भाजपचे दक्षिणायन आणि राजकीय सांगावा

लोकसभेच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाला दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही चार राज्ये वगळता उत्तर आणि पश्चिम भारतात मोठा फटका बसला. मात्र उत्तर आणि पश्चिम भारतातील नुकसान दक्षिण भारतात भरून निघाले.
भाजपचे दक्षिणायन आणि राजकीय सांगावा

- श्रीनिवास राव

विश्लेषण

लोकसभेच्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाला दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड ही चार राज्ये वगळता उत्तर आणि पश्चिम भारतात मोठा फटका बसला. मात्र उत्तर आणि पश्चिम भारतातील नुकसान दक्षिण भारतात भरून निघाले.

यापूर्वी दक्षिणेत भाजपला केवळ कर्नाटकच सर करता येत होते. यावेळी मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील सर्व राज्यांमधील जागा वाढवण्याची व्यूहनीती आखून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचार केला. धर्माचा आधार घेतला, जातींना गोंजारले. मात्र तरीही अपेक्षेइतक्या जागा मिळाल्या नाहीत. असे असले तरी मिळालेल्या जागांचे महत्त्व नाकारण्यासारखे नाही. दक्षिणेतील सर्वात मोठे राज्य असणाऱ्या तमिळनाडूमध्ये भाजपला खाते उघडता आले नसले तरी तेथील मतांमध्ये वाढ झाल्याने पक्षविस्ताराची उत्तम संधी निर्माण झाली आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशने भाजपला हवाहवासा जनाधार दिला. तेलुगु देसम पक्ष (टीडीपी) आणि जनसेना पक्ष (जेसीपी) यांच्याशी युती केल्याने भाजपला तिथल्या सत्तेत सहभागी होता आले.

दक्षिण भारतातील पाच राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण १३२ जागा आहेत. सर्वात मोठे राज्य असणाऱ्या तमिळनाडूमध्ये ३९ जागा आहेत. कर्नाटकमध्ये २८, आंध्र प्रदेशमध्ये २५, केरळमध्ये २०, तर तेलंगणामध्ये १७ जागा आहेत. लक्षद्वीप, पुद्दुचेरी आणि अंदमान-निकोबारमध्ये प्रत्येकी एक जागा आहे. गेल्या वेळी या राज्यांमध्ये दोन्ही मोठ्या राष्ट्रीय पक्षांना प्रत्येकी २९ जागा मिळाल्या होत्या. तर इतर पक्षांना ७४ जागांवर यश मिळाले होते. यंदा भाजपला दक्षिणेत २९ जागाच मिळाल्या, मात्र निवडणुकपूर्व युतीमुळे मित्रपक्षांच्या रुपात आणखी सुमारे २२ जागा पदरात पाडून घेता आल्या. पूर्वी कर्नाटक सोडले तर दक्षिणेकडील राज्यांमध्येही भाजपची कामगिरी फारशी चांगली नसायची. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाली होती. राज्यातील लोकसभेच्या २८ पैकी २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. पण वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मिळवलेल्या विजयाने भाजपसाठी कर्नाटकही बहुमत मिळवण्यासाठी अवघड ठरलेल्या राज्यांच्या यादीत गेले. या वेळी भाजपने येथे धर्मनिरपेक्ष जनता दलाबरोबर युती केली. पण धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रज्वल रेवण्णा तसेच त्यांच्या वडिलांचे कथित लैंगिक अत्याचार प्रकरण उघडकीस आल्याचा फटका भाजपला बसेल असे वाटले होते. परंतु प्रत्यक्षात तसे न होता भाजपला फक्त दहा जागांचा फटका बसला. मित्रपक्ष धर्मनिरपेक्ष जनता दलालाही दोन जागा मिळाल्या. सत्ताधारी काँग्रेसला केवळ नऊ जागांवर समाधान मानावे लागले.

दक्षिणेतील तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये काँग्रेसने दोन तर भाजपने एका जागी विजय मिळवला. पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसने बाजी मारली खरी, पण भाजपने अंदमान निकोबारची जागा काँग्रेसकडून हिसकावून घेतली. लक्षद्वीपमध्ये काँग्रेसने बाजी मारली. तेलंगणामध्ये लोकसभेच्या १७ जागा आहेत. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत या राज्यात काँग्रेसचे सरकार आले होते. पण तरीही इथे भाजपने चांगल्या जागा मिळवल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला इथे चार जागा मिळाल्या होत्या. या वेळी आठ जागा जिंकून भाजपने येथील सत्ताधारी काँग्रेसला भविष्यासाठी मोठा धोका निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत. या राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये तुल्यबळ स्पर्धा होती. राज्यावर सत्ता गाजवणाऱ्या भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षाची सत्ता पाच महिन्यांपूर्वी संपुष्टात आली. आंध्र प्रदेशमध्ये नव्या मैत्रीकराराचा फायदा झाला. लोकसभेच्या २५ जागा असणाऱ्या या राज्यात प्रादेशिक पक्षांसोबतची युती भाजपच्या कामी आली. भाजपने लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या. पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत भाजपला इथे खातेही उघडता आले नव्हते. भाजपचा मित्रपक्ष तेलुगु देसम पक्षाने १६ तर जनसेना पक्षाने दोन जागा जिंकल्या. सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला केवळ चार जागा मिळाल्या. भाजपच्या मतांच्या टक्केवारीतही मोठी वाढ झाली. त्यांनी सहा जागांवर निवडणूक लढवून ११ टक्क्यांहून अधिक मते मिळवली. गेल्या वेळी त्यांना एक टक्काही मते मिळाली नव्हती.

तमिळनाडूमध्ये भाजपने राज्यात सक्रिय असणाऱ्या छोट्या पक्षांसोबत आघाडी करून सत्ताधारी द्रमुकला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना यश मिळाले नसले तरी मतांची टक्केवारी वाढली. केरळमध्ये काँग्रेसची लाट असूनही भाजपने खाते उघडले. सुरेश गोपी त्रिशूरमधून विजयी झाले. लोकसभेच्या २० जागा असणाऱ्या केरळमध्ये भाजपचा हा पहिलाच विजय आहे. त्यांना या राज्यात १६ टक्क्यांहून अधिक मते मिळाली. ती काँग्रेसच्या एकूण मतांच्या टक्केवारीच्या निम्मी आहे. बऱ्याच काळापासून भाजप दक्षिणेकडील राज्यांमध्ये ‌‘उत्तर भारतीय पक्ष‌’ मानला जात होता. सर्व प्रयत्न करूनही कर्नाटक वगळता दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्रवेश करू शकला नव्हता. २०१९ मध्ये मोदी लाटेतही आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडूमध्ये एकही जागा जिंकता न आल्याने भाजप दक्षिणेबाबत अधिक गंभीर झाला. तमिळनाडूमध्ये भाजपने १९९९ मध्ये जयललिता यांच्या अण्णाद्रमुकशी युती करुन तीन जागा जिंकल्या होत्या. मात्र त्यावेळी त्यांच्या मतांची टक्केवारी ३.६६ होती. आता ती ११.२४ पर्यंत वाढली आहे. याचा अर्थ भाजपने द्रविड पक्षांच्या मतांचा वाटा कमी केला आहे. येथे मित्रपक्ष असणाऱ्या अण्णाद्रमुकमधील फुटीचा फायदा भाजपला झाला. आता भाजप तिथे प्रमुख विरोधी पक्षाची जागा घेऊ पाहत आहे. अर्थात राज्यातील ३९ पैकी २२ जागा जिंकणाऱ्या द्रमुकच्या मतांची टक्केवारी कमी करणे अजूनही सोपे नाही.

भाजपच्या दक्षिणेतील एकूण कामगिरीवरून कोणताही राष्ट्रीय पक्ष चार धडे घेऊ शकतो. त्यातील एक म्हणजे प्रत्येक राज्याचे स्वतःचे असे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटक असतात आणि ते मतदानावर परिणाम करतात. त्यामुळेच भाजपने दक्षिणेतील प्रत्येक राज्यात मतांची टक्केवारी आणि जिंकलेल्या जागांच्या बाबतीत परस्परविरोधी कामगिरी दाखवली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे कोणताही राष्ट्रीय पक्ष दक्षिणेतील प्रादेशिक पक्षांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तेलुगु देसम आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने हे सिद्ध केले आहे. तिसरा धडा म्हणजे विचारधारा आणि राजकीय वक्तृत्वामुळे मते मिळू शकतात; पण मतांचे रूपांतर जागांमध्ये होईल याची खात्री देता येत नाही. केरळ आणि तमिळनाडूने भाजपला ते दाखवून दिले आहे. शेवटचा धडा म्हणजे दक्षिणेकडील राजकारणात चित्रपट तारे, तारकांचा प्रभाव अजूनही कायम आहे. भाजपचे आंध्र प्रदेश आणि केरळमधील चित्रपट कलाकारांशी असलेले संबंध आणि त्यातून होणारे निवडणूक फायदे यावरून हे स्पष्ट होते.

( लेखक राजकीय अभ्यासक आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in