पुष्पमाला पुष्प १३: सुकाणू आयुष्याचे...

रिकामटेकडी मंडळी दुसऱ्यांना उपदेश करून अनेकदा दिशाभूल करतात.
पुष्पमाला पुष्प १३: सुकाणू आयुष्याचे...

रिकामटेकडी मंडळी दुसऱ्यांना उपदेश करून अनेकदा दिशाभूल करतात. पण कटलेल्या पतंगाप्रमाणे भरकटत जाणारे आयुष्य जगणाऱ्यांनी आपल्या विचारांत नेमके कसे बदल घडवून आणले पाहिजेत, यावर मंथन गरजेचे आहे. याविषयी थोडेसे...

(लेख - अनिकेत भालेराव)

आपल्या प्रत्येकालाच आयुष्यात काही तरी करून दाखवायचे असते. आपण प्रत्येकजण आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी धडपडतच असतो. पण आपल्यापैकी बरेच जण असे असतात की जे अगदी निवांत असतात त्यांना कोणतेही लक्ष्य साध्य करावयाचे नसते. त्यामुळे ते आला दिवस ढकलत असतात.

अशा ‘निवांत’ मंडळींच्या डोक्यात मग भलतेच विचार येत असतात. मग विनाकारण कोणाला उपद्रव देत रहायचे, विनाकारण रस्त्यावर गर्दी करावयाची. अशी माणसे स्वतः तर काहीच करत नाही पण दुसरा जे काही करत असतो त्याच्या मार्गात विनाकारण बाधा आणत असतात. जो कोणी काही करू पहात आहे अशा व्यक्तीला जर एखाद्या प्रयत्नात अपयश आले तर ही ‘रिकाम टेकडी’ मंडळी अगदी हिरीरीने सांगत असतात की, ‘मला माहित होते की हे शक्य होणार नाही... म्हणून मी हे असले काही करत नाही, मी तुला तर आधीच सांगितले होते पण तू ऐकतच नाही...’ अशा वेळी ते अगदी पोक्तपणाचे बोल बोलत असतात. जसे ही रिकाम टेकडी मंडळी अगदी सगळे काही करून सवरून बसलेली आहेत.

पण येथे एक लक्षात घ्यायला हवे की ‘जो काम करतो त्याच्याच चुका होतात आणि अर्थात जो कामच करत नाही त्याच्या चुकाच होत नाहीत...’ जो काचेचे पेले हाताळेल त्याच्या हातून एकदा का होईना पेला फुटू शकतो, पण जो हाताळणारच नाही त्याच्याकडून एकही पेला फुटणार नाही. ही रिकामटेकडी मंडळी पेले फुटतील म्हणून कामच करणार नाहीत. आणि दुसऱ्याला उपदेश करतील, ‘अरे ते फार अवघड काम आहे. ते होणारच नाही...’ अशा उपदेशामुळे जो कोणी ते पेले हाताळू पहात आहे तो गोंधळून जातो आणि त्याचा आत्मविश्वास खालावू शकतो. ही ‘रिकाम टेकडी’ मंडळी मात्र समोरच्याचा आत्मविश्वास कमी करण्याचे काम अगदी चोख बजावित असतात.

आता आपण आत्मपरिक्षण करायला हवे की आपण कोणत्या गटात आहोत ‘काम करणाऱ्यांच्या की ‘रिकामटेकड्यां’च्या. आपण आपल्या स्वतःला तर फसवू शकत नाही. जर आपण रिकामटेकडे असू तर आपल्यात बदल घडवून आणायला हवा. जर आपण स्वतःला कामात गुंतवून ठेवले नाही तर वाईट विचार मनात येतात. जर आपण कामात व्यस्त राहिलो तर आपोआपच इतर फालतू कामासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे आपोआपच आपण देशाच्या प्रगतीला, समाज स्वास्थ्यालाही थोडाफार हातभार लावत असतो.

महाभारतात जेव्हा अर्जुन अधीर होऊन शस्त्र खाली टाकून बसला होता त्यावेळी श्रीकृष्ण तेथे होता. मधुसुदनाने धनंजयाला सुधीर करून शस्त्र उचलण्यास प्रवृत्त केले. पण आपल्या आयुष्य कोणी गिरीधर भेटेल अशी वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. कारण येथे कोणालाही कोणाशी काहीही घेणे-देणे नाही. उलट आपले नुकसान कसे होईल याकडे लक्ष देणारी माणसे आपल्या भोवती असतात.

आपण आपले काही नुकसान होईल, आपण पराभूत होऊ वगैरे असा विचार करून केवळ शांत बसून राहणे हे योग्य नाही. आपण थोडेतरी धाडस दाखवायला हवे - ‘डर के आगे जित है|’ आपण आपल्या आयुष्यात काही ‘लक्ष्य’ हे ठेवलेच पाहिजे, मग ते कोणतेही असो. जर लक्ष्य आपल्या डोळ्यांसमोर असेल तर आपोआपच आपण त्या दृष्टीने प्रयत्न करणार. त्यात चुका होणार, आपण त्या चुका सुधारणार, म्हणजेच आपल्यात योग्य तो बदल घडून येणार. हीच तर आपली प्रगती आहे. आणि एका चुकी मधून शिकून आपण पुढच्या बर्‍याच संभाव्य चुका टाळत असतो. खेळामध्ये तर असे बर्‍याच वेळा पहावयास मिळते. एखादा खेळाडू प्रतिस्पर्ध्यास एक डाव टाकून पराभूत करतो. पण पुढच्या वेळेस जेव्हा ते दोन खेळाडू समोरा समोर येतात तेव्हा मागच्या वेळेस विजयी झालेला खेळाडू आधीचाच डाव टाकून पुन्हा विजयी होईलच असे नाही. कारण मागच्या वेळेसच्या पराभूत खेळाडूने त्यावर उत्तर शोधलेले असते आणि तो अधिक प्रगल्भ झालेला असतो.

आपल्याही बाबतीत असेच होत असते. पण त्यासाठी आपण लक्ष्य साध्य करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. विश्वनाथन आनंद हे बुद्धिबळात विश्वविजेता झाले. आनंद हे २००० ते २००२ व २००७ ते २०१३ या कालावधीत विश्वविजेता होते. सुरुवातीला स्थानिक पातळीवर ते ज्या स्पर्धा खेळले त्यातूनच अधिकाधिक प्रगल्भ होत गेले. आणि अशाच यशाच्या मालिका गुंफत विश्वविजेता झाले. एकदमच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना उडी मारता आली नाही तर एक एक पायरी चढतच ते सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचले. आपणही आपले १०० % द्यायलाच हवे. त्याशिवाय यश मिळणारच नाही. कोणी आपल्याला आयते काहीच देणार नाही.

जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ|

मैं बपुरा बूडन डरा, रहा किनारे बैठ॥

(स्थूलार्थ : जो प्रयत्न करतो तो काही ना काही मिळवितोच. जसे मोती मिळविण्यासाठी खोल पाण्यात डुबकी मारणारा हातात काही ना काही तरी घेऊन येतोच. पण काही जण असे असतात की जे बुडण्याच्या भितीने किनाऱ्यावरच बसून राहतात, पण त्यांना काहीच मिळत नाही.)

हे संत कबीर यांनी सांगितलेलेच आहे. जो शोधेल त्याला मार्ग सापडेल आणि जो नुसता बसून राहिल त्याला मार्ग मिळणारच नाही.

आपणही आपल्या मनोदेवतेच्या गाभाऱ्यात बसून आपले कोणत्याही अगदी आपल्या आवडीच्या क्षेत्रातील ‘लक्ष्य’ आपल्या डोळ्यांसमोर ठेवायला हवे. आणि आपल्या आयुष्याच्या सुकाणूवर व्यवस्थित नियंत्रण ठेवायला हवे. मग बघाच आपण कसे आपल्या मनोदेवतेला आपल्या विचारांची आणि प्रयत्नांची पुष्पे एक एक करून अर्पण करत जातो आणि विजयी होतो ते... आपणच आपले ‘चक्रधर’ अशा प्रकारे व्हावे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in