-प्रसाद कुलकर्णी
दृष्टिक्षेप
व्हीलचेअरवर बसून ब्रह्मांडयात्रा करत कृष्णविवर आणि विश्वाच्या उत्पत्तीच्या संशोधनात अतुलनीय योगदान देणारे महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा ८ जानेवारी हा जन्मदिन. ८ जानेवारी १९४२ रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे त्यांचा जन्म झाला. आणि १४ मार्च २०१८ रोजी केंब्रिज येथे ते कालवश झाले. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी झालेल्या दुर्धर आजाराशी तब्बल ५५ वर्षे झुंज देत या ख्यातनाम भौतिक शास्त्रज्ञाने आपल्या संशोधनाने विज्ञानात फार मोठी भर घातली.
स्टीफन हॉकिंग यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते. तर आई इझाबेल हॉकिंग या पदवीधर होत्या. ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी घेऊन उच्च शिक्षणासाठी ते केंब्रिज विद्यापीठात आले आणि तेथेच रमले. केंब्रिजमध्ये त्यांनी तीन दशके गणिताचे अध्यापन केले. याच काळात संशोधनाच्या क्षेत्रातही त्यांनी फार मोठी कामगिरी केली.
वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना ॲमीयोट्रॅफिक लेटरल स्करोसिस (एएलएस) हा गंभीर आजार झाला. त्यांना चालणे, बोलणे अवघड झाले. त्यावेळी डॉक्टरांनीही हा मुलगा आणखी जास्तीत जास्त दोन वर्षे जगू शकेल, असे भाकीत केले होते. पण, ते भाकीत या मृत्यूवर मात करणाऱ्या आणि जीवन व संशोधनावर प्रेम करणाऱ्या प्रगल्भ जिद्दी शास्त्रज्ञाने खोटे ठरवले. पुढील ५५ वर्षे ते कायमस्वरूपी व्हीलचेअरला खिळून बसले ते वैश्विक संशोधन करतच.
इंटेलिअर संगणक चीप तयार करणाऱ्या कंपनीने स्टीफन हॉकिंग यांच्यासाठी अतिशय खास स्वरूपाची व्हीलचेअर आणि संगणक तयार केले होते. या व्हीलचेअरमध्ये व संगणकात काही खास उपकरणे जोडलेली होती. ही सारी यंत्रणा इंफ्रा रेड ब्लिंक स्विचशी जोडलेली होती, जी त्यांच्या चष्म्यात बसवलेली होती. हाॅकिंग स्वतःचा जबडा आणि डोळे यांनी इशारा करायचे. आणि हे यंत्र त्यांचे म्हणणे समोरील डिस्प्ले बोर्डावर उमटवित असे. त्यांचे घर आणि कार्यालयाचे प्रवेशद्वार रेडिओ ट्रान्समिशनने जोडलेले होते. इशाऱ्यांद्वारे माऊसलाही नियंत्रित करता येईल, अशी त्यांच्या व्हीलचेअरमध्ये रचना होती. आपल्या या गंभीर स्वरूपाच्या आजारालाही हॉकिंग आणि इष्टापत्ती बनवले. आपल्या यशाचे गुपित सांगताना ते शेवटी म्हणाले, आजारपणामुळे मी वैज्ञानिक होण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे. आजाराच्या अगोदर मी शिक्षणावर अधिक लक्ष देत नसे. परंतु, आजारादरम्यान आपण दीर्घकाळ जगू शकणार नाही, असे वाटल्याने मी सर्व लक्ष संशोधनावर केंद्रित केले. 'सकारात्मकता आणि विज्ञाननिष्ठा यांचे हे फार मोठे उदाहरण आहे. विश्वाची निर्मिती कशी झाली? आकाशात कृष्णविवरे कशी निर्माण होतात? याचा शोध त्यांनी घेतला. स्टीफन हॉकिंग यांचा पीएचडीचा प्रबंध समाजमाध्यमांवर आल्यावर अल्पावधीत तो वीस लाखांहून अधिक लोकांनी पाहिला होता. त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेने व संशोधनाने केंद्रीय विद्यापीठाचे संकेतस्थळही ठप्प झाले होते. १९९८ मध्ये त्यांचं 'अ ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाइम' हे पुस्तक आले. त्याने जगभरात मोठी खळबळ माजवली. या पुस्तकात त्यांनी बिगबँग थेअरी आणि कृष्णविवरांची अत्यंत सोपी पण सखोल मांडणी केली. या पुस्तकाची अनेक भाषांत भाषांतरे झाली. आणि त्याच्या कोट्यवधी प्रती विकल्या गेल्या. हॉकिंग यांनी दि ग्रँड डिझाईन, युनिव्हर्स इन नटशेल यासारखी आणखी काही महत्त्वाची पुस्तके लिहिली.
स्टीफन हॉकिंग यांनी आपल्या संशोधनाची मांडणी अतिशय नेमक्या, आग्रही आणि सौम्य विनोदी शैलीत केली आहे. त्यांनी हे स्पष्ट केले आहे की, ब्रम्हांडाची रचना आपोआप तयार झाली आहे. ब्रम्हांडात गुरुत्वाकर्षणासारख्या शक्तीमुळे नव्या रचना होऊ शकतात. त्यासाठी ईश्वरासारख्या कोणत्याही शक्तीची गरज नाही. तसेच ब्रह्मांडाच्या निर्मितीपूर्वी ईश्वर काय करत होता? असाही प्रश्न ते विचारतात. आपले सौरमंडळ अनोखे नाही. उलट अनेक सूर्य असे आहेत, की ज्यांच्याभोवती ग्रह प्रदक्षिणा घालत असतात. ईश्वराप्रमाणे स्वर्गाची कल्पनाही त्यांनी फेटाळली. ते म्हणतात, 'आमचा मेंदू एका संगणकाप्रमाणे असून जेव्हा त्याचे सुटे भाग बिघडू लागतात, तेव्हा तो काम करणे थांबवतो. खराब झालेल्या संगणकासाठी स्वर्ग आणि त्यानंतरचे जीवन नाही. स्वर्ग केवळ काळोखाला घाबरवणाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेली कथा आहे.'
'जर आपण विश्वाच्या अस्तित्वाच्या कारणाचा शोध लावू शकलो तर तो मानवी कार्यकारणभावाचा सर्वात मोठा विजय असेल. कारण, त्यामुळे आपण देवाच्या मनात काय चालले आहे, ते वाचू शकू. देव अस्तित्वात नाही, असे कोणी सिद्ध करू शकत नसले, तरीही विज्ञानामुळे देवाच्या संकल्पनेची गरज संपली आहे. विश्वाचे रहस्य उमगण्यासाठी भौतिकशास्त्राचे नियम उपयुक्त ठरतील. त्यासाठी जगनियंत्याची गरज नाही,' असे सांगून ते पुढे ते म्हणतात,' इतकी वर्षे पृथ्वीचा उगम वगैरेंवर संशोधन केल्यावर परमेश्वर अस्तित्वात नाही, याची मला खात्री पटली आहे. या विश्वाचा आणि आपला कोणी निर्माता व भाग्यविधाता नाही म्हणूनच स्वर्ग-नरकही नाही. या विश्वाचे अस्तित्व समजून घेण्यासाठी हाती असलेला क्षण तेवढा आपला आहे. आणि तो मिळाला यासाठी मी कृतज्ञ आहे.' धर्माबाबत ते म्हणतात, 'धर्म हा अधिकार केंद्रित आहे तर विज्ञानाच्या केंद्रस्थानी असतात ते निरीक्षण आणि तर्क. या दोघांच्या संघर्षात अंतिम विजय हा विज्ञानाचा असेल. कारण ते जिवंत आणि प्रवाही आहे.'
स्टीफन हॉकिंग म्हणतात, ‘ब्रम्हांडाचा मूलभूत नियम आहे तो म्हणजे काहीही परिपूर्ण आणि निर्दोष नाही. परिपूर्णता असती, तर तुम्ही आणि मीही अस्तित्वात नसतो.' नि:शब्द माणसाचे मन सर्वाधिक गोंगाटी असते. असे स्पष्ट करून बोलू न शकणारे हॉकिंग मिश्किलपणे म्हणतात, 'माझ्या प्रसिद्धीची काळी बाजू म्हणजे मी कुठेही अज्ञात म्हणून जाऊ शकत नाही. केवळ काळा चष्मा आणि केसांचा विग घालूनही माझी ओळख लपवू शकत नाहीत. माझी व्हीलचेअर माझी ओळख जगजाहीर करतेच. आयुष्य कितीही आव्हानात्मक असू द्या, जीवनात तुम्ही करू शकाल आणि यशस्वी होऊ शकाल, असे नेहमीच काहीतरी गवसेल.'
स्टीफन हॉकिंग हे माणसाला आपला दृष्टिकोन बदलायला भाग पाडणारे, तसा विचार करायला लावणारे महान शास्त्रज्ञ होते. त्यांची काही विधाने या निमित्ताने आपण ध्यानात घेतली पाहिजेत. उदाहरणार्थ, नशिबात जे असेल तेच होईल, असा ज्यांचा विश्वास असतो तेच रस्ता ओलांडताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला काळजीपूर्वक पाहत असतात. स्वतःच्या बुद्धिमत्तेवर ज्यांना अत्याधिक घमेंड असते, ते प्रत्यक्षात पराभूत झालेले लोक असतात. स्वतःच्या पायांकडे न पाहता नेहमी ताऱ्यांच्या दिशेने पाहा. कधीच काम करणे सोडू नका. कोणतेही काम तुम्हाला जगण्याचा उद्देश प्रदान करत असते. कामाशिवाय जीवन रिक्त वाटू लागते. मनुष्याला सर्वात मोठे यश बोलल्याने प्राप्त झाले आणि सर्वात मोठे अपयश बोलू न शकल्याने मिळाले आहे. आम्ही सर्वांनी नेहमी बोलत राहणे गरजेचे आहे. क्रोध मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तोच संस्कृतीला नष्ट करण्यास कारणीभूत ठरतो. विद्वत्ता म्हणजे परिवर्तनाशी जुळवून घेण्याचे सामर्थ्य. ज्ञानाविषयीची भ्रामक कल्पना हाच ज्ञानग्रहणातील सर्वात मोठा अडसर आहे. हव्यास आणि मूर्खपणामुळे आपण स्वतःलाच नष्ट करत आहोत. पृथ्वीवरील कणाकणाने वाढणारे प्रदूषण आणि माणसांची गर्दी याकडे आपण निव्वळ पाहू शकत नाही. अशी शेकडो विधाने स्टीफन हॉकिंग यांनी केली आहेत.
स्टीफन हॉकिंग विनोदी शैलीत एकदा म्हणाले होते, माझी दोन लग्न झाली आणि दोन्ही असफल झाली. यावरून हे सिद्ध होते की, एखादा माणूस ब्रह्मांडाच्या उत्पत्तीला जाणू शकतो. पण बायकांना नाही. आपल्या दुर्धर आजारातही इतकी मिश्किलता आणि अस्सलपणा जपणारा हा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ इच्छामरणाविषयी म्हणाला होता, पीडिताची इच्छा असेल तर त्याला त्याच्या जीवनाचा अंत करण्याचा अधिकार असला पाहिजे. पण मला वाटते ती मोठी चूक ठरेल. आयुष्य कितीही वाईट भासले तरी तुम्ही कायमच काहीतरी करू शकता. कशात तरी यश संपादन करू शकता.जेथे आयुष्य आहे, तेथे अशा आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांना स्टीफन हॉकिंग यांचा अनेक वर्षे जवळून सहवास लाभला होता. ते म्हणाले होते, ‘कृष्णविवरातून किरणोत्सार होऊ शकतो हे कधी कुणालाही वाटले नसताना आपल्या बिनतोड सैद्धांतिक मांडणीतून आणि अचूक संशोधनातून स्टीफनने ते सिद्ध केले. हॉकिंग इफेक्ट या नावाने ते संशोधन जगभर ओळखले जाते. गुरुत्वाकर्षण या विषयातील तो एक सर्वमान्य तत्वज्ञ होता. शरीरास भले अपंगत्व आले तरीही मनाने कणखर राहण्याची असामान्य महत्वाकांक्षा त्याने लोकांपुढे उदाहरण म्हणून उभी केली. हीच दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रखर बुद्धिमत्ता अनेकांसाठी प्रदीर्घकाळ प्रेरणादायी ठरत राहील हे निश्चित. स्टीफन हॉकिंग या महान शास्त्रज्ञाला त्याच्या ८२ व्या जन्मदिनी विनम्र अभिवादन...!
(लेखक समाजवादी प्रबोधिनीचे कार्यकर्ते आहेत.)