
विशेष
ज. वि. पवार
बाबासाहेब हे जगातले असे अनोखे व्यक्तिमत्त्व आहे की ज्यांच्या महापरिनिर्वाण दिनी मेंदूची मशागत करणारे हजारो ग्रंथ विकले जातात. चैत्यभूमीवरील या ग्रंथविक्रीची सुरुवात १९६९ साली राजा ढाले, ज. वि. पवार या लेखक-कार्यकर्त्यांनी केली. आज चैत्यभूमीवर पाच व सहा डिसेंबरला हजारो ग्रंथांची विक्री होते. इथे येणारी गर्दी रिकाम्या हाताने आणि रिकाम्या मेंदूने परत जात नाही. जातव्यवस्थेने ज्या समूहावर ज्ञानबंदी लादली होती तो समूह आज ज्ञानाच्या व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमाचा वारसा त्यांचे अनुयायी जपत आहेत.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरील अनोखे वेगळेपण हा एक चर्चेचा विषय झाला आहे. कणाहीन माणसाला कणखर आणि दणकट कणा देऊन त्यांना गरुडाबरोबर झुंजविणे हे अशक्यप्राय असलेले कृत्य त्यांनी यशस्वी करून दाखविले अन् तेही ते स्वतः अभावग्रस्त असताना.
खरेतर भारतातला प्रत्येक अस्पृश्य हा सर्वदृष्ट्या अभावग्रस्त होता. ही अभावग्रस्तता शिक्षा, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांना व्यापणारी होती. १० मे १९२४ रोजी त्यांनी अस्पृश्यांना ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र दिला. त्यानंतर जो समाज अज्ञानाच्या अंधार गुहेत हजारो वर्षे बंदिस्त झाला होता त्याला शंभर वर्षांत उच्चशिक्षण, सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतीय समाजव्यवस्थेने दडपलेल्या अव्हेरलेल्या समाजाला आणि महिलांना उर्ज्वस्वल केले, सक्षम केले, भयमुक्त केले. त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच सर्वसामान्य माणूस आज माणूस म्हणून जगत आहे. ही अनोखी किमया केवळ संविधानामुळेच झाली.
डॉ. बाबासाहेबांचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्यांनी केलेली मेंदूची मशागत. भारतीय समाज हा परंपरानिष्ठ आणि रूढीग्रस्त होता. त्याने व्यवस्थेचे दास्यत्व स्वीकारले होते. त्याला दास्यमुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी महत्त्व दिले ते ग्रंथांना. भारतातील एक पंचमांशपेक्षा जास्त लोकांना ग्रंथाबाहेर आणि मंदिराबाहेर ठेवण्यात आले होते. बाबासाहेबांनी मंदिर प्रवेशाचा लढा उभारला. नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशासाठी तर सतत पाच वर्षे लढा चालू ठेवला; परंतु तो यशस्वी न झाल्यामुळे ‘वेळ आणि पैसा फुकट गेला’ असे म्हणत तो लढा संपुष्टात आणला. ९०% ते ९५% लोकांनी ग्रंथालयात जावे, यासाठी एखादा लढा उभारणे शक्य नव्हते; परंतु बाबासाहेबांना हे माहीत होते की, परिवर्तन होत असते ते ग्रंथ वाचल्यामुळेच. बाबासाहेब हे पाश्चात्य देशात उच्चविद्याविभूषित झालेले असल्यामुळे त्यांना ग्रंथांचे महत्त्व कळले होते. ‘अप फ्रॉम स्लेव्हरी’सारखे ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यामुळेच ते ‘ग्रंथमित्र’ झाले. त्यांनी ग्रंथांना एवढे महत्त्व दिले की, ग्रंथ ही एक संपत्ती आहे असे त्यांनी मानले. त्यामुळेच १९३२ साली त्यांनी ‘राजगृह’ हे ग्रंथघर बांधले. ग्रंथांसाठी स्वतंत्र घर बांधणारे बाबासाहेब हे जगातील एकमेव गृहस्थ आहेत. ग्रंथ घरासाठी, राजगृहनामक ग्रंथालयासाठी पैसा कमी पडला म्हणून ‘चारमिनार’ नावाची एक राहती इमारत विकली. माणसांच्या राहण्यापेक्षा ग्रंथाच्या राहण्यासाठी मालमत्ता विकणारे जगात दुसरे उदाहरण नाही. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांनी हे ग्रंथ वाचावेत म्हणून त्याला वसतिगृहाचे स्वरूप आणले. आपले राहते घर, त्यातील अमूल्य ग्रंथ हे सगळे विद्यार्थ्यांना हाॅस्टेल म्हणून देणारे बाबासाहेब शिक्षणालाही किती महत्त्व देतात हे समजून येते.
बाबासाहेबांनी ग्रंथाना दिलेले महत्त्व वा त्यांचे पुत्रवत ग्रंथप्रेम हा एक वेगळा आणि अनोखा प्रकार आहे. या प्रकारामुळे आमच्यासारखे तरुण प्रभावित झाले. बाबासाहेबांची ही परंपरा जोपासली जावी म्हणून आम्ही चैत्यभूमीवर ग्रंथविक्री सुरू केली ती १९६९ सालापासून. तिचा इतिहास हा असा आहे.
बाबासाहेबांनंतरच्या तिसऱ्या पिढीचे आम्ही तरुण. दर पाच वर्षांनी एक पिढी बदलते असा बाबासाहेबांचा कयास होता. दुसऱ्या पिढीचे लोक शिक्षित होते; परंतु ते सगळे बहुधा वकिली हा व्यवसाय करीत असत. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत. तिसऱ्या पिढीतले लोक नोकऱ्या करू लागले. १९५० साली संविधानाने नोकरी आणि शिक्षणात आरक्षणाची तरतूद केली. नोकऱ्या प्रामुख्याने शासकीय असल्यामुळे, त्या पायातील शृंखलाही होत होत्या. असे असले तरी बाबासाहेबांनी जो स्वाभिमान शिकविला त्यामुळे ही पिढी ग्रंथांबाहेर राहत नव्हती. व्यवस्थेने त्यांच्या हातातील लेखणी हिसकावली होती. गाते गळे चिरले होते. बाबासाहेबांनी या लेखण्या पुन्हा एकदा प्रस्थापित केल्या. त्यामुळेच १९६० या दशकात ‘दलित साहित्य’ नावाने एक उभारी जन्मास आली. बाबुराव बागूल, डॉ. गंगाधर पानतावणे, यशवंत मनोहर, केशव मेश्राम, राजा ढाले, नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळे, दया पवार, ज. वि. पवार, फ. मु. शिंदे, त्र्यंबक सपकाळे यांच्यासारखे साहित्यिक नवऊर्जेसह लिखाण करीत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अंत्यविधी ७ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईच्या दादर येथील हिंदू स्मशानभूमीत झाला होता. या परिसराला डॉ. आंबेडकर चौपाटी म्हणून ओळखण्यात येऊ लागले. बाबासाहेबांचे एकमेव सुपुत्र आणि भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष मा. भय्यासाहेब आंबेडकर यांनी महू ते मुंबई अशी पदयात्रा काढून जो निधी जमविला त्याच्या आधारे १४ एप्रिल १९६६ रोजी ‘चैत्यभूमी’ या नावे बाबासाहेबांचे स्मारक उभारले. आंबेडकरी जनता या आधी आंबेडकर चौपाटीवर येऊन नतमस्तक होत होती. सुरुवातीला आंबेडकरी जनता ५ व ६ डिसेंबरला चैत्यभूमीवर यायची, ती काही हजारात असायची; परंतु अलीकडे एक डिसेंबर ते सात डिसेंबर म्हणजे एक आठवडा ती येऊ लागली आहे आणि त्यांची संख्या आता लाखोंनी होऊ लागली आहे.
पूर्वी बाबासाहेबांचे अनुयायी लाखोंच्या संख्येने यायचे; परंतु रिकाम्या हाताने व रिकाम्या डोक्याने जायचे. त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे परिशीलन करावे म्हणून आम्ही ग्रंथविक्री सुरू केली. ही ग्रंथविकी कोणत्याही सुविधा नसताना समुद्राच्या काठावर रेतीमध्ये सुरू करण्यात आली. साहित्यही फारसे उपलब्ध नव्हते. माझी ‘बलिदान’ ही कादंबरी रिपब्लिकन पक्षाच्या दुभंगलेपणावर प्रसिद्ध झाली होती. राजा ढाले हे ‘लिटल’ मॅगेझीन चळवळीचे म्होरके असल्यामुळे त्यांचे काही अंक व माझी कादंबरी एवढ्या साहित्यावर आम्ही दोघांनी ‘चैत्यभूमीवर ग्रंथविक्री’ हा प्रकार सुरू केला. सुविधा नसल्यामुळे प्रकाशक आपली ग्रंथसंपदा घेऊन येत नसत; परंतु १९७२मध्ये ‘दलित पँथर’ या चळवळीमुळे ग्रंथवाचकांचीही चळवळ सुरू झाली आणि आज चैत्यभूमीवर अक्षरशः कोट्यवधी रुपयांची ग्रंथ खरेदी होते. बाबासाहेब हे जगातले असे अनोखे व्यक्तिमत्त्व आहे की ज्यांच्या महापरिनिर्वाण दिनी मेंदूची मशागत करणारे हजारो ग्रंथ विकले जातात. हे ग्रंथ बाबासाहेबांनी जसे लिहिलेले असतात तसेच बाबासाहेबांच्या चळवळीवरही लिहिलेले असतात. ६ डिसेंबरला वाचक मिळत असल्यामुळे इथे अनेक ग्रंथ व अंक प्रकाशित केले जातात. बाबासाहेबांचेग्रंथप्रेम त्यांच्या अनुयायांनी जोपासले असल्यामुळे या आंबेडकरी समाजाचे सांस्कृतिक उत्थापन झालेले दिसते.
राजा ढाले, ज. वि. पवार यांनी सुरू केलेली ही चळवळ आज महाराष्ट्रभर फोफावली आहे. बाबासाहेबांच्या पाऊलखुणा जेथे जेथे उमटल्या वा ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी लढे पुकारले त्या त्या ठिकाणी आज ग्रंथविक्री केंद्रे उभी राहत आहेत. नागपूरची दीक्षाभूमी, महाडची क्रांतिभूमी याची मासलेवाईक उदाहरणे आहेत. नागपूर या ठिकाणी धम्मचक्र अनुपवत्तन दिनी कोट्यवधी रुपयांची ग्रंथ खरेदी होते. एवढेच नव्हे, अनेक तालुके, जिल्हे, अगदी पंचक्रोशीतील महत्त्वाची गावे येथे १४ एप्रिल व ६ डिसेंबर रोजी पुस्तकालये उभारली जातात. त्यामुळे बाबासाहेबांनी लिहिलेले आणि बाबासाहेबांवर लिहिले गेलेले साहित्य तसेच इतर पुरोगामी साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. महाराष्ट्र शासनसुद्धा सकारात्मक पावले उचलत आहे. एवढेच नव्हे, खेड्यातील बुद्धविहारात ग्रंथालये स्थापन होऊ लागली आहेत.
आज जगभर जर कोणाचे ग्रंथ वाचले जात असतील तर ते फक्त बाबासाहेबांचेच. ग्रंथावर पुत्रवत प्रेम करणारे बाबासाहेब, त्यांच्या ग्रंथप्रेमाने प्रभावित झालेल्या घरांचे दरवाजे या ग्रंथाच्या माध्यमानेच आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करतात, शोभेच्या वस्तूंनी नव्हे. बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमाला सविनय जय भीम!
(लेखक ज्येष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक असून दलित पँथरचे संस्थापक सदस्य आहेत.)