...तर प्रत्येक जीव तिर्थंकर बनेल

भगवान महावीरांचा हा संदेश जगातील प्रत्येक व्यक्तीने पाळायचे ठरवले तर सर्व समस्या नष्ट होतील.
...तर प्रत्येक जीव तिर्थंकर बनेल

‘प्रत्येक जीवाचा आत्मा हा तेवढीच क्षमता असणारा आहे. या आत्म्याला जेव्हा बोध होईल, की मीही तीर्थंकर बनू शकतो आणि तीर्थंकर बनण्याची योग्यता माझ्यात आहे तर तो सदैव सर्व जीवांच्या कल्याणाची भावना ठेवेल,’ भगवान महावीरांचा हा संदेश जगातील प्रत्येक व्यक्तीने पाळायचे ठरवले तर सर्व समस्या नष्ट होतील. मग ती समस्या दहशतवादाची असो, पर्यावरणाची असो, भोगवादाची असो की अहंकाराची, द्वेषाची असो... केवळ एक संदेश आणि संपूर्ण जगाचे कल्याण! इतके सोपे, साधे, सुंदर सूत्र भगवान महावीरांनी आपल्याला दिले आहे. महावीर जयंतीनिमित्त भगवान महावीरांच्या जीवनविषयक दृष्टीकोन आपण समजून घेतला पाहिजे.

(लेख : डॉ. मनोज पाटील)

‘अहिंसा आणि अनेकांत, जगातील सर्व समस्यांचा अंत!’- भगवान महावीर

भगवान महावीर यांची जयंती ‘जन्मकल्याणक’ या अर्थाने संबोधली जाते. त्याला कल्याणक का म्हणायचे? कारण संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी या भव्यात्म्याचा जन्म सार्थक होत असतो. जगातील सर्व जीवांच्या कल्याणाची भावना ठेवल्यामुळेच या जीवाला ‘तीर्थंकर’ प्रकृतीचा बंध होत असतो. ‘बंध’ होत असतो म्हणजे हा एक साधारण आत्मा एक महान आत्मा म्हणून जन्म घेणार असतो. सर्व जीवांच्या कल्याणाचा भाव ठेवून त्याने जीवन व्यतीत केलेले असते.

‘सर्व जीव’ म्हणजे... पंचंद्रिय जीव, चतुरेंद्रिय जीव, त्रिन्द्रिय जीव, द्वि इंद्रिय जीव, एवढेच नाही तर एकंदरीय जीव सुद्धा! एकेंद्रीय जीवामध्ये...पृथ्वीकायीक जीव म्हणजे पृथ्वी हेच ज्यांचे शरीर आहे ते जीव, हे वेगळे जीव नाहीत. आपल्या भोवतालची दगड आणि माती यांचा समावेश यामध्ये होतो. जगाच्या उत्पत्ती आणि स्थितीचे अध्ययन करणाऱ्या आधुनिक विज्ञानाने सुद्धा यातले जीवत्व आता मान्य करायला सुरुवात केली आहे. पृथ्वीवरील जीवन नष्ट होऊ नये म्हणून यांचे सुद्धा रक्षण केले पाहिजे, असे पर्यावरणप्रेमी लोक सांगत आहेत. तसेच अग्नी कायीक जीव, वायुकायीक जीव, वनस्पतीकायीक जीव आणि जलकायिक जीव यांचा समावेश होतो. या एकेंद्रीय जीवापैकी ‘वनस्पतीमध्ये जीव असतो,’ हे आता आपण मान्य करू लागलो आहोत. पृथ्वी, अग्नी, जल आणि वायु हे सुद्धा जीव आहेत, असे म्हणून त्यांचे रक्षण करण्याचे भाव, त्यांच्या कल्याणाचे भाव ज्या जीवाने सदैव आपल्या मनामध्ये ठेवले, तेच जीव तीर्थंकर होतात, परमात्मा पदाला पोहोचतात, हाच संदेश या दिवसाच्या निमित्ताने भगवान महावीरांकडून आपल्याला घ्यावयाचा आहे.

तीर्थंकर भगवान महावीर पुढे जाऊन असे सांगतात की, ‘‘या जगातील सर्व जीवांमध्ये असे बनण्याची क्षमता आहे. या प्रत्येक जीवाचा आत्मा हा तेवढीच क्षमता असणारा आत्मा आहे. या आत्म्याला जेव्हा बोध होईल, की मीही तीर्थंकर बनू शकतो आणि तीर्थंकर बनण्याची योग्यता माझ्यात आहे तर तो सदैव सर्व जीवांच्या कल्याणाची भावना ठेवेल. केवळ मनामध्ये कल्याणाची भावना ठेवली आणि वर्तन विपरीत झाले, असे होऊन तर काही उपयोग होणार नाही. तर त्यासाठी वर्तन सुद्धा असेच ठेवावे लागेल. आपली अनावश्यक गरज भागवण्यासाठी जीवांची हत्या माझ्याकडून होणार नाही, असा व्यवहार मला ठेवावा लागेल. माझ्या निमित्ताने त्याच्या मनाला व त्याच्या देहाला कष्ट पोहोचणार नाही, असे वर्तन माझे राहिले पाहिजे. तशीच आपली वाणी आणि तसेच आपले चिंतनसुध्दा राहिले पाहिजे.’’

भगवान महावीरांचा हा संदेश जगातील प्रत्येक व्यक्तीने पाळायचे ठरवले तर जगामध्ये असलेल्या सर्व समस्या नष्ट होतील. मग ती समस्या दहशतवादाची असो, पर्यावरणाची असो, भोगवादाची असो की अहंकाराची, द्वेषाची असो... केवळ एक संदेश आणि संपूर्ण जगाचे कल्याण! इतके सोपे, साधे, सुंदर सूत्र भगवान महावीरांनी आपल्याला दिलेले आहे.

भगवान महावीरांनी दिलेले आणि आजच्या जगाला उपयुक्त ठरणारे आणखीन एक सूत्र म्हणजे अनेकांतवाद! आपण जे बोलतो म्हणजे शब्दातून व्यक्त होतो, त्याचे अनेक अर्थ लावता येतात... तसेच जे आपण पाहतो आणि त्याचे वर्णन करतो, ते अनेक दिशांनी वेगवेगळ्या रूपात दिसते आणि वर्णन केले जाते... म्हणजे एकाच तथ्याच्या अनेक बाजू असू शकतात... हे सांगणारे सूत्र आहे... अनेकांत. असे अनेकांत तत्व जेव्हा आपण मान्य करतो तेव्हा वाद-विवाद, भांडणे आणि युद्धे होणार नाहीत. मग ते अगदी पारावरती होणारे वादविवाद असू देत... नाहीतर टीव्हीवर होणारे वादविवाद असू देत... नाही तरी घरामध्ये होणारी भांडणे असू देत... जाती-जातीमध्ये आणि देशा-देशांमध्ये होणारी युद्धे असू देत!

वेगळा विचार असलेल्या व्यक्तीचा द्वेष करणे, वेगळा विचार असलेल्या व्यक्तीला नामोहरण करण्यासाठी आदळआपट करणे याच्यामुळे किती अशांतता जगामध्ये निर्माण झाली आहे... ती आपण आता पाहतो आहोत. या अशांततेचा अंत आहे, अनेकांत! या ‘अहिंसा’ आणि ‘अनेकांत’ या दोन तत्त्वांचा अंगीकार करण्यासाठी काहीही आडवे येत नाही. तो जीव कोठे जन्मला... कोणाच्या घरात जन्मला...कोणत्या स्थितीत जन्मला, याचा काहीही फरक पडत नाही. म्हणजे जातीभेदाचा, भाषावादाचा, प्रांतवादाचा अंत! सर्व प्रकारच्या भेदभावांचा अंत करणारे तत्त्वज्ञान भगवान महावीरांनी आपल्याला दिले आहे. आज भेदभावांचे मुद्दे अधिक ठळक करून आपली दुकाने चालवली जातात. अशा दुकानदारांना ओळखण्याची गरज आहे. अशा दुकानदारांची दुकाने बंद व्हावीत आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी. भगवान महावीरांनी आपल्याला सन्मार्ग दाखवलेला आहे.

या मार्गावरून चालताना या दुकानदारांचा सुद्धा द्वेष करण्याची आवश्यकता नाही. त्यांना क्षमा करा. त्यांनाही सदबुद्धी व्हावी, त्यांनीही सन्मार्गावर चालावे आणि त्यांचेही कल्याण व्हावे, ही भावना ठेवून आपल्या धर्माचे पालन करत रहा...असे भगवान महावीर सांगतात. शक्ती असून सुद्धा अशा प्रकारे क्षमा करण्याचे सामर्थ्य ज्या व्यक्तीमध्ये आहे, त्याला खरे ‘वीर’ म्हटले आहे. म्हणून ‘क्षमा वीरस्य भूषणम्।’ असे म्हटले आहे. वीरांचे वीर भगवान महावीर हेच आपल्याला सांगत आहेत.

क्षमा, हिंसा या शब्दांचे अर्थ लावताना सुद्धा बऱ्याचदा काही आक्षेप घेतले जातात. ‘अन्न खायचे, शेती करायची म्हणजे सुद्धा एकेंद्रीय जीवाची हिंसाच नाही काय? आयुष्याचे पालन करणे जगामध्ये शक्य तरी आहे काय? दुसऱ्याने आपल्यावर आक्रमण केले तर काय आपण अहिंसा म्हणून गप्प बसायचे काय? असे काही आक्षेप आहेत. पण याची उत्तरे सुद्धा भगवान महावीरांनी अत्यंत समर्पक रीतीने दिलेली आहेत. भगवान महावीर सांगतात, की आपल्याला आहार म्हणून जे हवे आहे, ते सृष्टीमध्ये आहे आणि ती सृष्टी आपल्याला योग्य वेळेत देत असते. सृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक जीवाला आपले जीवन पूर्ण जगण्याचा अधिकार आहे. त्या अधिकाराचा सन्मान करण्याची भावना आम्हा प्रत्येकामध्ये असायला पाहिजे. ज्वारीचे पीक शेतामध्ये आले तर आपण कधी काढून घेतो बरं! ते पूर्ण वाळल्यानंतर... पूर्ण मोठी ज्वारी झाल्यानंतर काढून घेतले तर आपल्याला ज्वारी म्हणून साठवता येते आणि वापरता येते. म्हणजे ज्वारीचे जे रोप जन्माला आले त्याचे जीवन संपल्यानंतर ते मानवाच्या उपयोगाला पडले. त्याचाच उपयोग करून मनुष्य आपले जीवन जगू शकतो.

महात्मा गांधी म्हणतात त्याप्रमाणे ‘मनुष्याला गरजेला पुरेल इतके जगामध्ये नक्कीच आहे,’ पण त्याच्या हव्यासासाठी तो हत्या करीत जातो. हा हव्यास मात्र आपण सोडला पाहिजे. आपल्यामध्ये असलेल्या शक्तीचा विकास करणे आणि त्या शक्तीची पूर्णता प्राप्त करणे हे प्रत्येक जीवाचे अधिकारच आहेत आणि कर्तव्य सुद्धा! भगवान महावीरांनी आणि सर्व तीर्थंकरांनी अनंत ज्ञान, अनंत बल, अनंत सुख आणि अनंत दर्शन या अनंत चतुष्टयाची प्राप्ती केली. म्हणजेच अरिहंत पद प्राप्त केले. या अरिहंतांनाच ‘नमो अरिहंता णं।’ असे म्हणून नित्य नमन केले जाते. ते कोणी एक नाहीत, अनंत काळामध्ये अनंत अरिहंत होऊन गेले. आपण सुद्धा होऊ शकतो. त्यासाठीच केवळ समर्पण या भावनेने नाही तर प्रेरणा प्राप्त करण्याच्या दृष्टीने सुज्ञ मनुष्याने त्यांची आराधना करावी.

प्रथमानुयोग म्हणजे सामान्य माणसाला कथेच्या रूपामध्ये सांगणारे ज्ञान उपलब्ध आहे. करणानुयोग म्हणजे कर्माचा सिद्धांत... कर्माचे गणित ...कर्माचे रसायनशास्त्र स्पष्ट करणारे ज्ञान उपलब्ध आहे. चरणानुयोग म्हणजे आचरण कसे करावे ? हे सांगणारे ज्ञान उपलब्ध आहे. द्रव्यानुयोग म्हणजे जगामधील विविध द्रव्य आणि त्याचे गुणधर्म सांगणारे ज्ञान उपलब्ध आहे. हे सर्व भगवान महावीरांनी आपल्याला सांगितले आहे. यांचा अभ्यास केला तर आपल्याला यातले विज्ञान समजते. हे विज्ञानच आपल्या जीवनाला सार्थक बनवणारे व जगातील प्रत्येक जीवाला दुःखापासून मुक्त करणारे विज्ञान आहे.

अशी तत्वे सांगणाऱ्या धर्माची स्थापना भगवान महावीर यांनी केलेली नाही. त्यांच्या आधी २३ तीर्थंकर एका काळामध्ये होऊन गेले आहेत. एका चतुर्थ काळाची ही प्रक्रिया अशी अनंत काळ सुरू आहे. म्हणजे अमुक एक ग्रंथ म्हणजेच सर्व काही...अमुक एक प्रेषित म्हणजेच सर्व काही... बाकी सर्व झूट आहे...यासाठी होणाऱ्या भांडणांचा अंत सुद्धा येथेच आहे. जीवसृष्टीच्या उगमापासून म्हटले तरी चालेल, जीव आले की जीवांचे गुणधर्म आले, जीवांचे गुणधर्म म्हणजेच जिनांचा धर्म! त्याला जैन धर्म असे संबोधले. पण ती एक जात अथवा पंथ नाही. जो जो जीव आहे त्याच्यासाठी तो एक स्वाभाविक धर्म आहे. मते वेगवेगळी असू शकतात...पंथ वेगवेगळे असू शकतात...पण धर्म एकच! जीवांचे गुणधर्म ते जीवाचे धर्म! मग आपण सगळे जीव असू तर आपल्या सगळ्यांचे एकच तत्व, तोच धर्म! ते अहिंसा तत्व, तोच धर्म! ते अनेकांत तत्व, तोच धर्म या तत्वांच्या पालनातच सर्व जगाचे कल्याण सामावलेले आहे.

logo
marathi.freepressjournal.in