
ग्राहक मंच
वैशाली अभ्यंकर
नेट बँकिंगने ऑनलाईन पेमेंटची सुविधा दिली आणि अनेक व्यवहार सोयीचे झाले. मोठी रोख रक्कम सोबत बाळगण्याची गरज उरली नाही. तसेच किरकोळ खरेदीच्या वेळी सुट्ट्या पैशांचा प्रश्नही सुटला. दैनंदिन खरेदी-विक्री सोयीची झाली, तसेच बिझिनेसमधले अनेक व्यवहारही सोपे झाले. मात्र इथेच फसवणुकीचे प्रकारही सुरु झाले. म्हणूनच जेवढी जास्त सोय, तेवढे जास्त सतर्क राहणे गरजेचे आहे.
सीमा चहा पिता पिता तिच्या जिवलग मैत्रिणीचा, प्रियाचा विचार करत होती आणि तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. फोन प्रियाचाच होता. सीमा म्हणाली, काय टेलिपथी आहे.
“अगं सीमा, किती दिवसात आपलं बोलणं झालं नाही.” प्रियाने आपली लाडिक तक्रार केली. “अग, नेहमी मीच फोन करते.” तिच्या आवाजात थोडे हिरमुसलेपण होते. पुढे ती म्हणाली, “अग, माझ्या खात्यातून ४० हजार रुपये गेले.”
“कसे काय?” सीमाची रिऍक्शन.
“माझ्या बिझनेस अकाऊंट मध्ये मला ५० हजार पाठवल्याचा मेसेज एका अनोळखी बाईने पाठवला. तो अगदी बँकेसारखा दिसणारा मेसेज होता. त्यामुळे मला वाटलं अकाऊंटमध्ये पैसे आले. त्यावर त्या बाईने लिहिले होते, “पाच हजार पाठवायचे होते. त्याऐवजी चुकून पन्नास हजार पाठवले गेलेत. त्यातले ४५००० मला परत करा हो. एकदम मोठी अमाऊंट आहे.” बिझनेस अकाऊंट जरी प्रियाच्या नावावर होता तरी व्यवहार नवराच पाहत होता. प्रिया अगदीच साधी भोळी. आपल्याला कोणीतरी फोन करून रिक्वेस्ट करत आहे यामुळे ती सुखावली. लगेच तिच्या नंबरवरुन ४० हजार रुपये पाठवून मोकळी झाली. हा एक प्रकारचा ‘हनी ट्रॅप’ होता. हनी ट्रॅप म्हणजे केवळ प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, असे नसते.
परत थोड्या वेळाने त्या बाईचा वेगळ्या नंबरवरून फोन आला “अहो, तुम्ही ४५,००० नाही ४०,००० ट्रान्सफर केलेत.” का कोण जाणे, मग मात्र प्रिया सतर्क झाली. आधी आलेला मेसेज बँकेचा नव्हताच. तिच्या खात्यात काहीही रक्कम जमा झालेली नव्हती. पण ४०,००० रुपये मात्र गेले होते. हे सगळे ऐकून सीमा थोडी काळजीतच पडली. गोड बोलून कशीही फसवणूक चालते.
तिला काही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग आठवला. सीमाची २२ वर्षाची लेक रुची अचानक पॅनिक होऊन हॉलमध्ये आली आणि म्हणाली, “आई, आय ऑलमोस्ट गॉट स्कॅम्ड.” सीमाने दचकून विचारले, “अग, काय झालं?” रुचीने तिला सांगितलेला किस्सा असा -
रुचीला एका नंबरवरून फोन आला. “तुझ्या बाबांनी मला काही पैसे दिले होते. ते मला परत करायचे होते. त्यांनी तुझा अकाउंट नंबर दिला आहे. तुझ्या बाबांनी मला पाच हजार रुपये दिले होते, पण चुकून माझ्या हातून पंधरा हजार ट्रान्सफर झालेत. तर ते जास्तीचे दहा हजार मला या नंबरवर परत पाठव.” मात्र या बोलण्यावर लगेच विश्वास न ठेवता रुचीने खालील गोष्टी केल्या फोनचा चॅट बॉक्स उघडला. त्यात बँकेसारखा रक्कम खात्यात जमा झाल्याचा एक मेसेज होता.खात्री करून घेण्यासाठी तिने बँकेचे ॲप उघडले.त्यात असे कोणतेही ट्रान्जॅक्शन दिसले नाही. म्हणून तिने त्या माणसाकडे QR कोड मागितला आणि यूपीआय आयडी पण मागितला.
त्यानंतर तिला एका दुसऱ्याच नंबरवरून फोन आला. “तुम्ही अजून माझे पैसे ट्रान्सफर केले नाहीत. माझ्याकडे अजिबात पैसे नाहीएत. ते दहा हजार फार महत्त्वाचे आहेत माझ्यासाठी. मी तुम्हाला डिटेल्स पण शेअर केले आहेत.” समोरची व्यक्ती कमालीची अजीजी दाखवत होती. हा नंबर वेगळा होता. दोन वेगवेगळ्या नंबरवरून कम्युनिकेशन झालेले होते हे तिच्या लक्षात आले. तिने सतर्क होऊन लगेच सायबर क्राईममध्ये तक्रार केली. ही आजकालची पिढी किती हुशार आहे. झालेला प्रकार घरच्यांना सुद्धा सांगितला. हे सर्व ऐकून सीमाला तिचे खूपच कौतुक वाटले.
आता सीमाच्या दोन जवळच्या व्यक्तींसोबत घडलेलेल्या या घटना. सीमाची मैत्रीण चाळीशीची आणि मुलगी २२ वर्षांची. अजूनही ज्येष्ठांची पिढी तेवढी सतर्क नाही, जेवढी ही तरुण पिढी आहे. आजच्या या घडीला कोणालाही पैसे देताना दहा वेळा विचार करूनच ते द्या. त्यासाठी खालील खबरदारी जरूर घ्या -
आपला QR कोड किंवा बँक तपशील अथवा CVV नंबर अनोळखी व्यक्तींना देऊ नका.
QR कोडचा वापर शक्यतो पैसे घेण्यासाठी करा.
कोणत्याही अनोळखी नंबरवर जास्त वेळ संभाषण करू नका.
कोणताही पैशांच्या संदर्भात आलेला एसएमएस खोटा आहे की खरा आहे, ते तपासून बघा.
आधी बँकेच्या अकाउंटमध्ये जमा झालेली रक्कम तपासून बघा.
कोणालाही पैसे देण्याची घाई करू नका.
नवीन नंबरवर पैसे पाठवताना आधी एकच रुपया पाठवून बघा.
अनोळखी व्यक्तींना एका दमात मोठी रक्कम ट्रान्सफर करूच नका.
भीम ॲपमध्ये एक ‘UPI lite’ नावाचा ऑप्शन आहे. त्यात मोजके दोन हजार रुपये जमा करून ठेवा आणि ऑनलाईन ट्रान्सफर करताना यातूनच पैसे देण्याची व्यवस्था करा.
ज्या खात्याशी Gpay/ Bhim app जोडलेले आहे त्या खात्यात कमी रक्कम शिल्लक ठेवा. जेणेकरून मोठया रकमेचे व्यवहार त्या खात्यातून होऊ शकणार नाहीत.
कोणतीही शंका आल्यास सायबर क्राईम सेलकडे तक्रार करा. https://cybercrime.gov.in आणि हेल्पलाईन नंबर - १९३०.
अशा अनेक गोष्टींची जागरूकता आज सर्व वयोगटातील लोकांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. प्रत्येकामध्ये एक व्यावहारिक शिस्त यायला हवी आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध नट पंकज तिवारी जाहिरातीत सतत सांगत असतात त्याप्रमाणे स्वतःला बजावून सांगत रहा, “मैं मुरख नही हूँ”. ऑनलाइन पेमेंट ही एक सोय आहे. ती सोय वापरताना काळजी घ्यायलाच हवी. म्हणतात ना, “फ्रीडम कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी”. तसंच “टेक्नॉलॉजी कम्स विथ रिस्पॉन्सिबिलिटी” हेच खरं.
मुंबई ग्राहक पंचायत
mgpshikshan@gmail.com