-राजा माने
राजपाट
महाराष्ट्रासारख्या राज्यातील मतदार सर्वेक्षण अहवाल भाजपची चिंता वाढविणारे असेच आहेत. राष्ट्रीय पातळीवर मोदींना आज तरी पर्याय नाही, असाच सूर सामान्य माणसांत उमटतो. तरीही देवेंद्र फडणवीस आणि भाजप श्रेष्ठी लोकसभा निवडणुकीत कोणताही धोका पत्करू इच्छित नाहीत. म्हणूनच मराठवाडाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यातील अशोक चव्हाणांचे बळ गृहित धरून देवेंद्र फडणवीस प्रायोजित अशोक पर्वाची मुहूर्तमेढ राज्यात रोवली गेली आहे.
स्व.शंकरराव चव्हाण यांनी नांदेडच्या नगराध्यक्षपदापासून आपल्या राजकीय सत्ताकारणाची सुरुवात केली होती. राज्यातील साखर लॉबीच्या विरोधातील आणि गांधी घराण्याचा विश्वासू खंबीर नेता अशी त्यांची ख्याती होती. स्वच्छ प्रतिमा आणि कडक शिस्तीमुळे त्यांना ‘राजकारणातील हेडमास्तर’ असे संबोधले जायचे. अशोक चव्हाण हे त्यांचे पुत्र! पण शंकरराव चव्हाण यांचे ‘राजकीय मानसपुत्र’ म्हणून स्व. विलासराव देशमुख यांच्याच नावाची चर्चा महाराष्ट्रभर असायची. ही पार्श्वभूमी घेऊन अशोक चव्हाण १९८६ युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून राजकारणात सक्रिय झाले. एम.बी.ए. ही पदवी घेतलेल्या अशोकरावांची इंग्रजी, हिंदी व मराठीवर चांगलेच प्रभुत्व. त्याचाच परिणाम म्हणून त्यांचा राजकीय प्रवास सुखकर बनला. राज्यमंत्रीपदापासून दोन वेळा मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांनी झेप घेतली. ‘आदर्श घोटाळा’ हा राजकीय अपघात असल्याचा उल्लेख ते स्वतः नेहमी करतात. न्यायालयीन लढा जिंकून आपल्याला क्लीनचिट मिळेल, याची खात्री त्यांना वाटते. त्यांचा नांदेड जिल्हा आणि मराठवाड्यात त्यांचे बऱ्यापैकी वजन आहे. त्याचा नांदेड, हिंगोली, लातूर आणि परभणी लोकसभा मतदारसंघात थेट फायदा होऊ शकतो. अशाच राज्यपातळीवरील गणितांचा आधार घेऊनच भाजपने त्यांना आपल्या गोटात आणले आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींजवळ असणारे विरोधक आणि राज्यातील विरोधकांमुळे गेल्या काही महिन्यांपासून चव्हाण अस्वस्थ होतेच.
एक शिस्तप्रिय राजकारणी, मराठवाड्याचे भगीरथ म्हणून ज्यांची ओळख आहे असे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे काँग्रेस पक्षात फार मोठे वलय होते. दोनवेळा मुख्यमंत्री, प्रमुख मंत्रिपदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद एवढेच काय, तर अगदी युवा नेत्यापासून विविध पदे उपभोगून काँग्रेसमधील एक बडे नेते अशी स्वतंत्र ओळख अशोक चव्हाण यांनी निर्माण केली होती. मात्र, मागच्या काही दिवसांपासून ते जरी शरीराने काँग्रेसमध्ये असले तरी मनाने कुठेतरी बाहेर असल्यासारखे वावरत होते. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार अशा वावड्या उठत होत्या. परंतु काँग्रेसचे एक निष्ठावान घराणे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. मात्र, त्यांची अस्वस्थता काहीतरी वेगळेच सांगून जात होती. अखेर ते भाजपवासी झाले आणि काँग्रेसजणांना मोठा धक्का देत त्यांनी आता अशोक पर्वाची नवी इनिंग सुरू केली.
प्रशासनावर एक मजबूत पकड असलेले माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे मानसपुत्र होते. शंकरराव चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्यावर सतत वरदहस्त ठेवला. त्यांच्या उपकारातून उतराई होण्याच्या दृष्टीने विलासराव देशमुख यांनी अशोक चव्हाण यांना मंत्रिमंडळात प्रमुख पदे देऊन पक्षात त्यांना नेहमीच मानाचे स्थान दिले. विशेष म्हणजे विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांनाच मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांचे पुत्र म्हणून आणि काँग्रेस पक्षात एक चांगली पकड असलेले आघाडीचे नेते म्हणून अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेहमीच मानाचे पान मिळत गेले. सत्तेत असताना सातत्याने विविध मंत्रिपदे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आणि दोनवेळा मुख्यमंत्रीपद एवढे सारे त्यांना काँग्रेसने दिले. त्यामुळे त्यांची निष्ठा कधीच ढळली नाही. उलट काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विश्वासू नेते म्हणूनही त्यांनी ओळख निर्माण केली होती. त्यामुळे मराठवाडा दौऱ्यात राहुल गांधी यांचा थेट नांदेड दौराच असायचा. याअगोदर भारत जोडो यात्रेत नांदेड जिल्ह्यातून जात असताना अशोक चव्हाण कायम राहुल गांधी यांच्यासोबत राहिले.
मोदी लाटेत लोकसभा मतदारसंघ हातातून गेला. परंतु जिल्ह्यातील काँग्रेसची पकड त्यांनी कमी होऊ दिली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पडत्या काळात अशोक चव्हाण यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु त्यांनी आपल्या मनातील कुठलीही खदखद कोणालाही कळू न देता थेट वर्षानुवर्षे सोबत असलेल्या काँग्रेस नेत्यांना धक्का देत विधानसभा सदस्यत्व आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन थेट भाजपचे कमळ हातात घेतले. त्यामुळे राज्यातील काँग्रेसजनांनाच खूप मोठा धक्का बसला. त्यातल्या त्यात मराठवाड्यातील काँग्रेसची भक्कम शक्ती असलेल्या अशोक चव्हाण यांच्यामुळे पक्षाची न भरून निघणारी हानी झाल्याची लोकभावना आहे. खरे म्हणजे सध्या मोदी सरकार एक-एक जागा कशी बळकावता येईल, यासाठी विरोधातील बड्या नेत्यांना कधी धमक्या, तर कधी वेगवेगळे आमिष दाखवून आपल्या छायाछत्राखाली खेचून घेत आहे. त्यामुळे विरोधी पक्ष दिवसेंदिवस खिळखिळा बनत चालला आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. अशा स्थितीत विरोधकांचे बळ एकवटून मोदी लाटेविरोधात लढणे आवश्यक होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी साथीदारांची साथ सोडून भाजपचे कमळ हातात घेतले. त्यांच्यासारख्या नेत्याने काँग्रेस सोडणे खरोखरच खूप महागात पडू शकते.
या अगोदर माजी मंत्री मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांसारख्या नेत्यांनी पक्ष सोडला. याचा काँग्रेसजनांवर फारसा परिणाम झाला नव्हता. परंतु अशोक चव्हाण यांच्यासारखा प्रबळ नेता पक्ष सोडून गेल्याने काँग्रेस पक्षात खळबळ उडाली असून, या धक्क्यातून सावरायचे कसे, असा प्रश्न अनेक नेत्यांना पडला आहे. तसेच काही नेत्यांची चलबिचल अवस्था असून, काही नेते भाजपची वाट धरण्याच्या मन:स्थितीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बडे-बडे नेते आपल्याच वरिष्ठ नेत्यांना धोका देऊन अचानक सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाऊन बसत असल्याने आता थेट ज्येष्ठ नेत्यांच्याच निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांवर आणि त्यांच्या निष्ठेवर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नेतेच जर सोयीनुसार उड्या मारत असतील, तर कार्यकर्ते भविष्यात कसे निष्ठा दाखवतील, हा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान, अशोक चव्हाण कोणत्याही काँग्रेस नेत्यावर कुठलीही टीका-टिपण्णी न करता थेट भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची नवी इनिंग सुरू करीत असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे अपेक्षेप्रमाणे ते भाजपमध्ये जाताच त्यांना थेट राज्यसभा सदस्यत्वाची लॉटरी लागली. त्यामुळे भाजपमध्ये जाऊन ते मोठे पद घेत नव्याने आपली राजकीय सुरुवात करतील, असे चित्र दिसते. परंतु ऐन निवडणुकीच्या पुढे त्यांच्यावर भाजपमध्ये जाण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित होत असतानाच नांदेड जिल्ह्यातील भाऊराव पाटील कारखान्यासाठी २०० कोटींचे कर्ज उचलले असून, यावरून त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. त्यामुळे ईडीचा ससेमिरा लागण्याची भीती असल्याचे बोलले जात होते. तसेच नुकत्याच झालेल्या संसदेच्या अंतरिम बजेटच्या शेवटी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यूपीए सरकारच्या काळातील श्वेतपत्रिका काढली होती. त्यामध्ये अशोक चव्हाण यांच्या काळातील आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे या मुद्यावरून आपल्याला आरोपाच्या कचाट्यात अडकवतील की काय अशी तर भीती वाटली नसेल ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण काहीही असो किंवा त्यांच्या मनात कुठलीही खदखद असो. त्यांनी आपल्या जीवनाचा मोठा काळ काँग्रेसमध्ये घालवलेला असताना आता भाजपच्या माध्यमातून ते नवी इनिंग सुरू करीत असतील आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांच्या सोईचा मार्ग त्यांना दिसत असेल, तर त्यांच्या नव्या इनिंगला खूप खूप शुभेच्छा.
(लेखक नवशक्ति व फ्री प्रेस जर्नलचे समूह राजकीय संपादक आहेत)