दख्खनचा भगतसिंग : सिंदूर लक्ष्मण

निसर्गाच्या लहरीवर आणि शासनाच्या बेभरवशावर कसंबसं जगणारी माणसं.
दख्खनचा भगतसिंग : सिंदूर लक्ष्मण

महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात सिंदूर नावाचं जत-अथणी या आंतरराज्य रस्त्यावरच छोटंसं खेडं. मराठी भाषक कमी अन‌् कानडी बोलणारे जास्त. अशी गावची अवस्था. गावचे व्यवहार महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात जास्त. गावात मराठी आणि कन्नड शिक्षण देणाऱ्या दोन्ही प्राथमिक शाळा.

देशातील इतर सर्व खेड्याप्रमाणे विकासापासून लांब अंतरावर असलेलं हे गाव. शेती हाच मुख्य व्यवसाय; पण सगळी शेती कोरडवाहू. निसर्गाच्या लहरीवर आणि शासनाच्या बेभरवशावर कसंबसं जगणारी माणसं. अशा एका दुर्गम भागातील ओसाड गावात रामोशी समाजात मे १८७८ मध्ये वीर लक्ष्मणचा जन्म झाला. कर्नाटकातील प्रथेप्रमाणे माणसाच्या नावाआगोदर त्याच्या गावचे नाव लिहिले जात असे. त्यामुळे त्यांना सिंदूर लक्ष्मण असे संबोधित केले गेले होते व आहे. त्याकाळात ब्रिटिशांचे राज्य होते. राजकीय व्यवहार इंग्रज त्यांच्या कायद्याप्रमाणे चालवत होते; परंतु सामाजिक व्यवहार मात्र मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे चालत होते. राजकीय आणि सामाजिक अशी दोन्ही प्रकारची गुलामी आणि शोषण या विरुद्ध लक्ष्मणने सशस्त्र बंड केले होते. ते फक्त जुलमी राजवटी विरुद्ध लढत होते असं नाही, तर त्यांचा लढा हा राजकीय आणि सामाजिक गुलामगिरी व शोषण या दोन्ही आघाड्यावर होता. ब्रिटिशांनी कायदा करूनच बेरड, रामोशी या समाजास गुन्हेगार जमात म्हणून जाहीर केले होते. या समाजासहित समस्त बहुजन समाज हा शिक्षणापासून वंचित होता. मनुस्मृतीने कावेबाजपणे लेखणी अभिजनांच्या हातात दिली होती. त्यामुळे त्या अभिजन इतिहासकारांनी सिंदूर लक्ष्मणाला दरोडेखोर ठरविले. जे उमाजी नाईक यांच्या बाबतीत झालं, तेच सिंदूर लक्ष्मण यांच्याही बाबतीत झालं. जी अवहेलना उमाजी नाईक यांच्या वाट्याला आली होती, तीच अवहेलना सिंदूर लक्ष्मणच्या वाट्याला आली होती. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सिंदूर लक्ष्मण लढला; पण इतिहासाने त्याना जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवले. ते जर फक्त अन‌् फक्त ब्रिटिशांविरुद्ध लढले असते, तर कदाचित त्यांची दखल घेतली गेली असती; परंतु ते भांडवलदार, सावकार या शोषकांच्या विरुद्ध लढत होते, म्हणूनच त्यांची दरोडेखोर अशी संभावना केली गेली. सिंदूर लक्ष्मण यांनी सशस्त्र क्रांतिकारकांची फौज उभारली होती. त्यात कर्नाटकात राहणाऱ्या त्यांच्या तीन भाच्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्य चळवळीसाठी क्रांतिकारकांची फौज सांभाळणे ही काय साधी सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी जुलमी सावकार, भांडवलदार, जमीनदार यांची संपत्ती लुटली. हे खरे असले तरी त्या संपत्तीचा वापर त्यांनी शोषित व उपेक्षित समाज घटकासाठी केला असल्याने त्यांना दरोडेखोर या संज्ञेत आणता येणार नाही. त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कारवाया रोखण्यासाठी त्यांना इनाम लावून ब्रिटिशांनी अटक केली होती. त्यांना जतच्या तुरुंगात ठेवले होते. त्यांनी अत्यंत शिताफीने व प्रचंड धाडसाने जतचा तुरुंग फोडला व पलायन केले. काही दिवसांनी त्यांना पकडून जमखंडीच्या तुरुंगात ठेवले. तो जेलही त्यांनी फोडला आणि तिथून निसटले, तिसऱ्या वेळी ब्रिटिश सरकारने त्यांना बेळगाव जवळच्या हिंडलगा तुरुंगात डांबले.

जत व जमखंडी या तुरुंगातून दोनदा ते तुरुंग फोडून निघून गेलेच्या पार्श्वभूमीवर त्यांना हिंड लग्याच्या दणकट सुरक्षा कवच असलेल्या जेल मध्ये ठेवले होते. सिंदूर लक्ष्मणने त्यांचे सर्व कौशल्य पणाला लावून तोही तुरुंग फोडला आणि ते आपल्या साथीदारासह बाहेर पडले. अशा प्रकारे तीन वेळा जेलफोडीचं रेकॉर्ड असणारा अन्य एकही स्वतंत्र सैनिक नाही; पण इतिहासकारांनी त्यांना उपेक्षित ठेवले. त्या सर्व कलमकसायाना इतिहास कधीही माफ करणार नाही. १५ जुलै १९२२ या दिवशी कर्नाटक प्रांतात त्यांना विश्वासघाताने पकडले आणि त्यांना गोळ्या घालून मारले गेले. एका क्रांतिकारक व लढवय्या स्वातंत्र्यवीराचा शेवट झाला. कर्नाटकात कानडी भाषेत सिंदूर लक्ष्मणच्या कर्तृत्वाचे पोवाडे रचले गेले. त्यांच्यावर बरीच नाटके लिहून सादर केली गेली. त्यांच्यावर चित्रपट काढले गेले. लिखित स्वरूपात असणारे साहित्य जसे आहे, तसेच मौखिक साहित्याचीही कानडीत रेलचेल आहे. पहाटे उठून जात्यावर दळण दळणाऱ्या महिला गेली १०० वर्षे सिंदूर लक्ष्मणच्या ओव्या आणि गाणी म्हणत आल्या आहेत; मात्र हे फक्त कर्नाटकात झालं. त्यांची जन्मभूमी असलेल्या मराठी मुलखात त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही. उपेक्षित स्वातंत्र्य सैनिकांना नव्याने जनतेसमोर आणण्याची गरज आहे. म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळ, राष्ट्र सेवा दल, राजे उमाजी नाईक ब्रिगेड या पुरोगामी संघटनांनी एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे.

त्या मोहिमेअंतर्गत गेली अनेक वर्षे संशोधन करून सिंदूर लक्ष्मण यांच्या हौतात्म्यास १०० वर्षे पूर्ण झालेल्या दिवशी त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यासाठी स्वातंत्र्य सैनिक व पुरोगामी विचारवंतांच्या विचाराचा जागर करण्यात आला. त्यांच्या जयंतीचे आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जंगी कार्यक्रम करण्यात आला. गावकऱ्यांनी या कार्यास प्रचंड प्रमाणात दाद दिली. अत्यंत कमी वेळेत त्यांनी सिंदूर लक्ष्मणचा सुंदर पुतळा तयार करून बसवला. केवळ ४४ वर्षे जगलेल्या या स्वातंत्र्य वीरांचे कर्तृत्व अफाट आहे. त्यास न्याय मिळणे आवश्यक आहे. त्यांचा देदीप्यमान इतिहास जनतेसमोर आणणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कैक ज्ञात-अज्ञात वीरांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली आहे. हे नव्याने लोकांसमोर आणावे लागेल. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. सिंदूर लक्ष्मणच्या संघर्षाची आणि बलिदानाची तुलना व बरोबरी ही फक्त शहीद भगतसिंग यांच्याशी होते. त्यामुळे या दख्खनच्या भगतसिंगाला वीर सिंदूर लक्ष्मणाला विद्रोही सलाम!

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in