नियोजनबद्ध प्रयत्नाने यश टाळा

आपण काहीच करू शकत नाही, अशा न्यूनगंडाने पछाडली जातात आणि उरलेलं सगळं आयुष्य नैराश्यात घालवतात.
नियोजनबद्ध प्रयत्नाने यश टाळा

आयुष्यात कोणतं ध्येय गाठायचं आहे ते ठरविणे आणि ध्येय निश्चितीनंतर त्या दिशेने एक-एक पाऊल उचलणे कसे महत्त्वाचे आहे, ते आपण मागील लेखात पाहिले. बऱ्याचदा ध्येय निश्चित करून त्या दिशेने एक एक पाऊल उचलायला सुरुवात तर केली जाते; पण थोड्याच दिवसांत माणसं थकतात किंवा आपलं जुनं ध्येय सोडून नव्या ध्येयाच्या मागे पळत सुटतात. परत काही पावलं चालल्यानंतर कंटाळतात आणि चालणंच सोडून देतात. असं दोन-तीनदा झालं की, माणसं नैराश्याने घेरली जातात. आपण काहीच करू शकत नाही, अशा न्यूनगंडाने पछाडली जातात आणि उरलेलं सगळं आयुष्य नैराश्यात घालवतात. आपल्या शेतात विहीर खणणारा शेतकरी जर दरवेळी दोन-तीन फूट खोदल्यावर जागा बदलून खोदत गेला तर दिवसाकाठी त्याच्या शेतात २०-२५ खड्डे झालेले असतील; पण विहीर नसेल. २५ ठिकाणी दोन-तीन फुटांचे खड्डे खोदून विहीर तर खोदलीच जात नाही; पण आहे ते शेतही खराब होतं. नेहमी नेहमी ध्येय बदलणारा माणूस हा या शेतकऱ्यासारखाच असतो. त्याच्या हाती काही लागत तर नाहीच; पण आयुष्याचे मौल्यवान दिवस मात्र वाया जातात. हे सर्व टाळण्यासाठी, कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास हा नियोजनबद्धच असावा लागतो. समजा, आपल्याला हजार-१२०० किलोमीटर दूर असलेल्या गावी जायचं असेल तर आपण कशी तयारी करतो ? घरून आपण गाडी घेऊन निघालो आणि कुठेही न थांबता, विश्रांती न घेता त्या हजार-१२०० किलोमीटर दूर असलेल्या गावी पोहोचलो, असं होतं का? एवढ्या लांबच्या प्रवासासाठी निघताना आपण रस्त्यात लागणारी गावं माहीत करून घेतो, किती वेळात कुठल्या गावी पोहोचायचं, कुठे थोडावेळ विश्रांती घ्यायची, कुठे जेवण घ्यायचं, दिवसभरात किती प्रवास करायचा, रात्रीचा मुक्काम कुठे करायचा, प्रवास किती दिवसांत पूर्ण करायचा हे सर्व ठरवूनच निघतो ना? असंच जर आपलं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला कोणत्या मार्गाने जावं लागेल, त्यासाठी किती कालावधी लागू शकतो, मोठं ध्येय गाठताना मध्ये काही छोटी-छोटी ध्येयंही गाठता येण्यासारखी आहेत का, याचा शांतपणे विचार करून ते जर एका डायरीत लिहून काढलं आणि पुढील वाटचालीत त्या डायरीत पाहून आपल्या प्रगतीचा आपणच अंदाज घेत गेलो, तर मध्येच धीर सुटण्याचा, नैराश्य येण्याचा आणि परिणामी सर्व प्रयत्न सोडून, हातपाय गाळून बसण्याचा धोका टळतो. आपल्याच ढिसाळ नियोजनामुळे आपण ध्येयापर्यंत न पोहोचणं जर वारंवार घडत गेलं तर ते, ‘म्हातारी मेल्याचं दुःख नाही; पण काळ सोकावतो.’ सारखं होतं. अपयश आल्याचं दुःख अजिबात करून घेऊ नये; पण अपयशाची सवय नको लागायला. एखाद दुसऱ्या अपयशाचं विशेष काही नाही, प्रत्येक वेळी कोणालाच यश मिळत नसतं, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी महाभारतातलं युद्ध टाळण्यासाठी केलेली ‘कृष्ण शिष्टाई’ तरी कुठे यशस्वी झाली होती? छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक मोहीम तरी कुठे यशस्वी झाली होती, तरी स्वराज स्थापन करण्यात ते यशस्वी झालेच ना? आपल्या एक-दोन मोहिमा फसल्या म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापनेचे प्रयत्नच सोडून दिले असते तर? कोणत्याही शास्त्रज्ञाने लावलेला कोणताही शोध हा काही पहिल्याच प्रयत्नात लागलेला नसतो. त्यासाठी केलेले अनेक प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतरच एक प्रयत्न यशस्वी होतो आणि अपेक्षित असलेला शोध लागतो. त्यामुळे आशावादी राहून प्रयत्न करीत राहावे. ‘एका यात्रेने देव म्हातारे होत नसतात.’ ही ग्रामीण भागातली म्हण लक्षात ठेवावी.

आपल्यासारखचं ध्येय असलेली अनेक माणसं आपल्या अवतीभवती असतात. इतरांच्या प्रगतीकडे लक्ष असू द्यावे, त्यातून आपल्या प्रयत्नांमध्ये काही सुधारणा करता आली तर जरूर करावी; पण निष्कारण कोणाची बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नये. ध्येय गाठणं म्हणजे काही धावण्याची शर्यत नाही. आजूबाजूच्या लोकांपेक्षा जास्त वेगाने धावण्याची गरज नसते. महामार्गावर प्रवास करताना आपल्याजवळ मोटारसायकल असेल तर शेजारून वेगाने पुढे निघून जाणाऱ्या किमती कारशी स्पर्धा करून कसं चालेल? दोघांच्या वेगाची, दोघांनी कापलेल्या अंतराची तुलना करून चालेल का? आपल्या शेजारून वेगाने पुढे जाणारी कार पाहून मोटारसायकलस्वाराने तिच्याशी स्पर्धा करण्यासाठी आपला वेग वाढवणे म्हणजे अपघात ओढवून घेणे. असे करणे जसे आत्मघात ओढवून घेणारे, तसेच तिच्या वेगाशी आपल्या वेगाची तुलना करून पुढे जाणेच सोडून देणेही आत्मघात ओढवून घेणारेच ठरते. दुसऱ्याशी तुलना करण्यापेक्षा आपल्या गतीने प्रवास सुरू ठेवणेच कधीही योग्य ठरते. जो गतीत राहतो त्याची प्रगती होते हे लक्षात ठेवावे. महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला अनेक ठिकाणी ‘अति घाई संकटात नेई’ असा सावधानतेचा इशारा देणारा फलक दिसतो. हा फलक महामार्गावरच्या प्रवासाइतकाच जीवनाच्या प्रवासातही डोळ्यांसमोर ठेवणे श्रेयस्कर ठरते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in