माणसे वाचणारा अजरामर माणूस

23 एप्रिल हा विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिनही आणि मृत्यूदिनही. मात्र काहीजण मृत्यूनंतरही कामाच्या, लौकिकाच्या रूपाने जगतात.
माणसे वाचणारा अजरामर माणूस
Published on

- उर्मिला राजोपाध्ये

स्मरण दिन विशेष

23 एप्रिल हा विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिनही आणि मृत्यूदिनही. मात्र काहीजण मृत्यूनंतरही कामाच्या, लौकिकाच्या रूपाने जगतात. अशाच काही मोजक्या नावांमध्ये शेक्सपियर या महान नाटककाराचा समावेश होतो. हे नाव साहित्यविश्वात आजही अढळ स्थान राखून आहे. त्यांनी केवळ साहित्यकृती घडवल्या नाहीत तर माणसांची मने वाचली, माणसे वाचली. त्यांच्या नावाला मिळालेल्या अमरत्वामागे हेच कारण आहे.

या महान साहित्यिकाचे नाव आणि त्याने निर्माण केलेले साहित्य ‘कालातीत’ या शब्दाचा खरा परिचय करून देते. इतकी दशके उलटूनही आजही त्याच्या नाटकांवर, साहित्यावर आधारलेल्या नानाविध कलाकृती जगाच्या कानाकोपऱ्यातील रंगमंचांवर सादर होतात आणि रसिकांना आगळीवेगळी अनुभूती देऊन जातात. त्यामुळेच त्यांच्या जन्म आणि मृत्यूदिनाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करणे औचित्यपूर्ण ठरते.

वडिलांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शेक्सपियर यांना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागले होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह केला. योगायोगाने लंडनमधील एका प्रसिद्ध ड्रामा हाऊसमध्ये त्यांना नोकरी मिळाली. अर्थातच हे काम त्यांच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध होते, कारण तबेल्यातील घोड्यांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र या नाटक कंपनीची नाटके पाहताना त्यांनाही नाटके लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि एका वेगळ्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला. कामाबरोबरच ते वाचन-लेखन करू लागले. त्यांची वाचनाची आवड पाहून नाटक कंपनीमध्ये प्रसिद्ध नाटककारांच्या कलाकृतींची कॉपी करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आले. अशारीतीने आवडीचे काम मिळाल्यामुळे ते पूर्णपणे झोकून देऊन काम करू लागले. यातून त्यांना स्वतःचे नाटक लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी एक नाटक मोठ्या जिद्दीने आणि मेहनतीने लिहिले. पुढे ते लेखन आणि अभिनयाच्या जगात प्रसिद्ध झाले. त्यांची नाटके राजवाड्यातही रंगू लागली. त्यांचे इतर लेखन प्रकाशित झाल्यानंतर तर साहित्यविश्वात एकच खळबळ उडाली. आज जवळपास ४०० वर्षांनंतरही शेक्सपियर आपल्या कर्तृत्वाने, मेहनतीने आणि अलौकिक प्रतिभेमुळे जिवंत आहे.

शेक्सपिअरने सुमारे ३४ नाटके आणि असंख्य सॉनेट्स लिहिली. ऐतिहासिक, सामाजिक, कौटुंबिक, काल्पनिक अशी सर्व प्रकारची कथानके त्यांच्या लेखणीतून उतरली. त्यांची पहिली काही नाटके केवळ विनोदी अंगाची होती. ‘लव्हज् लेबर्स लॉस्ट’, ‘कॉमेडी ऑफ एरर्स’, ‘अ‍ॅज यू लाइक इट’ अशी एकापेक्षा एक सरस नाटके त्यांच्या लेखणीतून उतरली. कधी स्त्री-पुरुषांचे वेषांतर, कधी एकसारख्या चेहऱ्याच्या जुळ्यांच्या घोटाळ्याच्या कथा अशी कथानके आणि व्यक्तिचित्रणे त्यात पहायला मिळाली. दुसरा टप्पा होता शोकांतिकांचा. शेक्सपिअर म्हणजे ट्रॅजेडी किंग. ‘हॅम्लेट’, ‘किंग लिअर’, ‘ऑथेल्लो’, ‘मॅकबेथ’, ‘ज्युलियस सिझर’ अशी कितीतरी शोकात्मक नाटके त्यांनी लिहिली. ही नाटके जुन्या इंग्रजी भाषेत आणि पोएटिक व्हर्समध्ये लिहिलेली होती. त्यामुळे एका पानावर मूळ नाटक आणि दुसऱ्या पानावर आधुनिक गद्य इंग्रजीत त्याचे रूपांतर असायचे. पण हे आधुनिक रूपांतर पहायची गरजच लागायची नाही. जवळच्या मित्राने विश्वासघात केल्यावर ‘यू टू ब्रूटस-देन डाय सिझर’ हे ब्रूटसने अंगावर शेवटचा घाव घातल्यावर सिझरने उच्चारलेले शेवटचे वाक्य इतके कालातीत आहे की, पृथ्वीवर माणसे असेपर्यंत शेक्सपिअरच्या नाटकातले हे असे उद‌्गार सार्थ ठरणारच. त्यांनी जवळजवळ दीड-दोन हजार व्यक्तिरेखा रेखाटल्या. एका अर्थी ती सगळी जिवंत माणसे आहेत. माणूस जातो पण मानवी प्रवृत्ती राहतात. म्हणूनच शेक्सपिअर कधी जुना होत नाही.

‘ट्रॅजी कॉमेडीज’ हा शेक्सपिअरच्या नाटकांमधील महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल. या टप्प्यातल्या चार नाटकांत सर्वोत्कृष्ट म्हणजे टेम्पेस्ट. त्याचा आत्मा शोकात्म, पण अंत मात्र सुखांत. अनेक टीकाकारांच्या मते, नाटककार म्हणून त्याची परिपक्वता ट्रॅजी कॉमेडीत अधिक दिसते. युद्ध, खून, सूड, मारामाऱ्या, क्रौर्य, रक्तपात ही अनेक नाटकांमधील नेहमीची दृश्ये असली तरी त्या हिंदी सिनेमांप्रमाणे सनसनाटी निर्माण करणाऱ्या घटना नाहीत. त्यामागचे कार्यकारणभाव, राजकारण, नाट्यात्म वळणे यांचा एक अपरिहार्य शेवट म्हणून अशा घटनांकडे बघावे लागते. पाच अंकी लांबलचक कथानके, अनेक घटना-प्रसंगांतून आपल्यासमोर पटकथेसारखी उलगडत जातात.

शेक्सपिअरच्या शोकात्म नाटकांचा अभ्यास करताना ‘कॅरॅक्टर इज डेस्टिनी’ असे म्हटले जाते. ग्रीक शोकांतिकांमध्ये नशिबाचे फासेच उलटे पडल्याने नायकाचा शोकात्म घडून येतो. ‘इडिपस रेक्स’ या नाटकात इडिपसच्या जन्मवेळी भविष्यवाणी उच्चारली गेली होती की, हा मुलगा आपल्या बापाला मारेल आणि आईशी विवाह करेल. असे काहीतरी विपरीत घडू नये, म्हणून बापाने रानात नेऊन मारून टाकण्याची आज्ञा दिली असतानाही इडिपस जिवंत राहतो आणि दुर्दैवाने परिस्थिती नेमकी अशी पालटत जाते की, भविष्यवाणी खरी होते. ज्या डोळ्यांनी आईशी समागम पाहिला, ते डोळे स्वत: तीक्ष्ण ब्रेसलेटने फोडून घेऊन इडिपस अंध होतो. सोफोक्लिसच्या या शोकांतिकेत नायकाचा काही दोष नाही, दोष आहे तो केवळ परिस्थितीचा, पण शेक्सपिअर आपल्या नायकांना परिस्थितीपुढे असे लाचार बनवत नाही. त्यांच्या शोकांतिकेला स्वत: त्या त्या नायकांचे स्वभावच कारणीभूत आहेत. जीवनातल्या कटू वास्तवतेला हे जास्त धरून आहे. मॅकबेथ कालांतराने राजा झाला असता, पण परिस्थिती पालटण्याची वाट न बघता तो राज्यपद अधीरतेने जवळ आणू बघतो. स्वत:च्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या डंकनचा खून करून! त्यात लेडी मॅकबेथ त्याच्या महत्त्वाकांक्षेत तेल ओतते. खुनानंतर दोघेही शांत झोप हरवतात. लेडी मॅकबेथ झोपेत चालते आणि अंधारात आपले रक्ताने बरबटलेले हात रोज धूत राहते. राजगादीसाठी मॅकबेथ खालच्या थराला जातो. पण त्या गादीवर बसलेले राजाचे भूत त्याला नंतर चक्रावून टाकते. शेक्सपिअरच्या नाटकांचे हेच असमान्यपण आहे की दुसऱ्यांचा खून करणारी माणसे मरताना मात्र प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणतात. कारण मुळात ती खुनी नाहीतच. चांगल्या स्वभावातला एक कंगोरा त्यांना उदात्त शोकात्म नायक बनवतो.

हॅम्लेट तर तरुण मुलगा, पण बापाच्या खुनाचा सूड उगवण्याची कृती तो करू शकत नाही. तो फक्त विचार, विचार आणि विचार करतो. ऑथेल्लो नेमकेपणाने हेच करू शकत नाही. डोक्यात संशयाचे भूत शिरले आणि त्याने सौंदर्यवती देस्देमोनाचा गळा आवळला. शेक्सपिअरचा भाष्यकार ब्रॅडली म्हणतो, हॅम्लेट आणि ऑथेल्लो यांच्या स्वभावाची उलटापालट झाली असती तर या शोकांतिकाच घडल्या नसत्या. हे खरे आहे, पण शेवटी त्या व्यक्तीचा स्वभावच त्याच्या जीवनाचे शिल्प घडवत असते. म्हणूनच स्वत:वरील अति प्रेम आणि माणसे ओळखण्यात अपयशी ठरलेला किंग लिअर आपल्यावर खरे प्रेम करणाऱ्या कॉर्डेलियाला ओळखू शकत नाही. अंती दोघांचाही शेवट होतो. ‘ज्युलियस सिझर’ हे नाटकाचे नाव असले तरी त्याचा खरा नायक आहे शेवटचा घाव घालणारा ब्रूटस. शेक्सपिअरने अशी माणसे वाचली आणि आपल्या साहित्यामध्ये मांडली. माणसाचा स्वभाव किती अगम्य याची जाणीव त्यांच्या नाटकांनी करून दिली. म्हणूनच माणूस वाचणारा हा माणूस अजरामर झाला.

logo
marathi.freepressjournal.in