बेटिंगचा नवा विळखा?

पैज लावण्याचा निरागस प्रकार आज जुगार म्हणून नावारुपाला आला आहे आणि त्याची व्याप्ती वाढत आहे. बेटिंग हे नाव या जुगाराने धारण केले आहे. यात लाखो-करोडोंची उलाढाल होत असून, सामान्य माणसे, तरुण मुले यात फसत आहेत, फसवले जात आहेत. ऑनलाईन ॲपचा यातील वाटा वाढत आहे.
बेटिंगचा नवा विळखा?
Published on

- ग्राहक मंच

- अभय दातार

पैज लावण्याचा निरागस प्रकार आज जुगार म्हणून नावारुपाला आला आहे आणि त्याची व्याप्ती वाढत आहे. बेटिंग हे नाव या जुगाराने धारण केले आहे. यात लाखो-करोडोंची उलाढाल होत असून, सामान्य माणसे, तरुण मुले यात फसत आहेत, फसवले जात आहेत. ऑनलाईन ॲपचा यातील वाटा वाढत आहे.

पैज लावणे आपल्यासाठी काही नवीन नाही. एखादा म्हणतो, “आज अमुक शिक्षक येणार नाहीत.” आपण विचारतो, “कशावरून?” समोरचा उत्तरतो, “मी सांगतो म्हणून, चल, लावतो पैज?’

हे असे संवाद आपल्या लहानपणी अनेकदा झडलेले आहेत. काही खेळ पैज लावून खेळले जायचे. साहित्याचा विचार केला तर खुद्द ज्ञानेश्वर माउलींनीही ज्ञानेश्वरीत आपल्या मायमराठीचे कवतिक करताना ‘अमृतातेही पैजा जिंके’ अशी लोभस शब्दयोजना केली आहे. खेळीमेळीच्या वातावरणात लावली जाणारी पैज बघता बघता नागिणीसारखा फूत्कार कधी सोडू लागली ते कळलेच नाही. पैजेचे रुपांतर पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या जुगारात झाले. या नागिणीने अनेकांना कंगाल केले, देशोधडीला लावले, कुटुंबे उद्ध्वस्त केली. हे कमी म्हणून की काय, अलीकडे आधीच मोबाईलचे व्यसन लागलेले अनेकजण जाहिरातींमधून दाखवल्या जाणाऱ्या बेटिंग ॲपच्या जाळ्यात फसत आहेत.

हे सर्व का घडत आहे याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे सतत केला जाणारा जाहिरातींचा मारा, आणि या माऱ्याद्वारे दाखवली जाणारी अविश्वसनीय प्रलोभने. हे सर्वसाधारणपणे कधी आढळते याचा आढावा घेतला तर समजेल की क्रिकेटचा हंगाम सुरु व्हायच्या आधीपासून; आणि आपण एखादे ॲप डाउनलोड केले असेल, तर त्याच्या माध्यमातून किंवा आपण मोबाईल गेम खेळताना वारंवार दिसणाऱ्या जाहिरातींमधून. हे कमी म्हणून की काय, एसएमएसचाही मारा चालू होतो आणि त्यातून ‘तुमच्या खात्यात अमुक इतकी नाणी बोनस म्हणून जमा झाली आहेत. ती वापरून हा गेम खेळा’ अशा अर्थाचे संदेश येतात.

पैज लावणे हा प्रकार प्रत्यक्षात दोघा-तिघांमध्ये घडतो; तर बेटिंगमध्ये अनेकजण सहभागी होत असतात. ही वेगवेगळी ॲप्स डाउनलोड करायला सांगणाऱ्या कंपन्या कुठल्या आहेत, त्या कितपत विश्वासार्ह आहेत, असे अनेक मुद्दे आहेत. क्रिकेटचे उदाहरण घेतले, तर अमुक सामन्यात अमुक फलंदाज शतक ठोकेल का, कोणता फलंदाज सर्वात जलद अर्धशतक पुरे करेल, कोणता गोलंदाज सर्वात जास्त बळी घेईल, कोण सर्वात जास्त झेल पकडेल, किती चौकर किंवा षटकार ठोकले जातील, अशा विविध प्रश्नांवर पैसे लावले जातात. जिंकणाऱ्याला जी रक्कम मिळते त्यासाठी काही अटीही असू शकतात. हरणाऱ्याचे पैसे बुडतात. अर्थात फायदा कमावणे हा एकमेव उद्देश असल्याने कोणी हरो वा कोणी जिंको, ॲप बनवणाऱ्या कंपनीला बक्कळ फायदा होतो. जिंकणारा लोभापायी अधिक रक्कम लावायला लागतो, तर हरणारा झालेले नुकसान भरून काढण्यासाठी खेळत राहतो. शिवाय या सर्वांना इरेस पेटविण्यासाठी अनेक नामांकित, तारांकित खेळाडू, चित्रपट तारका-तारे, मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती हजर असतातच.

बेटिंग हा प्रकार कित्ती सोप्पा आहे, माझा कसा दणदणीत फायदा झाला, तुमचा कसा प्रचंड फायदा होईल, वगैरे गोडगोड शब्दात सांगून जाळ्यात ओढले जाते. हे कमी म्हणून की काय, दर दोन मिनिटांनी कोणत्या ना कोणत्या पान मसाल्याच्या जाहिरातीही असतात. मध्यंतरी ज्या एका ॲपने धुमाकूळ घातला. त्यात ‘फक्त रु.४९ गुंतवा आणि जिंका लाखो रुपये’, असे सांगितले जायचे. एका संस्थेने गोळा केलेल्या प्रतिक्रिया कोणाही सुज्ञ माणसाची काळजी वाढवणाऱ्या आहेत. एका माणसाच्या गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन पुतण्यांनी ‘४९ रुपये भरा आणि करोडो जिंका’ असे सांगितले तेव्हा तो हादरला. दुसरा एकजण आयपीएलच्या मोसमात एका रिक्षातून चालला होता, तेव्हा तो रिक्षावाला या ॲपसाठी सभासद गोळा करीत आहे असे कळले. ‘मी स्वत: दहा लाख रुपये जिंकले’ असे तो रिक्षावाला म्हणाला, तेव्हा तो थापा मारतोय असे त्या प्रवाशाला वाटले.

छोट्या शहरात आणि खेड्यातसुद्धा हे वेड भयानक वेगाने पसरत चालले आहे, अशी चिंता एकाने व्यक्त केली. कोणत्याही प्रकारच्या नशेपेक्षा ही नशा अधिक संहारक आहे असे एकाने सांगितले. ज्यांचे पैसे बुडाले ते अक्षरश: कंगाल झाले. कोणाशीही बोलायची चोरी, म्हणून अनेकजण बेपत्ता झाले. जेव्हा कोणतीही व्यक्ती एखादी नशा करू लागते, मग ती दारू असो, धूम्रपान असो, मादक पदार्थ असोत किंवा बेटिंगसारखा जुगार असो, त्या व्यक्तीच्या एकंदरीत वागण्यात हळूहळू बदल होऊ लागतो. आपण जे करतोय ते चुकीचे आहे हे त्या व्यक्तीला कळत असते, पण वळत नाही. त्यामुळे अशी व्यक्ती आपल्याच कुटुंबात एकटे राहणे पसंत करते. काहीतरी बहाणे सांगणे, खोटे बोलणे हेही वाढू लागते. स्वत:ची मिळकत नसेल, तर चोरी करण्याइतकी सराईत होऊ लागते. कशातही मन लागत नाही. अभ्यास असो, घरातली किंवा ऑफिसमधली कामे असोत, चुकारपणा वाढतो. बेटिंगच्या बाबतीत हे सर्व लागू होतेच, शिवाय वारंवार मोबाईलवर संबंधित ॲप उघडून पाहणे, आपण जे व्यवहार केलेत, त्यांची स्थिती तपासणे चालू होते. उधारी वाढू लागते. ज्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांचा ससेमिरा वाढतो. या सर्वांमुळे ही व्यक्ती मानसिकदृष्ट्या पूर्ण उद्ध्वस्त होऊ शकते.

अनेक पाश्चात्य राष्ट्रात जुगाराला, बेटिंगला कायद्याने मान्यता असली, तरी आपल्याकडे ती नाही. मग यावर उपाय काय? मारझोड करून, अपशब्द बोलून, अपमान करून अशी व्यक्ती सुधारत नाहीच, पण उलट अधिक कोडगी बनू शकते. त्यामुळे तिच्याशी प्रेमानेच बोलायला हवे, तिला विश्वासात घेऊन नक्की काय झालेय ते जाणून घ्यायला हवे. मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घ्यावी. कोणतेही व्यसन एकदम सुटत नाही, काही वेळ जाऊ द्यावा लागतो, त्यामुळे त्या व्यक्तीच्या जवळच्या सर्वांनी धीर धरावा, संयम सोडू नये. सुरक्षेचा उपाय म्हणून हेच नव्हे, तर असे कोणतेही संशयास्पद ॲप आढळले, तर cybercrime.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तशी तक्रार करावी. आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांनाही सावध करावे. खरे तर ज्या प्रकारे अशा ॲप्सचा प्रसार होत आहे, खेळाडू, कलाकार मंडळी भूल घालणाऱ्या जाहिरातीतून सतत लोकांसमोर येत आहेत, ते पाहता या विरोधात एक मोठी सामाजिक चळवळ उभी करणे आणि समाजात जागृती करणे गरजेचे आहे.

mgpshikshan@gmail.com

मुंबई ग्राहक पंचायत

logo
marathi.freepressjournal.in