अन्सारी वादाच्या भोवऱ्यात!

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडे भाजपच्या नजरा वळणे स्वाभाविक होते
अन्सारी वादाच्या भोवऱ्यात!

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे, पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी दिलेल्या एका मुलाखतीत, जी विविध माहिती दिली त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आपण पाच वेळा भारत दौऱ्यावर आलो होतो. त्या दौऱ्यांमध्ये आपणास जी माहिती मिळाली ती आपण पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’ला दिली. तसेच त्यातील एक दौरा तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या निमंत्रणावरुन दहशतवादावरील परिसंवादात सहभागी होण्यासाठी केला होता, असे नुसरत मिर्झा याने स्पष्टपणे सांगितल्याने माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याकडे भाजपच्या नजरा वळणे स्वाभाविक होते आणि त्याप्रमाणे घडलेही. नुसरत मिर्झा ही व्यक्ती पत्रकारितेच्या नावाखाली हेरगिरी करीत होती आणि भारतासंबंधीची माहिती गोळा करून ‘आयएसआय’ला देत होती, असे मिर्झा यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या व्यक्तीस निमंत्रण दिल्याचा आरोप भाजपने माजी उपराष्ट्रपती अन्सारी यांच्यावर केला आहे. पण या आरोपाचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी खंडन केले आहे. हे सर्व धादांत खोटे असल्याचे आणि नुसरत मिर्झा या व्यक्तीस कधी भेटलो नसल्याचे वा त्यांस निमंत्रित केले नसल्याचे अन्सारी यांनी स्पष्ट केले. ११ डिसेंबर २०१० या दिवशी दहशतवादासंदर्भातील एका परिसंवादाचे आपण उदघाटन केले होते पण त्यासाठी ज्यांना निमंत्रित केले होते त्याची सूची आयोजकांकडून तयार करण्यात आली होती. आपण मिर्झा यांना निमंत्रित केले नाही आणि त्यांना भेटलोही नाही, असे माजी उपराष्ट्रपती अन्सारी यांनी स्पष्टीकरण दिले. त्याचप्रमाणे, हमीद अन्सारी हे इराणमध्ये भारताचे राजदूत असताना देशाच्या हितास बाधा येईल वर्तन त्यांच्या हातून घडल्याचा आरोप ‘रॉ’च्या एका माजी प्रमुखाने केला होता, याकडे भारतीय जनता पक्षाने लक्ष वेधले. पण त्या म्हणण्याचेही हमीद अन्सारी यांनी खंडन केले आहे. राजदूत या नात्याने आपण काय काम केले याची सरकारला माहिती आहे, असेही ते म्हणाले. अन्सारी यांच्यासमवेत काही संवेदनशील आणि गोपनीय माहिती ‘शेअर’ केल्याचे नुसरत मिर्झा यांनी मुलाखतीत म्हटले होते. पाकिस्तानी पत्रकाराने जी माहिती दिली आहे तो प्रकार धोकादायक आहे. अन्सारी हे नुसरत मिर्झा यांच्यासमवेत सरकारसंबंधीची गोपनीय आणि संवेदनशील माहितीची देवाणघेवाण करीत होते, असा आरोप भाजप नेते गौरव भाटिया यांनी केला. देशाच्या माजी उपराष्ट्रपतींवर इतका गंभीर आरोप होणे हे त्या महत्वाच्या पदाचा विचार करता नक्कीच योग्य नाही. पण भाजपने संशयाची सुई त्या पदावर राहिलेल्या हमीद अन्सारी यांच्याकडे वळविली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकाराने दिलेल्या माहितीवर अधिक विश्वास आणि आपल्याच देशाच्या उपराष्ट्रपतीपदासारख्या महत्वाच्या पदावर राहिलेल्या व्यक्तीच्या देशनिष्ठेबद्दल शंका व्यक्त करण्याचा प्रकार अयोग्यच मानायला हवा. हमीद अन्सारी यांच्यावर असे आरोप करून राजकारणात आपण किती खालची पातळी गाठू शकतो; तसेच असे आरोप करून भाजपने आपली विकृत मानसिकता दाखवून दिली आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. भाजपकडून सोनिया गांधी आणि अन्सारी यांच्यावर जी टीका होत आहे, त्याचा अत्यंत कडक शब्दात निषेध करायला हवा, असे काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. हमीद अन्सारी यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे स्पष्ट शब्दात खंडन केले असले तरी पत्रकार या नात्याने भारत भेटीवर आलेली व्यक्ती पाकिस्तानसाठी कशाप्रकारे हेरगिरी करू शकते, हे मिर्झा यांनी जी माहिती दिली त्यावरून दिसून येते. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांनी नुसरत मिर्झा यांना विसा मिळावा यासाठी भारतीय प्रशासनाकडे केलेली रदबदली, खुर्शीद यांनी भारतात जी काही माहिती मिळेल ती पाकिस्तानचे तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल कयानी यांच्याकडे सुपूर्द करण्याची केलेली सूचना, भारतात जी काही माहिती मिळाली ती ‘आयएसआय’ला दिल्याचा मिर्झा यांनी केला दावा आदी लक्षात घेता २००७ ते २०११ या काळात पाच वेळा नुसरत मिर्झा भारत दौऱ्यावर आलेच कसे, याचे आश्चर्य वाटते! मिर्झा यांनी भारतातील सात शहरांना भेटी दिल्या होत्या, विविध कार्यक्रमात भाग घेतला होता. मिर्झा यांच्यासारखी व्यक्ती पत्रकार असल्याच्या नावाखाली महत्वाची माहिती गोळा करून ती ‘आयएसआय’ला पुरवीत होती, हे लक्षात न येणे हे आमच्या देशाच्या गुप्तचर यंत्रणांचे अपयश नाही काय? सर्वांनाच अंतर्मुख करणाऱ्या या सर्व घटना आहेत. मिर्झा यांनी दिलेल्या मुलाखतीच्या निमित्ताने ही माहिती बाहेर आली इतकेच!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in