न संपणारे तू तू मैं मैं

निवडणुकांचे मतदान सुरू होण्यापूर्वीच अनेक वाहिन्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेचे अंदाज व्यक्त केले आहेत. त्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीसाठी एका वाहिनीने ४२, दुसऱ्या वाहिनीने ४१, तिसऱ्या वाहिनीने २७, असा अंदाज व्यक्त केला आहे.
न संपणारे तू तू मैं मैं

- अरविंद भानुशाली

सह्याद्रीचे वारे

लोकसभा निवडणुका शनिवारी जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांच्या जागावाटपाची घाई सुरू झाली आहे. भाजपने महाराष्ट्रात २० लोकसभा मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केल्याने तिथे बुथवार निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसते. महायुतीमध्ये २८ जागांच्या वाटपाचा घोळ, महाविकास आघाडीत ४८ जागांचा घोळ अजून सुटलेला नाही. विशेष करून गले की हड्डी झालेल्या प्रकाश आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडी व राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा प्रश्‍नही आता सुटण्याच्या मार्गावर आहे. आता यानंतर बच्चू कडू, महादेव जानकर यांचाही प्रश्‍न ऐरणीवर आहे. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्याने आता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचे उद्योग सुरू झाल्यास नवल नाही.

निवडणुकांचे मतदान सुरू होण्यापूर्वीच अनेक वाहिन्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेचे अंदाज व्यक्त केले आहेत. त्यात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीसाठी एका वाहिनीने ४२, दुसऱ्या वाहिनीने ४१, तिसऱ्या वाहिनीने २७, असा अंदाज व्यक्त केला आहे. देशात निवडणूक वारे जोरात सुरू असले तरी महाराष्ट्रात मात्र त्याचा ज्वर शनिवारपासून वाढू लागला आहे. जागावाटप व प्रचार यंत्रणा सुरू असतानाच राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. मालेगाव, नाशिक, भिवंडी, ठाणे व मुंबई इथपर्यंत ही यात्रा पोहचली आहे. या यात्रेत राष्ट्रवादीचे शरद पवार, उद्धव ठाकरे इत्यादी नेते उपस्थित राहिले आहेत. परंतु महाराष्ट्र काँग्रेसने सर्व शक्ती पणाला लावून मुंबईची सभा जिंकली आहे. याच काळात मुंबईमध्ये काँग्रेसला तडे जात आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, तर काँग्रेस पक्षाचे खजिनदार मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि या दोघांनीही राज्यसभेच्या जागा पटकावल्या आहेत. मुंबईमधील सहा जागांवर घमासान लढत होणार असून भाजपने मुंबईतील तीन उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीमध्ये शनिवारपर्यंत जागावाटपाचा घोळ सुरूच होता. अधिकृत जागावाटप जाहीर न होताच प्रत्येक पक्ष आपले उमेदवार घोषित करत आहेत. त्यात बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर नणंदा-भावजया एकमेकींसमोर उभ्या राहिल्याचे चित्र बारामती व रावेर मतदारसंघामधून पुढे आले आहे.

भाजपने २० उमेदवारांची यादी जाहीर करताना पाच विद्यमान खासदारांना वगळले आहे. दिवंगत प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांचा पत्ता जवळजवळ कट झाला आहे, तर उत्तर मुंबईचे गोपाळ शेट्टी यांनाही बाजूला करण्यात आले आहे. खान्देशमधील राजकारण पाहता एकनाथ खडसे हे निष्ठावंत भाजपचे नेते राष्ट्रवादीमध्ये गेले असले तरी त्यांची सूनबाई रक्षा खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

शनिवारी १६ मार्चला निवडणुका जाहीर होताच दुपारी तीन वाजता आचारसंहिता लागू झाली. परंतु त्यापूर्वी गेले आठवडाभर महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला होता. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत घेण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्यासाठी महाराष्ट्रात महायुती सरकारने कंबर कसली आहे. मात्र तसा कुठलाही जोश महाविकास आघाडीमध्ये दिसत नाही. यापूर्वी महायुतीचे सरकार पडणार अशी भविष्यवाणी खासदार संजय राऊत यांनी दहावेळा केली होती. परंतु तशी काही हालचाल न होता उलट महाविकास आघाडीमधलेच नेते फुटून महायुतीमध्ये गेल्याचे चित्र दिसत आहे.

२०१४ व २०१९ च्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष युती म्हणून एकत्रितपणे निवडणुका लढले होते. त्यामध्ये लोकसभेच्या २३ जागा भाजपला व १८ जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. त्यानंतर बरीच उलथापालथ झाली. आता मूळ शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १३ खासदार हे शिंदे गटाकडे गेले. सध्या उद्धव ठाकरे हे अनेक ठिकाणी सभा घेऊन मोदींविरोधात वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असले तरी सध्या सत्ता ही भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे आहे. हे पाहता पुढच्या काही दिवसांमध्ये अजून अनेक मोहरे महायुतीत येऊ शकतात. अथवा उ.बा.ठा., काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बाहेर गेलेल्या नेत्यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांची घरवापसी होऊ शकते. सध्या महाराष्ट्राचे राजकारण हे दोलायमान असून नजीकच्या काळात ते स्थिर होऊ शकते.

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे, तर एनडीएच्या आघाडीतील जागावाटपाचा गोंधळ सुरू असताना काँग्रेस नेते राहुल गांधी हे मात्र यात्रा करत फिरत आहेत. या यात्रेचा पहिला चरण संपुष्टात आल्यानंतर पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेसने राजस्थानमधील सत्ता गमावली व भाजपने चार राज्यांमध्ये आपले वर्चस्व दाखवून दिले. मध्य प्रदेशमध्ये तर काँग्रेसचा सुपडा साफ झाला. राजस्थानमधील सत्ता काँग्रेसच्या हलगर्जीपणामुळे गेली. आता तर बिहार हा मोठा प्रदेशही भाजपकडे गेला आहे. ही एकूण परिस्थिती व महाराष्ट्रातील ४८ लोकसभांची स्थिती याचे विश्‍लेषण करता आज तरी मोदी आघाडीवर आहेत. देशभरातून जे ‘ओपिनियन पोल’ आले आहेत त्यांनी तर ‘मोदी एके मोदी’लाच पसंती दिली आहे आणि अशा स्थितीत लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे इतर पक्षांमधून भाजपकडे होणारे ‘इनकमिंग’ वाढू शकते. शिंदे-फडणवीस व अजित पवार या त्रिसुत्रीचे म्हणणे आहे की, ४८ पैकी ४५ जागा महायुती जिंकेल. आता घोडा मैदान जवळ आहे. लवकरच उमेदवार निवडीवरून काही घमासान होते का, हेही दिसून येईल.

महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत जे अंदाज व्यक्त केले जात आहेत त्यात भाजप ३२, शिवसेना शिंदे गट ११, तर अजितदादा पवार गट ५, असे जागावाटप निश्‍चित होत असल्याचे समजते. मनसे हा महायुतीत समाविष्ट होईल, असे चित्र दिसत असले तरी जागावाटपात व चिन्हावरून काही गडबड होईल का, याचीही शक्यता आहे. तर तिकडे महाविकास आघाडीमध्ये बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या जागावाटपावरून अजूनही तू तू मैं मैं सुरू आहे. याशिवाय धनगर नेते महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आपले प्यादे जवळ बाळगले आहे, तर काँग्रेसच्या दृष्टीने अडचणीची ठरणारी एमआयएम ही संघटना किती उमेदवार उभे करते, यावर प्रत्येक मतदारसंघाचे गणित अवलंबून आहे. हे वृत्त प्रसिद्ध होत असताना सोमवारीच बहुतेक पक्षाच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील, असा रंग दिसतो.

देशभरात व महाराष्ट्रात सर्वात भल्या मोठ्या जाहिराती या भाजपच्या व महायुतीच्या आहेत. शनिवारी शेवटच्या दिवशीही प्रचंड जाहिराती करण्यात आल्या. मोदींनी ‘अब की बार ४०५’ हा चंग बांधला असून आता महाविकास आघाडी व इंडिया आघाडी त्याला कसे तोंड देतात, हे लवकरच समोर येईल. मोदींजवळ जमेच्या बाजू पुष्कळ आहेत, तर नेमके त्यांच्याविरुद्ध इंडिया या आघाडीकडे फारसे पत्ते नाहीत. रामजन्मभूमी न्यास या कार्यक्रमामुळे उभा हिंदू एकवटला होता, हे नाकारता येणार नाही. त्या अगोदर काश्मीरमधील ३७०/३५ हे कलम रद्द करून भाजपने एक वेगळाच संदेश लोकांना दिला. विशेष म्हणजे काश्मीरमधील फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, मुफ्ती मोहम्मद सईद याहीपेक्षा हुरियत कॉन्फरन्सचे सर्व लाड मोदींनी संपविले. ज्या काश्मीरमध्ये प्रजासत्ताकदिनी दोन झेंडे लागायचे तिथे यावेळी फक्त तिरंगाच लागला. याचे यश मतपेटीतून व्यक्त झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

logo
marathi.freepressjournal.in