अराजक निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न

बदलापूर घटनेच्या निमित्ताने राजकारण करण्याचे प्रयत्न विरोधक करत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अराजक निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव आहे. उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विविध समाजघटकांना भडकवत आहेत. यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात येत आहे.
अराजक निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न
Published on

- केशव उपाध्ये

मत आमचेही

बदलापूर घटनेच्या निमित्ताने राजकारण करण्याचे प्रयत्न विरोधक करत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अराजक निर्माण करण्याचा विरोधकांचा डाव आहे. उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विविध समाजघटकांना भडकवत आहेत. यामुळे राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात येत आहे.

बदलापूर येथे एका चिमुकलीबाबत घडलेल्या घटनेमुळे जनमानस ढवळून निघणे स्वाभाविक आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा विकृत प्रकारांची संख्या का वाढू लागली आहे, हा स्वतंत्र लेखाचा आणि संशोधनाचा विषय आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी बदलापूरमध्ये आंदोलन झाले. सुमारे नऊ तास रेल्वे वाहतूक बंद पाडली गेली. पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळल्यामुळे तेथे अनर्थ घडला नाही. या आंदोलनात सहभागी झालेली मंडळी कोण होती आणि त्यांचे उद्देश काय होते, या विषयी वेगवेगळी माहिती प्रसिद्ध होत आहे. अशा घटनांचे निमित्त करून हिंसक घटना घडवून आणण्याचा काही शक्तींचा प्रयत्न असल्याचे असंख्य पुरावे गेल्या दहा वर्षांत मिळाले आहेत.

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. न्यायालयाच्या दट्ट्यामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांना मनात इच्छा नसताना बंदचे आवाहन मागे घ्यावे लागले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात अशांतता निर्माण करून राजकीय स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याचा अधम प्रयत्न सध्या सुरू आहे. गेल्या काही महिन्यांतील घटनांचा बारकाईने मागोवा घेतला तर उबाठा, काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून अराजकता माजवण्याचे प्रयत्न किती पद्धतशीरपणे चालू आहेत, याची असंख्य उदाहरणे मिळतील. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या खोट्या बातम्या पसरवून, सीएएचा बागुलबुआ दाखवून मुस्लीम समाजात भयगंड निर्माण केला गेला. त्याचे राजकीय फायदे महाविकास आघाडीला ३२ जागांच्या रूपाने मिळाले. विधानसभा निवडणुकीत या खोट्या बातम्यांचा वापर पुन्हा करता येणे अशक्य आहे, हे लक्षात आल्याने विविध समाजघटकांना भडकवून राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कुटील पद्धतीने चालू असल्याचे दिसून येत आहे.

बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यात काही ठिकाणी निषेध मोर्चे निघाले. या मोर्चांवर नाशिक आणि जळगाव येथे दगडफेक केली गेली. विविध हिंदू संघटना आणि पोलिसांनी संयम ठेवल्याने या दोन्ही शहरांमध्ये काही वेडेवाकडे घडले नाही. हिंदू संघटनांनी आक्रमक होऊन पुढे यावे आणि त्यातून हिंसाचाराला निमित्त मिळावे, असा साधा सरळ हेतू ठेवून हिंदू संघटनांच्या मोर्चांवर दगडफेक केली गेली. महंत रामगिरी यांनी इस्लाम धर्माविषयी काढलेल्या उद‍्गारांमुळे त्यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रारी दाखल केल्या गेल्या. त्या मागचा हेतू राज्यातील धार्मिक सलोखा संपुष्टात यावा, असाच होता. मराठा आरक्षणाच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी महायुती सरकारने अलीकडेच सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार यांनी या बैठकीला उपस्थित राहणे टाळले. या विषयावरून उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नेते महायुती सरकारविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचा कसा प्रयत्न करीत आहेत, हे गेल्या वर्ष-दीड वर्षात महाराष्ट्राने पाहिले आहे. या विषयावरून महायुती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने आगपाखड करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आजवर उबाठा आणि शरद पवारांविरोधात चकार शब्दही उच्चारलेला नाही. मराठा समाजाला अन्य मागासवर्गीय समाजाच्या हक्काच्या आरक्षणातून वाटा देण्याऐवजी स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सातत्याने मांडली आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यास तुमची मान्यता आहे का, असा प्रश्‍न अनेकवेळा विचारूनही शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी या प्रश्‍नाचे उत्तर देणे टाळले आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याऐवजी ओबीसींच्या कोट्यातूनच द्या, अशी मागणी करण्याची सूचना आंदोलकांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच दिली असावी, असे मानण्याजोगा भरपूर परिस्थितीजन्य पुरावा उपलब्ध झाला आहे. या मागचा कार्यकारणभाव मराठा आणि ओबीसी समाजाला समोरासमोर उभे करून राज्याची सामाजिक वीण उसवणे हाच आहे. मराठा आणि ओबीसी परस्परांविरुद्ध आणून राजकीय स्वार्थ साधण्याच्या गणितामुळे राज्यातील सामाजिक सलोखा आपण कायमस्वरूपी संपवून टाकू, याचे भानही उबाठा, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांना राहिलेले नाही.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दोन अग्निवीरांच्या मृत्यूबाबत खोटी माहिती पसरवून युवकांमध्ये केंद्र सरकार आणि अग्निवीर योजनेबाबत गैरसमज निर्माण करण्याचे केलेले हेतुपूर्वक प्रयत्न अलीकडच्या काळातीलच आहेत. देशातील वातावरण सतत धगधगत राहिले पाहिजे, त्यातून असंतोष निर्माण व्हावा, त्याचे रूपांतर अशांततेत व्हावे, असा एक कलमी कार्यक्रम घेऊन उबाठा, काँग्रेस आणि शरद पवार गट सध्या कार्यरत असल्याचे ठिकठिकाणी दिसते. विरोधकांचा सत्ताधारी पक्षाला विरोध असणे अभिप्रेतच आहे. निखळ लोकशाहीच्या तत्त्वांना अनुसरून विरोधकांचा विरोध नेहमीच स्वगातार्ह आहे. मात्र राजकारणापोटी देशातील शांतता, धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्य धोक्यात आणण्याचा खेळ देशाला किती महागात पडू शकतो, याची फिकीर विरोधकांना नसावी, हे दुर्दैवी आहे. सामान्य भारतीय जनता सुज्ञ आहे, ती या प्रयत्नांना थारा देणार नाही, अशी खात्री आहे.

(लेखक भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in