प्रवासी, कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठलेली 'बेस्ट' !

समुद्रकिनारा आणि बॉलिवूड ही जशी मुंबईची ओळख आहे तशीच बेस्ट बस ही देखील मुंबईची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांत सदोष बसगाड्या आणि दुरवस्था झालेले बस डेपो यामुळे बेस्ट उपक्रम प्रवासी व कर्मचारी यांच्या जीवावर उठला आहे.
प्रवासी, कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठलेली 'बेस्ट' !
(संग्रहित फोटो)
Published on

मत आमचेही

ॲड. हर्षल प्रधान

समुद्रकिनारा आणि बॉलिवूड ही जशी मुंबईची ओळख आहे तशीच बेस्ट बस ही देखील मुंबईची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांत सदोष बसगाड्या आणि दुरवस्था झालेले बस डेपो यामुळे बेस्ट उपक्रम प्रवासी व कर्मचारी यांच्या जीवावर उठला आहे.

झंझावात हा एकच शब्द उद्धव ठाकरेंच्या या नितीन नांदगावकर नावाच्या शिलेदारासाठी वापरायला हवा. या पठ्ठ्याने उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या संधीचं सोनं केले आणि बेस्ट कामगार सेना सरचिटणीस आणि बेस्ट समिती सदस्य म्हणून अवघ्या बेस्ट प्रशासनालाच हादरवले. मुंबई कटकारस्थानी राजकारण्यांच्या हातून तेव्हाच वाचेल जेव्हा सगळ्यात आधी बेस्ट सुधारेल आणि बेस्ट तेव्हाच सुधारेल जेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील नितीन नांदगावकर यांच्यासारख्या निष्ठावान शिलेदारांना लढण्याची संधी पक्षाकडून देऊन मुक्तहस्त दिला जाईल.

मुंबई ही महानगरी केवळ इमारतींनी, समुद्रकिनाऱ्यांनी किंवा बॉलिवूडने ओळखली जात नाही तर ती ओळखली जाते तिच्या ‘बेस्ट’बसमुळे. लाखो सामान्य मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा आधारस्तंभ असलेल्या या बेस्ट उपक्रमावर गेल्या काही महिन्यांत एक राजकीय आणि सामाजिक वादळ घोंघावू लागले आहे. या वादळाचे केंद्रबिंदू आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते, बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस आणि बेस्ट समिती सदस्य डॉ. नितीन मधुकर नांदगावकर. डॉ. नांदगावकर हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे एक आक्रमक, तडफदार आणि अभ्यासू नेते आहेत. बेस्ट समितीवर त्यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी या उपक्रमाच्या प्रत्येक कोपऱ्यात डोकावण्याचा निर्धार केला. ते केवळ बैठकांमध्ये प्रश्न विचारणारे नेते नाहीत; ते स्वतः डेपोत जातात, बसची पाहणी करतात, कर्मचाऱ्यांशी बोलतात आणि मग प्रशासनावर थेट प्रहार करतात.

दोषपूर्ण बसचा भस्मासुर

डिसेंबर २०२४ मध्ये कुर्ला परिसरात एक बेस्ट इलेक्ट्रिक बस अनियंत्रित होऊन पादचाऱ्यांना धडकली. सहा जण ठार झाले, ४९ जखमी झाले. मानवी चुकीचा संशय असला, तरी यामागे एक मोठी व्यवस्थात्मक समस्या दडलेली होती आणि ती म्हणजे बेस्ट चालकांना इलेक्ट्रिक बस चालवण्याचे कोणतेही प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळाले नव्हते! मुंबई उच्च न्यायालयाने हे वास्तव ‘धक्कादायक’ म्हणून नोंदवले. डिसेंबर २०२५ मध्ये भांडुप परिसरात एक बेस्ट मिनी बस स्टेशनजवळ पादचाऱ्यांना धडकली. चार जण मृत्युमुखी पडले, नऊ जण जखमी झाले. मार्च २०२६ मध्ये कुर्ल्याच्या बर्वे मार्गावर एक बेस्ट बस वाहनांना धडकली. सात जण ठार, ४२ जखमी. या अपघातांची मालिका पाहता, नांदगावकरांनी एक गोष्ट स्पष्टपणे ओळखली. हे केवळ दुर्दैवी अपघात नाहीत, तर हे एक प्रणालीचे अपयश आहे. नांदगावकरांनी बेस्ट प्रशासनाला सादर केलेल्या याचिकेत त्यांनी दोन खासगी बस कंत्राटदारांशी संबंधित कागदोपत्री पुरावे सादर केले. एका प्रकरणात आठ बसमध्ये दोष आढळले, तर दुसऱ्या प्रकरणात पाच वेट लीज बसमध्ये गंभीर त्रुटी होत्या. ते दोष कोणते होते? स्टिअरिंग लॉकच्या गंभीर समस्या, ब्रेक निकामी होण्याचा धोका, ब्रेक लायनरच्या त्रुटी, ड्रॅग लिंक असेंब्लीतील दोष, गिअर बॉक्सचे नुकसान, सुरक्षा उपायांचा पूर्ण अभाव आणि अत्यंत खराब देखभाल. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये ओळखले गेलेले दोष मार्च महिन्यात पुन्हा तपासणी केल्यावर ‘अटेंड नॉट डन’ म्हणजेच दुरुस्त न केलेले आढळले. काही प्रकरणांमध्ये, बस ‘दुरुस्त’ झाल्याचे दाखवून कागदोपत्री नोंदी केल्या गेल्या, परंतु प्रत्यक्षात दोष तसेच राहिले. नांदगावकरांनी हा प्रकार उघड करताना ठणकावून सांगितले, “जर स्टिअरिंग किंवा ब्रेक निकामी झाले, तर चालक वाहनावरील नियंत्रण गमावेल. परिणामी अपघात होईल. प्रश्न असा आहे की, आपण हे अपघात घडण्याची वाट पाहत आहोत का?”

डेपोंचे भयावह वास्तव

नांदगावकरांनी मुंबईतील २७ बेस्ट डेपोंची पाहणी केली. मुलुंड पश्चिम डेपोमध्ये त्यांनी जे पाहिले ते थरारक होते. छताचे स्लॅब कोसळण्याच्या उंबरठ्यावर, भिंतींना मोठ्या भेगा, कमकुवत रचना, आजूबाजूला वाढलेले गवत, अस्वच्छ आणि धोकादायक विश्रांतीची जागा. अहवालात साप आढळल्याचेही नमूद केले. बांद्रा पश्चिम डेपोत तर परिस्थिती आणखी गंभीर होती. छत धरून ठेवण्यासाठी काँक्रीटचे तुकडे खाली पडू नयेत म्हणून वायर मेश लावण्यात आली होती. जवळपास ३०० कर्मचारी रोज या धोकादायक परिस्थितीत काम करतात. डॉक्टरांचे केबिन, कर्मचाऱ्यांची विश्रांतीची खोली सर्व काही जर्जर अवस्थेत. नांदगावकरांनी भिंतीतून काँक्रीटचा तुकडा हाताने बाहेर काढला आणि माध्यमांसमोर धरला आणि ही त्यांची कृती हजारो शब्दांपेक्षा जास्त बोलणारी ठरली. त्यांनी विचारले, “ज्या चालकांवर मुंबईकरांचे जीव अवलंबून आहेत, त्यांचे जीव धोक्यात असणे हे कोणाला चालते? हे क्रौर्य आहे.” विक्रोळी डेपोतही या शिवसेना कार्यकर्त्याने सुरक्षा जोखमी निदर्शनास आणल्या. कर्मचारी धोकादायक परिस्थितीत काम करत असल्याचे स्पष्ट झाले. डेपोतील कर्मचाऱ्यांनी नांदगावकरांशी बोलताना आपली व्यथा मांडली. एका बसचालकाने सांगितले, “आम्ही रोज कामावर येतो, पण छतावरून काहीतरी पडेल का याची भीती असते. मेश हेच एकमेव संरक्षण आहे. पर्याय नाही, म्हणून काम करतो.” एका वाहकाने सांगितले, “कधी कधी काँक्रीटचे छोटे तुकडे खरोखरच पडतात. आता हे सामान्य झाले आहे.” नांदगावकर यांनी सूचना केल्यावर बेस्ट प्रशासनही जागे झाले.

सुरक्षारक्षकांची ३२१ रिक्त पदे!

नांदगावकर केवळ बस आणि डेपो यापुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी बेस्ट उपक्रमातील सुरक्षा आणि दक्षता विभागात तब्बल ३२१ सुरक्षारक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आणले. २०१६ पासून महापालिकेच्या अखत्यारित असल्याने स्वमालकीच्या बस घेण्याचे उपक्रमाने थांबवले, कर्मचारी भरती बंद केली गेली. नांदगावकरांनी बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांच्याकडे तातडीने सुरक्षारक्षक भरती करण्याची मागणी केली. परिणामी, २३ मार्च २०२६ रोजी समिती अध्यक्षांनी संबंधित अधिकारी वर्गाला भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले.

बेस्टच्या मालमत्ता ढापण्याला विरोध

मार्च २०२६ मध्ये बेस्टने आपल्या १० मालमत्ता व्यावसायिक भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव मांडला. कांदिवली, अंधेरी, वडाळा, मुंबई सेंट्रल, घाटकोपर आणि गोरेगाव येथील मालमत्तांचा यात समावेश होता. वार्षिक भाडे कोट्यवधींमध्ये अपेक्षित होते. नांदगावकरांनी या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बेस्टने व्यावसायिक दराने भाडे आकारले पाहिजे. त्यांनी बंद बिडिंग प्रक्रियेऐवजी खुली लिलाव पद्धत वापरण्याची मागणी केली, जेणेकरून पारदर्शकता येईल आणि उपक्रमाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल.

प्रशासनावरील थेट प्रहार

नांदगावकरांनी वेट लीज बस ऑपरेटर्सना उत्तरदायित्वाच्या कक्षेत आणण्यासाठी ठोस मागण्या केल्या. प्रत्येक बस रस्त्यावर उतरण्यापूर्वी अभियांत्रिकी विभागाची लेखी परवानगी बंधनकारक असावी. नियमित रस्ते योग्यता तपासणी व्हावी. आरटीओमार्फत वार्षिक तंदुरुस्ती चाचण्या व्हाव्यात. दोषी कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. डेपोंसाठी संरचनात्मक तपासणी तातडीने व्हावी. देखभाल दुरुस्ती जलद गतीने व्हावी. कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित कामाची परिस्थिती निर्माण करावी. व्यापक पातळीवर उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी व्हावी. कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी. सर्व कंत्राटी बसचे तातडीचे सुरक्षा ऑडिट व्हावे. अभियांत्रिकी मंजुरीशिवाय कोणतीही बस रस्त्यावर धावू नये. नांदगावकरांच्या या सातत्यपूर्ण आणि आक्रमक लढ्याचे परिणाम दिसू लागले आहेत. बेस्ट महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी युद्धपातळीवर तीव्र तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले. वाहतूक विभागाच्या तपास पथकाकडून एका आठवड्याच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी ६ एप्रिल रोजी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. त्या म्हणाल्या, दोषपूर्ण बस रस्त्यावर धावणे खपवून घेणार नाही. प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना धोक्यात टाकणे आम्ही मान्य करणार नाही. सुरक्षारक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली. बेस्टने मालमत्ता विकास योजनेत सुधारणा करण्याचे संकेत दिले.

विरोधाभास आणि अटेंड नॉट डन?

बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र आपली बाजू मांडताना सांगितले की, सर्व वेट लीज बसची डेपोमध्ये नियमितपणे अचानक तपासणी केली जाते. स्टिअरिंग, ब्रेकिंग, टायर्स, सस्पेंशन, विद्युत प्रणाली सर्वांची तपासणी होते. कोणताही दोष आढळल्यास तातडीने सुधारणात्मक कारवाई केली जाते. परंतु नांदगावकरांनी ठेवलेले कागदोपत्री पुरावे वेगळी गोष्ट सांगतात. ‘अटेंड नॉट डन’ या शब्दांनी भरलेल्या तपासणी अहवालांनी प्रशासनाच्या दाव्यांना छेद दिला आहे. नांदगावकरांचा हा लढा केवळ एका पक्षाच्या विरोधाचा भाग नाही. हा लढा आहे मुंबईच्या लाखो सामान्य प्रवाशांसाठी, ज्यांना रोज या बसवर विश्वास ठेवावा लागतो. हा लढा आहे त्या चालकांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी, ज्यांना धोकादायक गाड्या चालवायला आणि जर्जर डेपोत काम करायला भाग पाडले जाते. बेस्ट उपक्रम ही मुंबईची दुसरी जीवनरेखा आहे. पहिली उपनगरी रेल्वे. परंतु ती जीवनरेखा जर दोषपूर्ण बसगाड्यांनी बनलेली असेल, जर ती जर्जर डेपोत श्वास घेत असेल, तर मुंबईकरांचे जगणे धोकादायक बनते. बेस्टच्या भल्यासाठी हा झंझावात थांबणे योग्य नाही. तो अधिक तीव्र व्हायला हवा.

प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

logo
marathi.freepressjournal.in