भय संपलेले नाही...

जगातील अनेक कंपन्यांनी कोविडची लस बनवली. त्यापैकी ‘एस्ट्राजेनेका’ ही एक कंपनी होती.
भय संपलेले नाही...

- उर्मिला राजोपाध्ये

पैलू

जगातील अनेक कंपन्यांनी कोविडची लस बनवली. त्यापैकी ‘एस्ट्राजेनेका’ ही एक कंपनी होती. ‘कोविशिल्ड’ नावाची कोरोना प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या याच कंपनीने नुकतेच आपल्याकडून निर्मित लसीमुळे लोकांवर काही दुष्परिणाम होऊ शकत असल्याचे मान्य केले. यामुळे रक्त गोठण्याची शक्यता असल्याचे कंपनीने म्हटले आहे. सदर वृत्तानंतर ही लस घेतलेल्यांमध्ये भीतीचे वातावरण असून अधिक खुलासा गरजेचा आहे.

बराच काळ उलटल्यानंतरही कोरोनाच्या दु:खद स्मृती कायम आहेत. या जीवघेण्या साथरोगाने घराघराला दिलेले जीवघेणे हादरे आठवणींद्वारे आजही जाणवत असल्याचा भास होतो. कोरोनाआधीचे जग आणि कोरोनानंतरचे जग अशा दोन तुकड्यांमध्ये काळाची विभागणी होत असल्यामुळे या आजाराचे गांभीर्य जाणवत राहते. त्याविषयीची चर्चा होत राहते. याच पार्श्वभूमीवर सध्या कोरोना लसीच्या दुष्परिणामांचा विषय चर्चेत आहे. कोविशिल्ड या लसीच्या वापराने काही गंभीर धोके उद्भवू शकत असल्याचे खुद्द लसनिर्मिती करणाऱ्या कंपनीने मान्य केल्यामुळे ऐन उन्हाळ्यात शंकेचे ढग दाटून आले नसते तरच नवल. सहाजिकच या लसीचे दुष्परिणाम नेमके कोणते, त्याची लक्षणे कोणती आणि लस घेणाऱ्यांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता नेमकी किती याविषयी लोकांचे अनेक प्रश्न आहेत.

जगातील अनेक कंपन्यांनी कोविडवर लस बनवली आहे. त्यापैकी एक एस्ट्राजेनेका ही कंपनी होती. कोविशिल्ड नावाची कोरोना प्रतिबंधक लस तयार करणाऱ्या याच एस्ट्राजेनेकाने नुकतेच कबूल केले की आपल्याकडून निर्मित लसीमुळे लोकांवर काही दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे रक्त गोठण्याची शक्यता असल्याचे कंपनीने म्हटले आहे. इथे हे लक्षात घेण्याजोगे आहे की, भारतातील लोकांना कोविड लसीचे सुमारे दोन अब्ज २१ कोटी डोस देण्यात आले आहेत. भारतातील तब्बल ९३ टक्के लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्याचवेळी जगात या लसीचे दोन अब्ज ५० कोटींपेक्षा जास्त डोस वितरीत केले गेले आहेत. २०२१ मध्येच युरोपियन मेडिसिन एजन्सीने एस्ट्राजेनेकाच्या लसीमुळे २२२ लोकांमध्ये रक्त गोठल्याची तक्रार असल्याचा अहवाल दिला होता. म्हणजेच त्यावेळी लाखातील एकाला हा धोका होता. तेही युरोपियन देशांमध्ये हे प्रमाण बघायला मिळाले होते. रक्त गोठण्याच्या समस्येबाबत भारतालाही माहिती होती आणि त्यावर देखरेख करण्यात आली होती, असे आता सांगितले जात आहे. मात्र फायद्याचा आकडा मोठा आणि तोटा नगण्य असल्यामुळे त्यावर त्यावेळी फारसे भाष्य केले गेले नाही. आता मात्र नव्याने हा विषय ऐरणीवर आला आहे.

कोरोनाची लस घेतल्यानंतर किती काळ वेदना होऊ शकतात, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. कोणतीही लस दिल्यानंतर हे दुष्परिणाम समोर येतात. सहाजिकच या मानसिकतेतून त्यावेळी लोकांनी छोट्या-मोठ्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. कारण लसीकरणानंतरच्या काही घटना या धोक्याचे स्पष्ट निर्देश देत होत्या. त्याचप्रमाणे, भारत सरकारने दीर्घकाळ कोरोना लसीकरणाचे निरीक्षण केल्याचेही समोर येत होते. त्यांनी यासंबंधीचे पोर्टल तयार केले. समिती स्थापन केली. हे वेळोवेळी पाहायला मिळाले. मात्र आता ताज्या बातम्यांनंतर भारताच्या कोविशिल्डवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, त्याचा इतका दीर्घ परिणाम होत नाही. कोणतीही समस्या उद्भवल्यास ती एकतर लस दिल्यानंतर लगेच दिसून येते किंवा महिना ते दीड महिन्यांनंतर परिणाम दिसू लागतो. प्रभाव दिसत असला तरीही भारतात लसीकरणानंतर आयएफआयची टक्केवारी ०.००७ टक्के आहे. त्यामुळे आता घाबरण्यासारखे काही नाही.

भारत सरकारने कोरोना लस बाहेर आल्यानंतर आयएफआय पोर्टल तयार केले. यासोबतच आयएफ समितीही स्थापन करण्यात आली. या समितीने शेवटचा अहवाल मे २०२२ मध्ये सादर केला होता. हा अहवाल कोरोनाची लस घेतल्यानंतर गुंतागुंत झाल्याची तक्रार होती त्यांच्याबद्दल होता. त्यामुळे समस्या फक्त कोविशिल्डचीच नाही तर स्फुटनिक, कोवॅयिसन आणि कोर्बिवॅयसचीही होती. या लसी घेतल्यानंतर लोकांनी समस्यांबद्दल तक्रार केली होती. आताही इंटरनेटवर गेल्यानंतर, तुम्ही कीवर्ड टाकून ही कागदपत्रे देखील पाहू शकता. या पार्श्वभूमीवर धोका व्यक्त करण्यात आलेली रक्त गोठण्याची समस्या नेमकी काय आहे, हेदेखील समजून घ्यायला हवे. रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या स्थितीला ‘थ्रोम्बोसिस’ म्हणतात आणि ही स्थिती शरीरात कोठेही निर्माण होऊ शकते. जसे की शिरा, धमन्या किंवा हृदयाच्या आतदेखील रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे शरीरातील अवयवांमध्ये रक्त नीट जात नाही. स्वाभाविकच संबंधित अवयवांचे काम बाधित होते आणि आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण होतात. रक्त गोठणे टाळण्यासाठी जीवनशैलीत काही बदल केले जाऊ शकतात. थ्रोम्बोसिसमुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि प्लेटलेट्स कमी होण्याचा धोका वाढतो.

‘कोविशिल्ड’बद्दल ज्या प्रकारचे दावे केले जात आहेत ते आधीच माहिती होते, तथापि, फायद्यांच्या तुलनेत, नुकसानाची टक्केवारी खूपच कमी होती. किंबहुना, ती नगण्य मानली गेली होती. त्यामुळेच ही लस देणे सुरू ठेवण्यात आले. सीरम इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार, लस घेतल्यानंतर तुम्हाला मूर्च्छा येण्याची किंवा चक्कर येण्याची समस्या होऊ शकते. याशिवाय हृदयाचे ठोके बदलणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वास घेताना शिट्टीचा आवाज येणे अशी समस्या असू शकते. ओठ, चेहरा किंवा घसा सुजण्याची समस्या देखील दिसू शकते. कंपनीचे म्हणणे आहे की, लसीकरणानंतर एकाच वेळी एकापेक्षा जास्त दुष्परिणामही दिसू शकतात. यामध्ये स्नायू किंवा सांधे दुखणे, डोकेदुखी यांचा समावेश होतो. या स्थितीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे कंपनीने सांगितले आहे. अर्थात या समस्या १० पैकी एकाला होऊ शकतात, असेही कंपनीचे म्हणणे आहे. त्याचबरोबर कंपनीने असेही म्हटले आहे की, इंजेक्शनच्या ठिकाणी सूज किंवा लालसरपणा येणे; ताप, उलट्या किंवा जुलाब, हात आणि पाय दुखणे किंवा खूप ताप येणे, घसा खवखवणे, नाक वाहणे, खोकला किंवा थरथरणे देखील येऊ शकतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास कोणत्याही प्रकारची लस घेतल्यानंतर घाबरून जाण्याचे कारण नाही. ही सगळी लक्षणे तात्पुरती असतात. कोणतेही उपचार न घेता काही दिवसांमध्ये ती कमी होतात. अर्थातच लक्षणांची तीव्रता अधिक असेल आणि ती बराच काळपर्यंत जाणवत असतील तर मात्र संबंधितांनी डॉक्टरांची मदत घ्यायलाच हवी.

याच सीरम इन्स्टिट्यूट म्हणजेच भारतातील कोविशिल्ड लस बनवणाऱ्या कंपनीने ऑगस्ट २०२१ मध्येच ही माहिती दिली असल्याचेही स्पष्ट केले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम एक लाखांपैकी एकापेक्षा कमी व्यक्तींमध्ये आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता कोणतीही लस घेतलेली असेल तरीही लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सध्या चर्चेत असणारे ‘कोविशिल्ड’चे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेे होते. याचिकाकर्त्याने ही मागणी केली होती. त्यावर वरील सगळा आणि सविस्तर खुलासा केल्यानंतर आमची सहानुभूती लसीचे दुष्परिणाम जाणवलेल्या लोकांबरोबर असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. खेरीज तुम्हाला पहिला डोस मिळतो तेव्हा धोका सर्वाधिक असतो, असेही कंपनीने स्पष्टीकरण देताना सांगितले आहे. दुसऱ्या डोससह तो कमी होताे आणि तिसऱ्या डोससह सर्वात कमी होतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काही शास्त्रज्ञांनी असेही म्हटले आहे की, लस घेतल्यानंतर सुरुवातीच्या दोन ते तीन महिन्यांत कोणतेही दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. मात्र या धोक्यांना घाबरून वा लक्षणांकडे अतिप्रमाणात लक्ष देऊन लसीकरण थांबवण्याचा वा कमी करण्याचा उपाय योग्य ठरत नाही. सततच्या अभ्यास आणि संशोधनातून धोक्यांची वा लक्षणांची संख्या कमी होत असते.

ज्याने आपल्या प्रियजनांना गमावले आहे किंवा आरोग्य समस्यांची तक्रार केली आहे अशा प्रत्येकासाठी आमची सहानुभूती आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि लसींसह सर्व औषधांचा सुरक्षित वापर सुनिश्चित करण्यासाठी नियामक प्राधिकरणांकडे स्पष्ट आणि कठोर मानके आहेत, असे एस्ट्राजेनेकाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे. एकीकडे या प्रकरणी असे वाद-प्रतिवाद होत आहेत. मात्र या वादाच्या दरम्यान समाजवादी पक्षाने भाजपने कोविड-१९ लसीच्या निर्मात्याकडून कमिशन घेतले होते, असा आरोप केला. याव्यतिरिक्त, त्यांनी लसीकरण केंद्रावर देशातील लोकांना चुकीची लस दिल्याचाही आरोप केला. दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही कथित दुष्परिणामांचे निराकरण करण्यासाठी केंद्राने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in