धमाल पावसाळी कॅम्पिंग

पावसाळा म्हटले की डोळ्यांसमोर येते ते निसर्गाचे देखणे रूप. हे रूप पाहून मन अगदी प्रसन्न होते.
धमाल पावसाळी कॅम्पिंग
Freepik

-सायली शिगवण

प्रासंगिक

पावसाळा म्हटले की डोळ्यांसमोर येते ते निसर्गाचे देखणे रूप. हे रूप पाहून मन अगदी प्रसन्न होते. निसर्गावर हिरवी चादर पसरवणारा आणि वातावरणामध्ये शीतलता घेऊन येणारा पावसाळा सगळ्यांनाच आवडतो. या दिवसांमध्ये कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस पडतो. कधी तरी मध्येच ऊनही हजेरी लावून जाते. अशातच बऱ्यापैकी पाऊस पडून गेला की सगळ्यांना फिरायला जाण्याची ओढ लागते. ट्रेकर मंडळी, पर्यटकांची पावले डोंगरदऱ्या, किल्ले, जंगल अशा ठिकाणांकडे आपसुकच वळू लागतात.

हल्लीची तरुणाई ट्रेकिंग, कॅम्पिंगमध्ये अजिबात मागे नाही. नवनवीन गोष्टी करण्यासाठी त्यांना बाहेरचे जग खुणावत असते. बाहेर भटकून ‌‘ॲडव्हेंचर्स’ गोष्टी करण्यामध्येच जीवनाचे सार्थक आहे, असे त्यांना वाटायला लागते. त्यात काही चुकीचे आहे, असेही नाही. कारण, दुनियेची चिंता न करता मनसोक्त जगायला कोणाला आवडत नाही? मनावर कसलेही दडपण न घेता फिरणे या पिढीकडून शिकण्यासारखे आहे. कुठलीही गोष्ट धडाडीने पूर्णत्वास नेण्याची वृत्ती आणि आव्हान पेलण्याचा लागलेला छंद असे त्यांच्यातले सकारात्मक बदल पाहणाऱ्याला थक्क करतात. हे सकारात्मक बदल आत्मसात करत असतानाच साहसी गोष्टींचा अनुभव घेण्याची मजा खूप काही शिकवून जाते.

या धुंद पावसाळ्यात ट्रेकिंगबरोबरच कॅम्पिंग करणाऱ्या मंडळींचीही पावले निसर्गाकडे वळतात. कॅम्पिंग म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात तंबू ठोकून राहणे. कामाच्या धबडग्यातून थोडा वेळ का होईना, मोकळा श्वास घेण्यासाठी या सहलींचे आयोजन केलेले असते. नव्या वाटा धुंडाळत कॅम्पिंग करण्यामध्ये ही पिढी मागे नाही. त्यांचे डोळे इतरांना अनभिज्ञ असणाऱ्या जागा शोधण्यात मग्न असतात. सध्या सोशल मीडियामुळे अशा जागा शोधण्याचे कष्ट वाचत असले तरी आपण नव्याने शोधलेल्या जागेबद्दल, तिथल्या वातावरणाबद्दल अधिक जाणून घेण्यामध्ये एक विलक्षण समाधान असते. त्यामुळे कॅम्पिंगसाठी ‌‘अनएक्सप्लोअर्ड‌’ जागेची नव्याने ओळख करून घेत असतानाच तिथल्या वातावरणाचा, उपलब्ध सुविधांचा विचार केला जातो. तसेच ऐनवेळी येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची तयारीही करावी लागते. कुटुंबातील सदस्यांनी सांगितलेले काम जीवावर येऊन करणारी ही मंडळी कॅम्पिंगच्या तयारीसाठी अगदी पहिल्या दिवसापासून उत्साही असतात. मग जागा ठरवणे असो की लागणाऱ्या सामानाची तडजोड करणे असो! ही तयारी बघण्यासारखी असते. कॅम्पिंगसाठी लागणाऱ्या वस्तूंची जुळवाजुळव करण्यातच खरी मजा येते. कधी कधी यासाठी काही ‌‘जुगाड‌’ही कामी येतात.

पूर्वी कॅम्पिंगची व्याख्या काहीशी वेगळी होती. कधी तरी गावकुसाबाहेर मित्र-मैत्रिणींच्या घरी सूर्य उगवेपर्यंत गप्पा मारत बसणे म्हणजे कॅम्पिंग असायचे. रात्रीच्या वेळी अंधारात भुतांच्या थरारक गोष्टी ऐकत बसणे म्हणजे कॅम्पिंग असायचे. रात्रीच्या आकाशात निळसर रंगाचे तारे न्याहाळत बसणे म्हणजे कॅम्पिंग असायचे. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. पण, जुन्या पिढीने अनुभवलेले हे क्षण आता नवी पिढी अनुभवत नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. आजच्या तरुण पिढीची कॅम्पिंगची व्याख्या पूर्वीपेक्षा फार काही वेगळी नाही, असे दिसते. आपल्या मित्रपरिवाराबरोबर सहलीला जाणे, एकमेकांबरोबर ‌‘क्वालिटी टाइम‌’ घालवणे, रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसणे, त्या निमित्ताने मनातल्या भावनांना वाट करून देणे हे क्षण आजच्या पिढीसाठीही खूप महत्त्वपूर्ण असतात. कॅम्पिंगसाठी नियोजित जागेची आवश्यक माहिती घेऊन नियोजन केले जाते. त्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची बांधाबांध केली जाते. आता पर्यटनाच्या बहुतांश ठिकाणी राहण्याच्या सोयी आहेत. त्यामुळे कुठे रहायचे हा प्रश्न सहसा पडत नाही. जवळपास सर्वच ठिकाणी टेंट्सची सुविधा आहे. तिथे कॅम्पिंग करण्यामध्ये या पिढीला ‌‘थ्रील‌’ वाटते. काही ठिकाणी नदीच्या किनारी कॅम्पिंग टेंट्स लावले जातात. काही वेळा डोंगरांमध्ये, एखाद्या पठारावर तसेच जंगलामध्येही कॅम्पिंग केले जाते. एकीकडे निसर्गाचे सौंदर्य ओसंडून वाहत असते. दिवस पावसाचे असल्याने आल्हाददायक धुकेही अनुभवायला मिळते. कॅम्पिंगसाठी निश्चित केलेल्या ठिकाणांची वैशिष्ट्ये एकदा तरी अनुभवावीत अशी असतात. कारण प्रत्येक जागा आधीपेक्षा काहीतरी नवीन तुमच्या समोर मांडत असते. त्यामुळे ते ठिकाण शक्य तितके जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करायला हवा.

सुट्टीच्या दिवशी सकाळी लवकर निघून गप्पागोष्टी करत नियोजित स्थळी पोहोचायचे, पोहोचल्यावर आजूबाजूला फेरफटका मारायचा हे ठरलेले असते. जागा ठरवलेली असेल तर टेंट बांधणे, सर्व सामान ठरावीक ठिकाणी लावून घेणे अशी कामे होतात. काही ग्रुप तिथेच जेवण बनवायच्या तयारीनिशी आलेले असतात. त्यामुळे जेवण बनवण्याची सर्व सामग्री सोबत असते. कॅम्पिंग म्हटले की रात्रभर जागणे आलेच. त्यामुळे मध्येच भूक लागली तर मॅगी, पास्ता, ग्रिल केलेले पदार्थ तिथेच तयार करून खाल्ले जातात. या पावसाळी रात्रीच्या उबदार वातावरणात ‌‘थोडी थोडी हो जाये‌’ असे म्हणायलाही ही पिढी कचरत नाही. कॅम्पच्या ठिकाणी पाऊस नसेल तर छोटी शेकोटी पेटवली जाते. उत्साही मंडळी आपल्यातल्या कलागुणांचे सादरीकरण करतात. काहींचा आवाज चांगला असतो, काहीजण एखादे वाद्य चांगले वाजवतात. मग त्याचे प्रात्यक्षिक सादर होते. त्यातून सोशल मीडियावर स्टोरीज पोस्ट केल्या नाही तर सर्वच अपूर्ण! त्यासाठी सर्व आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या जातात. ल्युडो, पत्ते, अंताक्षरी अशा खेळांचे अगणित डाव होतात. कॅम्पिंगच्या निमित्ताने का होईना, जवळच्या व्यक्तींबरोबर मनातल्या भावनाही व्यक्त केल्या जातात. कोणाला प्रेम व्यक्त करायचे असते, तर कोणाला खूप काळ मनात साठून राहिलेले दु:ख मांडायचे असते. काहीजण एखाद्या मित्रावरचा किंवा मैत्रिणीवरचा राग दूर करण्याची संधी सोडत नाहीत.

पावसाळ्यात अशा ठिकाणी जाण्यामागे बहरलेल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे, हा मुख्य उद्देश असतोच, पण कॅम्पिंगचा जगन्मान्य उद्देश बाजूला सारून वेगळे काय अनुभवता येईल, याकडे तरुण पिढीचे लक्ष असते. काही वेळा कॅम्पिंगसाठी रात्रीच्या ट्रेकिंगचेही नियोजन केलेले असते. हे करताना रात्रीच्या वेळी डोंगर-दऱ्यांमध्ये जाण्यामध्ये एक वेगळाच थरार अनुभवायला मिळतो. पण हे थरार अनुभवताना सुरक्षेचीही काळजी घ्यायला हवी. पावसाळ्यामध्ये काही ठिकाणे धोकादायक बनतात. तिथे कॅम्पिंग करणे जिकिरीचे ठरू शकते. पण तिथल्या वातावरणाची पूर्ण माहिती असेल आणि आवश्यक ती खबरदारी घेतली असेल तर तो धोका टाळता येतो. ही सगळी मौजमजा करत असतानाच त्या ठिकाणचे निसर्गसौंदर्य शक्य तितके अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजची पिढी वर वर उथळ वाटत असली तरी वेळ पडेल तेव्हा निसर्गाची, आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची जबाबदारी घेण्यात मागे रहात नाही, तर दुसरीकडे ही पिढी वाया गेलेली आहे, कुठलीही गोष्ट धांगडधिंगा घालूनच साजरी करते, शिस्तीचे भान नाही, असे म्हटले जाते. त्याची काही उदाहरणे आपण आपल्या डोळ्यांसमोर रोज पहात आहोतच. त्यामुळे समाजात वावरताना समंजसपणाने वागणे फायदेशीर ठरू शकते. बऱ्याचदा कॅम्पिंगच्या ठिकाणी मद्यपान करून बाटल्यांचा खच पडल्याच्या बातम्या आपण ऐकतो. त्यामुळे मजामस्ती करतानाच निसर्गाला, आजूबाजूच्या परिसराला, समाजाला हानी पोहोचणार नाही, हेही ध्यानात ठेवायला हवे. थोडी दक्षता बाळगली तर पावसाळ्यातल्या कॅम्पिंगचा अनुभव घेणे ही एक पर्वणीच असते, असे म्हणायला हरकत नाही.

logo
marathi.freepressjournal.in