सावधान राजकारण्यांनो,राजकीय घरफोड्यांचा धोका आहे!

महाराष्ट्रातील राजकीय घराण्यातील फुटीचा विषय नवा नाही. ते घराणे कुणीतरी फोडण्याचा प्रयत्न करते आणि ते घर फुटते, एवढा सहज व साधा हा विषय निश्चितच नाही.
सावधान राजकारण्यांनो,राजकीय घरफोड्यांचा धोका आहे!

-राजा माने

राजपाट

ग्रामीण भागात चोऱ्या आणि घरफोड्या सुरू झाल्या की पोलिसांबरोबरच गावकरीही सतर्क होतात. गटागटाने चौकाचौकात गस्त घालण्यासाठी तगड्या पोरांचे गट तयार करतात... कारण घरफोडी करणारे अज्ञात असतात. गेल्या काही वर्षांत ‘राजकीय घरफोडी’ ही नवी राजकीय-सामाजिक समस्या जन्माला आली आहे. यात घरफोडी करणारे मात्र अज्ञात नसतात, किंबहुना ते जवळचेच असतात! शरद पवार नामक दिग्गज राजकीय घराण्याच्या राजकीय घरफोड्याचा शोध आ. जितेंद्र आव्हाड यांनी साईनगरीत आपल्या राष्ट्रवादी चिंतन शिबिरात लावला आणि ‘राजकीय घरफोडी’ या शिळ्या विषयाला ताजी फोडणी दिलेला नवा विषय उभ्या महाराष्ट्राला चिंतनासाठी मिळाला...

ज्या विषयांशी ज्यांचा थेट संबंध असतो ते त्या विषयावर कधी चिंतन करीत नाहीत, मात्र त्या विषयांशी काडीचाही संबंध नसलेली मंडळीच भल्यामोठ्या चिंतन मालिका गुंफत बसते! त्याच विषयावरील चर्चेच्या एरंडाच्या गुऱ्हाळांना बहर येतो. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात तेच चाललेले आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा मुहूर्त जवळ येऊ लागल्याने नवनव्या विषयांना तोंड फुटत राहणार. राज्यातील राजकीय घराणी हा त्यातलाच सर्वश्रुत विषय! ‘जाणता राजा’ ही उपाधी लाभलेल्या शरद पवार यांच्या घराण्याची चर्चा नेहमीच होते. २०१९ सालच्या लोकसभा निवडणूक प्रचारातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली सभा विदर्भातील वर्धा येथे झाली होती. या सभेत खुद्द मोदींनीच शरद पवारांच्या कुटुंबात चाललेल्या राजकीय कलहाची वाच्यता आपल्या भाषणात केली होती. त्या अगोदर काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी आपल्या बारामतीत कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले होते. त्या कार्यक्रमात मोदी आणि शरद पवारांनी आपल्या वैयक्तिक स्नेहसंबंधांबद्दल एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली होती. त्यावेळीही शरद पवारांच्या सर्वपक्षीय मैत्रीची बरीच चर्चा झाली होती. यासंदर्भांची आठवण पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीत झालेल्या चिंतन शिबिरातील आ. जितेंद्र आव्हाडांच्या भाषणाच्या निमित्ताने झाली. आ. आव्हाडांनी स्वातंत्र्यप्राप्तीपासून वर्तमानकाळापर्यंतच्या देश व महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक घडामोडींचा मोठ्या खुबीने आढावा घेतला. तो घेत असतानाच प्रभू श्रीराम मांसाहारी होते हा एक विषय आणि शरद पवारांचे घर सुनील तटकरेंनी फोडले हा दुसरा विषय आपल्या भाषणात मांडून सनसनाटी निर्माण केली. आ. आव्हाड हे तसे शरद पवारांचे ‘राजकीय हनुमान’! त्यामुळे आपल्या श्रीरामाच्या विरोधात जाणाऱ्यांवर ते तुटून पडतात, हे आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. त्याच नियमानुसार सध्या ते अजितदादांवर तुटून पडताना दिसतात. शरद पवारांचे राजकीय घर फुटले हे त्यांचे शल्य मांडताना शिर्डीच्या शिबिरात सुनील तटकरेंनी घरफोडी केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मग प्रश्न असा पडतो की, तटकरेंचा प्रभाव आणि कारवाया शरद पवारांचे राजकीय घर फोडण्याएवढ्या ताकदीच्या असतील काय? जर असतील तर रोखठोक अशी प्रतिमा आणि प्रशासनावर जबरदस्त पकड राखणारा अनेकदा उपमुख्यमंत्री राहिलेला अजितदादांसारखा नेता दुधखुळा तर नाही ना? की जो तटकरेंमुळे पवार कुटुंबाच्या ऐक्याला धक्का लावण्याचे धाडस करतो! आ. आव्हाडांचे वक्तव्य अनेक प्रश्न उभे करते. अजित पवार एवढी वर्षे राजकारणात आणि सत्तेत आहेत. त्यांच्या या राजकीय प्रवासात ते आपल्या पक्षात हुकूमशाही करीत राहिले असतील तर ती हुकूमशाही आ. आव्हाडांनी निमूटपणे सहन का केली? आपला पुतण्या जर‌ पक्षात वर्षानुवर्षे हुकूमशाहीने वागत असेल तर देशाचे राजकारण करणाऱ्या शरद पवारांनी एवढी वर्षे अजितदादांना का आवरले नाही, ते गप्प का बसले? या प्रश्नांची उत्तरे बरेच काही सांगून जातात.

महाराष्ट्रातील राजकीय घराण्यातील फुटीचा विषय नवा नाही. ते घराणे कुणीतरी फोडण्याचा प्रयत्न करते आणि ते घर फुटते, एवढा सहज व साधा हा विषय निश्चितच नाही. कुटुंबावरील वर्चस्व, दीर्घकाळ दबून राहिलेले मतभेद आणि राजकीय महत्त्वाकांक्षा हीच घरफुटीची प्रमुख कारणे असल्याचे अनेकवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे राजकारणातील कुणीतरी घरफोड्या येतो आणि नियोजनबद्ध पद्धतीने घर फोडतो, असे होऊच शकत नाही. राजकारण-समाजकारणात मुरलेली व वेगवेगळ्या सत्तास्थानांवर नेतृत्व करण्याची क्षमता राखणारी ही मंडळी स्वतःच्या उद्देशाशिवाय तथाकथित घरफोड्यांच्या मोहिमांना बळी पडू शकत नाहीत. काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले अर्थशास्त्राचे अभ्यासक, सिने-नाट्य अभिनेते आणि लेखक दीपक करंजीकर यांचे ‘घातसूत्र’ नावाचे पुस्तक मी वाचले होते. जगात १९१० पासून घडलेल्या प्रत्येक घटना घडामोडींच्या मुळाशी एक घातसूत्र असल्याचे करंजीकरांचे म्हणणे आहे. ‘टायटॅनिक’ जहाज बुडण्यापासून अगदी भारतातील नोटबंदीपर्यंतच्या जगातील घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटना घडामोडींची त्यांनी विस्ताराने तार्किक मांडणी करून ‘घातसूत्र’ वाचकांपुढे मांडले. अवघे विश्वच जगातील काही औद्योगिक कुटुंबे चालवित आणि नियंत्रित करीत आहेत, असा सार दीपक करंजीकरांचे ‘घातसूत्र’ हे पुस्तक काढते.

राज्यातील अनेक राजकीय कुटुंबांत फूट पडून कुटुंबाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला होऊन स्वतःची स्वतंत्र भूमिका घेतल्याची उदाहरणे आहेत. माजी मुख्यमंत्री स्व. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या कुटुंबाचे उदाहरण घेता येईल. त्यांच्या मुलाने चक्क वडिलांच्याच विरोधात बंड केले होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे स्व. प्रतापसिंह त्यांना सोडून प्रथम भारतीय जनता पक्षात गेले होते. तीच फूट त्यांच्या पुढील पिढ्यांमध्ये आज कायम आहे. माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनीही काकांना सोडून सुरुवातीला शरद पवारांच्या पक्षात जाणे पसंत केले. राज ठाकरे यांनी आपले काका हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना सोडून स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष त्यांनी काढला. एकनाथ खडसेंपासून शरद पवारांपर्यंतच्या राजकीय कुटुंबांना घरफाेडीची झळ बसल्याचे आपण पाहिले.

महाराष्ट्रातही पक्ष कुठलाही असो, राज्यातील २५-३० राजकीय कुटुंबेच राजकारण ताब्यात ठेवतात, असा सप्रमाण सांगणारा एक मेसेज अधूनमधून समाजमाध्यमांवर व्हायरल होत असतो. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय कुटुंबांची आणि त्यांच्या नात्यागोत्यांची यादीच त्या मेसेजमध्ये दिलेली असते. या पार्श्वभूमीवर आ. जितेंद्र आव्हाड यांनी सुनील तटकरेंवर शरद पवारांचे घर फोडणारा ‘घरफोड्या’ म्हणून केलेला आरोप किती गांभीर्याने घ्यायचा हे ज्याचे त्याने ठरवावे. शेवटी राजकारणात ‘वाटीतले ताटात आणि ताटातील वाटीत’ हा लोकप्रिय अलिखित नियम सर्वांनाच आवडतो. अनेक राजकीय घराण्यांची नावे सांगता येतील. ती सर्वांनाच माहिती आहेत. ‘जसे पेराल, तेच उगवणार!’ या नैसर्गिक नियमाला शरद पवार यांच्यापासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत कोणालाही आपण अपवाद करू शकत नाही. आ. आव्हाडांचे वक्तव्य एक सनसनाटीचा प्रयत्न म्हणून घेतले तरी, येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घरफोड्यांचे प्रयत्न होणारच! म्हणूनच राजकीय घरफोड्यांपासून सावध राहण्याचा सल्ला राजकारण्यांना द्यावासा वाटतो.

(लेखक फ्री प्रेस जर्नल व नवशक्ति समूहाचे राजकीय संपादक आहेत.)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in