचे गुरू त्यांनी गॉर्कींना मानले. त्यांनी श्रीपाद अमृत डांगे यांच्याकडूनही प्रेरणा घेतली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य आणि कामगार संघटना चळवळीचे प्रणेते डांगे यांच्या ‘वाङ्मय आणि जनता’ या भाषणाने अण्णाभाऊ प्रभावित झाले. त्या भाषणात डांगे म्हणाले होते, “तुम्ही जनतेशी एकनिष्ठ राहा, तिच्या भावना समजून घ्या आणि मग लिहा. जनतेला विद्रूप करू नका.” हे वाक्य अण्णाभाऊंच्या कानात खोलवर रुजले, असे ते म्हणतात.
अण्णाभाऊंच्या लिखाणामागे मार्क्सवादाच्या प्रेरणाही स्पष्ट दिसतात. मार्क्सने समाजात शोषक आणि शोषित हे दोनच वर्ग मानले. त्याच्या मते, दुःख आणि गरिबीला भांडवलशहा जबाबदार आहेत. भांडवलशाहीचे मुळासकट उच्चाटन हाच त्याचा सिद्धांत. श्रीमंत त्यांच्या संपत्तीच्या जोरावर गरीबांची पिळवणूक करतात, त्यांना गुलाम बनवतात आणि त्यामुळे ते दुःखात जगतात, असे कार्ल मार्क्स म्हणतो. खासगी मालमत्तेचा मालक हाच कामगारांच्या श्रमाचे जादा मूल्य घेतो आणि कामगारास त्याचा लाभ मिळत नाही. या विचारातून कामगार-किसानशाहीचा सिद्धांत मांडला आहे.
‘राज्य आणि क्रांती’ हे लेनिन यांचे १९१७ मध्ये प्रकाशित झालेले मार्क्सवादी सिद्धांतावर आधारित पुस्तक आहे. यात त्यांनी राज्याच्या भूमिकेवर आणि कामगारवर्गाच्या क्रांतीवर आपली मते मांडली आहेत. लेनिन यांच्या मते, भांडवलशाही समाजात राज्य हे भांडवलदारांच्या हिताचे रक्षण करते आणि कामगारांचे शोषण करते. अण्णाभाऊ साठे यांच्या कामगार चळवळीमागे या पुस्तकांचा प्रभाव जाणवतो. अण्णाभाऊंनी कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य, पोवाडे आणि गीते असे विपुल साहित्य निर्माण केले. त्यांचे साहित्य हिंदी, गुजराती, उडिया, बंगाली, तमिळ, मल्याळी, इंग्रजी, फ्रेंच अशा २७ भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांवर चित्रपटही तयार झाले. त्यांच्या साहित्यातून हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा मिळते. अण्णाभाऊ साठे हे ‘जीवनासाठी कला’ या विचारप्रणालीत बसणारे साहित्यिक होते. त्यांच्या साहित्यात वंचित, उपेक्षित आणि दलित समाजाचे दुःख प्रकट होते. त्यांच्या शैलीत समाजशिक्षकाची ओळख दिसते. अण्णाभाऊ म्हणतात, “कल्पनेच्या भराऱ्या मला मारता येत नाहीत, मी जे जगलो, जे अनुभवलं तेच लिहितो.” “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर नाही तर दलित आणि कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे,” हे त्यांच्या साहित्यातून त्यांनी परखडपणे मांडले. ते विज्ञानवादी होते. त्यांनी काल्पनिक कथांऐवजी वास्तववादी कथांना अधिक महत्त्व दिले. त्यांच्या लिखाणावर महात्मा फुले, मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाचा प्रभाव दिसतो.
अण्णाभाऊंनी जे काही लिहिले त्यातून दलित, उपेक्षित, पीडित, शोषित समाजाच्या वेदनांना वाचा फोडली. अन्याय, गरिबी, सामाजिक विषमता, कामगार चळवळ याकडे त्यांनी अधिक जागरूकतेने पाहिले. म्हणूनच त्यांच्या साहित्याच्या प्रेरणा महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधून आल्यात, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
जुलै १९५९ ते नोव्हेंबर १९५९ या कालावधीत ‘युगांतर’ या साप्ताहिकामध्ये त्यांनी अनेक पुस्तकांची परीक्षणे लिहिली. मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव बागूल यांनी अण्णाभाऊंची तुलना रशियन साहित्यिक मॅक्सिम गॉर्की यांच्याशी करून ‘महाराष्ट्राचा मॅक्सिम गॉर्की’ असा गौरव केला. प्र. के. अत्रे म्हणतात, “अण्णाभाऊ यांचे साहित्य म्हणजे जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाचे साहित्य.” त्यांच्या अंगभूत गुणांबरोबरच त्यांच्या वाचनाची गोडी आणि समृद्धी त्यांच्या लेखनातून स्पष्ट दिसते. वाचन समृद्ध असेल, तर लेखनही समृद्ध होते. वाचनामुळे कल्पनाशक्ती वाढते, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव समजते आणि संवेदनशीलता विकसित होते. वाचनामुळे सामाजिक दृष्टिकोनही विकसित होतो. हे अण्णाभाऊंच्या साहित्य आणि कार्यातून स्पष्ट दिसते. कार्लाईल म्हणतात, “आतापर्यंत मानवजातीनं जे काही केले आहे, ते सर्व पुस्तकांमध्ये आहे.” अण्णाभाऊंच्या साहित्यिक वाटचालीला वाचनाने चालना दिली आणि त्यांना समृद्ध लेखक बनवले. त्यांच्यामध्ये लेखनकला होतीच, पण ती वाचनामुळे बहरली. इंटरनेट आणि मोबाईलच्या युगातही वाचनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या तरुण पिढीसाठी अण्णाभाऊंचा निरक्षरतेपासून साक्षरतेपर्यंत आणि साक्षरतेपासून साहित्यरत्न होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. वाचनामुळे त्यांच्या आयुष्यात एक नवीन दृष्टिकोन तयार झाला. संघर्षमय जीवन जगताना वाचनामुळे सामाजिक वास्तव समजून घेता आले. त्यांनी केवळ ग्रंथांचेच नव्हे तर समाजाचेही वाचन केले आणि उपेक्षितांच्या प्रश्नांना आणि त्यांच्या संघर्षाला साहित्यातून वाट दिली. वाचनातून घडलेले हे परिवर्तन अनेक तरुणांसाठी आजही प्रेरणादायी आहे.
अध्यक्षा, २५ टक्के आरक्षण पालक संघ, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा