आयुष्मान भारत : आरोग्यसेवेतील मैलाचा दगड

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा सहावा वर्धापन दिन, हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेली 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (एबी -पीएमजेएवाय) जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्यसेवा उपक्रमांपैकी एक ठरली आहे.
आयुष्मान भारत : आरोग्यसेवेतील मैलाचा दगड
Published on

नोंद

- जगत प्रकाश नड्डा

आज आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा सहावा वर्धापन दिन, हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सप्टेंबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आलेली 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' (एबी -पीएमजेएवाय) जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्यसेवा उपक्रमांपैकी एक ठरली आहे.केंद्र सरकारद्वारे या योजनेत द्वितीय आणि तृतीय स्तरावरील रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्यासाठी ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण देण्यात आले आहे. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना सूचीबद्ध रुग्णालयात वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो.

सर्व नागरिकांना विशेषतः सर्वाधिक दुर्बल घटकातल्या नागरिकांना समन्यायी आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठीची सरकारची वचनबद्धता आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून प्रतिबिंबित होते. गेल्या सहा वर्षांत या महत्त्वाकांक्षी योजनेने लाखो लोकांना आशा, दिलासा देत, अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारे उपचार देत, त्यांच्या जीवनाला स्पर्श केला. आपल्या लोकांचे कल्याण आणि आरोग्यसेवांचे सामायिक उद्दिष्ट घेऊन एक राष्ट्र एकत्र आल्यावर काय साध्य केले जाऊ शकते, याचा पुरावा एबी-पीएमजेएवायचा प्रवास आहे. 

आयुष्मान भारतचे मुख्य ध्येय साधेसोपे पण क्रांतिकारी आहे. कुठलाही भारतीयाला त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे आरोग्यसेवा नाकारली जाऊ नये. द्वितीयक आणि तृतीयक आरोग्य देखभाल रुग्णालयात उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी प्रति कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक सुरक्षा कवचासह एबी -पीएमजेएवायने आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबांना देशातील काही सर्वोत्तम रुग्णालयांमध्ये गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मोफत मिळण्याचे साधन उपलब्ध करून दिले आहे.

एबी -पीएमजेएवायचा लाभ ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या, कुठलीही सामाजिक-आर्थिक स्थिती असलेल्या, सर्व ज्येष्ठ नागरिकांना विस्तारित करण्याचा भारत सरकारचा अलीकडील निर्णय हा आपल्या देशातील बदलती लोकसंख्याशास्त्रीय परिस्थिती विचारात घेऊन उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्यापूर्वी आपल्या सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांची कुटुंबे- मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या (आशा), अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेच्या कवचाखाली आणण्यात आले होते. आजमितीस या योजनेंतर्गत ५५ कोटींहून अधिक लोक आरोग्य सेवांसाठी पात्र आहेत आणि ७.५ कोटींहून अधिक उपचारांसाठी एक लाख कोटी रुपयांची मदत यशस्वीरित्या पुरवण्यात आली, ही एक उल्लेखनीय कामगिरी आहे. एकेकाळी प्रचंड आरोग्य खर्चामुळे गरिबीत ढकलल्या जाणाऱ्या कुटुंबांना आता अशा संकटांपासून संरक्षण देणारी आर्थिक ढाल उपलब्ध झाली आहे. प्रचंड आरोग्य खर्चाचा सामना करणाऱ्या कुटुंबांसाठी ही योजना जीवनदायी ठरली आहे. या योजनेने आर्थिक संकटाच्या खाईत लोटण्यापासून कसे वाचवले, हे सांगणारी शेतकऱ्यांपासून रोजंदारी मजुरांपर्यंत अनेक लाभार्थ्यांची प्रशंसापत्रे आहेत. या अर्थाने आयुष्मान भारतने आपले वचन खरोखर पूर्ण केले आहे.

ही योजना व्यापक असून बायपास, सांधे बदलणे यांसारख्या जटिल शस्त्रक्रियांपासून ते कर्करोग आणि मूत्रपिंडाच्या व्याधींवरील उपचारांपर्यंत १९००हून अधिक वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश यात आहे. हे उपचार पूर्वी अनेकांना आवाक्याबाहेरचे वाटायचे, मात्र एबी -पीएमजेएवायने ते सर्वांसाठी सुलभ, किफायतशीर  आणि उपलब्ध केले आहेत.

विस्तार आणि यंत्रणेचे बळकटीकरण 

एबी -पीएमजेएवायचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, आरोग्यसेवा प्रदात्यांचे मजबूत जाळे निर्माण करण्याची क्षमता, हे आहे. आज, १३,००० हून अधिक खासगी रुग्णालयांसह संपूर्ण भारतातील २९,००० हून अधिक रुग्णालये या योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत. हे जाळे ग्रामीण आणि शहरी भागात सारख्याच प्रमाणात विस्तारलेले असून, देशाच्या अतिदुर्गम भागात राहणाऱ्यांनाही दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याची सुनिश्चिती ते करते. या योजनेच्या अद्वितीय अशा पोर्टेबिलिटी वैशिष्ट्यामुळे लाभार्थ्यांना ते ज्या राज्याचे रहिवासी आहेत, त्याव्यतिरिक्त देशात इतरत्र असलेल्या रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणे शक्य होणार आहे. या अत्यंत व्यापक स्वरूपाच्या नेटवर्कला माहिती तंत्रज्ञानविषयक पायाभूत सेवासुविधांची जोड आहे, त्यामुळेच पारदर्शकता, परिणामकारकता आणि दाव्यांच्या तडजोडीची जलद कारवाई सुनिश्चित होते. आधार कार्डवर आधारित बायोमेट्रिक पडताळणी आणि कागदरहित दावे यांच्यामुळे अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर राबवल्या जाणाऱ्या सार्वजनिक हिताच्या योजनांमध्ये बरेचदा होणारे भ्रष्टाचारासारखे अपप्रकार आणि अकार्यक्षमता यांच्यात लक्षणीय घट झाली आहे.

आयुषमान भारत योजनेच्या यशाने आरोग्यसेवा परिसंस्थेतील इतर भागांमध्येही सुधारणा घडवून आणल्या आहेत. गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा हे या योजनेचे गुणवैशिष्ट्य असल्याने सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयांना आपल्या पायाभूत सुविधा आणि सेवा अधिक उत्तम दर्जाच्या करण्यास प्रवृत्त केले आहे. याव्यतिरिक्त या योजनेने निकोप स्पर्धात्मक वातावरणाला चालना दिल्याने रुग्णालयांना अधिक उत्तम रुग्णसेवा प्रदान करण्यासाठी देखील प्रोत्साहित केले आहे.

समग्र आरोग्यसेवेवर लक्ष केंद्रित

आयुषमान भारत ही केवळ रुग्णालयातील सेवेशी निगडित  योजना नाही. एबी -पीएमजेएवाय समवेत केंद्रसरकार 'आयुषमान आरोग्य मंदिरांची स्थापना' करून प्राथमिक आरोग्यविषयक सेवा अधिक बळकट करण्यासाठी कार्य करत आहे. एकंदर लोकसंख्येवर आजारांचा पडणारा भार कमी करण्याच्या उद्देशाने ही योजना प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवांवर लक्ष केंद्रित करेल. आतापर्यंत, भारतभर १.७३लाखांहून अधिक आयुषमान आरोग्य मंदिरांची स्थापना करण्यात आली असून, यामध्ये सामान्य आजारांसह मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यांसारख्या दीर्घकालीन आजारांसंदर्भात रुग्णांची मोफत तपासणी आणि निदान केले जाते आणि औषधे प्रदान केली जातात. ही केंद्र, एक सर्वसमावेशक आणि सर्वांगीण आरोग्यसेवा प्रारूपाची रचना करण्याच्या दिशेने सुरू असलेल्या आपल्या वाटचालीच्या केंद्रस्थानी आहेत. याअंतर्गत निरामयता आणि वेळीच निदान या गोष्टींना प्रोत्साहन देऊन रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता कमी करण्याचा आणि दीर्घकाळात आरोग्यसेवा अधिक शाश्वत करण्याचा ठाम विश्वास आहे.

आव्हानांवर मात करून वेगाने मार्गक्रमण

आयुषमान भारत योजनेची यशोगाथा साजरी करत असताना एकीकडे आपल्यासमोर असलेली आव्हाने देखील आपण स्वीकारली पाहिजेत. या योजनेचा आवाका अतिशय प्रचंड असून, त्यामुळेच सातत्याने त्यात नवीन बदल आणून ती अधिक उत्तम करून त्यात सुधारणा करण्याची जबाबदारी देखील आपसूकच येते. या योजनेची व्याप्ती अधिक वाढवण्याच्या उद्देशाने आम्ही सातत्याने काम करत आहोत, रुग्णालयांना त्यांचे पैसे वेळेवर अदा करत आहोत आणि प्रत्येक लाभार्थ्याला मिळणाऱ्या सेवेची गुणवत्ता वाढवत आहोत. पुढे मार्गक्रमण करताना, आम्ही आयुषमान भारत योजना अधिक बळकट करू आणि एका समग्र, परवडण्याजोग्या आणि गुणवत्तापूर्ण दर्जेदार आरोग्यसेवेकडे सुरू असलेल्या भारताच्या प्रवासात ही योजना कायमच आघाडीवर राहील. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या उपचारांची संख्या आणि पॅनेलमधील रुग्णालयांची संख्या आणखी वाढवण्यासाठी तसेच आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या यशस्वी कामगिरीच्या पलीकडे अधिक यशस्वी वाटचाल करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

निरोगी भारतासाठी दूरदृष्टी

राष्ट्राचे आरोग्य हे त्याच्या समृद्धीचा पाया असतो, असा केंद्रीय आरोग्यमंत्री या नात्याने माझा दृढ विश्वास आहे. देशाची निरोगी जनता ही त्या देशाची वृद्धी, उत्पादकता आणि नाविन्यपूर्ण कल्पना यामध्ये योगदान देण्यासाठी अधिक सक्षम असते. आरोग्यपूर्ण, मजबूत आणि विकसित भारताच्या या दूरदृष्टीमध्ये आयुषमान भारत केंद्रस्थानी आहे. या योजनेला आतापर्यंत मिळालेल्या यशातून कठोर परिश्रम, समर्पण तसेच केंद्र सरकार, आरोग्यसेवा प्रदाते आणि लोकांमधील समन्वय प्रतिबिंबित होतो. आम्ही प्रत्येक नागरिकाचे कल्याण आणि आरोग्यापूर्ण दृष्टीकोनासाठी वचनबद्ध आहोत.

आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त, आपण सर्वसमावेशक, सुलभ आणि सर्वांची काळजी घेणारी अशी 'आरोग्यसेवा' निर्माण करण्याच्या आपल्या समर्पणाची पुष्टी करूया. भावी पिढ्यांसाठी आम्ही एकत्रितपणे निरोगी भारताची निर्मिती करत राहू.

जय हिंद ! (लेखक केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in