
ग्राहक मंच
उदय पिंगळे
मागील काही भागात आपण अल्प, मध्यम आणि दीर्घ कालावधीवर आधारित विविध गुंतवणूक पद्धतींची ओळख करून घेत आहोत. दीर्घ गुंतवणुकीचे फायदे अधिक असतात. ते समजून घेणे आवश्यक आहे. यातील कालमर्यादा ही व्यक्तीसापेक्ष असली तरी ती शेअर्स, विविध म्युच्युअल फंड योजनांचे युनिट, बॉण्ड, सरकारी रोखे, सोने-चांदी यासारखे मौल्यवान धातू, स्थावर मालमत्ता, दुर्मिळ वस्तू, चित्र अशा कोणत्याही मालमत्ता प्रकारात करता येते.
यकर कायद्यानुसार गुंतवणुकीचा प्रकार आणि मालमत्ता बाजारातील नोंदणी यानुसार एक ते दोन वर्षावरील गुंतवणूक म्हणजे दीर्घकाळ असतो. बेंजामिन ग्रॅहम, वॉरेन बफे, चार्ल्स मंगुर, पीटर लीच यांनी गुंतवणूकदारांत जागृती करून केवळ गुंतवणुकीतून प्रचंड बाजारमूल्य निर्माण करून आदर्श ठेवला आहे.
“सब्र का फल मिठा होता है!” हे याच अर्थाने म्हटले जात असावे. त्यामुळेच जगभरातील गुंतवणूकतज्ञांच्या मते अशा पद्धतीने गुंतवणूक करणे सर्वश्रेष्ठ मानले जात असावे.
वैशिष्ट्ये-
मोठा गुंतवणूक कालावधी -
गुंतवणूक तज्ञांच्या मते साधारणतः पाच वर्षाहून अधिक कालावधी हा मोठा गुंतवणूक कालावधी मानला जातो. शेअर्स म्युच्युअल फंड ,युनिट याबाबत हा कालावधी सात वर्ष असून या प्रकारात गुंतवणूक विभागून ठेवली असल्यास या कालावधीत आकर्षक परतावा मिळण्याची अधिक शक्यता असते.
दलाली आणि अन्य खर्च कमी -
अशी गुंतवणूक वारंवार केली जात नसल्याने त्यासाठी द्यावी लागणारी दलाली व अन्य शासकीय कर हे तुलनेने कमी असतात.
जोखीम - अशा प्रकारच्या गुंतवणुकीत गुंतवणूकदाराने घेतलेली जोखीम ही मध्यम ते तीव्र या स्वरूपाची असते.
विविध मालमत्ता प्रकारातील गुंतवणूक - जाणीवपूर्वक जोखीम स्वीकारून केलेल्या गुंतवणुकीत अधिक लाभाची अपेक्षा असल्याने अशी गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात कमी-अधिक प्रमाणात विभागली जाते.
चक्रवाढवाढीचा लाभ- गुंतवणूक कालावधी दीर्घ असल्याने त्या गुंतवणुकीवर चक्रवाढवाढीचा लाभ मिळण्याची शक्यता असते. जितका अधिक कालावधी तेवढा लाभ अधिकाधिक वाढत जातो.
संशोधन आणि संयम - ही गुंतवणूक करताना मालमत्ता प्रकारचे मूलभूत आणि तांत्रिक असे संशोधन करून त्यावरील दीर्घकालीन धोरण ठरवण्यात येते.
फायदे-
प्रचंड परतावा - चक्रवाढ वेगाने मिळणारा परतावा दीर्घकाळात मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रकमेत प्रचंड वाढ होते.
जोखीम कमी - गुंतवणूक कालावधी मोठा असल्याने कोणत्याही मालमत्ता प्रकारातील जोखीम ही कमी कमी होत जाते. अधिक जोखीम घेतल्यास अल्पकाळात लाभ अथवा तोटा अधिक होण्याची शक्यता दीर्घकाळात कमी होते.
शिस्त - बचत नियमितपणे करावी. त्याची आपोआप सवय लागते. कोणतीही गुंतवणूक ही योग्य संधी साधून करायची असते.
करलाभ - दीर्घकालीन गुंतवणुकीतून मिळणारा लाभ हा भांडवली नफा समजण्यात येऊन तुमचे उत्पन्न कितीही असेल तरी त्यावर सवलतीच्या एकसमान दराने कर आकारला जातो. शेअरबाजाराशी संबंधित अशा दीर्घकालीन भांडवली लाभावरील कर आकारणी काही मर्यादेत करमुक्त असून त्यावरील अधिक लाभावर कमी दराने कर आकारणी होत असल्याने आपोआपच एकूणच करदेयता कमी होते.
संपत्ती निर्मिती - दीर्घकाळ गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण होते. त्यामुळे गुंतवणूकदार केवळ श्रीमंत न होता धनवान होतो. (रिच आणि वेल्थ यातील फरक समजून घ्या.)
निवृत्ती नियोजन - ज्यांना आपल्या भविष्यातील निवृत्तीकाळाचे आर्थिक नियोजन करायचे आहे, त्यांनी गुंतवणुकीसाठी लवकरात लवकर सुरुवात करावी. गुंतुवणुकीची ही आदर्श पद्धती आहे.
तोटे-
कमी रोकड क्षमता - काही मालमत्ता प्रकारात मोठ्या प्रमाणावर लाभ दिसत असला तरी तो प्रत्यक्षात मिळवण्यात अडचणी असल्याने त्यातून अपेक्षित रक्कम योग्य वेळी मिळेल याची शक्यता कमी असते.
बाजार हालचाल - मालमत्ता बाजार सातत्याने हलता असतो. त्यामध्ये वर्षभरात पडणारा फरक हा खूप मोठा असतो. या संधीचा फायदा घेता येत नाही.
महागाईमुळे होणारा तोटा - काही मालमत्ता प्रकारात केलेली गुंतवणूक महागाई दरावर मात करणारी नसल्यास त्यामुळे त्यातील गुंतवणुकीचे मूल्य कमी होते.
बाजार संधी - गुंतवणूक धोरण आधीच ठरवलेले असल्याने अन्य उपलब्ध संधीचा लाभ घेता येत नाही.
गुंतवणूक प्रकारात सहज बदल अशक्य - विविध मालमत्तेतील गुंतवणूक प्रमाण बदलायचे असल्यास त्यातील बदल सहज करता येत नाहीत.
भूराजकीय हालचाली - देशातील आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील ताण-तणावाचा प्रभाव मालमत्तांच्या किंमतीवर पडण्याचा संभव यात अधिक आहे.
मानसिक ताण - यात होणारे बदल हे अनेकांच्या अपेक्षेनुसार नसल्यास त्या सर्वांचा गुंतवणुकदारांच्या मनावर ताण येऊ शकतो.
दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठीच्या विशेष सूचना.आपले निश्चित गुंतवणूक ध्येय ठरवावे.
जोखीम क्षमतेनुसार विविध मालमत्ता प्रकारात गुंतवणुकीची विभागणी करावी.संधी साधून योग्य वेळीच गुंतवणूक करावी.
नियमित कालावधीनंतर (सर्वसाधारणपणे वर्षातून किमान एकदा तरी) गुंतवणुकीचा आढावा घेऊन आवश्यक असल्यास बदल करावेत. वारंवार बदल करू नयेत. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक असते.
यासंबंधात माहिती मिळवून स्वतःला अद्यावत ठेवणे उत्तम. शिक्षणात केलेली गुंतवणूक कधीही फुकट जात नाही. आज अनेक मंच या संबंधातील उत्तम शिक्षण अल्प खर्चात उपलब्ध करून देत आहेत.आधी सांगितल्याप्रमाणे श्रद्धा आणि सबुरी ठेवणे अत्यावश्यक.
दीर्घकालीन गुंतवणूक वाटते तेवढी सहज सोपी नाही. त्यासाठी निश्चित मनोभूमिका असणे आणि त्याचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असते. त्याची काही सिद्ध झालेली अनेक गुंतवणूक धोरणे किंवा पद्धती आहेत. त्यातील कोणती धोरणे गुंतवणूकदार म्हणून आपल्याला पूरक होऊ शकतात ते ठरवण्यासाठी व्यावसायिक गुंतवणूक सल्लागाराची मदत होऊ शकते. अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घेण्यास कोणताही संकोच बाळगू नये. केशवसुतांनी त्यांच्या सतारीचे बोल या त्यांच्या दीर्घ कवितेत ‘धीर धरी रे धीरा पोटी असती मोठी फळे गोमटी..’असे आपल्याला सुचवले आहेच.
मुंबई ग्राहक पंचायत
mgpshikshan@gmail.com