ये जो पब्लिक है ये सब जानती है!

अयोध्येत दान चोरी झाली. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सरकार पक्षाला विरोधक दानचोर ठरवू लागले आहेत. हे आश्चर्य नव्हे, तर द्वेषाचे राजकारण आहे.
ये जो पब्लिक है ये सब जानती है!
ये जो पब्लिक है ये सब जानती है!(संग्रहित छायाचित्र)
Published on

सह्याद्रीचे वारे

अरविंद भानुशाली

अयोध्येत दान चोरी झाली. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सरकार पक्षाला विरोधक दानचोर ठरवू लागले आहेत. हे आश्चर्य नव्हे, तर द्वेषाचे राजकारण आहे.

ज्यांनी हिंदुत्व सोडले ते आता रामरक्षा बोलण्यास निघाले आहेत. यापूर्वी हनुमान चालीसा यावर मातोश्रीचे वातावरण बदलले होते. नवनीत राणा यांना काही दिवस जेलमध्येही टाकले होते. अयोध्येत भव्य असे राम मंदिर उभे राहावे ही कल्पना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. बाबरी ढाचा पाडल्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्याचा साक्षीदार उभा भारतवर्ष होता. मुलायमसिंग सरकारने कार सेवकांवर केलेला गोळीबार, शेकडो राम भक्तांना आपल्या आहुत्या त्यासाठी द्याव्या लागल्या होत्या. त्या एका मोठ्या भावनेने प्रभू रामचंद्रांची कृपा झाल्याने ७० वर्षांच्या रामजन्मभूमीचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात निकालात निघाला. निकाल मिळताच तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचा भूमिपूजन सोहळा केला. साधारणपणे ३ ते ४ वर्षात भव्य असे प्रभू रामचंद्रांचे मंदिर अयोध्येत उभे राहिले. त्यासाठी असंख्य उद्योगपती व दानशूर व्यक्तींनी करोडो रूपये दान दिले व भव्य असे राम मंदिर उभे राहिले. विशेष म्हणजे या मंदिराचे स्वप्न पुरे झाले म्हणून लाखो लोकांनी या उदघाटन सोहळ्यास हजेरी लावली. मात्र आज राम रक्षा बोलणारे शिवसेनाप्रमुखांचे चिरंजीव व उबाठाचे नेते उद्धव ठाकरे हे मात्र त्या सोहळ्यास गेले नाहीत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची उणीव त्यावेळी भासली. आता ज्यांनी हिंदुत्व सोडले ते रामरक्षा बोलण्यास निघाले आहेत. 'ये पब्लिक है ये सब जानती है !’ दान चोरीचा मुद्दा घेऊन ते आता आंदोलनात उतरले आहेत. या दानचोरी संदर्भात तपास यंत्रणा काम करीत आहेत. संबंधित ट्रस्टचे काही अधिकारी जेलमध्ये गेले आहेत. चोरीस गेलेली कोट्यवधींची रक्कम हाती लागली आहे. आता सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात बंद पाकिटातून रिपोर्ट आज सादर करण्यात येत आहे; परंतु द्वेषाचे राजकारण करणाऱ्या विरोधकांचे समाधान होत नाही.

अयोध्येत प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला होता की नाही याबाबत त्याकाळचे काँग्रेस पक्षाचे सरकार संशय व्यक्त करीत होते. अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी ७० वर्षे हिंदू समाज डोळ्यात अश्रू आणून वाट पाहत होता. त्यांचे स्वप्न मोदी सरकारने पूर्ण केले. या भव्य मंदिराची वास्तू उभारण्यासाठी आलेले दान ठेवण्यासाठी एक स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. एक मोठा ट्रस्ट त्यासाठी नियुक्त करण्यात आला होता. त्यामध्ये केंद्र व राज्य सरकारचा कुठलाही हेतू नव्हता हे तपासात निष्पन्न झाले आहे. हे विरोधकांना मंजूर नाही. दान चोरी झाली आहे म्हणजे यामध्ये मोदी व योगी आदित्यनाथ यांचा संबध जोडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे.

महाराष्ट्रात शिर्डी, पंढरपूर, तुळजापूर अनेक देवस्थानांसाठी देवस्थान ट्रस्ट उभे आहेत. सार्वजनिक न्याय संस्था यासाठी काम करीत आहे. नुकताच तुळजापूर देवस्थानामध्ये दानचोरीचा प्रकार पुढे आला म्हणून सत्ताधाऱ्यांनी अथवा विरोधकांनी सरकारला जबाबदार धरले नाही. सार्वजनिक न्याय संस्था या ट्रस्टवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत आहेत. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये सार्वजनिक न्याय संस्था कार्यरत आहे. त्यातून अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचे ट्रस्ट बनले आहे. या ट्रस्टला अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव व इतर पदाधिकारी न्यायसंस्थेने नेमले आहेत. त्यामधून ही दान चोरी झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारच्या ही बाब लक्षात येताच त्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागल्या. ८ ते १५ दिवसात ही दानचोरी करणाऱ्यापैकी काही जणांकडून रोकडही हस्तगत करण्यात आली. त्यापैकी काहीजण जेलमध्ये आहेत. हे सर्व काही होत असताना आजपासून सुरु झालेल्या संसदीय अधिवेशनात मोदी व आदित्यनाथ यांना टार्गेट केले जाईल यात शंका नाही. ही दान चोरी झाली आहे याचे कोणी समर्थन करणार नाही.

महाराष्ट्रात २०१९ मध्ये राज्यातील जनतेने भाजप व शिवसेनेला प्रचंड बहूमत दिले होते. मात्र असे असतांना अखंड असलेल्या शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर हात मिळवणी केली आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी झालेला करार आजही दृष्टीपथात आहे. 'सर्व धर्म समभाव' असे सांगून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली होती. आता तेच उद्धव ठाकरे हे प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन राजकारण करीत आहेत. मुंबईत झालेल्या या रामरक्षा आंदोलनात जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करण्यात आली. आता दुसरी रामरक्षा शनिवारी नागपूरमध्ये झाली. हे आभासी हिंदुत्व आहे की कसे हे लवकरच कळेल. मात्र यामधून उबाठा शिवसेना आपले हिंदुत्व परत आणण्याचा मागील दरवाजाने प्रयत्न करीत आहेत असे दिसते. मग असे आंदोलन मुंबईतील प्रभादेवीतील गणेश मंदिरात झालेल्या दान चोरीवर चकार शब्द का काढत नाहीत ? ट्रस्टचे मंदिर व्यवस्थापनाचे काम करीत असते, त्यावर कोणी टीका-टिपण्णी करीत नाही.

उत्तर प्रदेशमध्ये अशी काही ठिकाणे आहेत की, ती हिंदुत्वाला नख लावण्यासाठी आहेत. मग ते मथुरा असो वृंदावन असो की अन्य कोणतीही मंदिरे असोत तेथे तर उघडा बाजाराच चालतो. मथुरेत तर श्रीकृष्णाचा जन्म हा कोठडीतच झाला होता असे सांगणारे महाभाग आढळून आले आहेत. बाहेर पथारी टाकून भगवान श्रीकृष्णांचा फोटो लावून उघडपणे दान घेत आहेत.

देशात सोरटी सोमनाथ, काशी विश्वेश्वर, बद्रीनाथ, केदारनाथ, मानस-सरोवर, अमरनाथ अशी अनेक मोठी देवस्थाने आहेत. बद्रीनाथ केदारनाथ बाबत आता काही आरोप केले जात आहेत. परंतु याचा अर्थ तेथे होणाऱ्या या भ्रष्टाचारास सरकारचा पाठिंबा आहे असे म्हणता येणार नाही. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर हिंदूंचे ही एक ज्वलंत भावना होती. अशाच भावना महाराष्ट्रातील या देवस्थांनबद्दल आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी हजारो वारकरी, महिला व लहान मुले ही या दिंड्यामध्ये सामील असतात. मजल दर मजल करीत या दिंड्या श्री क्षेत्र पंढरपूरकडे जात आहेत. त्यांना एकाच ध्यास असतो तो म्हणजे पांडुरंगाचा. या दिंड्यांमधून रात्रंदिवस प्रवास करणाऱ्या वारकऱ्याला केवळ विठुरायाचे दर्शन व्हावे एवढाच ध्यास असतो. अशाच भावना देशातील श्रीराम भक्तांना अयोध्येत जाण्यासाठी असतात. प्रभू रामचंद्रांच्या ७० वर्षाच्या वनवासाची हे राम मंदिर पाहिल्यानंतर जाणीव होते. भव्य अशी वास्तू उभी राहिली आहे याचे १०१ टक्के श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी

यांच्याकडे जाते हे नाकारता येणार नाही. मात्र हे श्रेय देण्याऐवजी विरोधकांमार्फत दानचोरीचा कांगावा केला जात आहे. मात्र, या प्रचाराला जनता फसणार नाही. दान चोरीचे कुणीही समर्थन करणार नाही; परंतु त्याचा संबंध ज्या पंतप्रधानांनी गेली ७० वर्षाची सर्व राम भक्तांना लागलेली मंदिराची आस पूर्ण करून प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर साकार केले, त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे म्हणजे हिंदुत्वाला कमी लेखण्यासारखेच नव्हे का?

logo
marathi.freepressjournal.in