जहाँ जहाँ बसे राम, वहाँ वहाँ भारी हारे

भाजप लोकसभा निवडणूक हरली आहे हेच खरे आहे. भाजप आता काही दावे करत असला तरी सत्य हेच आहे की, भाजपचा गर्वाचा फुगा फुटला आहे.
जहाँ जहाँ बसे राम, वहाँ वहाँ भारी हारे
Published on

ॲड. हर्षल प्रधान

मत आमचेही

भाजप लोकसभा निवडणूक हरली आहे हेच खरे आहे. भाजप आता काही दावे करत असला तरी सत्य हेच आहे की, भाजपचा गर्वाचा फुगा फुटला आहे. आता सत्ता मिळाली म्हणून भाजपने कितीही गाजावाजा केला तरी भारतीय जनतेने भाजपला नाकारले असल्यामुळे आज ना उद्या एखाद्या बिहार किंवा आंध्र प्रदेश राज्याकडून त्यांना धक्का लागेल आणि मोदींच्या या दोन्ही कुबड्या गळून जातील आणि त्यांचे सरकार कोसळेल. नितीशकुमार आणि चंद्राबाबू आता मोदींच्या एनडीएला नामोहरम करतील आणि त्यांच्या अवास्तव मागण्यांना कंटाळून कदाचित मोदीच ‘सत्ता नको, पण या बाबूंना आणि त्यांच्या त्रासदायक मागण्यांना आवरा’, असे म्हणतील. भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला हेच सत्य आहे आणि त्यांनी हे सत्य लवकरात लवकर स्वीकारावे.

अयोध्या हार गए, चित्रकुट हार गए, रामटेक हार गए, नासिक हारे, रामेश्वरम हारे, खाटू श्याम हारे, सालासर हारे, रानी सती हारे, मेहंदीपूर बालाजी हारे, प्रयागराज हारे. जहाँ जहाँ बसे राम, वहाँ वहाँ भारी हारे, अशी आजच्या भाजपची अवस्था आहे. प्रभू रामाला गृहीत धरले की काय होते याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणावे लागेल. मोदींना आपण ईश्वरी अवतार असल्याचा झालेला साक्षात्कार असो किंवा आपला जन्म ईश्वरी कार्यासाठी झाल्याचे पडलेले स्वप्न असो, त्यांच्या वक्तव्यांनी त्यांनीच स्वतःची ही अवस्था करून घेतली आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. देवाचे अस्तित्व मान्य करा अथवा करू नका, परंतु त्यास अनुल्लेखून स्वतःचे महत्त्व वाढवू नका. त्याच्या अस्तित्वाला आव्हान देऊ नका. आपणच ईश्वर आहोत, अशा वल्गना करू नका, हाच या उदाहरणातून मिळालेला बोध आहे.

लोकांनी ईश्वराच्या या अवताराला नाकारले

मोदी हे स्वतःला ईश्वराचा अवतार समजत होते. या व्यक्तीचा दारुण पराभव भारतीय जनतेने केला असून हा लोकशाहीने हुकूमशाहीवर, झुंडशाहीवर मिळवलेला विजय आहे. नरेंद्र मोदी यांचा ‘चारशे पार’चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. लोक सार्वभौम आहेत हे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. लोकशाहीचे संरक्षणकर्ते शेवटी सामान्य नागरिकच असतात हे भारताने दाखवून दिले. चारशे जागा निवडून आणणारच, या अहंकारास शेवटी भारतीय जनतेने पायदळी तुडवले. खुद्द वाराणसीत नरेंद्र मोदी हे सुरुवातीस पिछाडीवर पडले, तेव्हा देव जागा आहे हे दिसून आले. नरेंद्र मोदी व अमित शहा या जोडगोळीने भारताचा तुरुंग केला होता. जनतेलाही मोकळेपणाने बोलण्याचे व वावरण्याचे स्वातंत्र्य नव्हते. दिल्ली, झारखंडच्या बहुमतातील मुख्यमंत्र्यांना सरळ तुरुंगात टाकणाऱ्या मोदी-शहांनी भारतीय जनता पक्षाचे ‘वॉशिंग’ मशीन केले. देशातील सर्व पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना भाजपमध्ये आणून ‘आयेगा तो मोदी ही’ हा नारा देणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली. भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही हे पहिले सत्य व तथाकथित ‘एनडीए’च्या बहुमताचा आकडा काठावर आहे. म्हणजे ‘चारशे पार’च्या रथावर स्वार होऊ पाहणाऱ्या मोदी यांना रिक्षात बसून रायसिना हिलवर फिरावे लागणार आहे. ज्या उत्तर प्रदेशात राम मंदिराचे राजकारण करून मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य म्हणून प्रस्थापित करू पाहत होते त्या उत्तर प्रदेशात मोदी व भाजपला मोठा हादरा बसला आहे. उत्तर प्रदेशात ८० पैकी ४० जागांवर समाजवादी पार्टी व काँग्रेसने आघाडी घेतली. अमेठीत स्मृती इराणी यांचा पराभव शेवटी राहुल गांधी यांच्या सामान्य कार्यकर्त्याने केला. रायबरेलीत राहुल गांधी स्वतः विजयी झाले. मोदी यांच्या अहंकाराचा गाडा रोखण्याचे काम शेवटी उत्तर प्रदेश व महाराष्ट्राने केले.

गांधी अभी जिंदा है

महात्मा गांधींना त्यांच्यावर सिनेमा यायच्या आधी कोणी ओळखतच नव्हते, असे विधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे ‘गांधी अभी जिंदा है’ हेच अधोरेखित झाले आणि गांधींनीही मोदींना त्यांची जागा दाखवली, असेच म्हणावे लागेल. गुजरातमधील एका हिंदू कुटुंबात जन्मलेल्या आणि वाढलेल्या गांधींनी इनर टेंपल, लंडन येथे वकिलीचे शिक्षण घेतले. जून १८९१ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी व्यवसायासाठी ते भारतात परतले. भारतात दोन वर्षे अनिश्चित स्थितीत राहिल्यानंतर ते १८९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेत एका भारतीय व्यापाऱ्याच्या दाव्यासाठी गेले. ते २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत कुटुंबासोबत राहिले आणि इथेच असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधींनी प्रथम केला. १९१५ मध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी ते भारतात परतले आणि त्यांनी अन्यायकारक जमीन कर आणि भेदभावाच्या विरोधात शेतकरी, कामगार आणि शहरी मजुरांना आंदोलन करण्यासाठी संघटित केले. इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्वधर्मसमभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ सुरु केली. गांधींनी भारतातील ग्रामीण गरीबांची ओळख म्हणून स्वतः कातलेल्या सुताचा पंचा घालण्यास सुरुवात केली. आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले. ऑगस्ट १९४७ मध्ये भारताने स्वातंत्र्य मिळवले. परंतु ब्रिटिश भारतीय साम्राज्य हे दोन अधिराज्यांमध्ये विभागले गेले. एक हिंदूबहुल भारत आणि मुस्लिमबहुल पाकिस्तान. अनेक विस्थापित हिंदू, मुस्लिम आणि शीख त्यांच्या नवीन भूमीत जात असताना, विशेषतः पंजाब आणि बंगालमध्ये धार्मिक हिंसाचार सुरू झाला. स्वातंत्र्याच्या अधिकृत उत्सवापासून दूर राहून गांधींनी या पीडित भागांना भेट दिली आणि होणारी हिंसा कमी करण्याचा प्रयत्न केला. धार्मिक हिंसाचार थांबवण्यासाठी अनेक उपोषणे केली. तेव्हा ते ७८ वर्षांचे होते. गांधींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांनी १९३० साली त्यांची ‘अर्धनग्न फकीर’ म्हणून निर्भत्सना केली. अहिंसात्मक असहकार आंदोलनांच्या माध्यमातून गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. इतकेच नाही, तर अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले. गांधी हे सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. हा इतिहास भाजप आणि मोदी यांनी नीट लक्षात ठेवला असता तरी त्यांच्याकडून गांधीजींचा असा अपमान झाला नसता.

महाराष्ट्र आधार देशाचा

महाराष्ट्र हाच देशाचा आधार आहे, हेच याही निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हेच खरे नेते आहेत. महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांनाच ‘असली’ नेता आणि बाळासाहेब ठाकरे यांचा ‘खरा वारसदार’ मानते. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून केलेले कार्य आजही महाराष्ट्रातील जनता विसरली नाही. राज्याचे नेतृत्व कसे असावे हे उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यपद्धतीने दाखवून दिले. त्यामुळेच राज्यातील जनतेने उद्धव ठाकरे यांना आपल्या परिवारात स्थान दिले आणि त्यांना नेतृत्वही बहाल केले. भाजपच्या लोकसभेतील पराजयात सगळ्यात महत्त्वाचा वाटा जर कोणी उचलला असेल तर तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हे आता अधोरेखित झाले आहे. देशाला पुढील काळात दिशा दाखवण्याचे कार्य उद्धव ठाकरे आणि शरद पवार करतील आणि अहंकारी भाजप-मोदीमुक्त भारत करून दाखवतील, याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात कोणतीही शंका नाही.

(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in