स्वतंत्र भारताची सर्व स्वप्ने साकार होताना...

सक्षम प्रशासकीय कौशल्य आणि प्रचंड जनमत लाभलेले दृढनिश्चयी पंतप्रधान आणि त्यांना लाभलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड यामुळे हे शक्य झाले आहे.
स्वतंत्र भारताची सर्व स्वप्ने साकार होताना...

 ‘सर्व भवन्तु सुखिन:’ अर्थात प्रत्येकजण सुखी व्हावा, प्रत्येकजण समृद्ध व्हावा असे स्वप्न, जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असलेल्या, सर्वात जुनी, सर्वात मोठी आणि सर्वात चैतन्यमय लोकशाही असलेल्या भारताने पाहिले होते. हे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने भारताने गेल्या नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय प्रगती केली आहे.

सक्षम प्रशासकीय कौशल्य आणि प्रचंड जनमत लाभलेले दृढनिश्चयी पंतप्रधान आणि त्यांना लाभलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड यामुळे हे शक्य झाले आहे. त्याचबरोबर युवा वर्ग आणि गरीब जनतेमध्येही नवी आशा निर्माण झाली आहे.

सरकारने प्रदान केलेल्या रकमेपैकी फक्त दहा टक्के रक्कम अंतिम लाभार्थींना मिळते, असे यापूर्वीच्या पंतप्रधानांनी कबुल केले आहे, तर दुसरीकडे, विद्यमान पंतप्रधानांनी असंख्य लाभार्थींची बँक खाती उघडून आणि त्यांच्यासाठी तरतूद असणारी रक्कम त्यांच्या खात्यावर थेट हस्तांतरित करून खऱ्या लाभार्थींना पूर्ण लाभ मिळेल, याची खातरजमा केली आहे.

बेरोजगारीची गंभीर समस्या जगभरात उद्भवली असताना, त्यावर उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत आणि केवळ शहरांमध्येच नाही तर देशातील दुर्गम ठिकाणीही अनेक कौशल्य प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

श्रमजीवींना आदराची वागणूक देण्यात आली आहे, चतुर्थ श्रेणी कामगारांना पंतप्रधानांनी अनेक प्रसंगी सन्मानित केले आहे. इतक्या कमी अवधीत पायाभूत सुविधांच्या बाबतीत दिसून येणारा सकारात्मक बदल, हा विकसित भारताची साक्ष देण्यासाठी पुरेसा आहे. कोणे एके काळी युरोपमध्ये फिरताना मला अनेकांचे उद्गार ऐकू यायचे की युरोपसारख्या पायाभूत सुविधा आणि प्रवासाची सोय भारतात कधीच होऊ शकणार नाही, पण अगदी कमी काळात ते चुकीचे ठरले आहेत.

शतकातून एखाद्या वेळीच येणारा कोविडसारखा साथरोग, जगातील विविध देशांच्या गटांमध्ये जागतिकीकरणाच्या विरोधात आणि ध्रुवीकरणाच्या दिशेने वाढता कल, युरोपच्या मध्यवर्ती भागात उद्भवलेला रशिया-युक्रेन संघर्ष, हवामानातील बदलांमुळे वाढणारी काळजी, जगभरात सातत्याने वाढणारी महागाई आणि जागतिक स्तरावर मोठ्या लोकसंख्येला सतावणाऱ्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या, ही या काळातील जागतिक स्तरावरील ठळक आव्हाने म्हणता येतील.

आशियातील अनेक सरकारे या विविध आघाड्यांवर अयशस्वी होत असताना, भारत मात्र आपल्या कौशल्यपूर्ण आणि सुजाण धोरणांच्या बळावर, सक्षम आणि सातत्याने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेसह उभा राहिला आहे. कुशल परकीय मुत्सद्देगिरीने भारताला जगभरात अभूतपूर्व सदिच्छा मिळवून दिल्या आहेत. जगाच्या लोकसंख्येच्या १/६ लोकसंख्या असणाऱ्या भारत देशाचा आवाज आता खणखणीत ऐकू येतो आहे. एकंदर पाहता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला आपले योग्य स्थान प्राप्त झाले आहे. याचे श्रेय वर्तमान सरकारला आणि त्यांच्या धोरणांना जाते. रशिया-युक्रेन संघर्षात भारताच्या समतोल वृत्तीने, कोणा एकाची बाजू न घेता परिपक्व मध्यस्थाची आणि जागतिक शांततेचा पुरस्कार करणारी भूमिका मांडली आहे. अनेक आशियाई अर्थव्यवस्था कोसळत असताना आणि जगभरातील अनेक देशांमध्ये महागाईची समस्या गंभीर होत असताना, भारताने या बाबतीत सुद्धा अविश्वसनीय लवचिकता दाखवली आहे. कोविड साथरोगाच्या काळात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी सरकारने सूज्ञ पावले उचलली.

भारताला भेट देणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या लक्षणीय होती, मात्र देशातील तीर्थक्षेत्रे अस्वच्छ होती, पायाभूत सुविधांचा अभाव होता. यापूर्वीच्या सरकारांनी अशा पर्यटन स्थळांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये वाराणसी, उज्जैन, केदारनाथ, हृषिकेश अशा ठिकाणी जी कामे झाली आहेत आणि या ठिकाणांचा चेहरामोहरा ज्याप्रकारे बदलून गेला आहे, तो बदल येणाऱ्या काळात निश्चितच कौतुकास्पद ठरणार आहे.

अर्वाचिन काळात बुद्धिमत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या कालबाह्य वसाहतवादी शिक्षण पद्धतीच्या तुलनेत नवीन शैक्षणिक धोरण ही एक क्रांती आहे. या धोरणामुळे आपल्या देशातील कोवळ्या मनांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना त्यांच्या उपजत बुद्धिमत्तेचा पुरेपूर वापर करण्यासाठी आणि आपली सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी मोठा वाव मिळाला आहे. शिक्षण सुधारण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे देशातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारली आहे आणि शिक्षण सर्वांसाठी अधिक सुलभ झाले आहे.

अलीकडच्या काळात कलेला आणि संस्कृतीला खूप महत्त्व आणि प्रोत्साहन दिले जाते आहे. अनेक नवीन संग्रहालये सुरू करण्यात आली आहेत आणि सर्व प्रकारच्या कलांना स्थान मिळाले आहे. या बदलांमधून आपल्याला आपल्यासाठी उपलब्ध असणाऱ्या शक्यतांची जाणीव होते आहे आणि त्याचबरोबर, आपण दीर्घ काळ स्वत:च्या क्षमतेची जाण नसणारे निद्रिस्त राष्ट्र होतो, याचीही जाणीव होऊ लागली आहे.

सर्वच राजकीय नेते आणि पक्ष धार्मिक विधी आणि प्रथांवर विश्वास ठेवणारे होते, मात्र ते आपल्या धार्मिक भावना उघडपणे व्यक्त करत नव्हते. आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र आपला धर्म आणि धार्मिक प्रथांचे उघडपणे पालन करण्यात कधीही लाज बाळगली नाही आणि आपल्या धार्मिक विचारसरणीबाबतचा अभिमान त्यांच्या वागण्यातून दिसत राहिला. आपल्या अनमोल आणि अमूर्त वारशाची ओळख त्यांनी इतर जागतिक नेत्यांना करून दिली.

कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजातील लोकांच्या आत्मविश्वासावर आणि स्वाभिमानावर अवलंबून असते. आपल्या मुळांबाबत आणि संस्कृतीबाबत आदराची भावना बाळगल्यामुळे समाजात आत्मसन्मान वाढू शकतो आणि ही भावना कोणताही संकोच आणि पूर्वग्रह न बाळगता अतिशय चांगल्या प्रकारे रूजवली गेली आहे.

दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या ईशान्यभारत क्षेत्राच्या प्रगतीच्या अनेक शक्यता दृष्टीक्षेपात आल्या आहेत. काश्मीरमधला विकास आणि या भागातील महिलांना दिलेला न्याय, हे बदल खरोखरच डोळे उघडणारे आहेत. आपल्या लोकांवर झालेले अन्याय कशा प्रकारे दूर करता येतात, हे यावरून दिसून येते. फुकाची निंदा करणाऱ्यांसाठी आणि टीकाकारांसाठी हे मोठेच आव्हान आहे. पंतप्रधान मोदींनी अफगाणिस्तानला संसदेची नवी इमारत भेट दिली होती, हे अनेकांना ठाऊक नसेल.

नायजेरियातील राष्ट्रपतींच्या महालाचे बांधकामही काही वर्षांपूर्वी भारताने केले होते. आणि आता पंतप्रधान मोदींनी आपल्या संविधानाचा आणि परंपरेचा आदर राखत संसदेची एक सुंदर इमारत आपल्या देशाला समर्पित केली आहे. इतक्या कमी अवधीत ही अप्रतिम वास्तू उभारण्यात आली आहे.

सगळे चित्र सुबक नाही, अनेक चुका झाल्या ज्या टाळता आल्या असत्या, आणि बेरोजगारी, महागाई तसेच इतर अनेक सामाजिक समस्यांच्या निराकरणाचा लांबचा पल्ला गाठायचा आहे, मात्र सध्याचे सरकार ज्या वेगाने आव्हानांना सामोरे जाते आहे, ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि उज्वल भविष्याची आशा निर्माण करणारे आहे. मात्र स्वतंत्र भारताची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मोदींच्या संघाला आणखी वेळ द्यावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in