अर्जुनविषाद योग तेंव्हाही आणि आजही...
महाभारत म्हंटलं की सर्वात प्रथम श्रीकृष्ण आठवतो. कौरव पांडव युध्द आठवतं. युध्दाच्या सुरवातीलाच आपलेच नातेवाईक बघून शस्र उचलण्यासाठी तयार नसणारा अर्जून आठवतो. आपलेच नातेवाईक; गुरु यांना गमवावे लागण्याची शक्यता लक्षात घेऊन अर्जून युध्दाला तयार नव्हता. त्याप्रसंगी अर्जुनाच्या मनात ज्या भावना होत्या, त्या द्विधा मनस्थितीला अर्जुनविषादयोग म्हंटलं गेलं. त्यावेळी श्रीकृष्ण अर्जुनाच्या मनाची तयारी करुन घेतो. त्याला कर्माविषयी, कर्तृत्वाविषयी, कर्तव्याविषयी जे काही सांगतो ती म्हणजे गीता. युध्दपूर्व अर्जुनाची द्विधा मन:स्थिती ओळखून त्याला कर्तव्याची जाणीव करुन देणारा श्रीकृष्ण अर्जुनासाठी त्याकाळातील समुपदेशकच होता. अशा असंख्य समुपदेशकाची गरज सध्या समाजाला आहे. कारण दैनंदिन जीवनातील छोट्या समस्याही माणसाला युध्दाइतक्या कठीण वाटत आहेत. श्रीकृष्णासारखा सखा, सोबती, सारथी न मिळाल्यामुळे अनेकजणं हतबल झाले आहेत. जगण्याची लढाई सर्वांना लढावीच लागते मात्र द्विधा मन:स्थिती म्हणजे ताणतणावाला आमंत्रण असतं. गीतेत भगवंतांनी मार्ग तर सांगून ठेवला आहे पण या मार्गावर चालताना योग्य साथ सोबत असेल तर जगणं सुकर होतं. अलीकडे दैनंदिन जीवनातील अडचणी सोडवण्यासाठी समुपदेशकाची गरज वाढू लागली आहे.
कौरव पांडव म्हणजेच राक्षस आणि देव अशा भिन्न वृत्तींची ती लढाई होती, असं जर मानलं तर माणसाच्या मनातच या वृत्ती आहेत. एकाच मनातला हा संघर्ष वर्षानुवर्षे चाललेला आहे. महाभारत कथेला पौराणिक स्थळांचे जरी संदर्भ असले तरी मानसिक संघर्षाचेही वर्णन अनेक संदर्भ ग्रंथामध्ये सापडते. दोन माणसांमधील युध्द असेल, दोन गटामधील युध्द असेल किंवा दोन वृत्तीमधील युध्द असेल. फळाची अपेक्षा न करता जो लढेल तोच युध्द जिंकेल हा संदेश प्रत्यक्ष श्रीकृष्ण सांगतात. अपेक्षा-विरहीत जगण्याची लढाई सामान्य नसतेच. आपण अर्जुनही नसतो आणि आपल्या समोरचे प्रश्नही जीवनमरणाचे नसतात. द्विधा मनस्थिती मात्र तशी थोडी गंभीरच असते. कारण आपापसात थोडीतरी अपेक्षा असणारच ना..! पती पत्नी नात्यामधे प्रेम, समजुतदारपणा हवा. एकतर्फी प्रेम थोडंच त्या नात्यात चालणार आहे. वृध्द आई वडिलांना मुलानी सांभाळायला हवं. मुलांच्या शिक्षणावर केलेल्या खर्चाचा; त्यासाठी आयुष्यभर काटकसर केल्याचा हिशोब प्रत्यक्षात बोलून नाही दाखवला तरी मनात चालू राहणारच ना !
प्रत्येक नात्याकडून थोडीफार अपेक्षा नैसर्गिकरीत्या केली जाते. अपेक्षा करायचं नाही म्हटलं तर प्रश्न पडतो, का नाही करायची? मी या नात्यासाठी बरंच काही सोसलंय आता त्यानी थोडं केलं तर काय बिघडलं. परंतु जेंव्हा समोरुन अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेंव्हा दु:ख वाट्याला येतं. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात,"कर्मण्ये वादिकारस्ते मा फलेषु कदाचन" कर्तव्य करत राहा. कोणत्याही नात्याकडून काहीतरी मिळेल हा हेतू मनात बाळगून राहू नकोस.
अपेक्षा ही अशी भावना आहे जी अहंकार दर्शवते. मी केलं मग त्यांनी करायला हवं. त्यांनी नाही केलं तर राग येतो. दुष्प्रवृत्ती बळावते. चांगल्या विचारांशी वाईट विचारांचा संघर्ष सुरु होतो. कौरवप्रवृत्ती क्रोध, द्वेष, मोह, माया, लोभ, मद, मत्सर तीव्र होतात. पांडव प्रवृत्ती जशा की, प्रेम, सत्य, विश्वास, जागृत राहणे, सहनशीलता, सद्भाव सौम्य होतात. तीव्र भावनांचा विकार उत्पन्न होतो. ज्यामुळे जगण्याची धडपड अंतिम श्वासापर्यंत चालू राहते. ती धडपड म्हणजेच चांगलं किंवा वाईट कर्म होय.
रोजच्या जगण्यात मनुष्य जी जी कृती करतो ते कर्मच असतं. कुणीतरी सुंदर म्हणावं म्हणून स्वत:ला तयार करणं, स्वयंपाकाची स्तुती व्हावी म्हणून जेवण बनवणं, कुणीतरी कौतुक करावं म्हणून गोड बोलणं, कुणीतरी काहीतरी म्हणेल म्हणून स्वभावाविरुध्द जाऊन वर्तन ठेवणं यामुळे सतत चांगलंच कर्मफळ मिळेल असे नाहीच. उलट सतत कौतुकाच्या अपेक्षेचं ओझं घेऊन जगल्याने एका क्षणी त्याचा स्फोट होईल आणि मन दुभंगून जाईल. म्हणजेच मनावर हजारो ओरखडे उठतील. म्हणूनच सम्यक भावनेने कर्तव्य केल्याने कदाचित अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकतं. मनात कोणतीही शंका कुशंका न ठेवता प्रत्येक नातं जपता यायला हवं. त्यामुळे दोन्ही बाजूनी प्रेम टिकतं. नाहीतर मनाची युध्दभूमी व्हायला वेळ लागत नाही.
एखादं नातं हवं असणं, एखादी वस्तू हवी असणं तशी इच्छा निर्माण होणं नैसर्गिक असू शकतं, मात्र अशी इच्छा जेव्हा अतितीव्र होते, त्यामुळे परीस्थितीचं भान सुटतं आणि अनेक समस्या निर्माण होतात. आसक्ती आणि मोह यांच्या चक्रात अडकणं टाळायला हवं. गरजा कधी संपून हव्यास कधी सुरु होतो हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. त्यामुळे माणसाची वैयक्तिक, सामाजिक अधोगती होते. कारण मानसिक ताण वाढतो. खरंतर या ताणाला दूर ठेवता आलं पाहिजे. नातेसंबंधाच्या रणभूमीत नात्यांचा सन्मान झाला तर प्रेमळ संवाद होऊ शकेल. ज्यामुळे मन सक्षम होईल आणि कोणत्याही वादाच्या संघर्षातून मुक्त होण्याचे मार्ग सुकर होतील. स्वत:च्या दु:ख, राग या भावनांचा अतिरेक कमी होऊन इतरांच्या भावनाही जपल्या जातील. ज्यामुळे दोन मानवी प्रवृत्तींच्या मानसिक लढाईला सुरूवात होण्यापूर्वीच पूर्णविराम मिळेल. मनाचा मनाशी योग्य पध्दतीने संवाद साधणे. साक्षीभावाने शारीरिक हालचाली, भावनिकता यांचं निरीक्षण करणे. सुख - दु:ख याना समान दर्जा देता येणे. कोणत्याही प्रकारच्या भीतीचं मनातून समूळ उच्चाटन करणे. सुखाचा हव्यास न करणे. दु:खाचा तिरस्कार न करणे. यामुळे मन:स्थितीतील गोंधळ कमी होतो. प्रामाणिक कर्तव्याचा हेतू स्पष्ट होतो.
एकदा एका सोसायटीत राहणारे आजोबा बाथरुममधे पाय घसरुन पडले. घरी आजी एकट्याच होत्या. त्यानी पटकन गेटवर असणाऱ्या वाॅचमनला हाक मारली. तो आला. त्याने आजोबाना उचलून बेडवर झोपवले. तेवढ्यात त्याला बेडवर आजोबांची सोन्याची चेन दिसली. तो तिथेच घुटमळला. बराच वेळ. चेन उचलणं खूप सोपं होतं. मन:स्थिती गोंधळाची होती.परंतु प्रामाणिक विचारानी त्याला साथ दिली. तो निघून गेला. असेच सात आठ महिने गेले. त्या आजोबांचा मृत्यू झाला. आजी दुसरीकडे राहायला गेल्या. जाताना त्याला दहा हजार रुपये देऊन गेल्या. त्याने चेन उचलली असती तर अपमानास्पदरीत्या नोकरी गमवावी लागली असती. आता सन्मानाने त्या सोसायटीत वावरु लागला. चांगल्या कर्माचं फळ त्याला मिळालं. काही क्षणाचा लोभ दूर ठेवता आल्यामुळे त्याचं सत्कर्म संपूर्ण सोसायटीला दिसलं. जीवनात असे मोहाचे क्षण खूपवेळा येतात. मनात हो नाहीचं द्वंद्व चालू राहतं. त्या त्या वेळेचं ते छोटंसं मनातलं युध्दच असतं. ती लढाई चांगल्या विचारानी जिंकता आली तर आयुष्य समाधानाने जगता येतं. परंतु तो क्षण सावरता येत नसेल तर आजकालचे समुपदेशकही वाईट प्रवृत्तींच्या परिणामांचा विचार करुन योग्य मार्ग सुचवतात. त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन अंतर्मनातील चित्तवृत्ती स्थिर करण्यासाठी उपयुक्त ठरते.
श्रध्दा, पुरुषार्थ, सजगता, समाधी, प्रज्ञा या गुणांना पांडवगुण संबोधलं जातं. या गुणांना आपल्यामध्ये उतरवण्यासाठी, दैनंदिन जीवनातील समस्यांतून म्हणजेच नेहमीच्या युध्दभुमीतून सहीसलामत बाहेर पडण्यासाठी, जिंकण्यासाठी श्रीकृष्णासारखा सखा असावा लागतो. ज्यामुळे फळाची अपेक्षा न करता कर्तव्य करत राहण्याचे विविध मार्ग प्राप्त होतात. जीवनात तृप्तीची तृष्णा पूर्ण होण्याची शक्यता वाढते. महाभारत काळातही अर्जुनविषादयोग होता. आजही तो माणसामाणसात आहेच. परंतु श्रीकृष्ण मात्र तेंव्हाच होते. आज जगण्याची गती प्रचंड प्रमाणात वाढली आहे. हा वेग आपल्या मानसिकतेला पेलेनासा झाला आहे. त्यामुळे आज श्रीकृष्णासोबत आधुनिक मानसशास्त्र आणि समुपदेशकांची मदत घ्यायला हवी. समुपदेशनासारख्या मानसशास्त्रीय उपाययोजनातून प्रत्येक अर्जुनाला त्याचा श्रीकृष्ण शोधावा लागेल.