

मत आमचेही
केशव उपाध्ये
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी भाजपचा एकही आमदार फुटला नव्हता. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी आपली कार्यपद्धती बदलली नाही, तर त्यांच्या मागे दोन-चार आमदारही उरणार नाहीत अशी स्थिती आहे.
सहा लोकसभा सदस्यांनी उबाठा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या सहा खासदारांच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे अत्यंत नम्रपणाने, सभ्य भाषेत ओवी वाचन केले. हे सर्व खासदार उद्धव ठाकरे यांचा नेतृत्वाचा चेहरा वापरून निवडून आले आहेत. त्यामुळे या सर्व खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, असेही श्रीमान संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत हे अत्यंत व्यस्त राजकारणी, संपादक असल्यामुळे त्यांना इतिहासातील काही गोष्टी आठवत नसाव्यात. २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यावेळच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या अनेक उमेदवारांच्या प्रचार फलकावर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची छायाचित्रे मोठ्या आकारात, तर उद्धव ठाकरेंचे छायाचित्र छोट्या आकारात, अशी स्थिती होती. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालाकोट एअर स्ट्राइकचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करत होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काश्मीरसाठीचे ३७० वे कलम रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाची जाहीर सभांमधून प्रशंसा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी भारतीय जनता पक्षाचा विश्वासघात केला आणि शरद पवार-काँग्रेस आघाडीशी समझौता केला. त्यावेळी संजय राऊतांना आपण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली असल्याने खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा, असे म्हणावेसे वाटले नाही. आता याच संजय राऊतांना राजकारणातील नैतिकेचा पुळका आला आहे. २०१७ मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये फूट पाडत मनसेचे सात नगरसेवक आपल्या पक्षात घेतले. त्यावेळीही संजय राऊतांना राजकारणातील नैतिकतेचे स्मरण झाले नव्हते. मनसेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावर मतदारांकडे मते मागितली होती. आपली सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना आपल्या सख्ख्या चुलतभावाचा पक्ष फोडताना राजकारणातील साधनशूचितेची आठवण झाली नव्हती. सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे संतापलेल्या संजय राऊतांनी शिवसैनिक आणि सामान्य जनता असे प्रकार सहन करणार नाही, या सहा खासदारांना घरात घुसून जाब विचारला जाईल, अशी उघडउघड चिथावणीखोर भाषा वापरली आहे. मात्र अशी भाषा वापरताना संजय राऊतांनी आपल्या पक्षात शिल्लक राहिले आहे तरी कोण, याचा विचार केलेला दिसत नाही.
सहा खासदारांनी उबाठा गटाला रामराम करण्याच्या घटनेने राज्याचे राजकारण तापणे स्वाभाविक आहे. या सहा खासदारांच्या निर्णयाचा उबाठाच्या लोकसभेतील संख्याबळावर परिणाम झाला आहेच. त्याशिवाय पक्षातील उरल्यासुरल्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, आमदार-नगरसेवकांच्या मनोधैर्यावर परिणाम होणारच. हे खासदार आपल्या गटातून बाहेर का पडले, या मागची कारणे मुळापासून शोधण्याऐवजी संजय राऊतांनी शिवीगाळीचा स्वस्त मार्ग पत्करला आहे. खरी कारणे मुळापासून शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याची पाळेमुळे उद्धव आणि आदित्य ठाकरेंपर्यंत पोहचलेली आढळून येतील. त्यामुळेच प्रामाणिकपणे कारणे शोधण्याऐवजी या खासदारांच्या नावाने बोटे मोडली जात आहेत. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या खुशालचेंडू वृत्तीला आणि संजय राऊतांच्या दंडेलीला वैतागूनच या खासदारांनी अस्सल शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला असावा. २००२ मधील बंड, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील तसेच मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभव यातून उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी काहीच धडा घेतलेला नाही. १९८५ ते १९९५ या १० वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता. हिंदुत्वाचा आणि राष्ट्रवादाचा प्रखर विचार घेऊन बाळासाहेबांनी आपली संघटना वाढवली. बाळासाहेबांसारखे कष्ट उपसण्याची तयारी उद्धव आणि आदित्य ठाकरे या पिता-पुत्राची नाही. सहा महिन्यांपूर्वी राज्यात महापालिकांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंनी जराही हातपाय हलवले नाहीत. त्यामुळे राज्यभर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उबाठा गटाचा धुव्वा उडाला. बाळासाहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला जीवापाड जपले होते. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सुख-दु:खामध्ये बाळासाहेब सहभागी होत असत. १९६० आणि १९७० च्या दशकात मुंबई आणि ठाण्यामध्ये शिवसेनेच्या बांधणीसाठी बाळासाहेबांनी अपार कष्ट घेतले होते. कामगार सेना, स्थानीय लोकाधिकार समिती अशा संघटनांच्या माध्यमातून बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. या कार्यकर्त्यांच्या बळावरच शिवसेना महाराष्ट्रात रुजली.
उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे आल्यानंतर या लढाऊ संघटनेचा आत्मा हरवला. उद्धव आणि आदित्य ठाकरे हे पितापुत्र सर्वसामान्य जनतेत मिसळण्याची तसदी घेत नाहीत. पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांनाही उद्धव ठाकरे सहजासहजी भेटत नाहीत. शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता ८६ व्या वर्षीही आपल्या कार्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना वेळ देतो. उत्तमराव पाटील, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, नितीन गडकरी यांच्यासारख्या अनेक पिढ्यांनी जनसंघ आणि भाजपच्या वाढीसाठी कष्ट घेतले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी भाजपचा एकही आमदार फुटला नव्हता. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी आपली कार्यपद्धती बदलली नाही, तर त्यांच्या मागे दोन-चार आमदारही उरणार नाहीत.
प्रदेश उपाध्यक्ष, भाजप